You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
Climate change COP26 : अतिभयंकर अशा नैसर्गिक आपत्ती आता 'आपल्या जगण्याचा एक भाग होणार'
- Author, मॅट मॅकग्रा
- Role, पर्यावरण प्रतिनिधी
तीव्र अशा उष्णतेच्या लाटा (हिटवेव्हज), विध्वंसकारी पूर आता आपल्यासाठी न्यू नॉर्मल ठरणार आहे, आपल्या जगण्याचाच एक भाग होणार आहेत असं जागतिक हवामान संघटनेने म्हटलं आहे.
2021 मधली हवामान बदलाची स्थिती यासंबंधी जो एक रिपोर्ट प्रकाशित झालाय त्यात एका शब्दाला अधोरेखित केलंय - 'आपल्या डोळ्यादेखत बदलणारी परिस्थिती.'
2002 पासून गेल्या 20 वर्षांत वाढलेलं सरासरी तापमान पाहिलं तर औद्योगिक क्रांतीआधीच्या तुलनेत ते पहिल्यांदा 1 अंश सेल्सिअसने वाढण्याच्या मार्गावर आहे.
जागतिक हवामान संघटनेने ही आकडेवारी ठरलेल्या वेळेच्या आधीच प्रकाशित केलीये म्हणजे ग्लासगोत होणाऱ्या जागतिक हवामान परिषदेचा मुहुर्त साधता येईल.
'द स्टेट ऑफ क्लायमेट' असं नाव असणारा हा रिपोर्ट भविष्यात आपल्यापुढे काय वाढून ठेवलं आहे याची एक झलक दाखवतो. वाढतं तापमान, वाढती समुद्राची पातळी, अतिभयंकर नैसर्गिक आपत्ती असं सगळं त्यात आहे.
हे वर्ष धरून गेली सात वर्षं सगळ्यात गरम होती कारण ग्रीनहाऊस वायूंच्या उत्सर्जनाने उच्चांक गाठला असंही या अभ्यासात म्हटलं आहे.
सतत वाढत्या तापमानामुळे आपला ग्रह, आपली राहती पृथ्वी अशा परिस्थिती ढकलली जातेय ज्याची कधी कोणी कल्पनाही केली नव्हती असंही या अभ्यासात म्हटलंय.
"अतिभयंकर वातवरणीय बदल, नैसर्गिक आपत्ती आता न्यू नॉर्मल असतील, आपल्या जगण्याचा भाग असतील," असं जागतिक हवामान संघटनेचे प्रा पेटेरी तालस म्हणतात.
"यातल्या काही नैसर्गिक आपत्ती मानवनिर्मित आहेत याचे भरपूर पुरावे सापडत आहेत."
प्रा तालस यांनी या वर्षभरात घडलेल्या काही नैसर्गिक आपत्तींची यादीच केली.
जगाच्या इतिहासात पहिल्यांदाच ग्रीनलँडच्या बर्फाच्छादित शिखरांवर पाऊस पडला - बर्फ पडायच्याऐवजी.
कॅनडा आणि त्याच्या आसपासच्या अमेरिकेच्या प्रदेशात उष्णतेची लाट लाट आली. ब्रिटिश कोलंबियातल्या एका खेडेगावात तर तापमान 50 अंश सेल्सिअसवर पोहचलं.
कॅलिफोर्नियातल्या डेथ व्हॅलीत एक नाही तर अनेक उष्णतेच्या लाटा आल्यामुळे तिथलं तापमान 54.4 सेल्सिअसवर पोहचलं
चीनमध्ये जो पाऊस कित्येक महिन्यांच्या काळात पडतो तो काही तासातच धोधो कोसळला.
युरोपच्या काही भागात भयानक पूर आला, अनेक लोकांचा यात मृत्यू झाला आणि अब्जावधी रूपयांचं नुकसान झालं.
अमेरिकेच्या दक्षिण भागात समशीतोष्ण तापमान असतं. तिथे सलग दुसऱ्यावर्षी दुष्काळ पडला आणि त्यामुळे तिथल्या नद्या आटल्या. परिणामी शेती, दळणवळण आणि ऊर्जा निर्मितीला जबर फटका बसला.
जागतिक हवामान संघटनेच्यामते जगात आणखी एक काळजीत टाकणारी गोष्ट घडतेय, ती म्हणजे जगभरात वाढणारी समुद्राची पातळी.
समुद्रांची पातळी 90 च्या दशकाच्या सुरुवातीला सॅटेलाईटच्या मदतीने अचूकपणे मोजली गेली होती. तेव्हापासून, म्हणजे 1993 ते 2002 या काळात ती पातळी वर्षाला 2.1 मिलीमिटर या वेगाने वाढतेय.
पण 2013 ते 2021 या काळात या वाढीचा वेग दुप्पट झाला आणि आता ती वर्षांला 4.4 मिलीमिटर या वेगाने वाढतेय. कारण? वेगाने वितळणाऱ्या हिमनद्या आणि हिमनग.
"समुद्राची पातळी ज्या वेगाने वाढतेय, त्यावेगाने गेल्या दोन हजार वर्षांत कधी वाढली नव्हती," ब्रिस्टॉल ग्लेशिओलॉजी सेंटरचे प्रो जॉनथन बॉम्बर म्हणतात.
"जर आपण असंच वागत राहिलो तर 2100 पर्यंत 63 कोटी लोकांना जगभरात विस्थापित व्हावं लागेल. त्याचे परिणाम महाभयंकर असतील."
तापमानाचीच गोष्ट करायची झाली तर 2021 हे आजवर नोंद झालेल्या सर्वाधिक तापमानांच्या यादीत सहाव्या किंवा सातव्या नंबरवर असेल.
तेही यावर्षी लाल निना घडलं म्हणून. ला निना म्हणजे जागतिक हवामानातली ती घटना जी आपसूक जागतिक तापमान कमी करते.
पण या रिपोर्टमध्ये असंही म्हटलंय की गेल्या 20 वर्षांत पहिल्यांदा जागतिक तापमान 1 सेल्सिअसची लक्ष्मणरेषा ओलांडायच्या बेतात आहे.
"मुळात 20 वर्षांची तापमानवाढीची सरासरी औद्योगिक क्रांतीआधीच्या काळाच्या सरासरीपेक्षा 1 सेल्सिअसने वाढलीये ही गोष्टच COP26 परिषदेत हजेरी लावणाऱ्या सदस्यांना जागतिक तापमानवाढ नियंत्रित केली पाहिजे यावर विचार करायला लावेल. पॅरिसमध्ये सहा वर्षांपूर्वी जी मर्यादा ठरवली होती ती पाळायला हवी हे ठसवेल," यूकेच्या हवामान विभागाचे प्रमुख वैज्ञानिक स्टेफन ब्लेचर सांगतात. त्यांनी या रिपोर्टसाठी योगदान दिलं आहे.
या विश्लेषणावर प्रतिक्रिया देताना संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अंतोनियो गुटारेस यांनी म्हटलं की आपल्या डोळ्यादेखत पृथ्वी बदलतेय.
"महासागरांची खोली ते पर्वतांची शिखरं, वितळणाऱ्या हिमनद्या ते सतत येणाऱ्या महाभयंकर नैसर्गिक आपत्ती सगळीकडे पर्यावरणीय संस्था आणि त्यावर अवलंबून असलेले लोक उद्धवस्त होताहेत," ते म्हणाले.
गुटारेस यांनी असंही म्हटलं की, " COP26 परिषद लोकांसाठी आणि पृथ्वीसाठीही एक टर्निंग पॉईंट ठरायला हवा."
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)