You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सेक्सचा विचार तुमच्या डोक्यात किती वेळा येतो?
- Author, टॉम स्टॅफर्ड
- Role, बीबीसी प्रतिनिधी
पुरुषांच्या डोक्यात सारखा सेक्सचा विचार सुरू असतो किंवा प्रत्येक सात सेकंदांनी पुरुषांच्या मनात सेक्सचा विचार येतो असं म्हटलं जातं. अनेक जणांचा यावर विश्वास बसतो. पण हे खरंच शक्य आहे. सेक्सचा खरंच प्रत्येक सात सेकंदांनंतर विचार करणं शक्य आहे का?
जर थोडी आकडेमोड केली तर आपल्या लक्षात येऊ शकेल की जर प्रत्येक सात सेकंदांनंतर सेक्सचा विचार केला तर प्रत्येक तासाला हा विचार 514 वेळा येईल. तसंच दिवसभरात आपण नीट जागे असतो असे 14 तास गृहित धरले तर दिवसाला 7,200 वेळा सेक्सचा विचार मनात येतो असं म्हणावं लागेल.
मला तर ही संख्या जास्तच वाटते. दुसऱ्या कोणत्याही विचारापेक्षा या विचाराची ही कथित संख्या कितीतरी पटीने जास्त आहे. मग आपल्या मनात सेक्स आणि इतर विचार दिवसभरात कितीवेळा येतात हे कसं पाहायचं?
हे विचार मोजण्यासाठी मानसशास्त्रज्ञ एक शास्त्रीय पद्धती वापरतात त्याला 'एक्सपिरिअरन्स सॅंपलिंग' म्हटलं जातं. या पद्धतीमध्ये एखादा विचार आल्या आल्या तो त्याच क्षणी मोजायला सांगितलं जातं.
ही संख्या मोजण्यासाठी टेरी फिशर आणि त्यांच्या ओहायो विद्यापीठातील संशोधन चमूने क्लिकर्सचा वापर केला. त्यांनी कॉलेजला जाणाऱ्या 283 विद्यार्थ्यांचे तीन गट केले. जेव्हा जेव्हा सेक्स, खाणं किंवा झोपण्याचे विचार येतील तेव्हा एकदा क्लिक करून नोंद करायला त्यांना सांगितलं.
साधारणतः एका पुरुषाच्या मनात दिवसभरात 19 वेळा सेक्सचे विचार येत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. हे प्रमाण महिलांपेक्षा जास्त होतं. महिलांच्या मनात एका दिवसात सरासरी 10 वेळा हे विचार येत होते.
तसेच पुरुषांच्या मनात खाण्या-पिण्याचे आणि झोपेचेही विचार जास्त येत होते. हे कदाचित पुरुष थोडे अधिक विलासी असावेत याकडे निर्देश करणारं असावं. किंवा त्यांना कोणतीही ढोबळपणे मनात येणारी भावना विचार वाटत असावी. किंवा दोन्ही शक्यता असाव्यात.
आश्चर्य म्हणजे या विचारांमध्ये माणसागणिक फरक दिसून आला. काही लोकांनी दिवसभरात फक्त एकदाच सेक्सचा विचार आल्याचं सांगितलं, तर एकाने मात्र 388 वेळा क्लिक केलं होतं. आकडेमोड केली तर त्याच्या मनात साधारणपणे दर दोन मिनिटांनी सेक्सचे विचार येत होते असं म्हणायला हवं.
पण यात एक दिशाभूल करणारा घटकही आहे. त्याचा मोठा अडथळा या अभ्यासात येण्याची शक्यता आहे. त्याला 'व्हाईट बेअर प्रॉब्लेम' म्हणतात.
आता हा प्रॉब्लेम म्हणजे काय ते समजून घेऊ. एखाद्या मुलाला हात हवेत उंचावायला सांगून आणि पांढरं अस्वल म्हणजे व्हाईट बेअरचा विचार मनात येत नाही तोपर्यंत हात खाली घ्यायचा नाही असं सांगितलं जातं. पण एकदा का विचार सुरू केला की जी गोष्ट विसरायची किंवा मनात आणायची असं ठरवलं की तोच विचार मनात सतत येऊ लागतो. म्हणजे लगेचच मनात पांढऱ्या अस्वलाचा विचार मनात येतो आणि हात खाली घ्यावा लागतो. (प्रयोगासाठी तुम्ही कोणताही प्राणी निवडू शकता, पांढरे अस्वल हे फक्त एक उदाहरण आहे.)
नेमकी हीच परिस्थिती आपल्या अभ्यासातही घडतेय हे फिशर यांना दिसून आलं. त्यांनी मुला-मुलींना सेक्सचे (आणि खाणं-पिणं, झोपेचे) विचार कितीदा मनात येतात हे मोजण्यासाठी क्लिकर दिले होते. म्हणजे ते क्लिकर हातात पडल्यावर तिथून बाहेर पडल्यावर लोकांवर सेक्सचा विचार मनात न येऊ देण्यासाठी नक्की धडपड करावी लागली असणार पुन्हा प्रत्येकवेळेस विचार आल्यावर क्लिक करायचं लक्षात ठेवणंही अवघड ठरलं आहे. त्यांची चांगलीच तारांबळ उडाली असेल. मला तर नक्की वाटतंय 388 वेळा क्लिक करणाऱ्या पोराचं तेच झालं असावं. त्या बिचाऱ्याला या गोंधळाला बळी पडावं लागलं असण्याची शक्यता आहे.
आणखी एक प्रयोग विल्हेम हॉफमन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केला होता. त्यांनी जर्मनीमधल्या प्रौढ लोकांमध्ये स्मार्टफोन वाटले. या स्मार्टफोनवर दिवसातून सातवेळा कोणत्याही वेळेस एक अलर्ट किंवा नोटिफिकेशन येई. असा प्रयोग आठवडाभर चालला.
आता हा अलर्ट जेव्हा येईल तेव्हा व्यक्तीच्या मनात त्यावेळचा सर्वात ताजा विचार कोणता होता ते नोंदवून ठेवायला सांगितलं जाई. त्यामुळे आपल्या मनात विचार आल्या आल्या तो नोंदवायचा असल्या कटकटीपासून त्या लोकांची सूटका झालेली आणि त्यांच्या मनालाही मोकळेपणाने विहार करायची संधी मिळाली.
आता या प्रयोगाची तुलना फिशर यांनी केलेल्या प्रयोगाशी करता येणार नाही. कारण बहुतांश लोकांनी काही आपण दिवसात सातही वेळा आपण सेक्सचा विचार करत होतो असं नोंदवलेलं नाही. पण त्या सात सेकंदांच्या समजुतीपेक्षा फार कमीवेळा लोक सेक्सचा विचार करतात इतकं तरी यातूनही स्पष्ट झालं. साधारण 4 टक्के नोंदीमध्ये गेल्या अर्ध्या तासात सेक्सचा विचार लोकांच्या मनात आल्याचं दिसलं म्हणजे दिवसातून एक वेळा विचार आला असं म्हणता येईल. फिशर यांच्या अभ्यासात तो आकडा 19 इतका होता.
पण हॉफमन यांच्या अभ्यासात एक वेगळीच माहिती बाहेर आली. ती म्हणजे सहभागी लोकांच्या विचारांमध्ये सेक्सला फारसं महत्त्व नसल्याचं दिसून आलं. लोकांच्या मनामध्ये खाणं-पिणं, झोपणं, वैयक्तिक स्वच्छता, सामाजिक संबंध, कॉफी, टीव्ही पाहाणे, इमेल पाहाणे, इतर माध्यमांचा वापर याचे विचार सेक्सपेक्षा जास्तवेळा येत असल्याचं दिसून आलं.
खरंतर सेक्सचा विचार दिवस संपतानाच साधारणतः मध्यरात्रीच्यावेळेस येत असल्याचं दिसून आलं तेही दुसऱ्या क्रमांकावर. झोपेच्या विचारानं पहिला क्रमांक पटकावलेला होता.
त्या 'पांढऱ्या अस्वला'चा परिणाम हॉफमन यांच्या अभ्यासातही दिसून येतो बरं. कारण दिवसभरात सातवेळा आपल्याला विचाराबद्दल अलर्ट येणार म्हटल्यावर लोक थोडी दक्षताही घेत असतील. आपल्या मनात दिवसभरात सेक्सचे विचार आले हे नोंदवायला त्यांना थोडी लाजही वाटू शकते, त्यामुळे सेक्सचा विचार कितीदा आला हे नीट नोंदवलं न जाण्याची शक्यता आहे.
थोडक्यात आपण सात सेकदांची समजूत आपण खोडून काढू शकत असलो तरी सरासरी नक्की कितीवेळा सेक्सचा विचार येतो याबद्दलही सांगता येत नाही हेसुद्धा तितकंच खरं आहे. म्हणजे हे स्थलकालव्यक्तीपरत्वे ते बदलत असतं. तसंच त्याच व्यक्तीच्या मनात परिस्थितीनुसार विचार बदलत असतात. त्याही पुढचा अडथळा म्हणजे एखाद्या प्रकारचे विचार मोजायला लावलं की मनात वेगळे विचारच जास्त येण्याची भीती आहे. त्याचाही परिणाम या संशोधनावर होतो.
विचार मोजण्याचं कोणतंही नैसर्गिक प्रमाण किंवा एकक उपलब्ध नाही. मोजायला काही ते अंतर नाही. ते काही आपल्याला सेंटीमीटर, मीटर, किलोमीटरमध्ये मोजता येणार नाहीत. त्यामुळे विचार म्हणजे नक्की काय? हा प्रश्न उरतोच. तो मोजला जावा इतका मोठा आहे का? हा लेख वाचताना तुमच्या मनात सेक्सचा विचार आजिबातच आला नाही का? आला तर एकदा आला की अनेकदा आला?... अनेक गोष्टी विचार करण्यासारख्या आहेत.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज रात्री 8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा )