कोरोना रुग्णांना 'टीबी'चा संसर्ग होण्याचा धोका आहे का?

कोरोना टीबी

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, मयांक भागवत
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

कोव्हिड-19 ग्रस्त रुग्णांना अॅक्टिव्ह 'टीबी' होण्याचा धोका जास्त आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही चिंता व्यक्त केलीये.

कोरोनासंसर्ग झालेल्या सर्व रुग्णांची 'टीबी'ची तपासणी करण्याचे निर्देश केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्यांना दिले आहेत.

अर्थात 'कोरोना संसर्गामुळे 'टीबी' रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असल्याचा, ठोस पुरावा मिळालेला नाही,' असंही केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केलंय.

कोरोनासंसर्ग झालेल्या रुग्णांना 'टीबी' होण्याचा खरच धोका आहे का? याची कारणं काय असू शकतात? हे आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

कोरोनाग्रस्तांना 'टीबी'चा धोका अधिक?

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, ट्युबरक्यूलॉसिस (TB), 'काळ्या बुरशी' सारखाचं (Black Fungus) कोरोनासंसर्गानंतर होणारा एक संधीसाधू आजार आहे.

त्यामुळे, केंद्रीय आरोग्यमंत्रालयाने कोरोनासंक्रमित सर्व रुग्णांची टीबी चाचणी आणि सर्व टीबी रुग्णांची कोरोना चाचणी करण्याचे निर्देश दिलेत.

प्रातिनिधीक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, कोरोनासंसर्गाच्या काळातील लॉकडाऊन आणि इतर निर्बंधांमुळे टीबी रुग्णांची नोंदणी 2020 मध्ये 25 टक्क्यांनी कमी झाली आहे.

तज्ज्ञ सांगतात, की कोव्हिड-19 आणि टीबी, दोन्ही अत्यंत संसर्गजन्ज्ञ आजार असून, रुग्णांच्या फुफ्फुसांवर हल्ला करतात. दोन्ही संसर्गात कफ, ताप आणि श्वास घेण्यास अडथळा, ही सारखीच लक्षणं दिसून येतात.

रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्याने टीबी होण्याची शक्यता?

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, टीबीचा विषाणू, लोकांच्या शरीरात असण्याची शक्यता असते. पण हा विषाणू सक्रिय नसतो. काही कारणांनी रोगप्रतिकारशक्ती कमी झाली तर हा विषाणू वाढू लागतो.

तज्ज्ञ सांगतात, की कोरोनासंसर्गातही अशीच परिस्थिती असते.

"कोरोना व्हायरस किंवा उपचारादरम्यान रुग्णांना स्टिरॉईड्स आणि इतर औषधं दिल्याने, रुग्णाची रोगप्रतिकारशक्ती कमी होते," असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचं म्हणणं आहे.

फुफ्फुस

फोटो स्रोत, SPL

कोरोनासंसर्गात टीबी होण्याची शक्यता का आहे? यावर बोलताना फुफ्फुसविकारतज्ज्ञ डॉ. विकास ओस्वाल सांगतात, "कोरोना संसर्गात आणि कोरोनामुक्त झाल्यानंतर, रुग्णांची रोगप्रतिकारशक्ती कमी होते. शरीरातील टीबीचे विषाणू अॅक्टिव्ह होतात. त्यामुळे, रुग्णांना टीबीचा संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते."

कोरोनासंसर्गात उपचारांसाठी देण्यात येणाऱ्या स्टिरॉईड्समुळे रुग्णाची रोगप्रतिकारशक्ती कमी होते. यामुळेच, टीबी किंवा काळ्या बुरशीसारखे संधीसाधू आजार डोकंवर काढतात, असं तज्ज्ञ म्हणतात.

नानावटी मॅक्स सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे संसर्गजन्य आजारतज्ज्ञ डॉ. दर्षद लिमये म्हणतात, "कोरोनारुग्णांची टीबी चाचणी केल्यामुळे ज्या रुग्णांचं निदान झालं नाही, त्यांची माहिती मिळेल. कोरोनाकाळात टीबी रुग्णांची संख्या कमी झाल्याचं आढळून आलंय."

डॉ. सोनम सोलंकी मुंबईच्या व्हॉकार्ट रुग्णालयात फुफ्फुसविकारतज्ज्ञ आहेत.

त्या सांगतात, "कोरोनावर उपचारात काही रुग्णांना स्टिरॉईड्स देण्यात येतात. स्टिरॉईड्स फायदेशीर आहेतच. पण, यामुळे इतरही आजार होण्याची शक्यता असते. यात टीबीचाही समावेश होतो."

मुंबईत कोरोनारुग्णांना टीबी होण्याचं प्रमाण किती?

मुंबईत देशातील सर्वात जास्त कोरोनारुग्ण आहेत. मग, मुंबईत कोरोनारुग्णांमध्ये टीबीचं प्रमाण वाढलंय का? हे आम्ही मुंबई महापालिकेच्या टीबी नियंत्रण अधिकारी डॉ. प्रणिता टिपरे यांच्याकडून जाणून घेतलं.

त्या सांगतात, "कोरोनासंसर्गामुळे रुग्णालयात दाखल रुग्णांची टीबी चाचणी करण्यात येतेच. त्याचसोबत कोरोनामुक्त झालेल्या पण कफ असलेल्या रुग्णांना फोन करून त्यांना टीबी चाचणीसाठी बोलावलं जातं."

मुंबई महापालिका आधिकारी सांगतात, की कोरोनासोबत टीबी बाबतही लोकांमध्ये एक स्टिग्मा आहे. त्यामुळे काही लोक पुढे येत नाहीत.

"कोरोनारुग्णांना टीबी झाल्याच्या काही केसेस आढळून आल्या आहेत. पण याचं प्रमाण फार कमी आहे," डॉ. प्रणिता टिपरे पुढे सांगतात.

त्यांच्या माहितीनुसार, "कोरोना चाचणीसाठी आलेल्या काही संशयित रुग्णांना टीबीचा संसर्ग झाल्याचं दिसून आलंय."

मुंबईत कोरोनासंसर्गाच्या पहिल्या लाटेपासून कोरोनारुग्णांची टीबी चाचणी करण्यास सुरू करण्यात आलंय.

प्रातिनिधीक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

व्हॉकार्ट रुग्णालयाच्या फुफ्फुसविकारतज्ज्ञ डॉ. सोलंकी सांगतात, "कोरोनावर उपचार करताना अनेकवेळा रुग्णांचं सीटीस्कॅन किंवा थुंकीची (sputum test) चाचणी करण्यात येते. ज्यात रुग्णांना टीबीची लागण झाल्याचं दिसून येतं."

'टीबी' रुग्णांमध्ये मुलींची संख्या वाढली?

फुफ्फुसविकारतज्ज्ञ डॉ. विकास ओस्वाल मुंबईतील गोवंडी परिसरात वैद्यकीय सेवा देतात.

ते सांगतात, "शनिवारी (17 जुलै) ओपीडीमध्ये नव्याने टीबी संसर्गाची लागण झालेल्या 14 रुग्णांची नोंद झाली. गेल्या दोन महिन्यात टीबी रुग्णांच्या संख्येत जवळपास 30 टक्क्यांनी वाढ झालीये."

डॉ. ओस्वाल मुंबई महापालिकेच्या शताब्दी रुग्णालयात, टीबी नियंत्रण कार्यक्रमाचे सदस्य आहेत.

"सर्वात महत्त्वाची आणि चिंतेची गोष्ट म्हणजे, नव्याने टीबीची लागण झालेल्या सर्व 11 ते 20 वर्ष वयोगटातील मुली आहेत," डॉ. विकास पुढे सांगतात.

कोरोना काळातील लॉकडाऊन आणि निर्बंधांमुळे 2020 मध्ये मुंबईत टीबी रुग्णांच्या संख्येत मोठी घट पहायला मिळाली होती.

मुंबई महापालिकेच्या माहितीनुसार, 2019 मध्ये 60 हजारपेक्षा जास्त टीबी रुग्ण आढळून आले होते. 2020 मध्ये टीबी रुग्णांची संख्या तब्बत 20 हजाराने कमी नोंदवण्यात आली.

डॉ. ओस्वाल पुढे सांगतात, "या मुलींना सौम्य नाही तर मध्यम स्वरूपाचा टीबी संसर्ग झालाय. एवढंच नाही, तर, ज्यांना कधीच टीबी झाला नव्हता अशा रुग्णांना औषधांना दाद न देणारा टीबी होतोय. हा मोठा चिंतेचा विषय आहे."

गोवंडीमध्ये मुंबईतील सर्वात जास्त टीबी रुग्ण आहेत. डॉ ओस्वाल टीबी रुग्णांमध्ये अचानक वाढ होण्याची कारणं सांगतात-

• गोवंडीत लोक लहान-लहान घरात रहतात. घरात कोणाला संसर्ग झाला असेल, तर इतरांना होण्याची शक्यता

• कोरोना निर्बंधामुळे बाहेर जाणं कमी झालं त्यामुळे त्यांनी घरीच रहावं लागलं

"कोरोनामुळे टीबी रुग्णांची संख्या वाढल्याचा सद्य स्थितीत पुरावा नाही. कोरोनाकाळात टीबी रुग्णांची संख्या कमी झाल्याचं दिसून आलंय," डॉ. दर्षद लिमये पुढे सांगतात.

भारतात 2019 मध्ये 24 लाख टीबी रुग्णांची नोंद करण्यात आली होती. 2018 च्या तुलनेत टीबी रुग्णांमध्ये 11 टक्क्यांनी वाढ झाल्याचं पाहायला मिळालं.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)