मेरथिर टाइडफिल: या गावातील उद्योग संकटात आले आणि 'व्हायग्रा'चा शोध लागला

फोटो स्रोत, BBC/QUAY STREET PRODUCTIONS/TOM JACKSON
- Author, पीटर शटरवर्थ
- Role, बीबीसी न्यूज
प्रसिद्ध फुटबॉलपटू पेले याचे पोस्टर बॉय होते किंवा पोपचा वरदहस्त लाभला असला तरीही व्हायग्राबद्दल आपल्याला कधीच समजलं नसतं, जर दक्षिण वेल्समधलं हे औद्योगिक शहर नसतं.
मेरथिर टाइडफिलमधल्या औद्योगिक क्षेत्रात तेव्हा मंदीचा काळ सुरू होता. त्यामुळेच या ठिकाणचे स्टील वर्कर्स आणि इतर पुरूष पैशांची नड भागविण्यासाठी स्थानिक संशोधन केंद्रात पोहोचले. या ठिकाणी होणाऱ्या वैद्यकीय चाचण्यांसाठी स्वयंसेवक म्हणून त्यांनी काम सुरू केलं. म्हणजे त्यांच्यावर चाचण्या करण्यात येणार होत्या.
त्यांना फक्त एवढंच माहिती होतं की, ज्या चाचण्यांमध्ये ते सहभागी होणार होते, त्यामुळे एकदिवस संपूर्ण जग बदलण्यासाठी मदत होणार होती. यापैकी काही लोकांना 30 वर्षांनंतर हे समजलं की, त्यांच्या माध्यमातून एका अशा औषधाचा शोध लागला, ज्यामुळं लैंगिक समस्यांचा सामना करणाऱ्या लाखो पुरुषांना फायदा झाला.
1990 च्या दशकाच्या सुरुवातीला फायझर ही औषध कंपनी उच्च रक्तदाब आणि अॅन्जायनाच्या उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या सिल्डेनफिल UK-92,480 नावाच्या कंपाऊंडचं परीक्षण करत होती.
त्यांनी मेरथिल टाइडफिलमधील एका घरातील केंद्रातून या संशोधनाच्या कामाला सुरुवात केली. त्यासाठी चाचणी करण्यासाठी त्यांनी स्थानिक तरुणांची भरती केली.
1992 मध्ये चाचणी करण्यासाठी निवडण्यात आलेल्या तरुणांमध्ये इद्रिस प्राइस यांचाही समावेश होता.
त्यावेळी स्थानिक स्टील उद्योगातून नोकरी गमावल्यानंतर ते दुसऱ्या एका ठिकाणी कामासाठी जात होते.

फोटो स्रोत, Getty Images
"माझ्याकडे पैशाची कमतरचा असली की मी सिम्बेक नावाच्या या ठिकाणी जायचो," असं इद्रिस म्हणाले.
पैशाच्या मोबदल्यात ते कोणत्या चाचण्या करणार असं ते विचारायचे.
"हे औषध अॅन्जायनावरील उपचारासाठीचं असून त्याचे साईड इफेक्ट होऊ शकतात, या एका गोष्टीव्यतिरिक्त आम्हाला या औषधाबाबत काहीही सांगण्यात आलं नव्हतं," असंही ते म्हणाले.
"नेमकं काय होणार आहे, या भीतीनं सर्वच तरुण घाबरलेले होते."

फोटो स्रोत, BBC / TWO RIVERS MEDIA
स्वयंसेवक तरुणांना 10 दिवस सलग दिवसातून तीन वेळा UK-92,480 कंपाऊंड असलेलं औषध घेण्यासाठी पैसे दिले जाणार होते.
"80 च्या दशकाच्या अखेरीचा आणि 90 च्या दशकाच्या सुरुवातीचा काळ आमच्यासाठी अत्यंत कठीण होता. त्यामुळे शक्य तेवढा अधिक पैसा मिळवण्याचा आमचा प्रयत्न असायचा," असं इद्रिस यांनी बीबीसीच्या ‘किपिंग इट अप’ या डॉक्युमेंटरीत सांगितलं.
"या चाचण्यांतून मिळालेला पैसा माझ्या कुटुंबासाठी फार महत्त्वाचा होता. कारण त्यामुळे आम्हाला अधिक अन्नं मिळालं, जळणासाठी दोन पिशव्यांऐवजी कोळशाच्या पाच पिशव्या घेणं शक्य झालं. हा ऐनवेळी मिळालेला पैसा आमच्या कामी आला होता."
पण जेव्हा चाचण्या संपल्या तेव्हा यातून समोर आलेले दुष्परिणाम फायझरसाठी अत्यंत महत्त्वाचे वळण देणारे ठरले.
व्हायग्राचा शोध कसा लागला?
"स्वयंसेवक पुढं येऊ लागले आणि सांगू लागले, की मला संकोच वाटतोय, पण मला नेहमीपेक्षा जास्त इरेक्शन (लिंगाची ताठरता) जाणवत आहे. तसंच नेहमीपेक्षा अधिक ताठरता जाणवत आहे," अशी माहिती फायझरचे माजी संशोधन प्रमुख डॉक्टर पीट एलिट यांनी दिली.
मेरथिर टाइडफिलमधील अचानक समोर आलेल्या संशोधनामुळं फायझरनं नपुंसकतेसंदर्भातील संशोधनासाठी पैसा खर्च करण्यास सुरुवात केली.
पुढच्याच वर्षी म्हणजे 1994 मध्ये स्वान्सीमध्ये आणखी एक वैद्यकीय चाचणी करण्यापूर्वी, ब्रिस्टलच्या साऊथमीड रुग्णालयात ज्या रुग्णांना इरेक्टाइल डिसफ्ंक्शन (ताठरतेची) ची समस्या आहे त्यांची चाचणी करण्यात आली.
स्वान्सीमधील मॉरिस्टन हॉस्पिटलमधील क्लिनिक अधिक व्यापक होतं, कारण त्यात मधुमेह आणि हृदयरोगाची समस्या असलेल्या रुग्णांचा समावेश करण्यात आला होता. त्यात इरेक्टाइल डिसफंक्शन या दुष्परिणामाचाही समावेश होता.
एन्डोक्रायनोलॉजी सल्लागार आणि चाचणीचे प्रमुख डेव्हिड प्राइस यांनी आठवणी सांगताना म्हटलं की, "फायझरनं त्यांना स्थिर नात्यात असलेल्या विषमलिंगी पुरुषांची गरज असल्याचं सांगितलं होतं."
"ते सर्वसामान्य लोक होते. स्वान्सीमधील विवाहित ब्लू कॉलर पुरुष होते. चाचणीत पुरुषांना कामुक व्हिडिओ दाखवण्याचाही समावेश होता."
औषधाच्या परिणामाची माहिती मिळण्यासाठी पुरुषाच्या लिंगावर एक उपकरण लावलेलं होतं. पुरुषांना त्यामुळे कोणताही त्रास होणार नाही, असं आश्वासन डॉक्टरांनी दिलं होतं.
स्वान्सीच्या चाचण्यांमधून समोर आलेली तथ्यं ब्रिस्टलमधील अभ्यासासारखीच सकारात्मक होती.

फोटो स्रोत, Getty Images
फायझरला लगेचच लक्षात आलं की, कदाचित त्यांच्या हाती मोठा बदल घडवून आणणारं औषध लागलं आहे.
समोर आलेले परिणाम एवढे सकारात्मक होते की, काही पुरुषांनी त्यांच्याकडं असलेल्या उर्वरित गोळ्या परत करण्यासही नकार दिला होता.
त्यानंतर फायझरच्या मार्केटिंग टीमनं या नव्या औषधाबद्दलचा संदेश कसा पोहोचवायचा यावर जोर द्यायला सुरुवात केली. कारण या औषधाला लोक एकतर खूपच खास किंवा विनाशकारी आहे असं समजतील, असं तज्ज्ञांचं मत होतं.
तुलनेनं अधिक रुढीवादी असलेल्या जगात ‘सेक्स ड्रग’ असं वर्णन होण्याची शक्यता असणारं औषध लाँच करण्याच्या विचारानं कंपनी चिंतित होती. त्यामुळं त्यांनी चाचण्यांदरम्यान पुरुषांकडून जे संदेश मिळाले त्याचाच मार्केटिंगसाठी वापर करायचं ठरवलं.
फायझरच्या माजी ज्येष्ठ जाहिरात व्यवस्थापक जेनिफर डोबलर म्हणाल्या की, "संशोधनातून एक असा विचार समोर आला की, नपुंसकता एखाद्यावर किती खोलवर परिणाम करू शकते. तसंच दुसरा विचार म्हणजे याचा नात्यांवर किती परिणाम होऊ शकतो."
"लोक जे काही सांगत होते, त्यांच्या नात्यांवर किती परिणाम होतो याच्या वर्णनांनं तसंच मी प्रचंड भारावलो होतो. त्यांच्यासाठी हे किती महत्त्वाचं आहे हे ते सांगत होते," डोबलर म्हणाल्या.

फोटो स्रोत, BBC / TWO RIVERS MEDIA
नपुंसकतेवर संभाव्य उपचार ठरून यामुळं नात्यांमध्ये सुधारणा होऊ शकते हा संदेश अधिक प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी फायझरनं व्हॅटिकनचा आशीर्वाद मिळवला होता.
व्हायग्रामुळं विवाहसंस्था मजबूत होऊन कौटुंबिक मूल्य दृढ होण्यास मदत होऊ शकते, असा दावा त्यांनी हा आशीर्वाद मिळवण्यासाठी केला होता.
ताठरतेच्या समस्येवरील परवानगी मिळालेलं पहिलं सेवन केलं जाणारं औषध असा प्रचार झाल्यानंतर व्हायग्रा 1998 मध्ये अमेरिका आणि युकेमध्ये उपलब्ध झाले.
त्यानंतर त्याला प्रचंड प्रसद्धी मिळाली आणि कमी वेळात ते सर्वाधिक विक्री होणारं औषध बनलं. 2008 मध्ये तर वार्षिक 2 अब्ज डॉलरच्या विक्रीसह त्यानं इतिहास रचला.
व्हायग्राची निर्मिती करण्यासाठी स्वयंसेवकांनी ज्या दुष्परिणामांची माहिती दिली होती त्याची मदत झाली होती, यापासून इद्रिस अनभिज्ञ होते. तसंच व्हायग्राच्या संपूर्ण प्रकरणात मेरथिलच्या भूमिकेबाबतही त्यांना माहिती नव्हती. ‘किपिंग इट अप’च्या संशोधकांनी नुकतीच त्यांना माहिती दिली तेव्हा त्यांना हे कळलं.
दक्षिण वेल्समध्ये व्हायग्राच्या उत्पत्तीची कहाणी 'मेन अप' नावाच्या एका माहितीपटातून मांडण्यात आली आहे. त्यात डॉक्टर व्हू आणि इट्स अन सिनचे रसेल टी डेव्हीस यांना कार्यकारी निर्माते आहेत. बीबीसी वनवर ती सादर करण्यात येणार आहे.
"मला जेव्हा समजलं तेव्हा मी आश्चर्यचकित झालो," असं इद्रिस म्हणाले.
"व्हायग्रा ही आता एक मोठी गोष्ट आहे. मेरथिल टाइडफिलमध्ये याचा शोध लागल्याचा मला आनंद आहे."
व्हायग्राचे सह-संस्थापक डॉ. डेव्हिड ब्राऊन यांनी म्हटलं की, जर साऊथ वेल्सचे पुरुष नसते तर व्हायग्रा अस्तित्वातच नसते.
"त्यांनी इतिहास रचला," असं ते म्हणाले.
"त्यांना केवळ थोडी जास्तीची कमाई करायची होती. पण त्यांनी अनेकांच्या जीवनात मोठा बदल घडवला आणि त्यासाठी त्यांनी आनंदी व्हायला हवं."
इरेक्टाइल डिसफ्ंक्शन किती सामान्य आहे?
NHS नं म्हटलं की नपुंसकता किंवा इरेक्टाइल डिसफ्ंक्शन ही अत्यंत सामान्य समस्या आहे. विशेषतः 40 पेक्षा अधिक वयाच्या पुरुषांच्या दृष्टीनं.
काही संशोधनांच्या मते 40 ते 0 वयोगटातील अर्ध्याहून अधिक लोकांवर याचा परिणाम होतो.

फोटो स्रोत, BBC / TWO RIVERS MEDIA
इतर अभ्यासांवरून लक्षात येतं की, 2025 पर्यंत जगभरातील 32 कोटींहून अधिक पुरुषांना ही समस्या असेल. 1995 मध्ये अंदाज बांधण्यात आलेल्या 15 कोटींच्या अंदाजापेक्षा हा आकडा दुप्पट आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








