G20 म्हणजे काय? नवी दिल्लीतल्या बैठकीला कोण कोण नेते येणार?

G20 च्या राष्ट्रप्रमुखांची येत्या 9 आणि 10 सप्टेंबरला राजधानी नवी दिल्लीमध्ये लीडर्स समिट होणार आहे.

G20 म्हणजे ग्रुप ऑफ ट्वेन्टी. हा जगातल्या प्रमुख विकसित आणि विकसनशील देशांचा राष्ट्रगट आहे.

1999 साली या राष्ट्रगटाची स्थापना करण्यात आली होती.

पूर्व आशिया आणि आग्नेय आशियात 1997 साली आलेल्या आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर G20 गट उदयास आला. अशा एखाद्या जागतिक आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी प्रमुख देशांनी एकत्र येऊन प्रयत्न करावेत हा त्यामागचा हेतू होता.

सुरुवातीला केवळ या देशांचे अर्थमंत्री आणि तिथल्या केंद्रीय बँकांचे गव्हर्नर एकत्र येऊन आर्थिक प्रश्नांवर चर्चा करायचे.

2008 च्या आर्थिक संकटानंतर या देशांचे राष्ट्रप्रमुख दरवर्षातून एकदा G20 लीडर्स समिट म्हणजे राष्ट्रप्रमुखांच्या परिषदेत सहभागी होऊ लागले.

G20 राष्ट्रगटात भारताशिवाय अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीन, फ्रांस, जर्मनी, इंडोनेशिया, इटली, जपान, दक्षिण कोरिया, मेक्सिको, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, तुर्की, ब्रिटन, अमेरिका अशा 19 देशांचा समावेश आहे.

युरोपियन युनियन ही संघटना या राष्ट्रगटातला विसावा सदस्य आहे.

त्याशिवाय संयुक्त राष्ट्रे, जागतिक आरोग्य संघटना, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, वर्ल्ड बँक अशा आंततराष्ट्रीय संघटनांचे प्रमुख तसंच काही देश पाहुणे म्हणून शिखर परिषदेत सहभागी होतात.

G20 राष्ट्रगट महत्त्वाचा का आहे?

  • जगातली 60 टक्के लोकसंख्या G20 राष्ट्रांमध्ये राहते.
  • जागाच्या एकूण जीडीपीच्या 85 टक्के जीडीपी या देशांतून येतं
  • जागतिक व्यापारातील 75 टक्क्यांहून अधिक व्यापार G20 देशांत एकवटला आहे.
  • साहजिकच या राष्ट्रगटाचं काम अतिशय महत्त्वाचं ठरतं.

G20 हे जी-7 या औद्योगिक देशांच्या राष्ट्रगटाचं विस्तारीत रूप मानलं जातं.

विकसनशील आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांना सामावून घेऊन जगाच्या अर्थव्यवस्थेला स्थिरता देणं हा या गटाचा उद्देश आहे.

G20 अध्यक्षपद म्हणजे काय?

संयुक्त राष्ट्रांचं जसं न्यूयॉर्कमध्ये एक कार्यालय आहे, तसं G20 देशांचं कायमस्वरूपी कार्यालय किंवा सचिवालय नाही.

अजेंडा आणि समन्वय साधण्याचं काम G20 देशांचे प्रतिनिधी करतात ज्यांना शेरपा म्हणून ओळखलं जातं.

दरवर्षी एका देशाकडे G20चं अध्यक्षपद येतं. यालाच G20 प्रेसिडंसी म्हणतात.

प्रत्येक प्रेसिडंसीच्या शेवटी G20 राष्ट्रगटाची बैठक होते आणि कारभार पुढच्या अध्यक्षांवर सोपवला जातो.

G20 चे विद्यमान अध्यक्ष आधीचे आणि पुढचे अध्यक्ष राष्ट्र यांच्या मदतीनं कारभार चालवातात. यंदा 2023चं अध्यक्षपद भारताकडे आहे.

भारत यंदा इंडोनेशिया आणि ब्राझीलच्या मदतीनं G20चा कारभार पाहत आहे.

कोण कोण उपस्थित राहणार?

जी 20 देशांचे राष्ट्रप्रमुख किंवा त्यांचे प्रतिनिधी

  • अल्बर्टो फर्नांडिस, राष्ट्राध्यक्ष, अर्जेंटिना
  • अँटोनी अल्बानेस, पंतप्रधान, ऑस्ट्रेलिया
  • लुला डी सिव्हा, राष्ट्राध्यक्ष, ब्राझील
  • जस्टिन ट्रुडो, पंतप्रधान, कॅनडा
  • ली केयांग, प्रिमिअर, चीन
  • इमॅन्युएल मॅक्रॉन, राष्ट्राध्यक्ष, फ्रान्स
  • ओलाफ शोज, चान्सलर, जर्मनी
  • नरेंद्र मोदी, पंतप्रधान, भारत
  • जोको विडोडो, राष्ट्राध्यक्ष, इंडोनेशिया
  • जॉर्जिया मेलोनी, पंतप्रधान, इटली
  • पुमिओ किशिदा, पंतप्रधान, जपान
  • आंद्रेस मॅन्युएल लोपेझ ओब्राडोर, राष्ट्राध्यक्ष, मेक्सिको
  • यून सूक लिओ, राष्ट्राध्यक्ष, दक्षिण कोरिया
  • सर्गेई लावरोव, परराष्ट्र मंत्री, रशिया
  • प्रिन्स मोहम्मद बिन सलमान, पंतप्रधान, पंतप्रधान, सौदी अरेबिया
  • सिरिल रामाफोसा, राष्ट्राध्यक्ष, दक्षिण आफ्रिका
  • रेसेप तय्यब आर्दोआन, राष्ट्राध्यक्ष, तुर्कीये
  • ऋषी सुनक, पंतप्रधान, यूके
  • जो बायडन, राष्ट्राध्यक्ष, अमेरिका
  • चार्ल्स मायकेल, अध्यक्ष, युरोपियन काउन्सिल
  • उर्सुला वोन डेर लेयेन, अध्यक्ष, युरोपियन कमिशन

आमंत्रित राष्ट्रप्रमुख

  • शेख हसिना, पंतप्रधान, बांगलादेश
  • अब्देल फातेह अल सीसी, राष्ट्राध्यक्ष, इजिप्त
  • प्रविण कुमार जगन्नाथ, पंतप्रधान, मॉरिशस
  • मार्क रूट, पंतप्रधान, नेदरलँड्स
  • बोला अहमद तिनुबू, राष्ट्राध्यक्ष, नायजेरिया
  • सुलतान हैतम हिन तारीक, राष्ट्र प्रमुख, ओमान
  • ली हे लून, पंतप्रधान, सिंगापूर
  • पेद्रो सांची, पंतप्रधान, स्पेन
  • शेख मोहम्मद बिन जायेद अल नहयान, राष्ट्राध्यक्ष, यूएई

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)