लँडेस अल्झायमर - या 'गावा'तील प्रत्येक रहिवाशाला आहे डेमेंशिया

- Author, सोफी हचिंसन
- Role, बीबीसी न्यूज
नैऋत्य फ्रान्समधील 'लँडेस अल्झायमर' हे एक वेगळं गाव आहे. या गावातील सर्वच रहिवाशांना डिमेंशिया आहे.
फ्रान्सचे सरकार आणि संशोधकांच्या पुढाकारातून 'व्हिलेज लॅंडेस अल्झायमर' ही संकल्पना साकारण्यात आली आहे. या ठिकाणी एका विस्तीर्ण परिसरात अल्झायमरच्या रुग्णांना राहता येतं. सर्व सोयी सुविधांनी युक्त अशा परिसरात इथे सर्व रुग्ण एखाद्या सामान्य गावकऱ्यासारखे जीवन जगतात.
या रुग्णांची काळजी घेण्यात येते पण त्यांना याठिकाणी एका मोकळ्या आणि सुरक्षित वातावरणात राहायला मिळतं.
हे गाव कसं वेगळं आहे, ते आपण पाहू.
या गावाच्या ऐन मध्यवर्ती भागात एक किराणा मालाचे दुकान आहे. इतर दुकानांप्रमाणे याठिकाणी पैसे द्यावे लागत नाहीत. तुम्हाला हवी ती वस्तू या ठिकाणाहून घेता येते. पैसे आणण्याची किंवा सोबत वॉलेट आणण्याची गरजच नाही. या रुग्णांना म्हणजेच गावकऱ्यांना आपला व्यवहार नीटपणे पार पाडता यावा या दृष्टीने हे दुकान बनवण्यात आले आहे.
दुकानाच्या जवळच एक कॅफे आहे. हे कॅफे म्हणजे गावाचे सांस्कृतिक केंद्रच आहे असं समजा.
मला वाटेत एक फ्रान्सिस नावाचे गृहस्थ भेटले जे वर्तमानपत्र घेण्यासाठी बाहेर पडले होते. मी त्यांना शेजारच्या रेस्तरॉंमध्ये कॉफी प्यायला जाऊ असं म्हटलं.
डॉक्टरनं जेव्हा त्यांना अल्झायमर आहे, असं सांगितलं तेव्हा त्यांना कसं वाटलं, हे मी फ्रान्सिस यांना विचारलं.
त्यांनी स्वतःला त्या काळात नेलं, मान हलवली आणि काही वेळ शांत राहून म्हणाले, "खूप कठीण" होतं.
'पुढे चालत राहावं'
त्यांच्या वडिलांनाही अल्झायमर होता. पण फ्रान्सिस हे निडर राहिले.
"मला मृत्यूची भीती वाटत नाही. कारण ते एक दिवस होणारच आहे," असं ते म्हणाले.
"यादरम्यान मी या आजारासह माझं जीवन जगत राहील.
"सगळं आधीसारखं नसलं तरी मी जगण्यासाठी या ठिकाणी आहे.
"तुम्ही शरणागती पत्करली तर, तुम्हाला हवं ते मिळतं. त्यामुळं तुम्ही तुमच्या सर्व ताकदीनिशी पुढे जात राहावं," असं फ्रान्सिस सांगतात.
दुकान आणि रेस्तरॉंबरोबरच गावकऱ्यांना थिएटरमध्ये जाऊन त्याठिकाणी विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठीही प्रोत्साहित केलं जातं.
फिलिप आणि विवियन यांनी आम्हाला सांगितलं की, 'त्यांना दुसऱ्यांदा डिमेंशियाचं निदान झाल्यानंतरही ते सामान्य जीवन जगण्याचा प्रयत्न करत आहेत.'
लांबवर पाहत फिलिप म्हणाले की, "आपण फिरायला जाऊया."

मी त्यांना विचारलं की तुम्ही आनंदी आहात का? त्यांनी लगेचच चेहरा वळवला आणि एक मोठं हास्य देत म्हणाले : "हो नक्कीच आहोत."
नंतर कॉफी संपवून काही उबदार कपडे परिधान करुन ते दाम्पत्य पार्कमध्ये गेलं.
'याठिकाणी वेळ वेगळ्या पद्धतीनं पुढं सरकतो', असं माझे गाईड मला म्हणाले.
इथं भेटीगाठी, खरेदी किंवा स्वच्छता यासाठी वेळ ठरलेली नाही. फक्त गावकऱ्यांना शक्य तेवढं स्वातंत्र्य देण्यासाठी हळू हळू त्यांच्याबरोबर मिसळावं लागतं.
या गावावर बारकाईनं नजर ठेवली जात आहे. प्रोफेसर हेलेना अमिवा म्हणाल्या की, 'याचा एकूणच आजाराच्या संदर्भात खरंच परिणाम होत असल्याचं प्राथमिक निष्कर्षांवरून समोर येत आहे.'
"जेव्हा लोक एखाद्या संस्थेमध्ये प्रवेश करतात तेव्हा लक्षात येईल अशा एका ठराविक पातळीपर्यंत घट झालेली पाहायला मिळते. पण याठिकाणी तसं पाहायला मिळालं नाही," असं त्या म्हणाल्या.
"आम्ही एका प्रकारचा अगदी सहजपणे झालेला बदल पाहत आहोत.
"अशा प्रकारच्या संस्थांमुळं वैद्यकीय निदानांवर प्रभाव पडू शकतो, असा विचार करण्यासाठी आमच्याकडं काही कारणं आहेत."
त्यांनी दोषीपणाची भावना आणि चिंता किंवा काळजी अशा भावना असणाऱ्या कुटुंबांमध्येही प्रचंड घट झाल्याचं पाहिलं आहे.
बेडरूममध्ये असलेल्या 89 वर्षीय आईकडे म्हणजे मॉरीसेट यांच्याकडं इशारा करत डॉमिनिक म्हणाल्या की, "तिचं मन शांत आहे आणि ती सुरक्षित आहे हे समजल्यामुळं माझं मनही शांत आहे."
कुटुंबाचे फोटो, पेंटिंग आणि फर्निचर यानं भरलेल्या या खोलीला गार्डनच्या दिशेला एक मोठी खिडकीही होती.

भेटण्याची वेळ निश्चित नसल्यानं लोक त्यांच्या इच्छेनुसार येतात आणि जातात. डॉमिनिक म्हणाल्या की, 'आईची एवढी चांगली काळजी घेतली जाईल असं मला किंवा माझ्या बहिणीला वाटलं नव्हतं.'
"मी जेव्हा तिला इथं सोडलं तेव्हा मला बरं वाटलं. मी इथं येते तेव्हा मी तिच्याच घरी आले असं मला वाटतं. मी माझ्या आईबरोबर घरी असते," असं त्या म्हणाल्या.
या ठिकाणी एका मजल्याच्या प्रत्येक घरात आठ रहिवासी राहतात. त्यात एक सामुदायिक किचन, बैठक आणि डायनिंग रूम आहेत.
याठिकाणी खर्चासाठी रहिवासी काही प्रमाणात वाटा उचलतात. पण सरासरी केअर होमसाठी लागणारा जो खर्च आहे, तो प्रामुख्यानं प्रादेशिक फ्रान्स सरकारकडून उचलला जातो. त्यांनीच या गावाची निर्मिती करण्यासाठी 22 दशलक्ष डॉलरचा खर्चही केला आहे.
2020 मध्ये जेव्हा याची सुरुवात झाली होती, तेव्हा अशा प्रकारचं हे दुसरं गाव होतं. तसंच संशोधन प्रकल्पाचा भाग असलेलं हे असं पहिलं गाव आहे.
तसंच जगभरात अशा अगदी कमी बोटावर मोजण्याइतक्या संस्था आहेत.
पण डिमेंशियाचं वाढतं प्रमाण पाहता, यावर चांगला उपाय हवा असणाऱ्या जगभरातील सर्वांचंच लक्ष याकडं वेधलं गेलं.
गावात 65 वर्षांच्या हेअरड्रेसर पॅट्रिशियाही आहेत. नुकतेच केस ब्लो ड्राय करून त्या बसल्या होत्या. 'लँडेस अल्झायमरमुळं मला जीवन परत मिळालं आहे', असं त्यांनी सांगितलं.
"मी घरी होते. पण मला बोअर होत होतं," असं त्या म्हणाल्या.

"माझ्याकडे स्वयंपाकासाठी कूक होती. मी थकलेली होते. मला बरं वाटत नव्हतं. अल्झायमर असणं म्हणजे सोपं नाही हे भीतीदायक आहे, असं त्या म्हणाल्या.
"मला असं कुठं तरी राहायचं होतं, जिथं मलाही कुणाला काही मदत करता येईल.
"कारण इतर केअर होममध्ये वेगळं असतं, ते काही करू देत नाहीत.
"त्याउलट इथं खरं जीवन आहे. खरं म्हणजे अगदी खरं जीवन."
शक्यतो डिमेंशियामुळं लोक एकटे पडतात.
पण इथं एक समुदाय, समाज असल्याची दृढ भावना पाहायला मिळते. लोक एकमेकांना भेटतात आणि काही अॅक्टिव्हिटीमध्येही सहभागी होतात.
संशोधकांच्या मते हा सामाजिक मुद्दा आनंदी जीवनाची किल्ली ठरू शकते. तसंच त्यामुळं डिमेंशिया असलेल्यांना अधिक चांगलं आणि निरोगी जीवन जगता येऊ शकतं.
याठिकाणी जवळपास 120 रहिवासी आहेत आणि तेवढेच आरोग्य कर्मचारी आहेत. त्यातही स्वयंसेवक वेगळे आहेत.
यावर काहीही उपचार नसल्यामुळं क्रूर असली तरी ही एक अनिवार्य बाब आहे.
पण जस-जशी प्रत्येक गावकऱ्याच्या आजारात वाढ होत जाते, तस-तशी त्यांना अधिक मदत दिली जाते.
शिवाय कदाचित हा या गावकऱ्याच्या जीवनातील महत्त्वाचा टप्पा असेल तर, कर्मचाऱ्यांच्या मते तो अत्यंत हळूवारपणे आणि अधिक आनंद सोबत घेऊन येणारा असेल.
(काही जणांनी त्यांची आडनाव देऊ नये अशी विनंती केली होती. )
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








