छाती, खांद्यातील वेदनेवरचं औषध शोधताना व्हायग्राचा शोध कसा लागला?

व्हायग्रा

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, मयंक भागवत
    • Role, बीबीसी मराठी

'व्हायग्रा'ची सर्वसामान्यांच्या भाषेत ओळख म्हणजे कामसुख देणारी 'निळी गोळी'

पुरूषांच्या लिंगात (शिश्नात) ताठरता आणणाऱ्या या गोळीला 27 मार्च 1998 रोजी अमेरिकेत मान्यता मिळालीआणि औषधनिर्मिती क्षेत्रात अपघातने एक मोठी क्रांती घडली.

एकेकाळी जगभरात सर्वात जास्त मागणी असणारी 'व्हायग्रा' 25 वर्षांची झालीये. कोट्यावधी लोकांचं 'सेक्स लाईफ' या गोळीमुळे पार बदललं आहे.

पण 'व्हायग्रा' तयार झाली? याचे साईडइफेक्ट आहेत का? हे आम्ही तज्ज्ञांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

व्हायग्रा काय आहे?

यूकेच्या आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, 'सिल्डेनाफिल' एक औषध असून याचा वापर 'Erectile Dysfunction' म्हणजे पुरूषांच्या लिंगात ताठरता येत नसेल तर त्यावर उपचार म्हणून केला जातो.

कामोत्तेजना (सेक्स करण्याची इच्छा) उत्पन्न झाल्यानंतर हे औषध घेतल्यास पुरुषांच्या लिंगामध्ये तात्पुरत्या काळासाठी रक्तप्रवाह वाढतो. ज्यामुळे लिंगात ताठरता येण्यास मदत होते.

सेक्स आरोग्यः लिंग ताठरता आणि हृदयाचे ठोके यांचा काय संबंध आहे?

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक छायाचित्र

'सिल्डेनाफिल' औषध विविध नावांनी बाजारात उपलब्ध आहे. पण, जगभरात प्रसिद्ध आहे ती म्हणजे 'सेक्स लाईफ' सुधारणारी व्हायग्रा.

अपघाताने लागला व्हायग्राचा शोध?

'सेक्स लाईफ' सुधारणारी ही गोळी खरंतर, या दृष्टीने तयार करण्यात आली नव्हती. त्याचा मुख्य उद्देश पूर्णत: वेगळा होता.

ही गोष्ट 1990 च्या दशकातील.

अमेरिकेतील संशोधकांची एक टीम 'सिल्डेनाफिल' नायट्रेट या औषधावर संशोधन करत होती. 'अॅगीना' या वैद्यकीय समस्येवर उपचारासाठी या गोळीवर संशोधन करण्यात येत होतं. या आजारात छातीत, खांद्यात तीव्र वेदना झाल्यामुळे हृदयाला होणारा रक्तपुरवठा कमी होतो.

औषधनिर्मितीत अग्रेसर असणाऱ्या फायझर या कंपनीकडून हे संशोधन करण्यात येत होतं. याचा प्रमुख उद्देश होता हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या थोड्या रिलॅक्स होतील. जेणेकरून रक्तपुरवठा वाढण्यास मदत होईल.

पण हे संशोधन पूर्णत: फेल गेलं. या औषधाचा चांगला परिणाम संशोधकांना आढळून आला नाही. कंपनीने या औषधाचं संशोधन बंद करण्याचा निर्णय घेतला होता. पण अपघाताने या औषधाचा एक विचित्र परिणाम शरीरावर दिसून येऊ लागला. हा परिणाम कोणालाही अपेक्षित नव्हता.

व्हायग्रा: एका गोळीने पुरुषांचं 'सेक्स लाईफ' कसं बदललं?

फोटो स्रोत, Getty Images

औषधाची चाचणी केलेले स्वयंसेवक औषध घेतल्यानंतर लिंगात खूप ताठरता आल्याचं सांगत होते. हा साईडइफेक्ट सामान्य नव्हता. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या संशोधनातील अनेक स्वयंसेवकांनी औषध कंपनीला परत देण्यास नकार दिला.

त्यामुळे फायझरचे वरिष्ठ संशोधक ख्रिस वेमॅन यांना हे नक्की कशामुळे होतंय. याची चौकशी करण्यासाठी सांगण्यात आलं.

नानावटी रुग्णालयाचे सेक्सॉलॉजिस्ट डॉ. राजशेखर ब्रम्हभट्ट सांगतात, "चौकशीत समोर आलं की, या गोळीमुळे लिंगात असलेल्या शरीरातील सर्वात लहान रक्तवाहिनीत रक्त पुरवठा वाढला. ज्यामुळे लिंगाची ताठरता दीर्घकाळ वाढली."

या गोळीमुळे नक्की काय होतं? यासाठी संशोधकांनी नपुंसक व्यक्तीच्या लिंगातील एका पेशीवर अभ्यास सुरू केला. व्हायग्रा दिल्यानंतर लिंगातील रक्तवाहिन्या रिलॅक्स झाल्याचं त्यांना संशोधनात दिसून आलं. ते म्हणाले होते, "हे काहीतरी खास होतं."

तज्ज्ञ म्हणतात, पुरूषांमध्ये कामेच्छा जागृत झाली की लिंगातील स्नायू शिथिल होतात ज्यामुळे रक्तपुरवठा अधिक होण्यास मदत होते.

व्हायग्राचा शोध लागण्याआधी 'Erectile Dysfunction' म्हणजे पुरूषांच्या लिंगात ताठरता न येण्याच्या समस्येवर तोंडावाटे घेण्याची कोणतीही गोळी नव्हती.

लिंगात ताठरता आणण्यासाठी विविध प्रकारचे उपाय केले जात असत, डॉ. ब्रम्हभट्ट पुढे म्हणाले. "सेक्स टॉनिक्स, टेस्टोस्ट्रोरॉन, हर्बल औषध , लिंगात देण्यात येणारं इंजेक्शन आणि इंप्लांटच्या माध्यमातून लिंगात नसणाऱ्या ताठरतेवर उपचार केले जायचे. ज्याचा काहीवेळा फार कमी किंवा अजिबात फायदा होत नसे."

व्हायग्रा बाजारात कशी आली?

सेक्स, कामोत्तेजना यांसारखे शब्द आजही समाजात एक टॅबू म्हणून पाहिले जातात. त्यामुळे व्हायग्रा बाजारात येण्याआधी खूप विरोध झाला होता.

सेक्स आरोग्यः लिंग ताठरता आणि हृदयाचे ठोके यांचा काय संबंध आहे?

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, (प्रातिनिधिक छायाचित्र)

व्हायग्रा बाजारात आणण्यासाठी रूनी नेल्सन आणि डॉ. साल जिओजिर्यानी यांचं फार मोठं योगदान आहे. या दोघांनी धार्मिक गुरू, राजकीय नेते यांचा विरोध झुगारून हे औषध बाजारात आणलं.

डॉ. साल जिओजिर्यानी व्हायग्राच्या कॅम्पेनचे प्रमुख होते. तर, रूनी नेल्सन हे कॅम्पेनवर लक्ष ठेऊन होते.

ही गोळी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वापरण्यात आलेल्या घोषणा लोकांच्या दृष्टीने बनवण्यात आल्या होत्या. यामध्ये नपुंसक यांसारखे शब्द नव्हते, तर लिंगात ताठरता न येण्यासाठी वापरण्यात येणारा 'Erectile Dysfunction' हा शब्दप्रयोग यात करण्यात आल्याचं तज्ज्ञ सांगतात.

व्हायग्रा कोणाला दिली जाते?

'Erectile Dysfunction' म्हणजे लिंगात ताठरता नसणाऱ्या व्यक्तींना हे औषध दिलं जातं.

यूकेच्या आरोग्य विभागाच्या माहितीनुसार,

  • या औषधाचा असर होण्यासाठी 30 ते 60 मिनिटं लागतात
  • सेक्स करण्याआधी चार तास हे औषध घेऊ शकतात
  • पण फक्त हे औषध घेऊन लिंगात ताठरता येणार नाही. त्यासाठी कामोत्तेजना यावी लागते

पुरूषांसाठी व्हायग्रा बाजारात उपलब्ध झाल्यानंतर महिलांमधील कामेच्छा वाढवण्यासाठी 2016 मध्ये 'फिमेल व्हायग्रा' गोळीची निर्मिती करण्यात आली. या औषधाचं नाव फ्लिबॅनसेरिन असं आहे.

तज्ज्ञ सांगतात, की अनेक प्रकरणात व्हायग्राचा फायदा होतो. पण प्रत्येकालाच होतो असं नाही. ही गोळी जेवताना किंवा जेवल्यानंतर घेतली तरी चालते. पण 50 मिलीग्रॅपपेक्षा जास्त हे औषध घेऊ नये.

भारतात व्हायग्राचा वापर वाढलाय?

ऑल इंडिया केमिस्ट एंड ड्रगिस्ट असोसिएशनच्या माहितीनुसार, 2010 ते 2018 या काळात भारतात व्हायग्राचा वापर 40 टक्क्यांनी वाढला होता. वोकाहार्ट रुग्णालयाचे इंटर्नल मेडिसनतज्ज्ञ डॉ. बेहराम पारडीवाला म्हणाले, "हे खरंय, भारतात गेल्याकाही वर्षात भारतात व्हायग्राचा वापर खूप जास्त वाढलाय."

व्हायग्रा

फोटो स्रोत, Getty Images

पण भारतात या औषधाला सुरूवातीला मोठा विरोध झाला होता. सध्या भारतात व्हायग्राचे अनेक देशी अवतार उपलब्ध आहेत. ज्यांना मोठी मागणी आहे.

"देशात व्हायग्रा ओव्हर द काउंटर म्हणजेच डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय केमिस्ट दुकानात सहज उपलब्ध आहे," डॉ. पारडीवाला पुढे म्हणाले.

यूकेमध्ये व्हायग्रा डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय मिळत नाही.

नपुंसकत्वाच्या उपचारासाठी वापरली जाणारी गोळी व्हायग्रा अल्झायमर आजारासाठी उपयुक्त उपचार ठरू शकते, असं अमेरिकन संशोधकांचं म्हणणं आहे. या संशोधकांनी मेंदूतील त्यांच्या परिणामांचा अभ्यास केला आहे.

पेशींच्या चाचण्यांमधून काही बाबी लक्षात आल्या आहेत. त्यानुसार या प्रकारची औषधं स्मृतिभ्रंशात जमा होणाऱ्या काही प्रथिनांना लक्ष्य करतात. यासंदर्भात क्लीव्हलँड टीमने 70 लाख रुग्णांच्या डेटाबेसचा अभ्यास केला आणि यात असं आढळलं की जे पुरूष हे औषध घेत होते त्यांना अल्झायमरचा धोका कमी आहे.

सेक्सॉलॉजिस्ट डॉ. सागर मुंदडा सांगतात, "भारतात व्हायग्राचा वापर वाढण्याची तीन प्रमुख कारणं आहेत. सहजरित्या केमिस्टमध्ये उपलब्ध होणारं औषध लोक लैंगिक समस्यांबाबत जागृत झालेत. लैंगिक त्रासाबाबत डॅाक्टरांशी बोलण्यात त्यांना संकोच वाटत नाही. लिंगात ताठरता येत नसेल तर ऑनलाईन खूप माहिती उपलब्ध आहे. लोक ही माहिती वाचून औषध घेत आहेत." ते पुढे म्हणाले, "18 वर्षांच्या मुलांपासून 70-80 वर्षाचे वयोवृद्ध लोक आता व्हायग्रा घेत आहेत. पण हे औषध डॅाक्टरांच्या चिठ्ठीशिवाय दिलं जाऊ नये."

व्हायग्राचे साईडइफेक्ट आहेत?

तज्ज्ञ सागंतात, व्हायग्रा घेताना वैद्यकीय सल्ला घेतला पाहिजे. या औषधाच्या जास्त वापराने आरोग्य विषयक समस्या निर्माण होऊ शकतात.

डॉ. बेहराम पारडीवाला सांगतात, "तुम्ही हृदयरोगासाठी नायट्रेट असलेली औषधं घेत असाल तर व्हायग्रामुळे हार्ट अटॅक येण्याची शक्यता असते. त्यामुळे हृदयरोग असलेल्यांनी हे औषध घेताना काळजी घेतली पाहिजे."

हे औषध घेतल्यामुळे काहीवेळा रक्तदाब अचानक कमी होतो.

व्हायग्राचे साईडइफेक्ट,

  • डोकेदुखी
  • गुंगी येणं
  • डोळ्यांनी स्पष्ट न दिसणं
  • नाक चोंदणं
  • छातीत दुखणं
  • अचानक दृष्टी जाणं

'Erectile Dysfunction' म्हणजे काय?

'Erectile Dysfunction' म्हणजे सोप्या भाषेत पुरुषांच्या लिंगात ताठरता नसणे.

जगभरात कोट्यावधी लोकांना ही समस्या आहे किंवा त्यांच्या आयुष्यात कधीतरी त्यांनी या समस्येचा सामना केलाय. तज्ज्ञ सांगतात, लिंगात ताठरता नसल्याने पुरूषांना सेक्स लाईफची मजा घेता येत नाही. नपुंसकत्वामुळे मूल जन्माला येण्यास अडथळा निर्माण होतो.

लिंगात ताठरता न येण्याचा आजार मानसिक, रक्त पुरवठ्याशी निगडीत समस्या आहे का? यावर खूप चर्चा झाली होती. पण, संशोधनानंतर स्पष्ट झालं की, लिंगात असलेली रक्तवाहिनी बंद झाल्यामुळे ताठरता येत नाही.

डॉ. ब्रम्हभट्ट पुढे सांगतात की, मधुमेह, हृदयरोग, स्मोकिंग, लठ्ठपणा आणि स्ट्रेस ही कारणं देखील लिंगात ताठरता न येण्यासाठी कारणीभूत ठरू शकतात. त्यामुळे फक्त औषधं नाहीत, तर दररोज व्यायाम, योग, आणि मानसिक आरोग्य चांगलं ठेवण्याकडे लक्ष दिलं पाहिजे. जेणेकरून लैंगिक आयुष्य चांगलं राहील.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)