'फिमेल व्हायग्रा'मुळे या अरब देशात घटस्फोटांचं प्रमाण कमी होईल?

- Author, सॅली नाबिल
- Role, बीबीसी प्रतिनिधी
स्त्रीची कामेच्छा वाढवणाऱ्या औषधाची निर्मिती आणि विक्रीला इजिप्तने अधिकृत मान्यता दिली आहे. अशा प्रकारची परवानगी देणारा इजिप्त हा पहिला अरब देश बनला आहे. पण रुढीवादी समाजव्यवस्था असलेल्या या देशात अशाप्रकारच्या औषधीला मान्यता आणि खप मिळेल का?
"मला गुंगी आल्यासारखं वाटलं, थोडं गरगरल्यासारखंही झालं. हृदयाची धडधड वाढली होती."
'फिमेल व्हायग्रा' म्हणून ओळखली जाणारी गोळी घेतल्यावर लैला हिला आलेला हा अनुभव. या औषधाचे वैद्यकीय नाव 'फ्लिबॅनसेरिन' असं आहे.
हे औषध तीन वर्षांपूर्वी पहिल्यांदा अमेरिकेत वापरात आलं. आता इजिप्तमध्ये या औषधीची निर्मिती सुरू झाली आहे.
लैला (खरी ओळख लपवलेली आहे) एका रुढीवादी मुस्लीम कुटुंबातील तिशीतील गृहिणी आहे. इजिप्तमध्ये स्त्रियांनी लैंगिक समस्या किंवा कामभावनेविषयी बोलणं अजूनही निषिद्ध मानलं जातं. त्यामुळे लैलालाही आपली खरी ओळख उघड करायची नाही.
लैलाच्या लग्नाला दहा वर्षं झाली आहेत आणि केवळ उत्सुकता म्हणून तिने हे औषध वापरून बघायचं ठरवलं.

लैलाला कुठलाही शारीरिक त्रास किंवा व्याधी नाही. इजिप्तमध्ये डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन नसेल तरीही फार्मसीमध्ये हे औषध सहज मिळतं. लैलानेही कुठल्याही प्रिस्क्रिप्शनशिवाय या टॅबलेट्स घेतल्या.
ती सांगते, "फार्मसिस्टने मला सांगितलं की ही टॅबलेट आठवडाभर रोज रात्री घ्या. याचे कुठलेही साईड इफेक्ट नाहीत, असंही तो म्हणाला. मला आणि माझ्या नवऱ्याला बघायचं होतं की ही गोळी घेतल्यावर नेमकं काय होतं. मी एकदा ही गोळी घेतली. मात्र यापुढे कधीही घेणार नाही."
लैंगिक समस्येवर समाधान?
इजिप्तमध्ये घटस्फोटांचं प्रमाण वाढत आहे. काही स्थानिक मीडिया रिपोर्टमध्ये यामागे जोडप्यांमध्ये असलेल्या लैंगिक समस्या, हे कारण म्हटलं जातं.
इजिप्तमधील प्रत्येक दहापैकी तीन महिलांमध्ये कामेच्छा कमी असल्याचं 'फ्लिबॅनसेरिन'चं उत्पादन करणाऱ्या इजिप्तमधील कंपन्यांचं म्हणणं आहे. मात्र ही आकडेवारी ढोबळ आहे.
औषध निर्मिती कंपनीचे प्रतिनिधी अश्रफ अल मॅराघी सांगतात, "या औषधीची इथे (इजिप्तमध्ये) फार गरज आहे."
ते सांगतात, "या गोळ्या सुरक्षित आणि परिणामकारक आहेत. या गोळ्यांमुळे येणारी गुंगी काही वेळात थांबते."
मात्र अनेक डॉक्टर आणि फार्मसिस्ट यांना हा दावा मान्य नाही.
या औषधामुळे रक्तदाब धोक्याच्या पातळीपर्यंत खाली येऊ शकतो आणि हृदय आणि यकृताच्या समस्या असणाऱ्यांना याचा अधिक त्रास होऊ शकतो, असं एका फार्मसिस्टने मला सांगितलं.
उत्तर कैरोमध्ये मुराद सादिक यांची एक फार्मसी आहे. या टॅबलेट मागणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला मी तिच्या धोक्याविषयी माहिती देतो, मात्र तरीही "ते या औषधाची मागणी करतात."
"हे औषध घेण्यासाठी दररोज जवळपास दहा जण आमच्याकडे येतात. त्यातले बहुतेक पुरुष असतात. महिला या गोळ्या मागायला लाजतात."
'हा केवळ मनाचा खेळ आहे.'
सादिक यांच्या फार्मसीमध्ये मी एक जाहिरात बघितली. त्यात 'फ्लिबॅनसेरीन'ला 'गुलाबी गोळी' म्हटलं होतं. 'ब्लू पिल' म्हणजेच 'निळ्या गोळी'ची ही महिला आवृत्ती. इजिप्तमध्ये पुरुषांसाठी मिळणाऱ्या व्हायग्राला ब्लू पिल म्हणतात.
मात्र 'फिमेल व्हायग्रा' म्हणणं चुकीचं आहे, असं औषध निर्मिती करणाऱ्या कंपनीचं म्हणणं आहे. मॅराघी म्हणतात, "मीडियाने हे नाव दिलं आहे. आम्ही नाही."

सेक्स करण्यात असमर्थ असलेल्या पुरुषांनी व्हायग्रा घेतल्यामुळे त्यांच्या शिश्नाकडे रक्तप्रवाह वाढतो आणि त्यामुळे शिश्न ताठ होतो. तर 'फ्लिबॅनसेरिन' मेंदूतील रसायनं संतुलित करतं. त्यामुळे नैराश्य दूर होतं आणि कामेच्छा वाढते.
हेबा कोत्ब या सेक्स थेरपिस्ट आहे. त्या आपल्या रुग्णांना कधीही पिंक पिल घ्यायचा सल्ला देत नाहीत. त्या म्हणतात, "फिमेल व्हायग्रा ही गैरसमज पसरवणारी संज्ञा आहे. कुठल्याही प्रकारचा शारीरिक किंवा मानसिक त्रास असणाऱ्या स्त्रीला याचा फायदा होत नाही."
"स्त्रीसाठी प्रणय ही एक भावनिक प्रक्रिया आहे. याची सुरुवात मनात होते. नवरा वाईट वागणूक देत असेल, तिची हेळसांड करत असेल तर अशी स्त्री कधीच नवऱ्यासोबत सुदृढ लैंगिक संबंध ठेवू शकत नाही. अशा परिस्थितीत कुठल्याच औषधांचा फायदा होत नाही."
कोत्ब सांगतात फ्लेबॅसेरिन फार परिणामकारक नाही आणि म्हणूनच हे औषध त्यापासून उद्भवणाऱ्या समस्यांची जोखीम पत्करण्यास पात्र नाही. "रक्तदाब कमी होणे फार जोखमीचे आहे," असा सावधानतेचा इशारा त्या देतात.
इजिप्तमधील स्त्रियांना त्यांच्या लैंगिक इच्छांबद्दल मोकळेपणाने बोलायला अजून बराच वेळ लागेल.
लैला सांगते, "वैवाहिक जीवनातील अनेक समस्यांचा लैंगिक संबंधावर परिणाम झाल्याने घटस्फोटासाठी अर्ज केलेल्या" अनेक महिला मला माहिती आहेत.
"तुमचा नवरा प्रेमळ असेल, तर त्याच्या संभोग असमर्थतेवर उपचार करण्यासाठी तुम्ही त्याची साथ देता, त्याला मदत करता. मात्र तो शिवीगाळ करत असेल, मारहाण करत असेल तर तुमचा त्यात काहीच रस उरणार नाही. पुरुषांना हे कळतं, असे वाटत नाही."
इजिप्तमध्ये पिंक गोळ्यांची विक्री गेल्या काही दिवसांतच सुरू झाली असली तरी आतापर्यंत त्याचा खप चांगला आहे आणि भविष्यात तो वाढेल, अशी आशा फार्मसी मॅनेजर असलेले सादिक यांना आहे.
मात्र सेक्स थेरपिस्ट कोत्ब यांना या गोळ्यांचा वैवाहिक आयुष्यावर होणाऱ्या संभावित भयंकर परिणामांची काळजी वाटते.
त्या म्हणतात, "या गोळ्या घेतल्यावरही बायकोच्या कामभावनेत फरक पडला नाही तर नवरा तिलाच दोष देईल. गोळ्या परिणामकारक नाहीत किंवा त्यांच्या नात्यातच तणाव आहे, याकडे तो लक्ष देणार नाही. इतकंच नाही तर गोळ्या घेऊनही फरक पडत नाही, या सबबीखाली तो बायकोचा त्याग करण्याचीही शक्यता आहे."
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








