कोरोना व्हायरस : मुंबईत टीबीचे रुग्ण असलेल्या वस्त्यांमध्ये कोव्हिड-19 पसरला तर...

फोटो स्रोत, Getty Images
- Author, जान्हवी मुळे
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
24 मार्च म्हणजे जागतिक क्षयरोग दिन. अर्थात ट्युबरक्युलॉसिस म्हणजे टीबीविषयी जागरुकता निर्माण करणारा दिवस. या दिवसाच्या निमित्तानं आणि कोरोना विषाणूच्या साथीच्या पार्श्वभूमीवर भारतात, विशेषतः मुंबईमध्ये या आजाराचा धोका आजही कसा टिकून आहे, याचा आढावा आम्ही घेतला.
“माझं एकच फुफ्फुस शिल्लक आहे. त्यामुळं मला कोरोना विषाणूची जास्तच भीती वाटते. कारण हा व्हायरस फुफ्फुसावर हल्ला करतो.”
क्षयरोगातून बचावलेली मीरा यादव सांगते. तिच्यासारखेच क्षयरोगावर मात करणारे किंवा अजूनही क्षयरोगानं ग्रासलेलेल हजारो लोक काहीशा तणावाखाली आहेत. कारण कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या कोव्हिड-19 या आजाराचा सर्वाधिक धोका असणाऱ्या व्यक्तींमध्ये त्यांचा समावेश आहे.

- वाचा - कोरोना व्हायरसची शरीरातील प्राथमिक लक्षणं कशी ओळखाल?
- वाचा -कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा - कोरोना व्हायरसची लक्षणं दिसायला किती दिवस लागतात?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा -मास्कची विल्हेवाट कशी लावायची? नवं संकट टाळण्यासाठी ‘हे’ नक्की करा
- वाचा - क्वारंटाईन, आयसोलेशन किंवा विलगीकरण म्हणजे नेमकं काय?
- वाचा - 'गो कोरोना': या लोकांनी केली कोरोना व्हायरसवर मात

“भीती वाटते, टेन्शन येतं, जेव्हा जवळपास कोणी खाकरतं, शिंकतं किंवा खोकतं, तेव्हा पुन्हा टीबी होईल किंवा कोरोना विषाणूची लागण झाली तर? असा विचार मनात येतो. ” मीरा आपली भीती बोलून दाखवते.
ती मुंबईजवळ भायंदरला वडील आणि भावासोबत राहते. सहा वर्षांपूर्वी तिच्या आईचा क्षयरोगानं मृत्यू झाला होता. त्याच सुमारास, 2013 साली मीरालाही क्षयरोग झाल्याचं निदान डॉक्टरांनी केलं होतं.

फोटो स्रोत, MEERA YADAV
दोन वर्षांपूर्वी ती त्यातून बरी तर झाली, पण मीराला एक फुफ्फुस गमवावं लागलं होतं.
मग इन्फेक्शन झाल्यानं तो पू काढण्यासाठी तिच्या छातीला छिद्र पाडावं लागलं होतं. (विंडो सर्जरी) अजूनही कधी पू येऊन इन्फेक्शन होऊ नये, म्हणून तिला खूप काळजी घ्यावी लागते. त्यातच कोरोना विषाणूविषयी कळल्यापासून तिला आपल्या तब्येतीची आणखी चिंता वाटते आहे.
पेशानं पत्रकार असलेली नंदिता वेंकटेशन क्षयरोगाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी काम करते. दोनदा आतड्याचा टीबी होऊनही त्यातून वाचली आहे.
ती सांगते, “एक क्षयरोगातून वाचलेली व्यक्ती म्हणून माझ्यासाठी सध्याचे दिवस पाहता हे मी आधीच अनुभवलं आहे असं वाटतं. विलगीकरण, क्वारंटाईन, आजारावर औषधं किंवा लस उपलब्धच नसणं, तुमच्या जवळच्या व्यक्तींना तुमच्यामुळे लागण होईल अशी भीती, मित्र मी कुटुंबियांना लागण झाली नाही ना हे तपासणं (contact tracing) आणि त्यासोबत आपण कलंक असल्याची भावना... हे सगळं आम्ही भोगलं आहे. यातून जाणं किती कठीण असतं, ते आम्हाला माहिती आहे.”
टीबीग्रस्तांना कोरोना विषाणूचा धोका
खरंतर क्षयरोग आणि कोव्हिड-19 हे दोन्ही श्वसनाचे आजार असले तरी या आजारांमध्ये मूलभूत फरक आहेत.
क्षयरोग हा bacteria म्हणजे जीवाणूंमुळे होतो, त्याचा प्रसार हवेतून होतो आणि बराच काळ शरीरात राहू शकतो. तर कोव्हिड-19 विशिष्ट प्रकारच्या कोरोना विषाणूमुळे होतो, त्याचा प्रसार प्रामुख्यानं शिंक किंवा खोकल्याच्या तुषारांतून होतो आणि सुदृढ व्यक्ती 14 दिवसांत बऱ्या होऊ शकतात, असं आतापर्यंतच्या संशोधनातून समोर आलं आहे. टीबीच्या तुलनेत कोरोना विषाणूची लागण जास्त वेगानं होते.

फोटो स्रोत, GETTY IMAGES
क्षयरोग आणि कोव्हिड-19 या दोन्ही आजारांत मधुमेह, एचआयव्हीची बाधा झाली असेल, तर मृत्यूची शक्यता वाढते.
हे दोन्ही आजार अतिशय संसर्गजन्य आहेत आणि त्यामुळेच अधिक घातक आहेत, असं मुंबईतल्या शिवडीच्या टीबी हॉस्पिटलचे मेडिकल ऑफिसर आणि क्षयरोगतज्ज्ञ डॉ. ललित आनंदे सांगतात.
“टीबीच्या रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली आहे. ज्यांना फुफ्फुसाचा टीबी झालेला आहे, त्यांचं फुफ्फुस निकामी झालेलं असतं. थोडासाही न्यूमोनिया त्यांच्यासाठी घातक ठरू शकतो. अशात त्यांना कोरोना विषाणूची लागण झाली, तर ते जीवावर बेतू शकतं.”
क्षयरोगाचं आव्हान किती मोठं आहे?
मीरा, नंदिता किंवा डॉ. ललित आनंदे यांना जाणवणारा धोका नेमका किती मोठा आहे? ही आकडेवारीच पाहा.
जागतिक आरोग्य संघटना, अर्थात WHOच्या अहवालानुसार क्षयरोग हे जगात मृत्यूच्या दहा कारणांपैकी एक आहे. तसंच एकाच जीवाणू किंवा विषाणूच्या संसर्गामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये टीबीनं होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण सर्वांत जास्त आहे.
WHO नं 2018 साली जाहीर केलेल्या अहवालानुसार, वर्षभरात जगात सुमारे एक कोटी 40 लाख लोकांना टीबीची लागण होते, त्यातले 20 लाख लोक भारतात आहेत.
तसंच टीबीनं होणाऱ्या जगभरातल्या 15 लाख मृत्यूंपैकी सुमारे वीस टक्क्यांहून अधिक मृत्यू हे भारतात होतात.
भारत सरकारच्या अहवालानुसार (RNTCP report) देशात गेल्या वर्षी उत्तर प्रदेशात सर्वाधिक 4 लाख 20 हजार तर महाराष्ट्रात सुमारे 2 लाख 9 हजार रुग्ण आढळून आले. मुंबई महापालिकेच्या आकडेवारीनुसार 2017-18 साली शहरात आढळून आलेल्या क्षयरोगग्रस्तांची संख्या 46 हजारांहून अधिक होती. देशात ड्रग रेझिस्टंट म्हणजे औषधाला प्रतिसाद न देणाऱ्या क्षयरोगानं ग्रस्त रुग्णांचं प्रमाण मुंबईत सर्वाधिक असल्याचं तज्ज्ञ सांगतात.
डॉ. आनंदे माहिती देतात, की “मुंबईत मानखुर्द, गोवंडी, कुर्ला, धारावी, इथे टीबीचं प्रमाण जास्त आहे. अनेक वस्त्यांत अशी कुटुंब आहेत जिथे एका घरात दोन-तीन व्यक्तींना टीबी झाला आहे. तिथे कोरोना विषाणूची साथ पसरली, तरी कल्पना करा किती महागात पडेल?”
‘संकट आपल्यासमोर आहे’
भारतात टीबी आज नाही, तर शतकांपासून आहे. पण 1993 साली WHOनं टीबी हे जगातलं ‘सार्वजनिक संकट’ (public emergency) असल्याचं जाहीर केलं. त्यानंतर भारतातही सरकारनं टीबीविषयी जागरूकता वाढवण्याचे प्रयत्न वाढवले. 2017 साली पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2025पर्यंत भारताला टीबीमुक्त करण्याचं आश्वासन देत बजेटमध्ये 525 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची तरतूद केली होती.
वर्ल्ड बँकच्या आकडेवारीनुसार, भारतात जीडीपीच्या चार टक्क्यांहूनही कमी निधी हा आरोग्य सुविधांवर खर्च होतो. ही परिस्थिती बदलायला हवी असं तज्ज्ञ वारंवार सांगत आले आहेत.
पण केवळ आर्थिक तरतूद पुरेशी नाही, असं या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना वाटतं. अनेकांनी वेळोवेळी आरोग्यक्षेत्रात कमी गुंतवणूक, खासगी क्षेत्रात न परवडणाऱ्या किंमती, विलगीकरण किंवा क्वारंटाईन कक्षांची कमतरता अशा गोष्टींकडे लक्ष वेधून घेतलं आहे.
डॉ. ललित आनंद म्हणतात, की क्षयरोगाच्या समस्येवर आपण सर्वांनी अधिक लक्ष दिलं असतं, त्याला तोंड दिलं असतं, तर ते कोरोना विषाणूचा सामना करताना उपयोगी आलं असतं. “संकट आपल्यासमोर आहे आणि आपण त्याकडे दुर्लक्ष करत आलो आहोत. एरवी आयसीयूमध्ये आठ-दहा बेड्स असतात. पण क्षयरोगासारख्या हवेतून प्रसारण होणाऱ्या आजारावर उपचार करण्यासाठी विशेष आयसीयूंची गरज असते, जिथे एका खोलीत एक रुग्ण अशी युनिट्स असतात. त्याला निगेटिव्ह प्रेशर रूम (Negative Pressure room) असं म्हणतात, म्हणजे एका खोलीतील हवा दुसऱ्या खोलीत जात नाही. असे वॉर्ड्स ठीकठीकाणी उभारले असते, तर ते आता कामी आले असते.”
क्षयरोगाला कलंक म्हणून पाहिलं जातं, ज्यामुळं लोक आजही आपला आजार लपवतात, गर्दीच्या जागी वावरतात. पण आता ते बदलेल, अशी आशाही डॉ. आनंदे यांना वाटते.
शिंकताना नाकावर रुमाल ठेवणं, खोकताना हात तोंडावर ठेवणं या प्रारोग्याच्या मूलभूत सवयी शाळेतच शिकवल्या जातात. पण त्यांचा आपल्याला विसर पडला आहे. कोरोना विषाणूमुळे लोक पुन्हा त्या सवयी अंगी बाणवतायत. मग TBचा प्रसार रोखण्यासाठी त्यामुळे मदत होईल का? पुढचं काही सांगता येत नाही, पण सध्या तरी नंदिताला वेगळीच भीती वाटते.
“टीबीसाठीच्या सुविधा आणि निधी कोरोना विषाणूकडे वळवला जाईल अशी भीती मला वाटते. या दोन्हीचा सामना आपण करायला हवा, त्यात पर्याय असू शकत नाही.”
मीरानं मात्र आशा सोडलेली नाही. “कोव्हिड-१९ ची साथ ओसरल्यावर किमान ५० टक्के लोक जरी स्वच्छतेचे हेच नियम पाळत राहिले, तर क्षयरोगा विरोधातल्या लढाईलाही हातभार मिळेल.”
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








