Climate Change : हवामान बदलाचा परिणाम तुमच्या खिशावर कसा होऊ शकतो?

हवामान बदलाचे परिणाम आता दिवसेंदिवस दिसायला लागले आहेत. पण, हवामान बदलाचा परिणाम केवळ पर्यावरणापुरता मर्यादित राहणार नाहीये.

हवामान बदलाचा थेट परिणाम तुमच्या बँक खात्यावर म्हणजेच तुमच्या खिशावर होऊ शकतो. कसा ते सांगणारी बातमी बीबीसीनं काही दिवसांपूर्वी केली होती. ती पुन्हा शेयर करत आहोत.

हवामान बदलामुळे केवळ वस्तूंच्या किमती वाढतील आणि बिल दर महिन्याला वाढेल एवढंच नाही. जर तुम्ही पूर किंवा वादळ येण्याची शक्यता जास्त असेल अशा भागात राहत असाल, तर तुमच्या घरालाही धोका असू शकतो. तसंच तुमची नोकरीही जाऊ शकते.

बीबीसीच्या एका अभ्यासानुसार, 1980 पासून पारा 50 अंश सेल्सिअसच्या पुढे गेला अशा दिवसांची संख्या जवळजवळ दुप्पट झाली आहे.

युनायटेड नेशन्स इंटर-गव्हर्नमेंटल पॅनेल ऑन क्लायमेट चेंजच्या (आयपीसीसी) नुकत्याच आलेल्या अहवालानुसार हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी केल्यानंतरही 2040 पर्यंत पृथ्वीचे तापमान 1.5 अंश सेल्सिअसपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.

तापमानात वाढ झाल्याने वादळ, दुष्काळ आणि पूर यांसारख्या नैसर्गिक आपत्तींमध्येही वाढ होण्याची शक्यता असून, त्यामुळे लोकांच्या जीवाला धोका वाढण्याची शक्यता आहे.

हवामानातील बदलांच्या अशा घटनांमुळे पीक वाया जाण्याची धोका अधिक असेल. याचा परिणाम आपल्या दैनंदिन गरजा, अन्न, पाणी आणि वीज यांसारख्या सुविधांवर होऊ शकतो आणि किमतींमध्ये वाढ होऊ शकते.

हवामान बदलामुळे लोकांच्या आरोग्यावरही परिणाम होईल आणि त्यांचा वैद्यकीय खर्च वाढेल. घरांबाबत बोलायचं झाल्यास हवामान बदलामुळे उकाड्यात राहण्यासाठी आणि गोठवणाऱ्या थंडीत राहण्यासाठी एअर कंडिशनर आणि हिटरचा लोकांचा वापर वाढेल. म्हणजे ऊर्जेचा वापर वाढेल आणि तुमचा खर्चही वाढेल.

जागतिक स्तरावर हवामान बदलामुळे मंदावलेला आर्थिक विकास दर आणि वाढती महागाई आपल्या खिशाला फटका देणारी सिद्ध होऊ शकते. यानिमित्त जाणून घेऊया हवामान बदलांमुळे होणारे पाच मोठे बदल.

1. खाद्य पदार्थांच्या किमती वाढतील

हवामान बदलाचा पीकांवर सर्वांत गंभीर परिणाम होईल. अलीकडच्या काही वर्षांत दुष्काळ, पूर, आग आणि वादळ यांसारख्या नैसर्गिक आपत्ती वाढल्या आहेत. पृथ्वीचे तापमान वाढतच राहिले तर नजीकच्या भविष्यात परिस्थिती गुंतागुंतीची होईल, असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे.

आयपीसीसीचा अहवाल बनवणाऱ्या संशोधकांच्या टीमपैकी एक फ्रेडरिक ऑटो हे ब्रिटनमधील ऑक्सफर्ड विद्यापीठात संशोधक आहेत. ते सांगतात, "नजीकच्या काळाच गरम हवेची तीव्रता जास्त असेल आणि त्यात सातत्य दिसून येईल."

मध्य अमेरिकेच्या भागात राहणारे लोक अशा नैसर्गिक आपत्तींचा सामना करत आले आहेत. तर लॅटिन अमेरिका आणि कॅरिबियन देशांमध्ये धान्याचे उत्पादन कमी झालं आहे. या भागात भीषण दुष्काळ येणं आता मोठी गोष्ट राहिलेली नाही.

प्राध्यापक मर्सिडीज-पेड्रॉ बुडिना स्पेनमधील कार्लोस विद्यापीठात 'सोशिओलॉजी ऑफ क्लायमेट चेंज अँड सस्टेनेबल डेव्हलपमेंट रिसर्च ग्रुप'चे संचालक आहेत. ते म्हणतात, "कोणत्याही आपत्तीचा परिणाम आर्थिक घडामोडींवर होतो. यामुळे धान्यांच्या किमतीही वाढतात."

ऊर्जा आणि पाण्याच्या किमती वाढल्या तर त्याचा परिणाम अन्नधान्याच्या उत्पादनावर तसंच मार्केटिंगवर सुद्धा होईल. एकूणच अन्नधान्याच्या किमती वाढतील.

लंडनच्या युनिव्हर्सिटी कॉलेजमधील भूगोलाचे प्राध्यापक मार्क मॅसलिन सांगतात, 'किमतींमध्ये वाढ होणे म्हणजे हवामान बदलांचा खरा परिणाम दिसणे. याचा फटका कुटुंबाच्या आर्थिक बजेटला बसेल.'

2. पाणी आणि वीज बिल वाढणार

मार्क मस्लिन सांगतात, "विजेच्या वाढत्या किमती सर्वत्र सारख्या नसतील कारण वीज कशी निर्माण होते आणि सरकार कोणत्या प्रकारची सबसिडी देतात यावर ते अवलंबून असेल."

परंतु विजेसाठी जलविद्युत प्रकल्पांवर अवलंबून असलेल्या देशांचा आणि हवामान बदलामुळे दुष्काळामुळे बाधित झालेल्या देशांचा विजेच्या किंमतींवर परिणाम होणं स्वाभाविक आहे.

सध्या अनेक देश लांब पल्ल्यात लाभ देऊ शकतील अशा प्रक्रियांवर काम करत आहेत. अनेक देश आता कोळशाऐवजी इतर स्त्रोतांपासून वीजनिर्मिती करण्याचा प्रयत्न करत आहेत. या बदलामुळे किमतींमध्ये काही काळ वाढ दिसेल.

पेड्रॉ बुडिना म्हणतात, "घराचे वीज बिल जास्त असेल, त्यामुळे विजेवर चालणाऱ्या उपकरणांच्या किमतीही वाढू शकतात."

वारंवार पडणारा दुष्काळ आणि वाढत्या तापमानामुळे शेती करणाऱ्या लोकांची संख्या कमी होऊ लागेल. लोक आपली उपजीविका गमावतील असंही जाणकार सांगतात. याचा परिणाम अन्नधान्याची उपलब्धता आणि त्याच्या किमतींवर होईल.

याचा मोठा परिणाम वृद्धांवरही होईल. त्यांच्या विजेच्या गरजा कमी होणार नाहीत, पण कमी उत्पन्नामुळे त्यांच्या घरातील खर्च वाढेल. अनेक ठिकाणी आधीच पाणीटंचाई दिसून येत असून पाण्याच्या बिलांमध्येही वाढ दिसून येत आहे.

पाणी विक्री करणाऱ्या कंपन्यांनी घरांना आणि उद्योगाला पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला तर त्यांना यासाठी बरीच गुंतवणूक करावी लागेल. याचा खर्चही अर्थात ग्राहकांना सोसावा लागेल.

3. अपघातांसाठी विम्याच्या किमती वाढतील

पेड्रॉ बुडीना सांगतात, "विम्याच्या किमतींमध्ये आधीच वाढ होताना दिसत आहे."

एकीकडे कृषी क्षेत्र, घरं आणि सर्व प्रकारच्या आपत्कालीन परिस्थितीसाठी विम्याच्या किंमती वाढत आहेत, तर दुसरीकडे अनेक विमा कंपन्या त्यांना अधिक धोका वाटतो अशा ग्राहकांना नाकारत आहेत.

पेड्रॉ बुडिना 2005 मध्ये अमेरिकेतील 'कॅटरिना' चक्रीवादळाची आठवण करून देतात आणि म्हणतात, "हवामान बदलामुळे धोका असलेली अनेक घरं आहेत आणि [H1] घराचा विमा काढण्यासाठी ते कंपनी शोधू शकलेले नाहीत."

हवामान बदलामुळे होणारे नुकसान जसजसे वाढत जाईल तसतसे विम्याच्या किमतीही वाढू शकतात.

सारा डुगार्टी न्यूयॉर्कमधील ग्रीन फायनान्स सेंटरमध्ये काम करतात. त्या सांगतात, "समजा तुम्ही अशा ठिकाणी राहता जिथे आगीच्या घटना सामान्य आहेत. तेव्हा तुमच्यासाठी विम्याच्या किंमती वाढू शकतात. किंवा तुम्ही जिथे राहता तिथे वादळं वारंवार येत असतील, तर तुमचा प्रीमियम वाढेल."

मोठी चिंता ही आहे की समुद्राच्या पातळीत वाढ झाल्याने विस्थापन आणि स्थलांतरणाचा धोकाही वाढेल. याचा परिणाम केवळ त्या ठिकाणच्या अर्थव्यवस्थेवरच होणार नाही तर मोठ्या संख्येने लोक ज्या देशात पोहोचतील त्या देशाच्या अर्थव्यवस्थेवरही होईल.

4. आरोग्य खर्च वाढेल

वायू प्रदूषणाचा मानवी आरोग्यावर वाईट परिणाम होतो. जागतिक आरोग्य संघटनेनुसार, वायू प्रदूषणामुळे दरवर्षी सुमारे 70 लाख लोकांचा मृत्यू होतो. आणखी एका अभ्यासात याहून गंभीर आकडेवारी समोर आली आहे. एप्रिलमध्ये प्रकाशित झालेल्या हार्वर्ड, बर्मिंगहॅम आणि लेस्टर येथील शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनानुसार, हवेच्या प्रदूषणामुळे दरवर्षी सुमारे 1 कोटी लोकांचा मृत्यू होतो.

दुसरीकडे, हवामान बदलामुळे संसर्गजन्य रोग पसरण्याचा धोका वाढू शकतो, त्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होत असल्याचा इशाराही शास्त्रज्ञ देत आहेत.

'लॅन्सेट काउंटडाऊन' या ब्रिटिश मेडिकल जर्नल लॅन्सेटच्या नुकत्याच आलेल्या वार्षिक अहवालात असं म्हटलं आहे की, 'थंड भागात मलेरिया पसरण्याचा धोका जास्त असेल, तर उत्तर युरोप आणि अमेरिकेत पोटाचा आजार आणि सेप्सिस बॅक्टेरिया पसरण्याचा धोका वाढेल.'

दुसरीकडे, उष्ण ठिकाणी कॉलरा आणि डेंग्यूसारखे आजार जलदगतीने पसरू शकतात.

या अहवालात असंही म्हटलं आहे की, 'सुमारे 60 कोटी लोक समुद्रसपाटीपासून पाच मीटर उंचीवर राहतात. त्यांच्यासाठी पूर आणि तीव्र वादळाचा धोका वाढेल.'

या अहवालाच्या प्रमुख लेखिका मारिया रोमानेलो म्हणतात, "हवामान बदलाच्या परिणांमापासून कोणीही वाचू शकत नाही, हे समजून घेण्याची वेळ आली आहे."

अलीकडच्या काही वर्षांत जगातील काही भागात तीव्र उष्णतेमुळे लोकांच्या आरोग्यावर परिणाम झाला होता.

वॉशिंग्टन विद्यापीठातील प्राध्यापक आणि लॅन्सेट अहवाल तयार करणाऱ्या तज्ज्ञांपैकी एक डॉ. जेरेमी हेस म्हणतात की, सिअॅटल रुग्णालयात काम करताना हवामान बदलाचा परिणाम त्यांनी पाहिला आहे.

ते म्हणाले, "मी उष्माघाताच्या रुग्णांची काळजी घेणाऱ्या आरोग्य सेविकांना पाहिले होते. गुडघे टेकल्यामुळे त्यांच्या गुडघ्यावर जळाल्याच्या जखमा होत्या. उष्णतेमुळे मी अनेक लोकांना मरताना पाहिलं आहे."

5- संथ आर्थिक विकास

स्विस रे इन्स्टिट्यूटच्या संशोधनात असं म्हटलं आहे की, "हवामान बदल हा जागतिक अर्थव्यवस्थेसाठी सर्वांत मोठा दीर्घकालीन धोका आहे."

त्यामुळे त्यानुसार पावलं उचलली नाहीत तर पुढील 30 वर्षांत जागतिक आर्थिक आकुंचन 10 ते 18 टक्क्यांदरम्यान शक्य आहे.

पृथ्वीचे तापमान 3.2 अंश सेल्सिअसने वाढले, तर शतकाच्या मध्यावर सर्वांत वाईट परिस्थिती (जीडीपी 18 टक्क्यांपर्यंत कमी होणं) दिसू शकते.

दुसऱ्या अंदाजानुसार 80 वर्षांत जीडीपीमध्ये सुमारे 10 टक्क्यांनी संभाव्य घट सांगितली जाते. मोजण्याच्या पद्धतींमुळे गणना वेगळी असते. परंतु एक गोष्ट स्पष्ट आहे की आर्थिक दुष्परिणाम वेगाने वाढत आहेत.

सर्वांत धोकादायक परिणाम सर्वांत गरीब देशांमध्ये दिसून येतील. विशेषत: सखल भागात जिथे पूर आणि दुष्काळाचा जास्त परिणाम होतो त्याठिकाणी दिसतील.

जागतिक बँकेचा अंदाज आहे की 2030 पर्यंत हवामान बदलामुळे 13.2 कोटीपेक्षा अधिक लोक कमालीच्या दारिद्र्यात जातील.

एजन्सीच्या म्हणण्यानुसार, 'या मानवनिर्मित आपत्तीमध्ये हवामानाच्या परिणामामुळे कृषी उत्पन्नात घट, कामगारांची उत्पादन क्षमता कमी होणे, अन्नधान्याच्या किंमतीत वाढ, वाढत्या आजारामुळे आर्थिक नुकसान दिसून येईल.'

जागतिक बँकेतील सस्टेनेबल डेव्हलपमेंटचे उपाध्यक्ष जुर्गेन व्योगल यांनी लिहिले की, "जगात संपत्ती वाढत आहे आणि यासोबतच देशांमध्ये असमानता आहे. कमी उत्पन्न असलेले देश त्यांच्या संपत्तीच्या हिश्श्याच्या बाबतीत मागे आहेत."

या गोष्टींचा तुमच्यावर परिणाम होणार नाही असं वाटत असेल तर तुम्ही चुकताहात. तुमच्या खिशाला यामुळे फटका बसणार आहे.

मार्क मॅस्लिन म्हणतात, "तुम्ही ज्या देशात राहता तो देश पुनर्निर्मितीक्षम ऊर्जेला पाठिंबा देत असेल तर तुमच्यावर त्याचा सकारात्मक परिणाम होईल."

ते म्हणाले की इलेक्ट्रिक गाड्या चांगल्या असतील आणि कालांतराने त्यांचा खर्चही कमी होऊ शकतो.

ते सांगतात की, स्वच्छ हवेच्या वातावरणात राहिल्यास लोकांचे आरोग्य सुधारेल आणि त्यांना त्यांच्या उपचारांशी संबंधित खर्च कमी करण्यास मदत होईल.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)