गाझातील हॉस्पिटलमध्ये झालेल्या स्फोटाबाबत इस्रायलच्या दाव्याला अमेरिकेच्या अध्यक्षांचं समर्थन

जो बायडेन आणि बेंजामिन नेत्यान्याहू

फोटो स्रोत, ISRAELI GOVERNMENT PRESS OFFICE/GETTY IMAGES

फोटो कॅप्शन, जो बायडेन आणि बेंजामिन नेत्यान्याहू

गाझा येथील हॉस्पिटलमध्ये झालेल्या स्फोटामागे पॅलेस्टिनी अतिरेकी असू शकतात, असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी म्हटलंय.

बुधवारी (18 ऑक्टोबर) इस्रायलच्या दौऱ्यावर आलेल्या बायडेन यांनी हॉस्पिटलवर झालेल्या हल्ल्याबाबत इस्रायलच्या वक्तव्याचे समर्थन केलं.

इस्रायलला पोहोचल्यानंतर बायडेन म्हणाले की, "या स्फोटामुळे मला खूप दु:ख झाले असून या कृतीचा अतिशय राग आलाय."

इस्त्रायली लष्कराचं म्हणणं आहे की, हे पॅलेस्टिनी रॉकेट होतं जे लक्ष्य भेदण्यात अयशस्वी झालं आणि हॉस्पिटलवर पडलं, ज्यामुळे स्फोट झाला.

तर दुसरीकडे, इस्रायलने हवाई हल्ल्यात रुग्णालयाला लक्ष्य केल्याचं पॅलेस्टिनी अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.

गाझासाठी मानवतावादी मदतीचा करार

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे जॉर्डनचे राजे अब्दुल्ला, पॅलेस्टिनी प्राधिकरणाचे अध्यक्ष महमूद अब्बास आणि इजिप्तचे अध्यक्ष अब्दुल फताह अल-सिसी यांची भेट घेणार होते. यासाठी ते इस्रायलहून जॉर्डनला जाणार होते. मात्र मंगळवारी हॉस्पिटलमध्ये झालेल्या स्फोटानंतर त्यांचा जॉर्डनचा दौरा रद्द करण्यात आलाय.

जॉर्डनने रुग्णालयातील स्फोटाचा निषेध केला आणि बायडेन यांच्यासोबतची बैठक रद्द केली. जॉर्डनने हॉस्पिटलवरील हल्ल्याचे वर्णन एक भयंकर मोठे संकट आणि युद्ध गुन्हा म्हणून केले आहे.

व्हाईट हाऊसने सांगितलं की, बैठक रद्द करण्याचा निर्णय परस्पर संमतीने घेण्यात आलाय. अमेरिकेत परतताना बायडेन हे अब्बास आणि सिसी यांच्याशी फोनवरुन चर्चा करतील, असंही त्यांनी म्हटलंय.

जो बायडेन आणि बेंजामिन नेत्यान्याहू

फोटो स्रोत, GETTY IMAGES

इस्त्रायलच्या युद्ध मंत्रिमंडळानेही बुधवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची भेट घेतली.

बैठकीनंतर त्यांनी जाहीर केलं की इजिप्तमार्गे गाझापर्यंत मानवतावादी मदत पोहोचवण्याचा करार झालाय. येणार्‍या मालाची चौकशी केली जाईल आणि ही मदत हमासला न देता नागरिकांना दिली जाईल, या आधारावर हा करार करण्यात आला आहे.

इस्रायलच्या पंतप्रधान कार्यालयाने या कराराला दुजोरा दिलाय. राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्या आवाहनावरून हे शक्य झाल्याचं त्यांनी म्हटलंय. तरीही, गाझापर्यंत मदत साहित्य कधी पोहोचेल हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी पॅलेस्टिनी नागरिकांना मदत करण्यासाठी 100 दशलक्ष डॉलर्सची मदत जाहीर केलेय. इस्रायलने घेराव घातल्यानंतर गाझामध्ये गेल्या काही दिवसांपासून अन्न, पाणी आणि औषधांचा मोठा तुटवडा निर्माण झालाय.

मोदींनी काय म्हटलं?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी (18 ऑक्टोबर) गाझा येथील अल अहली हॉस्पिटलवरील हल्ल्यात मोठ्या संख्येनं नागरिकांचा मृत्यू झाल्याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त केली.

पंतप्रधान मोदींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर लिहिलं की, "गाझामधील अल अहली हॉस्पिटलमध्ये मोठ्या संख्येनं लोकांच्या दुःखद मृत्यूबद्दल खूप धक्का बसला आहे. पीडितांच्या कुटुंबीयांप्रती आमची तीव्र संवेदना आहे. जखमींनी लवकरात लवकर बरं व्हावं, यासाठी आम्ही प्रार्थना करतो."

त्यांनी लिहिलं, "सध्याच्या संघर्षात नागरिकांचा मृत्यू ही गंभीर आणि सतत चिंतेची बाब आहे. या घटनेत जे सहभागी असतील त्यांना जबाबदार धरलं पाहिजे ."

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

X पोस्ट समाप्त

पॅलेस्टिनी अतिरेकी संघटना हमासनं इस्रायलवर केलेल्या हल्ल्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना सांगितलं की, "या कठीण काळात भारत इस्रायलच्या पाठीशी उभा आहे. हमासनं अचानक केलेल्या हल्ल्याबाबत मोदी म्हणाले होते की, दहशतवादी हल्ल्याच्या बातमीनं आपण काळजीत आहोत."

गाझा हॉस्पिटल हल्ला

फोटो स्रोत, REUTERS/MOHAMMED AL-MASRI

गाझाच्या आरोग्य विभागाने दावा केला आहे की एका हॉस्पिटलवर इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात जवळजवळ 500 लोकांचा मृत्यू झाला आहे.

नेमकं काय घडलं?

बीबीसीचे आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी जेरेमी बोवेन यांनी सांगितलं की फोनवर त्यांना इस्रायली लष्कराच्या प्रवक्त्यांना सांगितलं, “हॉस्पिटल ही अतिशय संवेदनशील इमारत असते आणि ते आयडीएफचं लक्ष्य असू शकत नाही. आयडीएफ ( Israel Defense Forces) हा स्फोट कसा झाला याची चौकशी करत आहे.”

आयडीएफने ट्विटरवर एक निवेदन जारी केलं आहे. “त्यांचं मत आहे की अल अहली हॉस्पिटलमध्ये झालेला हल्ला पॅलेस्टिनी कट्टरवाद्यांनी डागलेल्या रॉकेटचा परिणाम आहे.”

गाझामध्ये हमास प्रसारमाध्यमांनी या हल्ल्याला युद्ध गुन्हा म्हटलं आहे. एका निवेदनात ते म्हणतात, “हॉस्पिटलमध्ये शेकडो आजारी, जखमी आणि इस्रायली हल्ल्यानंतर बेघर झालेले लोक उपस्थित होते. शेकडो लोक ढिगाऱ्याखाली अडकले आहेत.”

बीबीसी मध्य पूर्व प्रतिनिधी टॉम बॅटमॅन यांनी सांगितलं आहे की अल अहली हॉस्पिटलमधली दृश्यं भयावह आहेत. मृतदेह आणि नुकसान झालेल्या गाड्या बाहेर दिसत होत्या.

इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्ष

फोटो स्रोत, REUTERS/REUTERS TV

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

स्थानिक लोकांनी सांगितलं की हॉस्पिटलच्या एका हॉलमध्ये हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी लोकांनी आसरा घेतला होता. बीबीसीने तिथल्या एका डॉक्टरांशी संवाद साधला. त्यांनी सांगितलं की इथे कमीत कमी 4000 लोकांनी आश्रय घेतला होता.

त्यांनी म्हटलं की आतापर्यंत हॉस्पिटलच्या 80 टक्के सेवा बाधित आहेत आणि शेकडो लोक मारले गेलेत किंवा जखमी आहेत. पॅलेस्टिनी प्रसारमाध्यमांत आलेल्या बातम्यांनुसार पॅलेस्टिनी राष्ट्राध्यक्ष महमूद अब्बास यांनी हॉस्पिटलवर झालेल्या हल्ल्यानंतर तीन दिवस दुखवटा जाहीर केला.

WHO चे महासंचालक टेड्रोस एडहेनॉम ग्रेबीयॉसिस यांनी हॉस्पिटलवर झालेल्या हल्ल्याचा निषेध केला.

यासंबंधी केलेल्या ट्वीटमध्ये ते म्हणतात, “WHO या हल्ल्याचा निषेध करत आहे. सुरुवातीला मिळालेल्या माहितीनुसार अनेक लोक जखमी किंवा मृत्युमुखी पडले आहेत. सामान्य नागरिकांना सुरक्षा आणि सेवा मिळाव्यात अशी आम्ही मागणी करत आहोत.”

अल अहली हॉस्पिटलला अँगलिकन चर्चकडून निधी मिळतो. या चर्चच्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार किमान 6000 लोकांनी या हॉस्पिटलमध्ये आसरा घेतला होता.

पॅलेस्टाईनचे राष्ट्राध्यक्ष महमूद अब्बास यांनी अल अहली हॉस्पिटलवर झालेला हल्ला हा भयावह नरसंहार असल्याचं सांगितलं आहे.

ते म्हणाले, “इस्रायलने सर्व सीमा ओलांडल्या आहेत.”

इस्रायलने मात्र या हल्ल्यात आपला कोणताही सहभाग नसल्याचं सांगितलं आहे. हा पॅलेस्टाईनच्याच रॉकेटचा परिणाम आहे असं ते म्हणाले. हमास या कट्टरवादी संघटनेने ही जबाबदारी घेण्यास नकार दिला.

या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन बुधवारी (18 ऑक्टोबर) रवाना झाले.

सगळीकडे विद्धवंसाच्या खुणा

इस्रायलच्या लष्कराने या हल्ल्यात त्यांचा सहभाग असल्याच्या आरोपाचा इन्कार केला आहे. त्यांनी पॅलेस्टाईनला या हल्ल्यासाठी जबाबदार धरलं आहे. लष्कराच्या मते त्यांच्याकडून सोडलं जाणारं रॉकेट मिसफायर होऊन हॉस्पिटलवर पडलं.

मंगळवारी (17 ऑक्टो) झालेल्या या हल्ल्यानंतर अल अहली अब बाप्टिस्ट हॉस्पिटलमधून जे फोटो समोर येत आहेत त्यात चारही बाजूंना अफरातफरीचं वातावरण पहायला मिळत आहे.

तिथे सर्वदूर अंधार पसरला आहे आणि तिथून जखमी नागरिकांना स्ट्रेचरवरून काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सगळीकडे मृतदेह आणि विखुरलेल्या वस्तू दिसत आहेत.

गाझा

फोटो स्रोत, Reuters

या घटनेशी निगडीत एक व्हीडिओ शेअर केला जात आहे. त्यात स्फोटानंतर बॉम्ब किंवा मिसाईल या परिसरात पडताना दिसत आहे.

प्लास्टिक सर्जन गस्सन-अबू-सित्ता युद्धात जखमी झालेल्या लोकांवर उपचार करत आहेत. त्यांच्या मते, “आम्ही हॉस्पिटलमध्ये होतो आणि एक ऑपरेशन करत होतो. एक मोठ्या स्फोटाचा आवाज आला ऑपरेशन थिएटरचं छतच कोसळलं. सध्या जे सुरू आहे तो नरसंहार आहे.

आणखी एका डॉक्टरने बीबीसीला सांगितलं की हॉस्पिटलचं 80 टक्के कामकाज ठप्प झालं आहे. आणि त्यांच्या आकलनानुसाकर 1000 लोक या हल्ल्याला बळी पडले आहेत.

आजारी आणि जखमी लोकांनी भरलं होतं हॉस्पिटल

या हॉस्पिटलमध्ये फक्त जखमी आणि आजारी लोक नव्हते तर इस्रायलच्या स्फोटांपासून बचाव करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये आसरा घेतला होता.

या हल्ल्यामागे कोणाचा हात आहे हे कळणं कठीण आहे असं चर्चच्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं.

गाझा

फोटो स्रोत, Reuters

ते म्हणाले की, शनिवारीसुद्धा या हॉस्पिटलवर इस्रायलने हवाई हल्ला केला होता. त्यात या हॉस्पिटलचं नुकसान झालं होतं. त्यानंतर किमान 5000 लोक इथून निघून गेले होते आणि तिथे आसरा घेणारे 1000 लोक राहिले होते. त्याच बहुतांश लोक अपंग, जायबंदी आणि वृद्ध होते. त्यांना दुसऱ्या ठिकाणी हलवण्याची गरज होती.

ज्यावेळी हा हल्ला झाला त्यावेळी 600 रुग्ण होते आणि त्याशिवाय त्यांच्यावर उपचार करणारे आरोग्य कर्मचारी होते. अपघातक म्हणा की हल्ला म्हणा हे अजिबात स्वीकारार्ह नाही. हे सगळं अतिशय भीतिदायक आहे.

‘जे पाहिलं ते कल्पनातीत होतं.’

मूळ ब्रिटिश असलेले पॅलेस्टिनी जाहीर कुहैल व्यवसायाने सिव्हिल इंजिनिअर कन्सलटंट आहेत. ते विद्यापीठात प्राध्यापकही आहेत. ज्यावेळी हा स्फोट झाला त्यावेळी हॉस्पिटलच्या जवळ होते. त्यांनी बीबीसीला सांगितलं की त्यांनी जे पाहिलं ते कल्पनेच्या पलीकडे होते.

ते म्हणतात, “मी पाहिलं की एक विमानातून दोन रॉकेट पडलं. ते एफ 16 किंवा एफ 3.5 फायटर विमान होतं. त्यांनी निष्पाप लोकांवर हल्ला केला. त्यांनी कोणतीही दया दाखवली नाही आणि निर्घृणपणे लोकांना मारलं.”

ते म्हणाले की या स्फोटानंतर आग लागल्याच्या घटना घडल्या आणि त्यात अनेक लोकांचा मृत्यू झाला. त्यांचं म्हणणं होतं की सर्वांत आधी जे मदतीसाठी जाणाऱ्या लोकांकडे मदतीचं कोणतंच सामान नव्हतं.

WHO ने काय म्हटलं?

WHO ने कोणाचंही नाव न घेता या हल्ल्याचा निषेध केला आहे. इस्रायलने आदेश दिल्यावर हे हॉस्पिटल रिकामं करण्याचा आदेश दिला होता, त्यापैकी हे एक हॉस्पिटल होतं. इस्रायलच्या लष्कराने उत्तर गाझाचा संपूर्ण परिसर रिकामा करायला सांगितला होता.

मात्र या भागातले अनेक लोक जखमी असल्याने हा परिसर ते रिकामा करू शकले नाहीत. इस्रायलने गाझाला मिळणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंवर बंदी घातली होती. त्यानंतर खाण्यापिण्याच्या आणि पिण्याच्या पाण्याचा तुटवडा निर्माण झाला होता.

इस्रायल

इंटरनॅशनल रेड क्रॉसने एक निवेदन जारी केलं आहे. ते म्हणतात, “हॉस्पिटलमध्ये लोकांचे जीव वाचवले जातात. तिथे असा विध्वंस होऊ शकत नाही. हॉस्पिटल बेडवर जखमी अवस्थेत असलेल्या लोकांची हत्या होऊ शकत नाही.”

हमासने काय म्हटलं?

वेस्ट बँकवर उपस्थित असलेल्या पॅलेस्टिनी प्रशासनाचे मुख्य प्रवकते महमूद अब्बास यांनी या बीभत्स हल्ल्यासाठी इस्रायलला जबाबदार ठरवलं आहे.

हॉस्पिटलवर झालेल्या हल्ल्यानंतर सामान्य नागरिक रस्त्यावर उतरले आणि त्यांनी निदर्शनं केली. त्यांच्यात आणि पॅलेस्टिनी संरक्षण दलांशी त्यांची झटापट झाली.

इस्माईल हानिया

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, इस्माईल हानिया

हमासच्या पॉलिटिकल ब्युरोचे प्रमुख इस्माईल हानिया यांनी या हल्ल्यासाठी अमेरिकेला जबाबदार ठरवलं आहे. इस्रायलनेच या आक्रमकतेला खतपाणी घातलं आहे असं त्यांचं मत आहे.

टीव्हीवर प्रसारित झालेल्या एका संदेशात ते म्हणतात, “हॉस्पिटलवर झालेल्या हल्ल्यातून लक्षात येतं की शत्रू किती निर्दयी आहे आणि त्याला पराभवाची किती भीती आहे.”

तर पॅलेस्टिनी इस्लामिक जिहादने इस्रायलच्या आरोपांचा इन्कार केला. या संस्थेचे प्रवक्ते दाऊद शाहाब यांनी रॉयटर्स या वृत्तसंस्थेला सांगितलं की हे अत्यंत खोटं आहे.

इस्रायलने काय म्हटलं?

इस्रायल डिफेन्स फोर्सेसने या आरोपांचा इन्कार केला आहे आणि फेक न्यूजपासून सावध राहण्याचा इशारा दिला आहे.

बेन्यामिन नेत्यान्याहू

फोटो स्रोत, Reuters

इस्रायलच्या लष्कराचे मुख्य प्रवक्ते रेअर अडमिरल डॅनियल हगारी यांन एक व्हीडिओ संदेश जारी केला ते म्हणाले, “आम्ही पूर्ण चौकशीअंती हे सांगत आहोत की या हल्ल्यात इस्रायली सैन्याचा हात नाही.”

त्यांनी या हल्ल्यासाठी पॅलेस्टिनी इस्लामिक जिहाद या संस्थेला जबाबदार ठरवलं आहे. ते म्हणाले, “इस्लामिक जिहादने जे रॉकेट सोडलं ते योग्य ठिकाणी पडलं नाही आणि हॉस्पिटल पडलं.”

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify,आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)