विष्ठा पाण्यावर तरंगण्याचं कारण संशोधनातून आलं समोर

- Author, रिचर्ड ग्रे
- Role, संपादक, बीबीसी फ्युचर
तुमची विष्ठा पाण्यात तरंगताना तुम्ही कधी पाहिलंय का? संशोधकांच्या मते, या प्रश्नातच त्याचं उत्तर दडलंय, किंबहुना यात आपल्या आरोग्याचीही काही रहस्य दडली आहेत.
जर तुम्हाला अनोळखी व्यक्तीने हा प्रश्न विचारला तर ते तुमच्यासाठी खूप विचित्र असेल. नाही का?
आणि जर हाच प्रश्न ई-मेलवर विचारला तर?
म्हणजे हा प्रश्न खरं तर खूप खाजगी आहे. पण मिनेसोटाच्या रोचेस्टर येथील मेयो क्लिनिकमधील स्टेम सेल आणि कॅन्सर बायोलॉजी प्रयोगशाळेचे संचालक नागराजन कन्नन यांनी हा प्रश्न अतिशय मनोरंजक पद्धतीने विचारला. त्यामुळे आमची याविषयीची उत्सुकता आणखीन चाळवली.
नागराजन हे त्यांचा दिवसातील बहुतेक वेळ स्तनाच्या कर्करोगाच्या सेल्युलर आणि आण्विक यंत्रणेवर काम करण्यात घालवतात. आणि त्यांचा फावला वेळ ते कोडी सोडवण्यात किंवा लोकांच्या समस्या सोडवण्यात घालवतात.
जसं की, समस्या अशी होती की विष्ठा पाण्यात का तरंगते?
आपल्या प्रत्येकाला हा अनुभव कधी ना कधी आलेलाच आहे. म्हणजे टॉयलेटमध्ये पाणी सोडल्यावर काही विष्ठा पाण्यासोबत निघून जाते. पण काही विष्ठा तिथेच तरंगत राहते.
नागराजन याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करताना सांगतात की, आपल्या शरीरात जे काही घडतं ते तिथे राहणाऱ्या सूक्ष्मजीवांमुळे घडतं.

फोटो स्रोत, Getty Images
सुरुवातीला त्यांना असं वाटलं की, विष्ठेतील चरबीच्या पेशी त्यांच्या पाण्यात तरंगण्यासाठी जबाबदार आहेत. पण 1970 च्या सुमारास, मिनेसोटा विद्यापीठातील काही गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्टनी अनेक प्रयोग केले.
त्यांनी 39 लोकांवर प्रयोग केले आणि त्यातील काहींच्या विष्ठेची चाचणी घेण्यात आली. त्यानंतर समजलं की विष्ठा तरंगण्यामागे चरबी हे कारण नसून वायू अर्थात पोटातील गॅस हे एक कारण आहे.
अगदी स्पष्ट शब्दात सांगायचं तर विष्ठेतील वायूच्या प्रमाणावर तिचं तरंगणं अवलंबून असतं. जर त्यात वायूचं प्रमाण जास्त असेल तर ती पाण्यावर तरंगेल आणि जर प्रमाण कमी असेल ती एखाद्या विटेप्रमाणे पाण्याखाली जाईल.
या फरकाचं मुख्य कारण असणारा वायू म्हणजे मिथेन वायू. दुसऱ्या शब्दात सांगायचं तर अतिरिक्त प्रमाणात असणारा मिथेन वायू.
नेमकं याच टप्प्यावर नागराजन यांनी आपलं लक्ष केंद्रित केलं आहे.
अलिकडच्या वर्षांत, विज्ञानाने लठ्ठपणापासून हृदयविकारापर्यंत, आपल्या आरोग्याच्या अनेक पैलूंमध्ये मायक्रोबायोटा बजावत असलेली भूमिका शोधून काढली आहे.

आतड्यांमध्ये जमा होणाऱ्या लाखो सूक्ष्मजंतूंमधले जीवाणू, बुरशी आणि इतर सूक्ष्मजीव हे विष्ठा तरंगण्यास कारणीभूत असू शकतात, असा त्यांना संशय होता.
उंदरांच्या विष्ठेवरील संशोधनात काय आढळलं?
नागराजन म्हणतात, "फ्लोटिंग स्टूल म्हणजे विष्ठा तरंगण्यामागे सर्वात सामान्य कारण म्हणजे आपण खातो त्या अन्नातील कण मोठ्या प्रमाणात बॅक्टेरिया बनतात."
या सिद्धांताची चाचणी घेण्यासाठी नागराजन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मेयो क्लिनिकमध्ये उंदरांच्या विष्ठेची तपासणी केली. त्यांनी आतड्यांमध्ये सूक्ष्मजीव नसलेले उंदीर आणले.
अशा उंदरांची विष्ठा पाण्यात लगेच बुडाली. पण ज्या उंदरांच्या आतड्यांमध्ये सूक्ष्मजंतू होते त्या उंदरांच्या विष्ठेपैकी 50 टक्के विष्ठा पाण्यावर तरंगत होती.
त्यामुळे विष्ठा तरंगण्यामागे नेमकं कारण काय आहे हे त्यांना समजलं.

फोटो स्रोत, getty images
नागराजन म्हणतात की, सूक्ष्मजंतू नसलेल्या उंदरांच्या विष्ठेमध्ये न पचलेल्या अन्नाचं प्रमाण जास्त असतं आणि त्यामुळे ती पाण्यात बुडते. त्यानंतर त्यांच्या टीमने विष्ठा बुडणाऱ्या उंदरांच्या आतड्यांमध्ये सूक्ष्मजंतू सोडले. यानंतर या उंदरांची विष्ठाही तरंगू लागली. याचा अर्थ त्यांनी त्यांच्या आतड्यांतील जीवाणूंना चालना दिली.
नंतर मानवाच्या आतड्यांमध्ये आढळणारे जीवाणू उंदरांमध्ये सोडल्यानंतरही त्यांची विष्ठा तरंगत होती. म्हणजे जीवाणू कुठलेही असले तरी त्याची पर्वा न करता विष्ठा तरंगते, असं नागराजन म्हणतात.
यानंतर, त्यांच्या टीमने उंदरांकडून गोळा केलेल्या विष्ठेतील जीवाणूंचे व्यापक अनुवांशिक विश्लेषण केले आणि गॅस निर्मितीसाठी जबाबदार असलेल्या दहा प्रकारचे जीवाणू शोधून काढले.
यापैकी सर्वात प्रबळ म्हणजे बॅक्टेरॉइड्स ओव्हटस हा जीवाणू होता. यामुळेच मानवी विष्ठा पाण्यात तरंगते.
'प्रतिजैविकांचा वापर केल्यावर विष्ठा बुडते'
नागराजन यांच्या म्हणण्यानुसार, उंदरांवर केलेले संशोधन मानवांवर लागू करण्यासाठी अधिक अभ्यास आणि संशोधन करणे आवश्यक आहे. मानवी विष्ठा तरंगते कारण आपल्या आतड्यांतील विविध प्रकारच्या जीवाणूंमध्ये बदल होत असतात.
ते म्हणाले की, जेव्हा प्रतिजैविकांचा वापर केला जातो तेव्हा विष्ठा तरंगण्याऐवजी बुडते. पण आज अखेर यावर कोणताही अभ्यास झालेला नाही.

फोटो स्रोत, GETTY IMAGES
अशा विषयांच्या अभ्यासासाठी निधी मिळणं सोपं नसल्याचं नागराजन सांगतात.
आपण खातो ते अन्न, धुम्रपान, ताणतणाव आणि मोठ्या प्रमाणात घेत असलेली औषधं यामुळे आपल्या आतड्यांमधील जीवाणूंमध्ये बदल होऊ शकतात.
नागराजन विष्ठेतील वायू (गॅस) उत्पादक जीवाणू कशामुळे वाढतात हे शोधण्यास उत्सुक आहेत.
ते म्हणतात, "तुम्ही लोकांनी खचाखच भरलेल्या एखाद्या सामाजिक कार्यक्रमात गेला असाल तेव्हा तिथे येणारे गॅसोजेनिक वास कोणालाच आवडत नाही. म्हणजे गॅसोजेनिक सूक्ष्मजंतूंनी भरलेलं आतडं असलेल्या एखाद्याच्या शेजारी बसणं आपल्याला आवडत नाही. त्यामुळे हे एक घाणेरडं काम आहे, पण कोणीतरी ते केलंच पाहिजे."
हेही नक्की वाचा
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








