You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
राज्यसेवा परीक्षेत प्रमोद चौगुले यांनी सलग दुसऱ्यांदा पटकावला पहिला क्रमांक
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2021 चा निकाल लागला आहे. या परीक्षेत प्रमोद चौगुले यांनी पहिला क्रमांक मिळवला आहे.
मागच्या वर्षीही त्यांचा पहिला क्रमांक आला होता. मात्र तेव्हा त्यांना हवी असलेली पोलीस उपअधीक्षक ही पोस्ट नसल्याने त्यांनी पुन्हा परीक्षा दिली आणि त्यांनी हे स्पृहणीय यश मिळवलं.
या निकालानंतर बीबीसी मराठीशी त्यांनी संवाद साधला. ते म्हणाले, “मागच्या वर्षी माझा पहिला क्रमांक आला होता. पण हवी ती पोस्ट न मिळाल्याने मी पुन्हा परीक्षा दिली. खरंतर अभ्यास असा थांबला नव्हताच. कारण मला पोस्ट वेगळी हवी होती. त्यामुळे अभ्यासात सातत्य ठेवलं आणि आज हे यश मिळालं.”
प्रमोद चौगुले यांना मुलाखतीत 70 मार्क पडले आहेत. आता ते पोलीस उपअधीक्षक या पदावर रुजू होणार आहेत. सध्या त्यांचं नागपुरात उपसंचालक (उद्योग) या पदाचं प्रशिक्षण सुरू आहे.
अडचणींची वाट
2015 पासून त्यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायला सुरुवात केली. यशा अपयशांच्या अनेक फेऱ्यानंतर अखेर यावर्षी त्यांना यश मिळालं आहे. गेल्या परीक्षेत त्यांचा क्रमांक एक मार्काने हुकला होता. त्यानंतर 2020 आणि 2021 च्या परीक्षेत ते राज्यातून पहिले आले आहेत.
हा प्रवास नक्कीच सोपा नव्हतं असं ते सांगतात. 2020 कोरोना काळात सांगलीत पूर आला होता. तेव्हाच त्यांच्या घरचे सगळे कोरोना पॉझिटिव्ह आले होते. प्रमोद एकटे अभ्यास करत होतो. अशा बिकट परिस्थितीत मार्ग काढून त्यांनी हे यश मिळवलं.
2021 च्या परीक्षेत सगळं सुरळीत झालं असलं तरी अनेकदा चढ उतार आलेच. तरीही कुटुंबियांच्या साथीने त्यांनी हे यश मिळवलं.
या प्रवासात अनेकदा त्यांना सगळं सोडून द्यावंसं वाटलं. मात्र त्यांनी हिंमत सोडली नाही. घरच्यांनी त्यांनी खूप पाठिंबा दिला. स्वत:पेक्षा घरच्यांच त्यांना जास्त पाठिंबा होता.
मी खूप अपयश पाहिलं आहे. आता मात्र छान वाटतंय. परीक्षेचा प्रवास इथेच संपला असला तरी पुढचा प्रवास आता सुरू झाला आहे, अशी भावूक प्रतिक्रिया त्यांनी दिली.
घरच्यांनीही माझ्या निराशेच्या सुरात सूर मिसळले असते तर आज हा दिवस पहायल मिळाला नसता असं ते सांगतात.
MPSC करणाऱ्या सगळ्याच मुलांचा संघर्ष वेगळा आहे. ते वेगवेगळ्या पातळ्यांवर लढत आहे. त्या सगळ्यांना माझ्या शुभेच्छा आहेत असं प्रमोद चौगुले म्हणाले.
आज लागला निकाल
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2021 चा निकाल आज जाहीर झाला आहे. त्यात प्रमोद चौगुले राज्यात पहिला आला आहे. तर मुलींमधून सोनाली मात्रे हिने प्रथम क्रमांक पटकावला आहे
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ही गुणवत्ता यादी जाहीर केली आहे. ही यादी केवळ तात्पुरत्या स्वरुपाची असून विविध दाव्यांच्या अनुषंगाने अंतिम निकालापूर्वी प्रमाणपत्रे सादर करताना काही उमेदवारांच्या दाव्यांमध्ये बदल होऊ शकतो असं आयोगाने म्हटलं आहे.
उपजिल्हाधिकारी, उपअधीक्षक आणि तहसीलदार यांच्यासह 405 जागांसाठी निवड यादी जाहीर करण्यात आली आहे.
2023 च्या राज्यसेवेची जाहिरात आली असून त्यासाठी 28 मार्च ही शेवटची तारीख आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)