आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने बोटांच्या ठशांबाबतचे महत्त्वपूर्ण संशोधन समोर

फोटो स्रोत, Getty Images
- Author, झोई क्लाइनमान
- Role, तंत्रज्ञान संपादक
प्रत्येक व्यक्तीच्या हाताच्या बोटांचे ठसे हे वेगळे असतात असं मानलं जातं, पण या गोष्टीला आता आर्टिफिशियल इंटिलिजिन्सकडून आव्हान मिळत आहे.
कोलंबिया विद्यापीठाने एक संशोधन केलं आहे ज्यात असा दावा केला आहे की दोन वेगवेगळ्या बोटांचे ठसे हे एकाच व्यक्तीचे आहेत की नाही हे आता आर्टिफिशियल इंटिलिजन्सचा वापर करुन सांगता येऊ शकते.
60,000 बोटांच्या ठशांचा डेटा फीड करून आर्टिफिशियल इंटेलिजन्स टूल विकसित करण्यात आलं आहे. या अभ्यासाचा मुख्य उद्देश हा होता की हे तपासणे की दोन वेगवेगळ्या बोटांचे ठसे हे एकाच व्यक्तीचे आहेत की नाही.
कल्पना करा की एकाच क्राइम सीनवर दोन वेगवेगळ्या बोटांचे ठसे सापडले आहेत. एक ठसा आहे अंगठ्याचा आणि एक ठसा आहे करंगळीचा. तर सध्या असलेल्या तंत्रज्ञानातून हे समजत नाही की ती एकच व्यक्ती होती की त्या दोन व्यक्ती होत्या. पण नवीन तंत्रज्ञानातून ही त्रुटी दूर होऊ शकेल आणि त्यातून गुन्ह्याचा छडा लागण्यासाठी मोठी मदत होईल.
याचाच अर्थ असा आहे की दोन वेगवेगळ्या बोटांवरील ठशांचा सुद्धा विश्लेषण करता येऊ शकतं आणि त्यातून हे समजेल की एकाच व्यक्तीचे हे ठसे आहेत की त्या दोन वेगवेगळ्या व्यक्ती आहेत.
संशोधकांनी दावा केला आहे की वेगवेगळ्या बोटांचे ठसे हे एकाच व्यक्तीचे आहेत की नाही याचं निदान तंत्रज्ञानाचा वापर करुन करता येऊ शकतं. अचूक निदान करण्याची शक्यता 70-75 टक्क्यांपर्यंत असल्याचं संशोधक सांगत आहेत.
पण ते नेमकं कसं काम करतं याबाबत माहिती नाही.
कोलंबिया विद्यापीठातील रोबोटिक्सचे प्राध्यापक हॉड लिपसन यांनी अभ्यासाचं निरीक्षण करताना असं सांगितलं की, "एआय टूल हे काम कशा पद्धतीने करते याची आम्हाला खात्री नाही."
'दोन वेगवेगळ्या बोटांचे ठसे एकसारखे असू शकतात'
संशोधकांच्या मतानुसार, हे उपकरण पारंपारिक पद्धतींपेक्षा वेगळ्या पद्धतीने बोटांच्या ठशांचं विश्लेषण करतं. याचा अर्थ असा की बोटांवरील रेघ कुठेतरी सुरू होऊन कुठेतरी संपते आणि ज्या गोलाकार रेघा असतात त्यावर हे उपकरण लक्ष केंद्रित करते.
प्राध्यापक हॉड लिपसन म्हणाले, "थोडक्यात हे उपकरण फॉरेन्सिक सायन्समध्ये ज्या पद्धती वापरल्या जातात ते वापरत नसल्याचं स्पष्ट आहे. हे उपकरण बोटांच्या ठशांचा वक्राकार भाग वापरत असल्याचं दिसून आलं आहे."
लिपसन पुढे म्हणाले की, जेव्हा हा निकाल आला तेव्हा ते स्वतः आणि त्यांचा विद्यार्थी गॅबे गुओ आश्चर्यचकित झाले.
गॅबे गुओ या पदवीधर विद्यार्थ्याने ही कल्पना सर्वप्रथम मांडली होती.
ते म्हणतात "आम्ही याबद्दल खूप साशंक होतो. आम्ही अधिक सखोल माहिती जाणून घेण्याच्या उद्देशाने त्याची दोनदा चाचणी केली."
युनिव्हर्सिटी ऑफ हलमधील फॉरेन्सिक सायन्सचे प्राध्यापक ग्रॅहम विल्यम्स म्हणाले की, "कोणत्याही दोन बोटांचे ठसे जुळण्याची शक्यता कधी व्यक्तच झाली नाही."
ते म्हणाले, "कोणत्याही दोन व्यक्तींच्या बोटांचे ठसे जुळण्याची शक्यता असल्याचं आम्हाला निश्चितपणे माहित नाही. पण आमच्या माहितीनुसार, कोणत्याही दोन बोटांचे ठसे जुळत नाहीत."

फोटो स्रोत, Getty Images
फॉरेन्सिक सायन्समध्ये ही समस्या आहे का?
कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये करण्यात आलेल्या या अभ्यासाच्या परिणामांमध्ये बायोमेट्रिक्सच्या दोन्ही क्षेत्रांवर प्रभाव टाकण्याची क्षमता असू शकते. जसं की, डिव्हाइस अनलॉक करण्यासाठी आणि किती व्यक्ती आहेत हे ओळखण्यासाठी.
उदाहरण म्हणून बघायचं झालं तर, गुन्ह्याच्या ठिकाणी एखाद्या अज्ञात व्यक्तीचा अंगठा 'A' आढळला आणि गुन्ह्याच्या ठिकाणी 'B' वर तर्जनी आढळली तर फॉरेन्सिक सायन्सला या दोन व्यक्ती आहेत की एक व्यक्ती आहे ते सांगता येणार नाही, पण एआय टूल हे सांगू शकेल.
कोलंबिया युनिव्हर्सिटी टीमने सांगितलं की यावर आणखी संशोधन होणं गरजेचं आहे.
एआय टूल्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता उपकरणं सामान्यत: मोठ्या प्रमाणात डेटा प्रोसेस करतात. त्यामुळे या तंत्रज्ञानाचा विकास करण्यासाठी आणखी बोटांच्या ठशांची आवश्यकता आहे.
याव्यतिरिक्त, हे मॉडेल विकसित करण्यासाठी वापरलेले सर्व बोटांचे ठसे स्पष्ट आहेत. परंतु प्रत्यक्ष जेव्हा काम केलं जाईल तेव्हा बोटांचे ठसे इतके स्पष्ट असतीलच असे नाही.
गॅबे गुओ या पदवीधर विद्यार्थ्याने सांगितलं की, "आम्ही तयार केलेलं उपकरण हे न्यायालयांमध्ये पुराव्याची पडताळणी करण्याच्या पातळीवर काम करू शकत नाही. पण ते फॉरेन्सिक विभागातील काम सुलभ करण्यासाठी वापरलं जाऊ शकतं."

फोटो स्रोत, Getty Images
या संशोधनाच्या मर्यादा कोणत्या आहेत?
स्टॅनफर्ड युनिव्हर्सिटीच्या फॉरेन्सिक सायन्सच्या सहयोगी प्राध्यापक डॉ. सारा फील्डहाऊस म्हणाल्या, "उपकरणाचा हा टप्पा पाहता या अभ्यासाचा गुन्हेगारी प्रकरणांवर तितका प्रभाव पडू शकत नाही."
त्या म्हणाल्या की, पृष्ठभागाच्या संपर्कात त्वचा कशी वळते यावर एआय लक्ष केंद्रित करते. त्यामुळे हे उपकरण देखील पारंपारिक उपकरणासारखेच काम करते का हा प्रश्न आहेच.
इतर एआय साधनांप्रमाणे, याचं उत्तर देणं कठीण आहे कारण हे साधन नेमकं कसं काम करतं याबद्दल संशोधकांमध्ये देखील एकवाक्यता नाही असं त्या म्हणाल्या.
कोलंबिया विद्यापीठाच्या अभ्यासाचा सखोल आढावा घेण्यात आला असून हा अभ्यास सायन्स अॅडव्हान्सेस या जर्नलमध्ये शुक्रवारी प्रकाशित केला जाईल.
पण चेशायरमधील जुळ्या मुलांच्या बाबतीत जो दावा करण्यात आला आहे त्यातून समोर काय होईल हे पाहणे देखील औत्सुक्याचे असणार आहे.
कारण त्यांची आजी कॅरोल यांनी बीबीसीला सांगितलं की त्यांची दोन नातवंडे स्वतःच्या बोटांनी एकमेकांचे आयफोन अनलॉक करू शकतात.
"त्यांनी मला ख्रिसमसच्या दिवशी हे दाखवलं. जेव्हा त्यांचा जन्म झाला तेव्हा आम्हाला सांगण्यात आलं की ते एकसारखे दिसतात. पण ते जसजसे मोठे झाले तसतसा मला त्यांच्यातील फरक स्पष्टपणे सांगता येऊ लागला."
त्या म्हणाल्या की, "त्यांची दोन नातवंडं मोबाइल फोनच्या 'फेशियल रेकग्निशन फीचर'ला फसवू शकतात आणि कोणाचाही चेहरा दाखवून मोबाइल फोन अनलॉक करू शकतात."
या दाव्यावर देखील अधिक संशोधन होणे आवश्यक आहे.
संशोधक सांगतात की जन्मापूर्वीच मानवांच्या बोटांचे ठसे तयार होतात. गेल्या वर्षी प्रकाशित झालेल्या एका शोधनिबंधात असं सुचवण्यात आलं होतं की, झेब्रा आणि चित्ता यांसारख्या प्राण्यांमध्ये जशा अनुवांशिक खुणा मिळतात अगदी त्याप्रमाणेच मानवाच्या शरीरातही तशी प्रक्रिया दिसते.
1950 साली या प्रक्रियेबद्दल पहिल्यांदा अॅलन ट्युरिंग यांनी सांगितलं होतं. त्या सिद्धांतावर आधारित संशोधन गेल्या वर्षी प्रकाशित झालं होतं.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








