सेक्स आणि कोरोना व्हायरस विषयी तुमच्या मनातल्या 'त्या' 7 प्रश्नांची उत्तरं

    • Author, सेलेस्टिना ओलुलोडे
    • Role, न्यूजबीट रिपोर्टर

सेक्स केल्यास मलाही कोरोना व्हायरसची लागण होईल का? असा प्रश्न तुमच्या मनात अनेकदा आला असेल. मात्र, कदाचित तुम्ही हे उघडपणे विचारू शकत नसाल.

याबाबत लोकांच्या मनात सहाजिकपणे येणाऱ्या काही प्रश्नांची उत्तरं डॉ. अॅलेक्स जॉर्ज आणि डॉ. अॅलिक्स फॉक्स यांनी दिली आहेत.

अॅलेक्स जॉर्ज हे स्वत: डॉक्टर आहेत, तर अॅलिक्स फॉक्स या पत्रकार आहेत.

तर डॉ. अॅलिक्स फॉक्स यांनी लैंगिकतेशी संबंधित विषयांवर पत्रकार म्हणून अभ्यासही केलाय. बीबीसी रेडिओ वनच्या अनएक्स्पेक्टेड फ्ल्यूड्स या कार्यक्रमाच्या निवेदक म्हणूनही त्यांनी काम केलंय. द मॉडर्न मॅन पॉडकास्टच्या त्या को-होस्ट आहेत.

चला तर मग... कोरोना व्हायरस आणि सेक्स यासंबंधी तुमच्या मनातील प्रश्नांवर त्यांची उत्तरं जाणून घेऊया.

1) कोरोना व्हायरस वेगानं पसरत असताना सेक्स करणं सुरक्षित आहे का?

डॉ. अॅलेक्स जॉर्ज - जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये आहात, एखाद्या व्यक्तीसोबत राहतायत किंवा एकाच वातावरणात अनेक दिवसांपासून राहताय, तर तुमच्या नियमित गोष्टींमध्ये काही बदल गरजेचा नाहीय.

मात्र, जर तुमच्यातील कुणामध्ये कोरोना व्हायरसची लक्षणं आढळून आली, तर मात्र दोघांमध्ये निश्चितच अंतर राखलं पाहिजे. घरातील अलगीकरणात गेले पाहिजे. एकमेकांपासून दोन मीटर दूर राहिलं पाहिजे. पण आम्हाल माहीत आहे, हे करणं खूप कठीण आहे.

अॅलिक्स फॉक्स - तुम्हाला कुठली लक्षणं जाणवत असतील, तर त्याची लागण तुमच्या जोडीदारालाही होईल, असं मानण्याची गरज नाही. मात्र, तुमच्यात एखादं लक्षण आढळलं, तरी खबरदारी घेऊन जोडीदारापासून अंतर राखलं पाहिजे.

2) नव्या जोडीदारासोबत सेक्स करणं सुरक्षित आहे का?

अॅलिक्स फॉक्स -सेक्ससाठी नवा जोडीदार बनवण्याचा सल्ला आजच्या घडीला मी तर देणार नाही. कारण यातून तुम्हाला कोरोना व्हायरसची लागण होण्याची शक्यता वाढेल.

डॉ. अॅलेक्स जॉर्ज - कोरोना व्हायरसच्या काही वाहकांमध्ये (कॅरिअर्स) लक्षणंच दिसून येत नाहीत. त्यामुळे तुमच्यामध्ये लक्षण आढळलत नसलं, तरी तुम्ही तुमच्या जोडीदाराला संक्रमित करू शकता. जवळीक किंवा किस केल्यानं जोडीदारापर्यंत विषाणू पोहोचू शकतात.

3) मी काही दिवस आधीच एकाला किस केलं, तर त्या व्यक्तीत कोरोना व्हायरसची लक्षणं दिसून आलीत. मग मी काय करायला हवं?

अॅलिक्स फॉक्स - जर तुम्ही किस केलेल्या व्यक्तीमध्ये कोरोना व्हायरसची लक्षणं आढळून आली असतील, तर तुम्ही स्वत:ला अलग करा आणि तुमच्या लक्षणांवर देखरेख ठेवा. जर तुमच्यातही तशी लक्षणं दिसून आली, तर मग सतर्क व्हा. शिवाय, ही लक्षणं अधिक गंभीर वाटत असली, तर मग वैद्यकीय उपचारांचीही मदत घ्या.

डॉ. अॅलेक्स जॉर्ज - आपण सर्वजण जबाबदार बनलं पाहिजे. त्यामुळे जर तुमच्यामध्ये एखादं लक्षण आढळलं, तर तुम्ही गेल्या काही दिवसात कुणाला किस केलं असल्यास त्या व्यक्तीला तुमच्या लक्षणांबद्दल माहिती द्या. त्या व्यक्तीलाही सतर्क करा. एकमेकांची काळजी घेणं आवश्यक आहे.

4) कोरोना व्हायरसच्या प्रसारापूर्वी मी जोडीदारासोबत सेक्स करताना कंडोम वापरत नव्हतो, मग आता कंडोम वापरायला हवं का?

अॅलिक्स फॉक्स - याचं उत्तर असंय की, तुम्ही आतापर्यंत कंडोम का वापरत नव्हतात?

तुम्ही STI पीडित आहात किंवा इतर कॉन्स्ट्रासेप्शन वापरत आहात, असं तुमचं यावर उत्तर असेल, तर ठीक आहे. मात्र, जर पुल-आऊटसारख्या पद्धतीवर तुमचा विश्वास आहे म्हणून तुम्ही कंडोम वापरत नसाल, तर मग तुम्ही आता कंडोम वापरणं अत्यंत आवश्यक आहे.

5) गुप्तांगांना स्पर्श केल्यानंतरही कोरोना व्हायरस होतो?

डॉ. अॅलेक्स जॉर्ज - जेव्हा तुम्ही जोडीदाराच्या गुप्तांगाला स्पर्श करता, त्यावेळी हेही शक्य आहे की, तुम्ही किस करत असाल. यावेळी एक गोष्ट नीट लक्षात ठेवा, कोरोना व्हायरस लाळेतूनही पसरतो. त्यामुळे गुप्तांगांना स्पर्श आणि त्याचवेळी किस करणं हे नक्कीच धोकादायक ठरू शकतं. अशावेळी ज्या जोडीदारासोबत तुम्ही राहत नाहीत, त्यांच्याशी शारीरिक संबंध ठेवू नका.

6) या स्थितीत नातं कायम कसं ठेवायचं? मला आता सिंगलही राहायचं नाहीय.

अॅलिक्स फॉक्स- लोकांना चांगली सेक्सलाईफ काय असते, याचा विचार करण्यास कोरोना व्हायरसच्या या साथीनं भाग पाडलंय. लोक एकमेकांसाठी रोमँटिक गोष्टी लिहू लागलेत. जे लोक अलगीकरणात आहे, ते या वेळेचा सदुपयोग करतायेत. काही लोक तर अधिकच क्रिएटिव्ह झालेत.

जर तुम्ही जोडीदारासोबत एकाच घरात अलगीकरणात राहत असाल, तर तुम्ही एकमेकांना अधिक चांगल्या प्रकारे जाणून घेऊ शकता. एकमेकांच्या आवडी-निवडी समजून घेऊ शकता.

7) जर मला HIV असेल, तर कोरोना व्हायरस होण्याची भीती आहे का?

अॅलिक्स फॉक्स - टेरेंस हिगिन्स ट्रस्टच्या डॉ. मायकल ब्रॅडी यांनी याबाबत अत्यंत महत्त्वाचा सल्ला दिलाय. जर तुम्ही HIV ची औषधं घेत असाल आणि तुमचा CD4 काऊंट चांगला असेल, तर तुम्हाला कमकुवत रोगप्रतिकार प्रणाली असणारे मानले जात नाही. याचाच अर्थ तुम्ही कोरोना व्हायरसग्रस्त होण्याची शक्यता नाहीय. मात्र, तुम्ही HIV पॉझिटिव्ह असाल, तर नियमितपणे औषधं घेत राहा.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)