दररोज एक सफरचंद खाल्ल्यानं खरंच डॉक्टरांना दूर ठेवता येतं का? यात किती तथ्य?

सफरचंद Apple

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, जेसिका ब्रेडले
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

'रोज एक सफरचंद खा आणि डॉक्टरपासून दूर राहा', हे वाक्य तुम्ही आजवर अनेकवेळा ऐकलं- वाचलं असेल. जगभरात सफरचंद आवडणारे भरपूर लोक आढळतील. अनेक रंगांमध्ये आणि वेगवेगळ्या चवीची जगभर मिळणारी सफरचंदं आरोग्यासाठी चांगली आहेत, असं म्हटलं जातं. जगात दरवर्षी 10 कोटी टन सफरचंदं पिकवली जातात.

रोज एक सफरचंद खाऊन डॉक्टरपासून लांब राहण्याचं वाक्य 1866 साली वेल्समध्ये लिहिलेल्या लेखातून आलं आहे. त्यात रात्री झोपण्यापूर्वी एक सफरचंद खाल्लं, तर डॉक्टरांच्या पोटावर पाय येईल, असं लिहिलं होतं.

पण खरंच इतर फळांच्या तुलनेत सफरचंदं आरोग्यासाठी चांगली असतात का? त्यासाठी यामध्ये नक्की कोणते पोषकघटक असतात याची माहिती घेऊ.

सफरचंदामध्ये 'फ्लेवानोल्स'सह 'फायटोकेमिकल्स' असतात.

त्याचे अनेक फायदे आहे. हृदयाचं आरोग्य चांगलं राहावं आणि वजन कमी राहावं यासाठी सफरचंद मदत करतात. म्हणजेच हृदयाच्या आरोग्यावरचा धोका कमी करण्यासाठी हे फळ मदत करतं.

आरोग्यासाठी सफरचंद चांगलं, असं का मानलं जातं?

सफरचंदामध्ये अनेक प्रकारचे 'पॉलिफेनॉल्स' असतात. त्यात 'एन्थोकेनिन्स'सुद्धा समाविष्ट आहेत.

यामुळेच सफरचंदाला लाल रंग येतो आणि हृदय नीट राहाण्यासाठी त्याची मदत होते.

सफरचंदात 'फ्लोर्दिजिन' हे आणखी एका प्रकारचं पॉलिफेनॉल असतं. त्यामुळे रक्तामधल्या ग्लुकोजची पातळी नियंत्रणात राहण्यासाठी त्याची मदत होते.

सफरचंदात भरपूर प्रमाणात फायबर्स म्हणजे तंतूमय पदार्थ असतात. यात सर्वात जास्त प्रमाण 'पेक्टिन'चं असतं. रक्तातील 'एलडीएल' म्हणजे 'लो डेन्सिटी लिपोप्रोटिन्स'चं प्रमाण कमी करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. एलडीएलला वाईट प्रकारचं कोलेस्ट्रॉल मानलं जातं, तर एचडीएलला चांगलं कोलेस्ट्रॉल म्हटलं जातं.

आपण अन्नामधून जी साखर आणि मेद म्हणजे फॅट्स घेत असतो ते कमी करण्यासाठी पेक्टिन कार्यरत राहतं. अशाप्रकारे आपल्या रक्तातील ग्लुकोजची पातळी स्थिर ठेवण्यास मदत होते.

सफरचंदातले हे पोषकघटक आपलं आरोग्य चांगलं राहावं यासाठी उपयोगी ठरतात.

2017 साली झालेल्या 5 अभ्यासांमधून काही महत्त्वाची माहिती आली. त्यात सफरचंद नियमित खाल्ल्यामुळे 'टाइप-टू डायबेटिस' होण्याचा धोका 18 टक्क्यांनी कमी होतो, असं समजलं.

अशाचप्रकारे 2018 साली 18 अभ्यास करण्यात आले. त्यातील माहितीनुसार सफरचंद खाल्ल्याने किंवा त्याचा रस प्यायल्याने कोलेस्ट्रॉल कमी होऊ शकते.

अर्थात याचा परिणाम दिसण्यासाठी एका आठवड्यापेक्षा जास्त काळ सफरचंद खाल्लं पाहिजे.

सफरचंद Apple

फोटो स्रोत, Getty Images

साधारणपणे समतोल अशा पौष्टिक आहारामुळे कर्करोग होण्याचा धोका 40 टक्क्यांनी कमी होतो.

समतोल पौष्टिक जेवणामधील बायोॲक्टिव्ह आणि फोटोकेमिकल्स ही कर्करोगाचा धोका कमी करण्यासाठी मदत करतात.

पण मग हे उपयोगी घटक झाडांकडून मिळणाऱ्या सफरचंदासारख्या खाद्यपदार्थातून मिळतात का? हा प्रश्न उरतोच.

अमेरिकेच्या मिडल टेनेसी विद्यापीठात पोषण आणि अन्नशास्त्राच्या प्राध्यापक जेनेट कोसलन याबद्दल अधिक माहिती देतात.

त्या म्हणतात, "सफरचंदात क जीवनसत्व जास्त प्रमाणात नसतं. त्यात लोह आणि कॅल्शियमही जास्त नसतं. परंतु आरोग्य नीट राहावं यासाठी लागणारे काही पोषकघटक त्यात असतात."

सफरचंद Apple

फोटो स्रोत, Getty Images

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

इटलीच्या व्हेरोना विद्यापीठात वनस्पती जीवशास्त्राच्या सहायक प्राध्यापक फ्लाविया गुझो यांनीही याबद्दल माहिती दिली.

त्या सांगतात, "सफरचंदात इतर अनेक फळं आणि भाज्यांमध्ये आढळणाऱ्या काही संयुगाप्रमाणे संयुगं आढळतात. यात पॉलिफेनॉल्ससारखी उपयुक्त संयुगंही आहेत. पॉलिफेनॉल्स एक सक्षम अँटिऑक्सिडंट आहे. अँटिऑक्सिडंट आणि फ्रि रॅडिकल्सचं प्रमाण संतुलित राखण्यासाठी त्याची मदत होते."

फ्री रॅडिकल्स हे एकप्रकारचे ऑक्सिजन अणू असतात, ते वेगाने प्रतिक्रिया देणारे आणि पेशींचं नुकसान करणारे असतात.

त्यांना नियंत्रित केलं, तर आपण कॅन्सर, हृदयरोगाची वाढ थांबवू शकतो. कर्करोग, दमा, डायबेटिस, लठ्ठपणा असे आजारही कमी केले जाऊ शकतात.

काही संशोधकांच्यामते इतर फळांच्या तुलनेत सफरचंदात अँटिऑक्सिडंट्स जास्त असतात. फेलोनिक संयुगंही त्यात भरपूर असतात. फेनोलिक संयुगं ही फायटोकेमिकल्सचीच दुसरी रुपं आहेत.

अमेरिकेतल्या लोकांच्या फेनोलिकच्या एकूण गरजेपैकी 20 टक्के गरज सफरचंदातून भागते, असं एका अभ्यासातून दिसलं आहे.

फेनोलिक संयुगंं हृदयरोग, कर्करोग, दमा, मधुमेह, लठ्ठपणासारख्या समस्या कमी करू शकतात, असं अभ्यासातून दिसलं आहे.

आता यात पॉलिफेनॉल्स आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर असतात म्हणून सफरचंदं खा असं सांगितलं जात नाही, तर ती सगळीकडे सहज मिळतात आणि ते एक जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचलेलं फळ आहे म्हणूनही ते खायला सांगितलं जातं.

आपलं आरोग्य चांगलं राहावं यासाठी सफरचंद मदत करतात हे स्पष्टच आहे. पण रोज एक सफरचंद खाल्ल्यामुळे डॉक्टरकडे जाण्याची वेळ येणार नाही, हा मात्र मोठा दावा आहे.

2015 साली झालेल्या एका अभ्यासात याचं थोडं उत्तर मिळतं. अभ्यासकांनी 9,000 लोकांचा अभ्यास केला. त्यांना गेल्या 24 तासात काय खाल्लं हा प्रश्न विचारलं. त्यात सफरचंद खाणाऱ्यांना डॉक्टरकडे फारसं जावं लागत नसल्याचं दिसलं. पण हे आकड्यातून स्पष्ट करता आलेलं नाही.

रोज एक सफरचंद खा आणि औषधांपासून दूर राहा

अमेरिकेच्या हॅम्पशायरमधील 'डार्टमाऊथ गिसेल स्कूल ऑफ मेडिसिन'मध्ये कार्यरत असणारे, साथरोगशास्त्राचे सहायक प्राध्यापक मॅथ्यू डेव्हिस यांच्याशी आम्ही चर्चा केली.

ते म्हणाले की, रोज सफरचंद खाण्यानं डॉक्टरांकडं जाणं टळतं यात काही विशेष संबंध दिसलेला नाही.

डेव्हिस म्हणाले, "आम्ही आजवर मिळवलेल्या माहितीनुसार जे लोक सफरचंद खातात त्यांचं आरोग्य चांगलं असतं एवढा निष्कर्ष निघाला आहे."

मात्र नियमित सफरचंद खाणाऱ्यांना औषधांवर कमी अवलंबून राहावं लागतं, असंसुद्धा अभ्यासकांना आढळलं आहे.

त्यामुळेच रोज एक सफरचंद खा आणि औषधांपासून दूर राहा, असा बदल करता येईल.

पण डेव्हिस यांना मात्र 'रोज एक सफरचंद' हा वाक्प्रचार फारसा रुचत नाही.

ते सांगतात, "रोज सफरचंद खाणं आणि डॉक्टरकडे जाणं यात फारसा संबंध आढळलेला नाही. यामागे काही इतर कारणंही असू शकतात."

"लोक आजारी पडल्यावरच डॉक्टरकडे जातात, अशी यामागे लोकधारणा गृहित धरलेली आहे. मात्र लोक वार्षिक आरोग्य तपासणी तसेच आजार होऊ नये म्हणून आवश्यक असलेला सल्ला घेण्यासाठीही डॉक्टरकडे जात असतात."

अंतिमतः ते सांगतात, "सफरचंदामुळे तुम्हाला डॉक्टरकडे जावंच लागणार नाही ही कल्पना चुकीची आहे. खरंतर तुमचं सर्वच जेवण पौष्टिक आणि आरोग्यदायी असलं पाहिजे."

सफरचंद Apple

फोटो स्रोत, Getty Images

कोलसनसुद्धा तेच सांगतात. त्या म्हणतात, "तुमच्या आहारात वनस्पतीजन्य पदार्थ पाहिजेत एवढाच या वाक्प्रचाराचा अर्थ आहे."

"सफरचंदाचं नाव इथं घेतलं जातं, कारण ते सगळीकडे सहज मिळतं. किंमत कमी असते आणि दीर्घकाळ टिकवून ठेवता येतं."

त्या सांगतात, "फ्रिज येण्यापूर्वी लोक तळघरांमध्ये सफरचंदं साठवून ठेवत आणि ती दीर्घकाळ ताजीही राहत. त्याला बुरशीही लागत नसे."

एका दिवसात किती सफरचंदं खावीत?

सफरचंद रोज खाल्ल्यानं फायदा होतो हे काही अभ्यासांमध्ये दिसलं आहे. मात्र तेही जर लोक एकापेक्षा जास्त सफरचंदं खात असतील तर.

रोज तीन सफरचंदं खाल्ल्यामुळे वजन घटल्याचं एका अभ्यासात दिसून आलं आहे.

2020 मध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात संशोधकांनी थोडंस कोलेस्ट्रॉल वाढलेल्या 40 लोकांचे दोन गट केले.

एका गटातल्या लोकांना रोज दोन सफरचंदं खायला सांगितली, तर दुसऱ्या गटातल्या लोकांना तितक्याच कॅलरीइतकं पेय प्यायला दिलं.

हा प्रयोग आठ आठवडे केला. या सफरचंद आणि पेयाशिवाय या लोकांनी आपल्या आहारात कोणताही बदल केला नाही.

प्रयोगानंतर सफरचंद खाणाऱ्या लोकांच्या रक्तातला कोलेस्ट्रॉलची पातळी कमी झाल्याचं दिसलं.

अर्थात या प्रयोगात फक्त 40 लोक सहभागी झाले होते. मोठा निष्कर्ष काढण्यासाठी सहभागींची संख्या मोठी असणं आवश्यक आहे.

सफरचंद Apple

फोटो स्रोत, Getty Images

आणखी एका अभ्यासात दररोज तीन सफरचंद खाणाऱ्या व्यक्तींचं वजन आणि रक्तातील ग्लुकोजपातळी कमी झाल्याचं दिसलं. हा अभ्यास वजन जास्त असणाऱ्या 40 पेक्षा जास्त महिलांच्या गटावर केला होता.

सफरचंद खाण्याबाबतीत संशोधकांंचं एकच म्हणणं आहे. ते म्हणजे, खाताना त्याची साल काढू नका. कारण सफरचंदाच्या सालीमध्ये अनेक पोषक घटक आणि अँटिऑक्सिडंट्स असतात.

संशोधक सांगतात, सफरचंदाची साल खाल्ली पाहिजे. कारण सफरचंदातील बहुतांश पॉलिफेनॉल्स तिथंच असतात. सफरचंद जितक्या जुन्या जातीचं तितकं चांगलं, असंही ते सांगतात.

2021 मध्ये संशोधकांनी आणखी एक संशोधन प्रसिद्ध केलं. त्यात इटलीतल्या 'पॉम प्रुशियन' नावाच्या सफरचंदाच्या एका जुन्या जातीचा अभ्यास केला होता. त्या अभ्यासात या जातीच्या सफरचंदात इतर जातींपेक्षा जास्त प्रमाणात पॉलिफेनॉल्स असल्याचं आढळलं.

कोलसन सांगतात, "अर्थात सफरचंदाची नवी जात तयार करताना इतरही गुणांकडे लक्ष दिलं जातं. जसं की फळाचा आकार, त्याची चव, झाडाची ताकद वगैरे गोष्टींचाही विचार केला जातो."

कोलसन म्हणतात, "रंगाचा विचार करता त्याला काही विशेष महत्त्व नाही. ते (संशोधक) सालीचा रंग हिरवा किंवा लालच ठेवतात."

थोडक्यात रोज एक सफरचंद खाल्ल्यामुळे डॉक्टरांकडची फेरी कमी होईल न होईल यापेक्षा तुमच्या आरोग्याला नक्कीच मदत होईल. तुमची औषधावरची भिस्त नक्कीच कमी होईल.

गुझो सांगतात, "रोज एक सफरचंद खाणं चांगलं आहे. मात्र तुमचा इतर आहारही वनस्पतीजन्य पदार्थांनी संपृक्त असला पाहिजे. कारण तोच चांगल्या आरोग्याचा पाया आहे."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)