You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
भविष्यात सेक्ससाठी रोबोटचा वापर होऊ शकतो? ही कल्पना की वास्तव?
- Author, रोझ एव्हलेथ
- Role, स्तंभलेखक, बीबीसी फ्युचर
सेक्ससाठी रोबोटसाठी वापर होईल ही भविष्यवाणी खरी ठरण्याची चिन्हं आहेत. पण रोबोट-मानवी संबंध काही कमी गुंतागुंतीचे नाहीत.
हॉलिवूडचे दोन पिक्चर आहेत, हर आणि एक्स मशिना. या दोन्ही पिक्चरमध्ये एक वेगळीच कल्पना मांडली आहे. माणसं रोबोटच्या प्रेमात पडू शकतात का आणि रोबोटशी सेक्स करू शकतात का?
अर्थात कृत्रिम वस्तूंशी मानवी संबंध येण्याची कल्पना पहिल्यांदाच मांडली गेलेली नाहीये. ग्रीक कथांमध्ये पिग्मॅलियनचा उल्लेख आहे, ज्यात ही कल्पना पहिल्यांदा मांडली आहे.
पण आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि रोबोटिक्स जसंजसं अजून प्रगत होतंय, तसं काहींना ठामपणे वाटतंय की सेक्ससाठी डिझाईन केलेले रोबोट प्रत्यक्षात येऊ शकतात.
'लव्ह अँड सेक्स विथ रोबोट्स' या पुस्तकात लेखक डेव्हीड लेव्ही म्हणतात की 2050 पर्यंत रोबोट्सशी सेक्स करणं फारच सामान्य गोष्ट असेल.
पण दिसतं त्यापेक्षा सत्य गुंतागुंतीचं असतं. सेक्ससाठी रोबोट डिझाईन करणं आणि तयार करणं वाटतं त्यापेक्षा अवघड आहे. असे रोबोट किळसवाणे न वाटता, आकर्षक वाटावेत ही सर्वात अवघड गोष्ट आहे.
त्याआधी हे पाहावं लागेल की एखादा रोबोट सेक्स रोबोट कसा ठरू शकेल. तांत्रिकदृष्ट्या बोलायचं झालं तर असा कोणताही रोबोट ज्याच्याशी तुम्ही सेक्स करू शकता – सेक्स रोबोट ठरेल.
अशा प्रकारची यंत्रं आधीपासून अस्तित्वात आहेतच. सेक्स टॉईज आहेत, माणसांच्या भावना उत्तेजित करणारे रिमोट कंट्रोलने चालणारे व्हायब्रेटर्स आहेत.
न्यूयॉर्क विद्यापीठात मानवी संबंध, सेक्स आणि सेक्स टॉईजचा अभ्यास करणाऱ्या शेली रोनीन म्हणतात, “सध्या अनेक गोष्टी उपलब्ध आहेत ज्या मानवी शरीरातल्या अंगाच्या जवळपास जातात, तुम्हाला लैंगिक आनंद देतात आणि या गोष्टींची मदत घेऊन लैंगिक आनंद घेणं यावर तुमचं पूर्ण नियंत्रण असतं.”
यातले काही सेक्स टॉईज यशस्वी ठरले तर काही बाजारात अयशस्वी ठरले. उदाहरणार्थ, 2009 साली रिअलटच नावाचं एक यंत्र बाजारात आलं. हे सेक्सटॉय पुरुषांसाठी होतं. यात एक असं यंत्र होतं जे पॉर्न व्हीडिओशी कनेक्टेड होतं आणि हे वापरणाऱ्या पुरुषांच्या भावना पडद्यावर दिसणाऱ्या लोकांशी जोडलेल्या होत्या.
हा अनुभव फारच खराखुरा वाटणारा होता असं टेक्नोलॉजी मॅगझिन गिझमॅगने लिहिलं होतं. पण हा खरा अनुभवच या सेक्सटॉयची पडती बाजू ठरला. यामुळे त्याचा खप झालाच नाही.
शेवटी 2013 साली एका कायदेशीर प्रकरणात अडकल्यानंतर रिअलटचने आपली विक्री बंद केली.
पण सेक्स टॉईज म्हणजे सेक्स रोबोट नाही. लोकांच्या दृष्टीने सेक्स रोबोटचा अर्थ म्हणजे अशी यंत्रं जी मानवी आकृतीबंधाच्या रूपात समोर येतात, सेक्स किंवा लैंगिक क्रिया करू शकतात आणि मुख्य म्हणजे त्यांच्यात असा काही आर्टिफिशिय इंटेलिजन्स असतो ज्यामुळे ते ‘विचार’ करू शकतात.
सध्या तरी पूर्ण मानवी आकृतीबंध असलेला रोबोट म्हणजे कॅलिफोर्नियातल्या अबिस क्रिएशन या किंवा यासारख्या इतर कंपन्यांनी बाजारात आणलेली सेक्स डॉल आहे. अबिस ‘रिअल डॉल’ या नावाने एक मानवी आकृतीबंध विकते.
या डॉलमध्ये अनेक कस्टम फिचर्स आहेत. तिचा रंग, त्वचेचा पोत, केस, शरीरावरच्या खुणा... सगळं ग्राहक ठरवू शकतात, तशा प्रकारे आपली सेक्स डॉल बनवून घेऊ शकतात.
‘रिअल डॉल’चे खूप सारे फॅन आहेत. फॅन्सचे हे ग्रुप एकमेकांशी चर्चा करतात, एकमेकांच्या संपर्कात राहातात आणि आपल्या ‘रिअलडॉल’शी असलेल्या संबधांचे पैलूही एकमेकांना सांगतात.
यात अजून एक लहानसा ग्रुप आहे जो स्वतःला ‘डॉल डॉक्टर्स’ म्हणवतो. तुटलेल्या ‘रिअल डॉल्स’ नीट करण्यासाठी हे लोक अमेरिकाभर फिरतात. पण त्यांची फी प्रचंड असते. तुमची तुटलेली डॉल नीट करायलाही तुमच्या खिशाला मोठी चाट लागू शकते.
पण तरीही ‘रिअल डॉल्स’ सेक्स रोबोट नाहीयेत.
खरा सेक्स रोबोट कुठला तर आपल्या वापरकर्त्याच्या/ वापरकर्तीच्या भावना समजून घेईल, त्यांच्या बदलत्या हावभावांवरून आपला प्रतिसाद बदलेल, त्यांच्या वागणुकीचा अर्थ समजून आपल्या वापरकर्त्याला/वापरकर्तीला अधिकाधिक लैगिंक आनंद कसा मिळेल हे पाहील.
खऱ्या माणसाशी सेक्स करताना जो भावनिक बंध निर्माण होतो त्याचा अनुभव सेक्स रोबोट आपल्या पार्टनरला देईल.
एव्ही फ्लॉक्स एक पत्रकार आहेत. ते सेक्स, कायदा आणि तंत्रज्ञान यांचा एकमेकांशी असलेल्या संबंधांचा अभ्यास करतात. ते म्हणतात, “सेक्स रोबोट – सेक्स डॉल नाहीयेत, ते यंत्र नाहीयेत. त्यांना बनवण्यासाठी अनेक प्रकारचं तंत्रज्ञान वापरात आणावं लागेल.
त्यासाठी नॅनोटेक्नोलॉजी लागेल ज्यामुळे मानवी शरीरावर असलेल्या त्वचेचे वेगवेगळे पोत तयार होतील तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स लागेल ज्यामुळे त्या रोबोटला माणसाची नैसर्गिक बॉडी लँग्वेज, हावभाव आणि प्रतिसादाचा अर्थ लावता येईल.”
सेक्स रोबोट बनवण्यातलं पहिलं मोठं आव्हान आहे असा मानवी आकृतीबंध तयार करणं जो स्वतःच स्वतः, कोणत्याही आधाराशिवाय उभा राहू शकेल. सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या सेक्स डॉल्स किंवा इतर मानवी आकृतीबंध वजनाला जड आहेत. एका ‘रिअल डॉल’ चं वजन 50 किलोपर्यंत असू शकतं.
या डॉल्स उभ्या राहू शकत नाहीत, चालू शकत नाहीत, स्वतः हालचाल करू शकत नाहीत.
स्वतःच हालचाल करू शकणारा रोबोट बनवणं इतकं सोपं नाहीये. रोबोटिक्स शास्त्र अजूनही असा रोबोट बनवण्यात यशस्वी झाला नाहीये.
दुसरा मोठा अडसर... मानवी त्वचेचा पोत कृत्रिमरित्या तयार करणं. ज्यांनी सिलिकॉन हाताळलं असेल त्यांना लक्षात येईल की सिलिकॉनचा स्पर्श मानवी त्वचेसारखा नसतो. परत सिलिकॉन साफ करणं खूप अवघड गोष्ट आहे.
बरं मानवी त्वचा तयार करणं म्हणजे फक्त पोत तयार करणं नाही. त्वचेला हात लावल्यानंतर जो स्पर्श जाणवतो तो स्पर्श तयार करणं, त्या त्वचेला लवचिकता आणि तन्यता असणं या सगळ्या गोष्टी आल्या. ते अजिबातच सोपं नाही.
2015 साली सिंगापूरमधल्या शास्त्रज्ञांनी म्हटलं होतं की, त्यांना अशी कृत्रिम त्वचा तयार केलीये ज्यावर दाब दिला तर प्रतिसाद मिळतो. पण तरीही या त्वचेला तापमान कळत नव्हतं, ती ताणली जाऊ शकत नव्हती आणि मानवी त्वचेसारखा तिचा स्पर्श नव्हता.
रोबोटच्या बाह्यअंगाबरोबरीने त्यांचं अंतरंग महत्त्वाचं ठरेल. रोबोटच्या आता असा कृत्रिम मेंदू तयार करावा लागेल, ज्यामुळे त्याला आपल्या पार्टनरचा प्रतिसाद कळेल आणि त्याचा अभ्यास करून तो पार्टनरला खुश करायला शिकू शकेल.
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं क्षेत्र खूप प्रगत झालं असलं तरी अजूनही AI सेक्सदरम्यान लागणाऱ्या भावना निर्माण करू शकत नाही. कॉम्प्युटर्स कदाचित मानवाला चेसमध्ये हरवू शकतात पण सेक्स म्हणजे आपल्या साथीदारासोबत केलेल्या लयबद्ध नृत्यासारखं आहे.
सेक्स दरम्यान प्रत्येक पार्टनरला दुसऱ्या पार्टनरच्या भावनांचा, प्रतिसादांचा, जाणीवांचा, भावनांचा अभ्यास करावा लागतो आणि त्याला अनुरूप प्रतिसाद द्यावा लागतो. आर्टिफिशियल इंटलेजिन्स याबाबतीत मानवी मेंदूची बरोबरी करू शकलेला नाही.
त्याहून महत्त्वाचं, डिझायनर्सला असं डिझाईन बनवावं लागेल जे किळसवाणं वाटणार नाही. आणि रोबोट अजून त्या पातळीपर्यंत पोचले नाहीयेत.
मॅडलिन अॅशबी सायन्स फिक्शन लेखिका आहेत. त्यांच्या मते सेक्स रोबोट अजूनतरी पूर्ण मानवी दिसत नाहीयेत, नजिकच्या भविष्यात तसं घडायची शक्यता कमी आहे. त्यासाठी आपल्याला वाट पाहावी लागेल.
त्या म्हणतात, “आपल्याला सगळ्यात आधी ते कार्टूनच वाटतील किंवा व्हीडिओ गेममधली पात्रं वाटतील.”
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)