TB उपचार: भारताला क्षयरोगविरोधी लढ्यात विजय मिळवण्यासाठी लशींची मदत मिळणार?

क्षयरोग

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, निखिला हेन्री
    • Role, बीबीसी न्यूज, दिल्ली

भारतानं 2018 मध्येच देश 2025 पर्यंत क्षयरोगमुक्त होण्यासाठीचं उद्दिष्ट समोर ठेवलं होतं.

संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांनुसार ठरवण्यात आलेल्या मुदतीच्या पाच वर्षं अलीकडची ही मुदत ठरवण्यात आली आहे.

मार्च 2023 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वन वर्ल्ड टीबी परिषदेत पुन्हा एकदा या आश्वासनाचा उल्लेख केला. वाराणसी शहरामध्ये या परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं.

पण जागतिक आरोग्य परिषदेचा टीबीबाबतचा जागतिक अहवाल पाहता वेगळं चित्र समोर उभं राहतं. भारतात दर दोन मिनिटांनी क्षयरोगामुळं एका व्यक्तीचा मृत्यू होतो.

या अहवालानुसार जागतिक स्तराचा विचार करता टीबीचे सर्वाधिक प्रमाण भारतात आहे. 2022 मध्ये 1 कोटी 60 लाख जणांना क्षयरोगाचं निदान झालं. हे प्रमाण जगाच्या तुलनेत जवळपास 27% होतं.

त्याचबरोबर देशात याचवर्षी मल्टी ड्रग रेझिस्टंट इन्फेक्शन असलेल्या रुग्णांचं प्रमाण हे 47% आहे. या संसर्गावर क्षयरोगाच्या उपचारावरील प्रमुख औषधांपैकी दोन औषधांचा काहीही परिणाम होत नाही.

एकीकडं तज्ज्ञ सांगतात की, या आजाराच्या उपचारासाठी चाचणी आणि उपचार हीच सर्वांत योग्य पद्धत आहे. त्याचबरोबर भारतानं क्षयरोगावरील प्रभावी लस शोधून काढण्यासाठीही गुंतवणूक केली आहे. 2019 पासून शास्त्रज्ञ सात संशोधन केंद्रांमध्ये दोन लसींवर चाचणी घेत आहेत.

पण क्षयरोगाची लस तयार करणं ही एवढी सोपी गोष्टही नाही.

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

"लशीकडून नेमकं काय हवं हेच आम्हाला माहिती नाही. जोपर्यंत टीबीचा बॅक्टेरिया म्हणजे ट्युबरकल बॅसिलसचा प्रतिकार कशाप्रकारे करतात किंवा कशामुळं प्रतिकार करण्यात अपयशी ठरतात, याची मूलभूत माहिती मिळत नाही, तोपर्यंत त्या ज्ञानाचा फायदा घेत लस तयार करणं कठीण आहे," असं मत कॅनडाच्या मॅकगिल युनिव्हर्सिटीच्या हेल्थ सेंटरमधील संसर्गजन्य आजार विभागाचे संचालक डॉक्टर मार्सेल ए बेहर यांनी व्यक्त केलं.

त्याचा अर्थ म्हणजे, टीबीच्या लशीमुळं नेमक्या अँटिबॉडी (प्रतिपिंडं) तयार होतील, अँटिजन-विशिष्ट टी-पेशी (विशिष्ट बॅक्टेरियाच्या माध्यमातून तयार झालेल्या प्रतिकारक पेशी) किंवा प्रतिकारक्षमता या कशाच्या माध्यमातून फायदा होईल याबाबत अद्याप स्पष्टपणे काहीही समोर आलेलं नाही.

डॉक्टर बेहर म्हणाले की, "क्षयरोगाच्या चाचणीद्वारे सध्याच्या आणि पूर्वीच्या संसर्गामधील फरक स्पष्ट होत नसल्यामुळंही क्षयरोगाच्या लशीच्या शोधात अडथळे येत आहेत. एखाद्या व्यक्तीला क्षयरोगाच्या जीवाणूची लागण झाली आहे किंवा नाही तसंच हा संसर्ग अजूनही शरिरात आहे, की त्यावर उपचार झाला आहे, एवढंच सध्याच्या चाचणीवरून स्पष्ट होतं."

"जेव्हा चाचणीच्या माध्यमातून यामधील फरक स्पष्ट होऊ शकत नसेल तेव्हा कोणाला संसर्ग कायम आहे आणि कुणाच्या शरीरातील संसर्ग दूर झाला आहे, हे लोकांची माहिती घेऊन शोधणं कठीण ठरतं," असंही डॉ. बेहर म्हणाले.

क्षयरोग

फोटो स्रोत, Getty Images

पण सरकारचा पाठिंबा असलेल्या इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर)मधील शास्त्रज्ञ नेमकं हेच करत आहेत.

क्षयरोगाचा संसर्ग झालेल्या रुग्णांच्या घरातील संपर्कात असलेल्यांचं ते चार वर्षं निरीक्षण करत आहेत. त्यांच्यातही क्षयरोगाची लागण झालेली आहे का हे ते पाहत आहेत.

संसर्ग झालेल्या व्यक्तीबरोबर राहिल्यानं याचा संसर्ग होण्याचा धोका वाढतो का हे तपासत आहेत. जर सर्वकाही योग्यरित्या झालं तर या चाचणीचे निष्कर्ष मार्च महिन्यापर्यंत समोर येतील असं आयसीएमआरच्या संशोधकांनी बीबीसीबरोबर बोलताना सांगितलं.

आयसीएमआर VPM1002नावाच्या रिकॉम्बिनंट बीसीजी लशीची चाचणी घेत आहे. तसंच इम्युव्हॅक नावाच्या हीट किल्ड मायकोबॅक्टेरियम लशीचीही चाचणी घेत आहेत.

सोप्या शब्दांत सांगायचं झाल्यास, पहिल्या लशीमध्ये टीबीच्या जीवाणूचा सुधारित डीएनए आहे तर दुसऱ्या लशीमध्ये उष्णतेच्या मदतीनं मारण्यात आलेला टीबीचा जीवाणू आहे. जर ते परिणामकारक ठरले तर त्याद्वारे क्षयरोगाच्या विरोधात प्रतिकारक्षमता तयार होऊ शकते.

ही चाचणी तीन गटांमध्ये आहे. दोन गटांना प्रत्येक लशीचा एक एक डोस देण्यात आला आहे. तर तिसऱ्या गटाला एक प्लासिबो देण्यात आला. पण सहभागी असलेल्या 6 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या 12000 लोकांना मात्र त्यांना नेमकी कोणते उपचार मिळाले हे माहिती नाही.

"या लशीच्या परिणामकारकतेच्या अभ्यासाचे उद्दिष्ट हे घरात संपर्कात असलेल्यांमध्ये क्षयरोगाच्या संसर्गाची शक्यता कमी करणं हे आहे," असं चेन्नईमधील आयसीएमआरच्या नॅशनल इन्सिट्यूट फॉर रिसर्च इन ट्युबरकुलोसिसमध्ये या चाचणीचं नेतृत्व करणाऱ्या डॉ. बानू रेखा म्हणाल्या.

डॉ. बेहर यांच्यासारख्या काही तज्ज्ञांच्या मते ही चाचणी फार जास्त काळ चालली. उच्च प्रसाराची शक्यता असलेल्या ठिकाणी जिथं काही जणांना सक्रिय किंवा सुप्त क्षयरोग असेल, अशा ठिकाणी यशस्वी लसीमुळं एक किंवा दोन वर्षात प्रभावी परिणामकारकता दिसायला हवी, असं ते म्हणाले.

तसंच याबाबत इतरही आव्हानं आहेतच.

क्षयरोगाची लस प्रभावी ठरावी यासाठी आधी तिनं काम करायला हवं. तर दुसरी बाब म्हणजे भारतातील जवळपास सर्व लोकसंख्येला डोस द्यावे लागतील.

सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ चॅपल मेहरा यांच्या मते, "भारतात लाखो लोकांना सुप्त क्षयरोग असतो. सुप्त क्षयरोग असलेल्यांना याची लागण होते, पण त्यांच्यामध्ये लक्षणं आढळून येत नाहीत."

क्षयरोग

फोटो स्रोत, Getty Images

तामिळनाडूमध्ये 1968 ते 1987 या 17 वर्षांच्या बीसीजी लशीच्या चाचणीमध्ये जवळपास 2 लाख 80 हजार जणांनी सहभाग घेतला होता. पण त्यातून निराशाच हाती आली, याकडंही तज्ज्ञांनी लक्ष वेधलं.

1999 मधील चाचणीच्या अहवालानुसार "बीसीजीमुळं प्रौढांना बॅसिलरी पलमोनरी टीबी पासून कोणत्याही प्रकारचं संरक्षण मिळालं नाही."

अभ्यासकांच्या मते, क्षयरोगासाठी कोणतंही वन स्टॉप सोल्युशन असू शकत नाही. कारण हा एक गुंतागुंतीचा आजार आहे. तसंच त्याच्याशी सामाजिक, आर्थिक आणि वर्तनाशी संबंधित घटकही संलग्न आहेत.

"क्षयरोग हा गरिबांचा आजार म्हणून का ओळखला जातो? गरीबांना केवळ निकृष्ट घरं आणि निकृष्ट किंवा पोषण असलेला आहारच परवडत असतो. त्यामुळं त्यांना क्षयरोग होण्याची सर्वाधिक भीती असते. क्षयरोग पूर्णपणे घालवण्यासाठी हा रोग आणि त्यासाठी जबाबदार असलेले घटक पूर्णपणे समजून घेणं गरजेचं आहे," असंही मेहरा यांनी म्हटलं.

भारतात जागतिक आरोग्य संघटनेनं शिफारस केलेला सर्वसमावेशक DOTS (Directly Observed Treatment, Short-course) उपक्रम आहे. त्याअंतर्गत क्षयरोग असलेल्यांना सरकारी आरोग्य सुविधांच्या माध्यमातून मोफत उपचार दिले जातात.

पण सार्वजिनक रुग्णालयांवर असलेल्या ताणामुळं कधीकधी ते परिणामकारक ठरत नाही. त्यामुळं हजारो क्षयरोगाचे रुग्ण हे उपचारासाठी खासगी आरोग्य सुविधांकडं वळतात.

याशिवाय इतरही आव्हानं आहेत. 2020 आणि 2021 मध्ये केंद्र सरकारनं 75 लाख क्षयरुग्णांना उपचारासाठी थेट खात्यात रक्कम ट्रान्सफर करत 20 अब्ज रुपये खर्च केले. पण तज्ज्ञांच्या मते, यातून प्रत्येक रुग्णासाठी मासिक रक्कम मिळाली ती फारच कमी होती.

पोषण तज्ज्ञांच्या मते, क्षयरोग असलेल्यांच्या संपर्कात असलेल्यांना पोषक आहार दिल्यास या रोगाचा प्रसार लक्षणीयदृष्ट्या कमी होतो. लॅन्सेटनं प्रकाशित केलेल्या एका ताज्या अभ्यासात माधवी भार्गव आणि अनुराग भार्गव यांनी लिहिलं की, त्यांनी सहा महिने केलेल्या निरीक्षणात चांगल्या पोषणामुळं सर्वप्रकारच्या क्षयरोगाचं प्रमाण 40% नी कमी केलं. तर रुग्णाच्या संपर्कात असलेल्यांना संसर्गाचं प्रमाण 50% नी घटलं.

"क्षयरोगामुळं निर्माण झालेला भार कमी करण्यासाठी एक प्रभावी लस अत्यंत महत्त्वाची आहे. पण लसीकरण आणि पोषणासंदर्भातील सुधारणा याकडंही महत्त्वाचा भाग म्हणून पाहणं गरजेचं ठरेल," असं मत सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ डॉ. माधवी भार्गव यांनी व्यक्त केलं.

याबाबत मत मांडताना डॉ. बेहर म्हणाले की, जगाला त्रिस्तरीय क्षयरोग निर्मूलन यंत्रणेची गरज आहे. त्यात चाचणी आणि योग्य उपचार, पोषणात सुधारणा आणि लस (ज्यामुळं रोगाला प्रतिबंध लागेल आणि त्याचा प्रसारही होणार नाही) या तिन्हीचा समावेश असेल.

क्षयरोगाशी संबंधित काही तथ्ये

- संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या खोकल्याद्वारे किंवा शिंकेद्वारे बाहेर पडलेले सूक्ष्म थेंब श्वसनाद्वारे शरीरात गेल्याने क्षयरोगाचा संसर्ग पसरतो.

- याचा प्रामुख्यानं फुफ्फुसांवर परिणाम होतो. पण शरिरातील कोणत्याही अवयवावर त्याचा परिणाम होऊ शकतो.

- निदान कठीण - लागण झालेल्या व्यक्तीच्या जवळच्या संपर्कात खूप जास्त तास घालवले तर संसर्ग होण्याचा धोका असतो. पण उपचार न केल्यास तो घातक ठरू शकतो.

- योग्य औषधोपचार घेतल्यास बरा होतो.

- सर्वसामान्य लक्षणांमध्ये तीन आठवड्यांपेक्षा जास्त काळ असलेला सततचा खोकला, अचानक वजन कमी होते आणि ताप तसंच रात्रीच्या वेळी घाम येणे यांचा समावेश आहे.

- बीसीजी लसीमुळं लहान बाळांना काही प्रमाणात क्षयरोगापासून संरक्षण मिळतं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)