You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
महाराष्ट्रात ऐन दिवाळीत पाऊस का पडतोय?
- Author, राहुल गायकवाड
- Role, बीबीसी मराठीसाठी
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध भागांमध्ये पावसाच्या सरी कोसळत आहेत. 4 नोव्हेंबरला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील अनेक भागांमध्ये मध्यम स्वरुपाच्या पावसाच्या सरी कोसळल्या.
तर कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. एैन दिवाळीत पाऊस आल्याने अनेकांची निराशा झाली. पण दिवाळीत नेमका पाऊस का पडतोय ? यंदाच्या वर्षीच असा पाऊस होतोय की याआधी देखील दिवाळीत पाऊस झाला होता? याच प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करुयात.
सध्या अग्नेय अरबी समुद्रात तसंच लक्षद्वीपदवळ कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यामुळे दक्षिण भारतात पाऊस पडतोय. हा कमी दाबाचा पट्टा महाराष्ट्राच्या किनारपट्टीपर्यंत आहे. त्यामुळे 7 नोव्हेंबरपर्यंत पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर सोलापूर, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये देखील पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दिवाळीत नेमका पाऊस कसा ?
दिवाळीत नेमका पाऊस कसा काय पडतोय असा प्रश्न अनेकांना पडला आहे. असा पाऊस यंदाच होतोय की याआधी देखील झाला होता अशी देखील विचारणा केली जातीये.
याबाबत बीबीसी मराठीने ज्येष्ठ हवामानतज्ञ डॉ. जीवनप्रकाश कुलकर्णी यांना विचारलं. कुलकर्णी म्हणाले, "गेल्यावर्षी देखील दिवाळीपर्यंत पाऊस पडल्याचं आपण पाहिलं होतं. अरबी समुद्रावर किंवा बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला की पाऊस पडत असतो. सध्याच्या काळात मान्सूनचा पाऊस हा खाली सरकरत आहे. त्यामुळे या काळात तामिळनाडू, कर्नाटकात पाऊस पडत असतो. हा पाऊस काहीवेळा महाराष्ट्रात देखील पडतो."
"हा पाऊस असमान्य आहे असं देखील म्हणता येणार नाही. नोव्हेंबरमध्ये पाऊस कमी असतो. परंतु कधी कधी बदललेल्या पावसाच्या पॅटर्नमुळे असा पाऊस पडतो. मान्सून प्रमाणे सर्वदूर पडणारा हा पाऊस नाही हा काही तुरळक ठिकाणी पडतो. त्यामुळे एक दोन दिवस पडून पाऊस जातो," असं देखील कुलकर्णी म्हणाले.
डिसेंबरमध्ये गारपीट होण्याची शक्यता?
मान्सूनचा पॅटर्न बदललाय. गेल्या पाच वर्षांत यात अनेक बदल झाले आहेत. नोव्हेंबरमध्ये गरमी तर डिसेंबरमध्ये गारपीटीची शक्यता असल्याचं मत भौतिकशास्त्रज्ञ आणि हवामान तज्ञ प्रा. किरणकुमार जोहरे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना व्यक्त केलं.
जोहरे म्हणाले, "2019 ला 15 जुलैला राज्यात मान्सूनला सुरुवात झाली. 2020 ला 15 ऑगस्टला मान्सूला सुरुवात झाली. तर 2021 ला मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापून जाण्यासाठी 28 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर एवढा कालावधी लागला. त्यामुळे यंदा सप्टेंबर ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर या महिन्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. सध्या पडत असलेला पाऊस हा संपूर्ण महाराष्ट्रात नाहीतर काही ठिकाणी होतोय. असाच पाऊस ख्रिसमसला देखील होण्याची शक्यता आहे."
"गेल्या 20 वर्षांत पावसाचा पॅटर्न खूप बदलला आहे. सध्या पडणारा पाऊस हा पावसाच्या बदललेल्या पॅटर्नमुळे पडणारा पाऊस आहे. पुढच्या काही वर्षांमध्ये देखील अशाच बदललेल्या पॅटर्नमुळे पाऊस पडण्याची शक्यता आहे. यात बदल होऊ द्यायचा नसेल तर सेंद्रीय शेती करण्याची गरज आहे," असं देखील जोहरे म्हणाले.
पुढचे दोन-तीन दिवस पावसाचे
पुढचे दोन तीन दिवस सुद्धा राज्यातील काही भागांमध्ये पाऊस पडेल असा अंदाज पुण्याच्या हवामान विभागाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्यपी यांनी बीबीसी मराठीशी बोलताना वर्तवला.
कश्यपी म्हणाले, "दिवाळीत पाऊस पडू शकतो असा अंदाज हवामानखात्याने आधीच वर्तवला होता. 5 नोव्हेंबरलासुद्धा दुपारनंतर कोकण आणि पश्चिम आणि मध्य महाराष्ट्रात पाऊस पडण्याची शक्यता आहे. 6 ते 8 जिल्ह्यांमध्ये हा पाऊस पडेल. हा असाधरण पाऊस आहे परंतु याला दुर्मिळ पाऊस म्हणता येणार नाही."
दिवाळीत पडणाऱ्या पावासाच्या कारणांबाबत बोलताना कश्यपी म्हणाले, "अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. उत्तर ते पश्चिम असा त्याचा प्रवास सुरु आहे त्यामुळे हा पाऊस पडल्याचं आपल्याला दिसत आहे. पुढे दोन तीन दिवस सुद्धा पाऊस पडेल असा अंदाज आहे."
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)