अल्झायमर्स हा आजार आहे तरी काय?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, नूतन कुलकर्णी
- Role, बीबीसी मराठीसाठी
अल्झायमर्स या आजाराविषयी भारतीय समाजात एक प्रकारचा टॅबू आहे. लोक गैरसमज करून घेतील, या भीतीने आपल्याला किंवा आपल्या कुटुंबापैकी कुणाला हा आजार आहे, हे सहसा कुणी सांगत नाही. अशा लपवून ठेवण्याच्या प्रवृत्तीमुळे आपलंचं मोठं नुकसान होतं.
अल्झायमर्स या रोगाचे नाव डॉ. अलोईस अल्झायमर यांच्या नावावरुन आले. एका मेंदूच्या विचित्र आजारपँणामुळे मृत्युमुखी पडलेल्या महिलेच्या मेंदूतील पेशींमध्ये बदल डॉ. अल्झायमर यांनी 1906 साली अभ्यासले होते. स्मृतिभ्रंश, बोलताना अडथळे येणे, लहरी वर्तन अशी लक्षणं त्या महिलेमध्ये दिसून आली होती. मृत्यूनंतर तिच्या मेंदूची तपासणी केल्यानंतर डॉ. अल्झायमर यांना तिच्या मेंदूत गाठी, तंतुंच्या गाठी दिसून आल्या होत्या.
हा वृद्धांना होणारा आजार आहे. या आजारावर खुलेपणाने बोलल्यास त्याविषयीची जागृती निर्माण होऊन त्या दिशेने पावलं उचलली जातील, असं प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ आणि ज्येष्ठ तसंच डिमेंशिया रुग्णांसाठी सिल्व्हर इनिंग नावाच्या स्वयंसेवी संस्थेचे संस्थापक डॉ. शैलेश मिश्रा यांचं म्हणणं आहे.
डॉ. शैलेश मिश्रा म्हणतात, "संपूर्ण जगातच उपचाराची योग्य पद्धत काय आहे तर सुरुवातीच्या टप्प्यातच आजाराचं निदान करावं. पण आपल्याकडे काय होतं, या आजाराला एक स्टिग्मा आहे. लोक वेडे म्हणतील, म्हणून ती व्यक्ती किंवा तिचे कुटुंबीय कुणालाही याबद्दल सांगत नाहीत आणि डॉक्टरांकडेही जात नाहीत."
ते पुढे म्हणतात, "अटल बिहारी वाजपेयी, जॉर्ज फर्नांडिस, तेजी बच्चन यांसारख्या अनेकांना अल्झायमर होता. मात्र, इतरही अनेक जणांना हा आजार असूनही ते सार्वजनिक पातळीवर मान्य केलं जात नाही किंवा त्याबद्दल सांगितलं जात नाही. "

फोटो स्रोत, Getty Images
अल्झायमर्स म्हणजे काय?
या आजाराविषयी थोडं जाणून घेऊया. अल्झायमर हा मेंदूशी संबंधित आजार आहे. साठ वर्षांपेक्षा मोठ्या व्यक्तींना अल्झायमर्स होतो. अल्झायमर्स हा डिमेंशिया या सिंड्रोमचा एक प्रकार आहे. डिमेंशियाचे वेगवेगळे प्रकार आहेत. मात्र, या सगळ्या प्रकारांमध्ये व्यक्तीच्या स्मृतीवर (Memory) परिणाम होतो. मराठीतत याला स्मृतीभ्रंश म्हणतात. सोप्या शब्दात सांगायचं तर विसरभोळेपणा.
1906 साली डॉक्टर अल्झायमर्स यांनी सर्वात आधी या आजाराविषयी सांगितलं. त्यामुळे याला अल्झायमर असं नाव देण्यात आलं.
बोलणे, ऐकणे, वास घेणे, हात हलवणे, चालणे, जेवण करणे, स्वच्छेतेच्या क्रिया हे सगळं मेंदुतल्या काही पॉईंट्समधून नियंत्रित होत असतं. अशा वेगवेगळ्या पॉईंट्सना जेव्हा इजा होते तेव्हा शरीरातल्या संबंधित अवयवापर्यंत सूचना पोहोचत नाही आणि ती क्रिया बंद पडते किंवा ती क्रिया आपण विसरतो.
उदाहरणार्थ अल्झायमर्सचा रुग्ण ब्रश करणे, स्वच्छतेच्या क्रिया करणे, हेसुद्धा विसरतो. इतकंच नाहीतर तोंडात घास टाकल्यावर तो गिळायलाही विसरतो. 80 वर्षांपेक्षा मोठ्या असलेल्या 50 टक्के व्यक्तींना डिमेंशिया होण्याची शक्यता असते. सध्या भारतात 43-50 लाख डिमेंशियाचे रुग्ण आहेत. सामाजिक, आर्थिक, धार्मिक सांस्कृतिक असं कुठलंही बंधन या आजाराला नाही. गरीब, श्रीमंत, सुशिक्षित, अशिक्षित अशा कुणालाही हा आजार होऊ शकतो.
मानसोपचारतज्ज्ञ आणि न्यूरोलॉजिस्ट या रोगाचं निदान करतात. आजाराचं निदान करण्यासाठी एक प्रश्नावली असते. त्या प्रश्नाची उत्तरं घेतली जातात. त्यावरून एखाद्याला डिमेंशिया आहे का, हे शोधता येतं. याशिवया, MRI करूनही या आजाराचं निदान करतात.

फोटो स्रोत, Science Photo Library
का होतो अल्झायमर?
अल्झायमरची अनेक कारणं आहे. कुठल्याही एका कारणामुळेच तो होतो, असं नाही. काही कारणं खालीलप्रमाणे आहेत.
- वय : 60 वर्षांपेक्षा जास्त वय, हे डिमेंशियाचं कारण असू शकतं.
- समाजापासून दुरावणे : लोकांमधली उठबस, संवाद कमी होणे किंवा इतर निवृत्ती, शहर किंवा देश बदलणे, यासारख्या कारणांमुळे आलेला एकटेपणा यामुळेही अल्झायमर होऊ शकतो.
- हृदयाशीसंबंधित आजार : मधुमेह, रक्तदाब यासारख्या हृदयाशी संबंधित आजार असणाऱ्या व्यक्तींना हा आजार होऊ शकतो.
- ब-जीवनसत्त्वाची कमतरता : डॉक्टर सांगतात भारतात बहुतांश शाकाहारी खाद्यसंस्कृती आहे. त्यामुळे आपल्या जेवणात ब जीवनसत्त्वाची कमतरता असते. विशेषत महिलांमध्ये आणि अल्झायमर होण्याचं हेदेखील एक कारण आहे.

फोटो स्रोत, Getty Images
अल्झायमर्सचे टप्पे
अल्झायमर्स हा आजार पूर्णपणे बरा होत नाही. पण, काही औषधं आणि उपचारांच्या माध्यमातून आजार स्थिर ठेवता येतो. म्हणजे तो वाढत नाही. त्यामुळे सुरुवातीच्या स्टेजमध्येच रुग्णाला योग्य उपचार मिळाले तर रुग्णाला 10-15 वर्ष किंवा त्याहूनही जास्त काळ सामान्य आयुष्य घालवता येतं.
या आजाराविषयी सांगताना डॉक्टर सागर मुंदडा सांगतात, "अल्झायमर्समध्ये जसजसं वय वाढतं तसा मेंदूचा आकार लहान होत जातो. मेंदुतल्या वळ्या कमी होत जातात. यामुळे विसरभोळेपणा येतो. अल्झायमर झालेल्या व्यक्तींना काही तासांपूर्वी घडलेल्या गोष्टींचा विसर पडतो."
या आजाराच्याही काही स्टेजेस असतात. या स्टेजसविषयी अधिक माहिती देताना डॉ. सागर सांगतात, "आजाराच्या सुरुवातीच्या स्टेजमध्ये रुग्णाला नुकत्याच घडून गेलेल्या गोष्टी आठवायला त्रास होतो. उदाहरणार्थ सकाळी काय खाल्लं हे दुपारी आठवत नाही. ही सुरुवातीची स्टेज मानली जाते."
मात्र, काही रुग्णांमध्ये याआधीही काही लक्षणं दिसतात. विनाकारण चिडचिडण होणे, गाढ आणि शांत झोप न लागणे, कुठल्याच गोष्टीत आनंद न वाटणे, नैराश्य येणे, अतीविचार करणे हीदेखील अल्झायमर किंवा डिमेंशियाची अतिशय सुरुवातीची लक्षणं असू शकतात. मात्र, ही प्रत्येकच रुग्णामध्ये दिसतीलच असं नाही.

फोटो स्रोत, Getty Images
यापुढच्या स्टेजेसविषयी डॉ. सागर सांगतात, "आजाराची पुढची स्टेज असते ज्यात क्रमाने कराव्या लागणाऱ्या गोष्टी करण्यात रुग्णाला अडचणी येतात. उदाहरणार्थ भाजी करायची असेल. तर ती कुठल्या क्रमाने करायची, हे रुग्णाला आठवत नाही.
गाडी चालवणे, कपडे घालणे यासारख्या गोष्टी ज्यात एकानंतर दुसरी क्रिया एका विशिष्ट क्रमाने कराव्या लागतात, त्या त्यांना जमत नाही. या पुढचा टप्पा म्हणजे रुग्ण घराच्याच व्यक्तींना ओळखत नाही किंवा ओळखलं तर दुसऱ्या व्यक्तीच्या नावाने ओळखतात. चेहरा बघून आपण या व्यक्तीला ओळखतो असं त्यांना वाटतं. पण नाव आठवत नाही. घरचा पत्ता आठवत नाही. पाठ असलेले मोबाईल नंबर आठवत नाही. या स्टेजपर्यंत उपचार मिळाले नाही तर रुग्णांना दिवस आहे की रात्र, तारीख, महिना, वर्ष हेसुद्धा लक्षात राहत नाही."
डिमेंशियाच्या दुसऱ्या टप्प्यात रुग्णाची चिडचिड वाढते, तो कपडे घालायला विसरतो आणि तिसऱ्या स्टेजमध्ये तो पूर्णपणे इतरांवर अवलंबून राहतो. म्हणजे घरचा पत्ता आठवत नाही, त्यामुळे एकट्याने घराबाहेर पडता येत नाही. आंघोळ कशी करायची, आधी साबण लावायचा की पाणी हेही विसरतो. त्यामुळे आंघोळ घालावी लागते. आता टॉयलेटला जायचं आहे, याची सूचना मेंदूकडून मिळत नाही. त्यामुळे कुठेही सू-शी होते. अशावेळी डायपर वापरावे लागतात.
स्मृतीभ्रंशाच्या या स्टेजेस असल्या तरी याच क्रमाने प्रत्येक रुग्णाला त्रास होतो, असं नाही. अनेक रुग्ण कित्येक वर्ष पहिल्या स्टेजमध्येच असतात. तर काही रुग्णांमध्ये चार महिन्यातच त्रास वाढतो.

फोटो स्रोत, Getty Images
डॉक्टरांकडे कधी जायचं?
याआधी सांगितल्याप्रमाणे हा ज्येष्ठ नागरिकांना होणारा आजार आहे. तेव्हा डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार वयाच्या पन्नाशीनंतर प्रत्येकाना दर सहा महिन्यांनी ब्लड टेस्ट करायला हवी. रुटीन चेकअप करायला हवं. यात लिव्हर प्रोफाईल, किडनी प्रोफाईल, व्हिटॅमिन बी-12, व्हिटॅमिन डी यांची टेस्ट करायला हवी. मात्र, काही गोष्टी अशा आहेत की ज्या जाणवल्यावर डॉक्टरांचा सल्ला नक्की घेतला पाहिजे.
- लहान-लहान गोष्टींचा विसर पडत असेल. उदाहरणार्थ 1000 लिहिताना एकावर किती शून्य लिहायचे ते विसरणे. लोकांची नावं विसरणे. कुलुपाची नेमकी किल्ली कोणती, ते विसरणे, गाडीची चाबी फ्रिजमध्ये ठेवणे.
- कारण नसताना सारखी चिडचिड होत असेल.
- कुठल्याच गोष्टीत आनंद न वाटता नैराश्य येत असेल. कुठल्याही कामात सहभागी होण्याची इच्छा होत नसेल.
अशी काही लक्षणं असल्यावर डॉक्टरांची मदत नक्की घ्यावी. यापैकी एक किंवा त्यापेक्षा जास्त लक्षणं असल्यावर तो डिमेंशिया किंवा अल्झायमर असेलच असं नाही.
कदाचित काही मानसिक ताण किंवा इतरही आजार असू शकतात. मात्र, त्याच योग्य निदान डॉक्टरांकडे गेल्यावरच होऊ शकतं. त्यामुळे एखादी गोष्ट क्षुल्लक आहे, असं म्हणून त्याकडे दुर्लक्ष करणे योग्य ठरणार नाही.

फोटो स्रोत, Getty Images
अल्झायमर रुग्णांची काळजी कशी घ्यावी?
अल्झायमर झालेला रुग्ण गोष्टी विसरतो. त्यामुळे त्याला वारंवार गोष्टी लक्षात आणून द्याव्या लागतात. हे करताना सर्वात महत्त्वाचा ठरतो तो संयम. अल्झायमर रुग्णाला प्रेमाची आणि आपुलकीची गरज असते.
व्यक्ती जेव्हा लहान-लहान गोष्टी विसरायला लागतो त्यावेळी कुटुंबीयांना त्याचा खूप त्रास होतो आणि रुग्णाबरोबरच त्याच्या कुटुंबीयांचीही चिडचिड वाढते. त्यामुळे अल्झायमरचा रुग्ण म्हणजे लहान बाळ हे कायम लक्षात ठेवून शांतपणे प्रत्येक गोष्ट सांगणं गरजेचं असतं.
तुम्ही आता काही कामाचे नाहीत, एकच गोष्ट कशी वारंवार सांगावी लागते, असं म्हटल्याने रुग्णाचं मानसिक खच्चीकरण होत असतं. अशा रुग्णांचा तिरस्कार करणे, थट्टा-मस्करी करणे योग्य नाही. त्यांना कुटुंबाच्या आणि एकूणच समाजाच्या पाठिंब्याची गरज असते.
अल्झायमरग्रस्त रुग्ण आणि कुटुंब
आजारपण म्हटलं की रुग्णाबरोबरच त्याच्या कुटुंबालाही त्याचा त्रास होतो. मात्र, अल्झायमर या आजारात रुग्णापेक्षा कुटुंबीयांना जास्त त्रास होतो. अल्झायमर झालेला रुग्ण गोष्टी विसरतो. पण, कपडे घालायला विसरणे, कुठेही नैसर्गिक विधी करणे, वस्तू जागेवर न ठेवणे या सगळ्या गोष्टींचा त्याच्या कुटुंबीयांना अतिशय त्रास होत असतो. रुग्णाची चिडचिड वाढते. अशावेळी कुटुंबीयांचा संयम संपतो.
डॉ. मिश्रा म्हणतात, "पूर्वी एकत्र कुटुंब पद्धतीत घरी कुणीतरी सतत असायचं. त्यामुळे म्हाताऱ्या माणसांची, रुग्णांची काळजी घेतली जायची. मात्र, आज परिस्थिती बदलली आहे. विभक्त कुटुंब झालेली आहेत. स्त्रियासुद्धा घराबाहेर पडल्या आहेत. शहरातली घरं छोटी झाली आहेत. अशावेळी घरात एखादा अल्झायमर झालेली व्यक्ती असेल तर तिचा सांभाळ करणं फार अवघड होतं."
दुसरं म्हणजे हा खूप खर्चिक आजार आहे. डिमेंशियाच्या रुग्णांना सारखे डायपर वापरावे लागतात. वृद्धांचे डायपर महाग असतात. शिवाय, घरात सगळे कामावर जाणारे लोक असतील तर रुग्णासाठी केअर टेकर ठेवावा लागतो, त्याला 8 तासांचे 700 ते 800 रुपये मोजावे लागतात. म्हणजे अशा रुग्णांसाठी महिन्याला 30 ते 40 हजार रुपयांचा खर्च येतो.
शिवाय, डिमेंशियाच्या रुग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल करता येत नाही. कारण विसरभोळेपणाव्यतिरिक्त इतर कुठलाही शारीरिक त्रास त्यांना नसतो. त्यामुळे ते घरीच असतात. ही सगळी परिस्थिती कुठल्याही कुटुंबासाठी कष्टप्रद असते.

फोटो स्रोत, Getty Images
रुग्णाची काळजी
डिमेंशिया किंवा अल्झायमरच्या रुग्णांना प्रेम आणि जिव्हाळा अत्यंत महत्त्वाचा असतो. याशिवाय संगीत, नृत्य, चेअर योगा, छंद अशा वेगवेगळ्या मिनिंगफुल अॅक्टिव्हिटीज फार महत्त्वाच्या असतात.
डिमेंशिया रुग्णांची संख्या मोठी आहे. त्या तुलनेत त्यासाठीचं काम झालेलं नाही, अशी खंत डॉ. मिश्रा व्यक्त करतात. ते म्हणतात, "या आजारासाठी सरकारी पातळीवर म्हणावे तितके प्रयत्न झालेले नाही. महाराष्ट्रात सरकार मेमरी क्लिनिक सुरू करणार होते. पण ते काम कितपत झालं, याची काहीही माहिती नाही. प्रत्येक हॉस्पिटलमध्ये मेमरी क्लिनिक हवं. आरोग्य सेवकांना विशेष प्रशिक्षण हवं."
डॉ. मिश्रा म्हणतात, "डिमेंशियाच्या रुग्णांची संख्या बघता राष्ट्रीय डिमेंशिया धोरणाची गरज आहे. याअंतर्गत प्रत्येक वॉर्डात डिमेंशिया डे-केअर असायला हवं. लहान मुलांना जसं आई-वडील दिवसभर डे-केअरमध्ये ठेवून आपापल्या कामावर जातात. तसेच सेंटर्स डिमेंशिया रुग्णांसाठी हवे.
दुसऱ्या आणि त्यापुढच्या टप्प्यातल्या रुग्णांसाठी असिस्टेड लिव्हिंग केअर होम्स हवेत. जिथे रुग्णांची 24 तास काळजी घेतली जाईल. त्यानंतर होम केअर सर्व्हिस हवी. यात डिमेंशिया आजाराच्या दृष्टीने प्रशिक्षित आरोग्य सेवक हवे त्या वेळेला घरी येऊन रुग्णांची तपासणी करू शकतात."
भारतात आज घडीला केवळ दहा डिमेंशिया केअर होम्स आहेत.
याशिवाय केअर गिव्हरना प्रशिक्षण देण्यासाठी एक दीर्घकालीन योजना सरकारने आखायला हवी. इतकंच नाही तर मेडिकल कॉलेजसमध्ये डॉक्टर आणि नर्सेसना डिमेंशिया उपचारासंबंधीचं प्रशिक्षण देणंही गरजेचं असल्याचं डॉ. मिश्रा यांचं म्हणणं आहे.
ते म्हणतात, "भारतात डिमेंशिया एमडी डॉक्टर नाहीत. म्हणजेच भारतात डिमेंशिया स्पेशलिस्ट नाहीत. एमबीबीएसच्या अभ्यासक्रमात डिमेंशिया आजार हा अभ्यासक्रमाचा खूप छोटा भाग आहे. मानसोपचारामध्ये एमडी करणाऱ्या डॉक्टरांनाच या विषयाची सविस्तर माहिती अभ्यासक्रमात असते. या सगळ्यामधून एक चांगलं वातावरण तयार होईल."

फोटो स्रोत, Getty Images
प्रतिबंधात्मक उपाय
डिमेंशिया कधीही होऊ नये, यासाठी खात्रीशीर उपाय नाही. मात्र, जीवनशैलीमध्ये काही बदल करून हा आजार दूर ठेवता येतो.
- हृदय निरोगी ठेवा
- चांगली झोप घ्या
- जीवनशैली उत्तम ठेवा
- रोज किमान 30 मिनिटं योगा, व्यायाम, सायकलिंग, रनिंग असा एकतरी व्यायाम प्रकार करा
- दारू, सिगारेट, तंबाखू, अशी व्यसनं टाळा
- मिनिंगफुल अॅक्टिव्हिटीजमध्ये स्वतःला गुंतवा.
- सकस आणि ताजं अन्न खा. साखर, मीठ यांचा आहारात कमी प्रमाणात समावेश करा.
डॉ. मिश्रा सांगतात, "एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हा म्हातारपणात होणारा आजार असला तरी त्याची सुरुवात 40 ते 50 व्या वर्षापासून होते. माझं वय 40 ते 50 च्या घरात असेल आणि मी खूप व्यसनं करत असेन, सतत पिझ्झा, बर्गर खात असेन, पुरेशी झोप घेत नसेन किंवा दिवसातला रिकामा वेळ मिनिंगफुल अॅक्टिव्हिटीमध्ये न घालवता तासनतास टिव्ही किंवा मोबाईलसमोर बसत असेन तर अशा प्रकारचे त्रास होणार, हे निश्चित."
पाश्चिमात्य राष्ट्रांमध्ये तर 40-50 वर्षांच्या लोकांमध्येही हे आजार दिसू लागले आहेत. त्यामुळे आपणही यातून शिकवण घेऊन घरात कुणाला विसरभोळेपणा आहे, याची लाज वाटून न घेता त्यावर उपचार घेतले पाहिजे.
डिमेंशिया किंवा अल्झायमर झालेली व्यक्ती स्वतः सगळं विसरत असते. त्यामुळे तिच्या काहीच लक्षात राहत नाही. अशावेळी तुम्ही तिच्यावर योग्य उपचार केले नाही तर तो आपल्या प्रिय व्यक्तीवर अत्याचार ठऱत असतो.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)








