You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कॉफी : '...आणि मी एका प्राण्याच्या शी पासून बनलेली कॉफी प्यायलो'
- Author, विनायक गायकवाड
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
चहा किंवा कॉफी नसती तर अनेकांचं काय झालं असतं या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासारखं आहे. आपल्यातले अनेकजण 'टी टॉटलर' किंवा 'कॉफीहॉलीक' असतील. पण कॉफीच्या चाहत्यांसाठी एक विशेष सूचना. पुढे जे वाचणार आहात त्यामुळे तुमच्या कॉफी प्रेमाला फटका बसू नये इतकीच अपेक्षा.
काही महिन्यांपूर्वी कामानिमित्त इंडोनेशियाला जाणं झालं. इंडोनेशिया... सध्या भूकंप आणि त्सुनामीनं हादरलेला हा देश. पण हा आणखी एका कारणासाठी ओळखला जातो तो त्यांच्याकडे मिळणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या कॉफीमुळे. मलाही कॉफी मनापासून आवडते. त्यामुळे एका महिन्यात मी अनेक प्रकारच्या कॉफी ट्राय केल्या. कॉफीच्या टेस्टमध्ये इतकं वैविध्य असू शकतं हे मला पहिल्यांदाच जाणवलं. पण माझं कॉफीप्रेम संपलं नव्हतं. कारण मला टेस्ट करायची होती जगातील सर्वांत महाग कॉफीपैकी एक - लुवाक कॉफी.
आता तुम्ही म्हणाल यात काय आहे? अशा अनेक महागड्या कॉफी आहेत. पण थांबा, जर मी तुम्हाला म्हटलं की लुवाक कॉफी ही थेट कॉफीच्या बियांपासून नाही तर एका प्राण्याच्या 'शी'पासून म्हणजे विष्ठेपासून बनते असं सांगितलं तर? घाबरू नका. कॉफी बनवण्याची प्रक्रिया पूर्णपणे नैसर्गिक आहे. हा आहे ब्लॅक कॉफी पिणाऱ्यांसाठी एक छान ऑप्शन.
कॉफी लुवाक बनते कशी?
इंडोनेशियातील सुमात्रा, जावा, बाली आणि सुलावेसी या बेटांवर प्रामुख्याने कॉफी लुवाकचं उत्पादन होतं. या कॉफीला नाव दिलं गेलंय ते 'लुवाक' नावाच्या प्राण्यावरून.
लुवाक हा मांजरासारखाच प्राणी. आकारानं मांजरापेक्षा थोडा मोठा. या प्राण्यांचं वैशिष्ट्य म्हणजे हे प्राणी रात्री जागतात आणि दिवसा मस्त झोपा काढतात.
त्यामुळे लुवाक कॉफीची प्रक्रियाही सुरू होते ती रात्री. रात्री या लुवाक प्राण्यांना कॉफीची भरपूर फळं खायला दिली जातात. रात्रभर खाऊन ती फळं हे प्राणी पचवतात, पण बिया मात्र त्यांना पचवता येत नाहीत. परिणामी मग सकाळी त्यांच्या विष्ठेमधून बिया बाहेर पडतात.
मग काम सुरू होतं ते लुवाक कॉफी बनवण्याचं. लुवाकच्या शीमधून बाहेर पडलेल्या कॉफीच्या या बिया गरम आणि थंड पाण्यानं धुतल्या जातात आणि उन्हात सुकवल्या जातात. विशेष म्हणजे इंडोनेशियात ही कॉफी बनवण्यासाठी कुठेही मोठ्या मशिन्स वापरले जात नाहीत. कॉफी मेकिंग मशीन आहेत ते लुवाक प्राणीच. कॉफीच्या बिया सुकल्या की त्या निवडल्या जातात आणि तव्यावर किंवा पातेल्यात भाजल्या जातात.
बिया सुकवल्यामुळे त्यातलं पाणी निघून गेलेलं असतं आणि त्या भाजल्यानं कडक आणि टणकं होऊन कुरकुरीत बनतात. पण या बिया भाजताना त्या सतत परताव्या लागतात. बिया गोल्डन ब्राऊन झाल्या की बाहेर काढल्या जातात. इंडोनेशियात बहुतेक करून चुलीवर बिया भाजल्या जातात. मातीच्या पातेल्यात भाजलेल्या या बियांना त्यामुळे एक वेगळा स्वाद येतो.
बिया भाजून झाल्यावर त्या कुटल्या जातात. कडक झालेल्या बिया कुटायला फार कष्ट पडतात. तरीही त्या हातानेच कुटल्या जातात. या बियांची बारीक पावडर बनेपर्यंत ही प्रक्रिया चालते. नंतर ही पावडर चाळणीतून चाळली जाते आणि आपल्याला मिळते, जगातली सर्वांत महागडी कॉफी - कॉफी लुवाक.
कॉफी लुवाक लागते कशी?
ज्यांना ब्लॅक कॉफी आवडते त्यांना कॉफीच्या वेगवेगळ्या चवी अगदी नीट समजू शकतात. लुवाकची चव ही इतर ब्लॅक किंवा फिल्टर कॉफी सारखी नाही. यात एक उग्रपणा आहे.
नुसती कॉफी पावडर जर चाखली तर एक कडू भुकटी खाल्ल्यायारखी वाटेल. आणि जर कॉफी प्याल तर एक काढा. ही कॉफी हातानं बनवलेली असल्यानं तिची पावडर अगदी बारीक नसते. त्यामुळे कॉफी पिताना की पावडर आणि तिची चव अगदी प्रकर्षानं जाणवते.
इतकंच नाही तर या कॉफीची चव ही लुवाक प्राण्याची पचनप्रक्रीया आणि क्षमतेवरही अवलंबून असते. त्यामुळे उत्तम कॉफी हवी असेल तर लुवाक प्राण्याचं ठणठणीत असणं अगदी महत्त्वाचं आहे.
कॉफी लुवाकची किंमत काय?
आता ही कॉफी इतकी महाग का हे वेगळं सांगायला नको. पण आंतरराष्ट्रीय बाजारात या कॉफीची किंमत जवळपास एका किलोला कमीत कमी ६००० रुपये इतकी आहे. इंडोनेशियात ही किंमत स्वस्त आहे, पण निर्यातीनंतर ही कॉफी महाग बनते असं उत्पादक सांगतात.
ही कॉफी प्यावी की पिऊ नये हे ज्यानं त्यानं ठरवावं. जेव्हा मी ही कॉफी प्यायलो तेव्हा मला ती वेगळी वाटली पण आऊट ऑफ द वर्ल्ड वाटली नाही.
माझ्या बरोबरच्यांना ती इतकी आवडली की एका फ्रेंच जोडप्यानं चक्क ८ मोठी पाकिटं विकत घेतली. माझा खिसा इतकाही गरम नाही की एका कॉफीपायी मी तो रिकामा करेन. पण ही गरम गरम कॉफी प्यायची मजा मात्र कायम लक्षात राहील.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)