कोरोना व्हायरस : आपल्या आयुष्यातून स्पर्शाची भावनाच गायब झाली तर?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, अनघा पाठक
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
कोरोना व्हायरसने काय केलं असेल तर माणसाला माणसापासून लांब केलं. विलगीकरण,आयसोलेशन, क्वारंटाईन, सोशल डिस्टन्स हे सगळे शब्द आता परवलीचे शब्द झालेत.
सोशल मीडियावर फिरणारे 'ते'फोटो तुम्ही पाहिलेच असतील. कॉफिन घेऊन जाणाऱ्या लांबच लांब रांगा, मरणातही न सरलेलं एकाकीपण... आई मुलांना हात लावू शकत नाही, नवरा बायकोला धीर देऊ शकत नाही, जेष्ठांना डोक्यावरून हात फिरवून लहानांना आशिर्वाद देता येत नाही. कधी नव्हे ती अशी वेळ आलीये की आपल्या प्रियजनांना वाचवायचं असेल तर त्यांच्यापासून लांब पळणं हा एकमेव मार्ग आहे.
इटलीच्या हॉस्पिटलमध्ये शेवटच्या घटका मोजणाऱ्या अनेकांना आपल्या आप्तेष्टांना ना डोळाभरून पाहाता येतंय ना त्यांच्या चेहऱ्यावरून शेवटचा हात फिरवता येतोय.
आपली प्रिय व्यक्ती कोरोना व्हायरसला बळी पडली तरी त्यांचे अंत्यसंस्कार पाहणं अनेकाच्या नशिबात नाही,आणि त्यांच्या मृतदेहाला कवटाळून धाय मोकलून रडणंही!

फोटो स्रोत, Getty Images
कोरोना व्हायरसने काय केलं असेल तर माणसाला माणसापासून लांब केलं! कितीही क्लिशे वाटत असला तरी हा डायलॉग खराच आहे. कोरोना व्हायरसपासून स्वतःचा बचाव करायचा असेल तर इतरांपासून स्वतःला आणि स्वतःपासून इतरांना लांब ठेवण्याशिवाय गत्यंतर नाही. विलगीकरण, आयसोलेशन, क्वारंटिन, सोशल डिस्टन्स हे सगळे शब्द आता परवलीचे शब्द झालेत.
गेल्या काही दिवसांमध्ये तुमच्या बाबतीत असं झालं का की आपल्या मित्राला कडकडून मिठी मारावीशी वाटली पण मारता आली नाही, आपली बहीण परदेशातून सुखरूप परत आली पण तिला भेटायलाही जाता आलं नाही, अचानक आलेल्या आपत्तीमुळे गावाकडे जावं लागलं पण वडिलांचा हात हातात घेऊन त्यांची खुशाली विचारता आली नाही, की वर्क फ्रॉम होममध्ये बिझी असणाऱ्या नवराबायकोला अनेक दिवसांनी मनासारखा एकांत मिळाला खरा, पण एकमेकांच्या शेजारी बसण्याचीही धास्ती वाटायला लागली...

- वाचा - कोरोना व्हायरसची शरीरातील प्राथमिक लक्षणं कशी ओळखाल?
- वाचा -कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा - कोरोना व्हायरसची लक्षणं दिसायला किती दिवस लागतात?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा -मास्कची विल्हेवाट कशी लावायची? नवं संकट टाळण्यासाठी ‘हे’ नक्की करा
- वाचा - क्वारंटाईन, आयसोलेशन किंवा विलगीकरण म्हणजे नेमकं काय?
- वाचा - 'गो कोरोना': या लोकांनी केली कोरोना व्हायरसवर मात

चुकूनही आपण एकमेकांना स्पर्श होणार नाही, याची काळजी घेतो आहोत, झालाच तर खसाखसा साबणाने हात धुवत आहोत. नाही याबद्दल हरकत काहीच नाही, हे करायलाच हवंय. पण या सगळ्यांत आपण एका महत्त्वाच्या मानवी गरजेपासून मुकतोय... स्पर्श!
हा स्पर्श आपल्या आयुष्यात किती महत्त्वाचा असतो? त्याच्यावाचून आपलं काही अडतं का?
बीबीसीच्या क्लॉडिया हेमंड या रेडियोसाठी मानसिक आरोग्यावर बेतलेला कार्यक्रम करतात. त्यांनी तज्ज्ञांशी बोलून आपल्या आयुष्यातलं स्पर्शाचं महत्त्व समजून घेतलं.
जीवनाशी होणारी पहिली ओळख - स्पर्श
गर्भात असलेल्या भ्रूणाला जाणवणारी सगळ्यांत पहिला संवेदना म्हणजे स्पर्श. त्यानंतर बाळाच्या ऐकू येणं, वास येणं किंवा चव घेता येणं अशा संवेदना विकसित होतात. गंमत म्हणजे गर्भात जर जुळे असतील तर ते एकमेकांना स्पर्श करून एकमेकांविषयी समजून घेण्याचा प्रयत्न करतात. जन्म झाल्यानंतर बाळाला आईने छातीशी धरणं अपेक्षित असतं कारण त्यामुळे बाळाला सुरक्षित वाटतं.
ही भावना आयुष्यभर कायम राहते. त्यामुळे आपल्या हळव्या क्षणी किंवा अडचणीच्या वेळी आपल्या प्रिय व्यक्तीने आपल्याला मिठी मारली की आपल्याला सुरक्षित वाटतं.
आपल्या प्रिय व्यक्तीच्या स्पर्शाचा आणि आपल्याला मानसिक शांतता मिळण्याचा जवळचा संबंध आहे, असं क्लॉडिया लिहातात.
सगळ्यांत मोठं ज्ञानेंद्रिय
आपल्या स्पर्शाची जाणीव आपल्या त्वचेद्वारे होते. आपली त्वचा अर्थातच कान, नाक,डोळ्यांच्या तुलनेत सगळ्यांत मोठं ज्ञानेंद्रिय आहे. आणि त्यामुळेच अनेकदा आपले निर्णय आपल्या नकळतपणे आपण स्पर्शाव्दारे घेत असतो. उदाहरणच द्यायचं झालं तर भाजी ताजी आहे का ते आपण हात लावून पाहातो, समोरच्या व्यक्तीला ताप आलाय का ते हात लावून पाहतो, इतकंच कशाला तिऱ्हाईत व्यक्तीची आपल्याप्रति काय भावना आहे हे देखील अनेकदा आपल्याल्या त्यांच्या स्पर्शातून कळतं.

फोटो स्रोत, Getty Images
आणि म्हणूनच आता आपण माणसं कधी नव्हे ते आपल्या या ज्ञानेंद्रियावर अवलंबून राहू शकत नाहीत, परिस्थितीचं अवलोकन करण्यासाठी स्पर्श वापरू शकत नाही त्यामुळे अनेकांना बांधल्यासारखं होतंय.
केईएम हॉस्पिटलच्या मनोविकार विभागाच्या माजी डीन असणाऱ्या डॉ. शुभांगी पारकर सविस्तर उलगडून सांगतात. "हा आजार आपल्या स्पर्शावर घाला घालतोय. माणूसच नाही, कोणत्याही सजीवाच्या आयुष्यात स्पर्शाची भूमिका फार महत्त्वाची असते. आज कोव्हीड-19मुळे माणसांना एकमेकांपासून तुटल्यासारखं झालंय."
असुरक्षिततेची भावना
डॉ पारकर म्हणतात की, प्रेम आणि स्पर्श आपलं जीवन आहे. आपल्याला सुरक्षित वाटण्यासाठी ते खूप महत्त्वाचं आहे. त्यातून आपल्याला शांत वाटतं. आपला तणाव कमी होतो.
"आपण जग स्पर्शातून शिकतो म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. इतकंच नाही आपल्या प्रिय व्यक्तीच्या स्पर्शाने आपल्या शरीरात सकारात्मक हार्मोन्स तयार होतात. आपल्या आरोग्यासाठी ते चांगलं असतं. दुसरं म्हणजे स्पर्शाने मनोकायिक आजार कमी होतात, मानसिक तणाव दूर होतो. अनेकदा ब्लड प्रेशर किंवा डायबिटीजसारखे आजार आटोक्यात राहायला मदत होते. आपल्याला स्पर्शाची इतकी सवय असते की, तो मिळाला नाही तर चिडचिड वाढणं, राग येणं, उदास वाटणं, हताश किंवा असुरक्षित वाटणं अशा गोष्टी घडू शकतात," डॉ पारकर विशद करतात.
मग आता पुढे काय?
कोव्हीड-19 या आजाराने आपल्याला अक्षरशः एकमेकांपासून लांब केलंय. अशा अवघडप्रसंगी धीर द्यायलाही कोणी नसेल मग कसं तारून न्यायचं स्वतःला?
सगळ्यांत महत्त्वांचं म्हणजे डॉक्टरांनी, सरकारने, WHOने ज्या ज्या सूचना दिल्यात त्यांची काटेकोरपणे अंमलबजावणी करणं. त्यात कोणतीही सुट नाही. संयम राखला पाहिजे.
आयुष्यातली स्पर्शाची कमतरता भरून काढता येणार नाही, पण काही गोष्टी केल्या तर त्या अभावी वाटणारी असुरक्षितता नक्कीच कमी करता येऊ शकते.
"प्रेम स्पर्शातून व्यक्त करता येतं तसं बोलण्यातूनही व्यक्त करता येतं. मनमोकळेपणाने बोला. आपली माणसं आपल्यासमोर आहेत, हेल्दी आहेत ही गोष्ट सकारात्मकच आहे. त्यातून स्वतःला प्रेरणा द्या,"डॉ पारेकर सांगतात.
स्वतःला प्रसन्न ठेवता येतील अशा अनेक गोष्टी आहेत, त्या ट्राय करायला काहीच हरकत नाही. आपल्याला जगायचंय हा निश्चय ठाम ठेवा आणि नकारात्मक भावनांना दूर ठेवा. सोशल मीडियावर काही नवे मित्र बनवा. जुन्या मित्रांना फोन करा, धकाधकीच्या आयुष्यात कुणी दुखावलं गेलं असेल तर त्यांच्याशी आवर्जून संवाद साधा, अशा अनेक गोष्टी डॉ पारेकर सांगतात.
कोरोना व्हायरसने आपल्याला कोंडलं जरी असलं तरी एका वेगळ्या दुनियेचे दरवाजे आपल्यासमोर उघडले आहे. ते म्हणतात ना, जेव्हा तुम्ही बाहेर जाऊ शकत नाही, तेव्हा स्वतःच्या आत डोकावून पाहा. एकांतातही आनंदाने जगता येतं हेही तुमच्या लक्षात येईल.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








