You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
या मंदिरात पूजेसाठी जिवंत हत्तीऐवजी रोबो हत्ती ठेवलाय...
भारतातील अनेक मंदिरात खरेखुरे प्राणी पूजेसाठी ठेवण्यात येतात. केरळमधील इरिंजाडापल्ली श्री कृष्णा मंदिरात हत्तीला पूजण्याची परंपरा आहे. मात्र, या मंदिराच्या प्रशासनानं अनोखी युक्ती काढली आहे.
या मंदिराच्या प्रशासनाचं म्हणणं आहे की, जिवंत प्राण्यांना सणासुदीला किंवा एखाद्या मंदिरात ठेवून, अशा प्राण्यांना त्रास देणं बंद केलं पाहिजे. त्यामुळेच त्यांनी मंदिरात हत्तीचा रोबो ठेवलाय.
या हत्तीच्या रोबोचं मॉडेल भारतात प्राण्यांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या पिपल फॉर एथिकल ट्रिटमेंट ऑफ अॅनिमल्स (PETA) या संस्थेनं दान केलंय. यात प्रसिद्ध अभिनेत्री पार्वथी थिरुवोथू हिनेही मोठी मदत केलीय.
कुठलाही सण किंवा विधी प्राण्यांवरील अत्याचाराविना होऊ शकेल, अशी आशा या उपक्रमाद्वारे ‘पेटा’ आणि अभिनेत्री पार्वथीने केलीय.
हत्तींना साखळदंडांनी बांधून त्यांना सजवलं जातं आणि केरळमधील मंदिरांच्या उत्सवात वापरले जातात. किंबहुना, तो तिथल्या विधींचा भाग आहे.
देशात एकूण जितके हत्ती बंदिस्त आहेत, त्यातील एक पंचमांश संख्या एकट्या केरळातील आहे.
अनेक वर्षांपासून प्राणीप्रेमी याबद्दल आवाज उठवत आलेत आणि चिंता व्यक्त करत आलेत.
सेंटर फॉर रिसर्च ऑन अॅनिमल राईट्सने गेल्याच आठवड्यात केरळच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून प्राण्यांच्या वाढत्या मृत्यूंबद्दल चिंता व्यक्त केली होती.
2018 ते 2023 या वर्षांदरम्यान तब्बल 138 बंदिस्त हत्तींचा मृत्यू झाल्याची माहितीही सेंटर फॉर रिसर्च ऑन अॅनिमल राईट्सने दिली.
पिपल फॉर एथिकल ट्रिटमेंट ऑफ अॅनिमल्स (PETA) ने सोमवारी जारी केलेल्या पत्रकानुसार, “जिवंत हत्तींना सण किंवा इतर धार्मिक विधींवेळी वापरणं हे क्रूर आहे. अशा प्रकारे हत्तींना वापरण्याऐवजी रोबोंचा वापर करावा.”
“अशा प्रकारे प्राण्यांचा गैरवापर थांबवण्याच्या आणि प्राण्यांना योग्यतापूर्ण जीवन जगू देण्याच्या दिशेने अधिक मजबूत आणि अधिक प्रभावी पाऊल उचलण्याची वेळ आली आहे," असंही ‘पेटा’नं आपल्या पत्रकात म्हटलं होतं.
इंडियन एक्स्प्रेस वृत्तपत्रातील माहितीनुसार, ‘पेटा’ने दान केलेल्या रोबो हत्तीची उचीं 11 फूट असून, 800 किलो वजन आहे. लोखंडाचा वापर करून रोबो हत्ती तयार करण्यात आलाय.
या मंदिराचे पूजारी राजकुमार नंबूथिरी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना म्हणाले की, जिवंत हत्तीऐवजी रोबो हत्तीची पूजा करण्याच्या उपक्रमामुळे मंदिर प्रशासन आनंदीच आहे.
“मला आशा आहे की, इतर मंदिर प्रशासनं सुद्धा असाच विचार करतील आणि जिंवत हत्तींऐवजी रोबो हत्तींचा वापर विधींमध्ये करतील,” असंही नंबूथिरी म्हणाले.