इस्रायलवरील इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर पहिल्यांदाच बोलले इराणचे सर्वोच्च नेते

फोटो स्रोत, EPA
काही दिवसांपूर्वीच इराणनं इस्रायलवर जोरदार क्षेपणास्त्र केला होता. त्यानंतर इस्रायल काय प्रत्युत्तर देणार, इराणची भूमिका काय असणार, इस्रायलचा लेबनॉन, हमास, हिजबुल्लाह आणि इराणबरोबर संघर्ष कोणत्या स्तरावर जाणार, या संघर्षाची व्यापक युद्धात परिणती होणार का हे मुद्दे जगभरात सर्वाधिक चर्चेचा आणि चिंतेचा विषय बनले आहेत.
इराणचे खामेनी यासंदर्भात काय म्हणाले, इस्रायलचे लेबनॉन मधील ताजे हल्ले कोणावर झाले याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
इराणच्या खामेनींचा भाषणात मुस्लीम एकतेवर जोर
इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी यांनी तेहरानच्या इमाम खोमेनी मोसल्ला मशिदीत भाषण केलं. गेल्या अनेक वर्षांत ते पहिल्यांदाच या प्रकारे सार्वजनिकरीत्या भाषण देत होते.
खामेनी यांनी 2020 मध्ये शेवटचे सार्वजनिक भाषण केले होते.
आपल्या भाषणात आयातुल्ला अली खामेनी यांनी जगभरातील मुस्लीम समुदायाच्या एकतेवर भर दिला. सर्व मुस्लिमांनी कुराणाच्या मूल्यांच्या आधारे एकत्र आलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं.
ते म्हणाले की जे पॅलेस्टाईन, लेबनॉन आणि इतर मुस्लीम देशांचे शस्त्रू आहेत ते इराणचे देखील शत्रू आहेत.
खामेनी यांनी त्यांच्या भाषणाद्वारे एकीकडे जगाला त्यांची शक्ती दाखवण्याचा प्रयत्न केला तर दुसरीकडे इराणमधील नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला.
खामेनी यांनी त्यांचे भाषण फारसी भाषेत केले, त्यात काही भाग अरेबिकही होता. लेबनीज आणि पॅलेस्टिनी लोकांना भाषण समजण्यासाठी असं करण्यात आलं होतं.
हमासनं गेल्या वर्षी 7 ऑक्टोबरला इस्रायलवर मोठा हल्ला केला होता. या हल्ल्यानंतरच युद्धाची सुरूवात झाली होती. तीन दिवसांनी हमासच्या या हल्ल्याला एक वर्ष पूर्ण होईल.


या सर्व पार्श्वभूमीवर खामेनी यांचं भाषण झालं आहे.
तीनच दिवसांपूर्वी इराणनं इस्रायलवर प्रचंड क्षेपणास्त्र केला होता. हिजबुल्लाहचे प्रमुख हसन नसरल्लाह आणि इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सचे कमांडर अब्बास निलफोरोशान तसंच हमासचे नेते इस्माईल हानिये यांच्या हत्येला प्रत्युत्तर म्हणून इराणनं इस्रायलवर हा हल्ला केल्याचं मानलं जातं.
याआधी खामेनी यांनी शुक्रवारच्या नमाजच्या वेळेस भाषण करण्यास देखील अशाच महत्त्वाच्या घटनेची पार्श्वभूमी होती. 2020 मध्ये बगदाद विमानतळाजवळ अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख कासीम सुलेमानी यांचा मृत्यू झाला होता.
त्यानंतर शुक्रवारच्या नमाजच्या वेळेस खामेनी यांनी भाषण केलं होतं. त्यानंतर त्यांनी आज (4 ऑक्टोबर) भाषण केलं आहे. त्याआधी 2012 मध्ये त्यांनी नमाजच्या वेळेस भाषण केलं होतं.
खामेनी म्हणतात ही 'इस्रायलला केलेली छोटीशी शिक्षा'
खामेनी यांनी मंगळवारी (1 ऑक्टोबर) इराणनं इस्रायलवर केलेल्या हल्ल्याचं कौतुक केलं. त्यांनी हा हल्ला पूर्णपणे योग्य आणि न्याय्य असल्याचं म्हटलं आहे.
ते पुढे म्हणाले की इस्रायलनं केलेल्या 'मोठ्या गुन्ह्यांसाठी' केलेली ही 'किमान शिक्षा' होती.

फोटो स्रोत, EPA-EFE/REX/Shutterstock
खामेनी म्हणाले की इस्रायलच्या विरोधातील सर्व 'संबंधित कर्तव्ये' इराण "ताकदीनं आणि धैर्यानं" पार पाडेल.
त्यांनी आपल्या भाषणात जोर देत सांगितलं की इस्रायलच्या बाबतीत इराण 'दिरंगाई' करणार नाही तसेच काही संकोचही बाळगणार नाही.
याआधी, इस्रायलवर हल्ला केल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू म्हणाले होते, "इराणने आजच्या रात्री फार मोठी चूक केली आहे. त्याला याची भरपाई करावी लागेल."
या हल्ल्याच्या वृत्तानंतर, इस्रायलचे संरक्षण करावे असे आदेश अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी अमेरिकेच्या लष्कराला दिले होते. इस्रायलच्या लष्कराला संपूर्णपणे मदत करण्याचे आवाहन बायडन यांनी लष्कराला केले होते.
लेबनॉन-सीरिया रस्ता उद्ध्वस्त
दरम्यान, इस्रायलने लेबनॉनवरील हवाई हल्ले सुरूच ठेवले असून त्याची तीव्रता वाढवली आहे. लेबनॉन आणि शेजारच्या सीरियाला जोडणारा महत्त्वाचा रस्ता या हवाई हल्ल्यात मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त झाला आहे.
हिजबुल्लाह सीरिया मार्गे लेबनॉन मध्ये लष्करी उपकरणं, शस्त्रास्त्रं आणत असल्याचा आरोप इस्रायलच्या लष्करानं केला आहे.
संयुक्त राष्ट्रसंघाच्या अंदाजानुसार 23 सप्टेंबरपासून जवळपास 1,30,000 लोकांनी सीरियामध्ये पलायन केलं आहे.

या बातम्याही वाचा:

लेबनॉन-सीरिया सीमेजवळच्या क्रॉसिंग पॉईंटच्या लेबनॉनच्या बाजूच्या जवळपास 700 मीटर परिसरात इस्रायलनं जोरदार हवाई हल्ले केले आहेत. सीमेपासून हा भाग फक्त 5 किमी अंतरावर आहे.
लेबनॉनमधून सीरियात जाणाऱ्या या चौकीला मसना क्रॉसिंग म्हणतात. याच रस्त्याचा वापर करून सकाळपासून असंख्य लेबनीज नागरिक पायीच सीरियामध्ये पलायन करत आहेत.

फोटो स्रोत, EPA-EFE/REX/Shutterstock
हिजबुल्लाहच्या आणखी एका कमांडरचा मृत्यू
इस्रायलच्या लेबनॉनवरील हल्ल्यांमध्ये हिजबुल्लाहचा आणखी कमांडर मारला गेला आहे.
इस्रायलच्या लष्कराच्या म्हणण्यानुसार काल (3 ऑक्टोबर) बैरूत वर केलेल्या हल्ल्यांमध्ये मुहम्मद रशिद स्काफी हा हिजबुल्लाहचा कम्युनिकेशन्स कमांडर मारला गेला आहे.
आपल्या वक्तव्यात इस्रायलच्या लष्करानं म्हटलं आहे की स्काफी हा हिजबुल्लाहमध्ये 2000 पासून कार्यरत होता आणि तो हिजबुल्लाहच्या वरिष्ठ नेत्यांच्या अतिशय विश्वासातील होता. हिजबुल्लाहनं मात्र यासंदर्भात कोणतीही माहिती किंवा प्रतिक्रिया दिलेली नाही.

फोटो स्रोत, Getty Images
हिजबुल्लाहच्या उर्वरित नेत्यांवर इस्रायलचा हल्ला
काल रात्री (3 ऑक्टोबर) इस्रायलनं बैरूतवर भीषण हवाई हल्ला केला होता. हा हल्ला हसन नसरल्लाह यांचे उत्तराधिकारी आणि हिजबुल्लाहचे नवे प्रमुख हाशिम सफीद्दीन यांना लक्ष्य करुन करण्यात आला होता.
इस्रायलच्या अधिकाऱ्यांकडून न्यूयॉर्क टाईम्सला दिलेल्या माहितीत म्हटलं आहे की सफिद्दीन बैरूतमध्ये दाहिह येथे एका बंकरमध्ये हिजबुल्लाहच्या वरिष्ठ नेत्यांसह एक बैठक घेत होते. मागील आठवड्यात ज्या भागात नसरल्लाह मारले गेले होते त्याच्या जवळ हा बंकर आहे.
याबाबत लेबनॉन संदर्भातील वरिष्ठ विश्लेषक डेव्हिड वूड म्हणाले की, हिजबुल्लाहच्या वरिष्ठ नेत्यांवर सातत्यानं हल्ले करून इस्रायलनं असे हल्ले करण्याची त्यांची क्षमता दाखवून दिली आहे. मात्र यात मोठा धोका आहे. अर्थात हिजबुल्लाहच्या वरिष्ठ नेत्यांसमोर याप्रकारे बैठक घेण्याशिवाय पर्याय नव्हता.
ते म्हणाले, "काही दिवसांपूर्वी हिजबुल्लाहच्या सदस्यांवर झालेला पेजर हल्ला आणि त्यानंतर वरिष्ठ नेत्यांवर झालेले हल्ले यातून इस्रायलच्या गुप्तहेर यंत्रणेनं हिजबुल्लाहमध्ये वरिष्ठ पातळीपर्यंत शिरकाव केल्याचं स्पष्ट आहे."
"त्यामुळे अशा परिस्थितीत गोपनीयता राखण्यासाठी हिजबुल्लाहच्या वरिष्ठ नेत्यांना एकमेकांना प्रत्यक्ष भेटून बैठका घेण्याशिवाय पर्याय नाही. शिवाय दाहिहशिवाय त्यांच्याकडे योग्य जागाही नाही."
अर्थात इस्रायलच्या हल्ल्यात हाशिम सफिद्दीन मारले गेल्याची कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र हिजबुल्लाहसाठी ही घटना अत्यंत महत्त्वाची आहे, असं वूड पुढे म्हणाले.
इस्लायलनं रात्रभर लेबनॉनवरील हल्ले सुरू ठेवले आहेत. यात बैरूत विमानतळाचाही समावेश आहे. मागील 24 तासात इस्रायलच्या हवाई हल्ल्यात किमान 37 लोक मारले गेल्याची माहिती लेबनॉनकडून देण्यात आली आहे.
लेबनॉन मधील प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार इराणचे परराष्ट्रमंत्री लेबनॉन दौऱ्यावर आले असून ते बैरूत विमानतळावर उतरले आहेत.
तर दुसऱ्या बाजूला लेबनॉनमधून इस्रायलवर रॉकेट मारा सुरूच आहे. इस्रायलच्या म्हणण्यानुसार आज सकाळी 20 रॉकेटचा मारा करण्यात आला. मात्र यातील बहुतांश रॉकेट हवेत नष्ट करण्यात आले आणि उर्वरित मोकळ्या जागेत पडले अशी माहिती इस्रायली लष्करानं दिली आहे.
इस्रायलनं टार्गेट केलेले सफिद्दीन कोण आहेत?
हाशिम सफिद्दीन यांना हसन नसरल्लाह यांचे उत्तराधिकारी आणि हिजबुल्लाहचे भावी प्रमुख मानलं जातं आहे. ते हिजबुल्लाहच्या कार्यकारी कौन्सिलचे प्रमुख आहेत आणि जिहाद कौन्सिलचे देखील सदस्य आहेत. हिजबुल्लाहच्या लष्करी आणि सुरक्षा कारवाया या कौन्सिलच्याच अखत्यारित येतात.
सफिद्दीन हे हिजबुल्लाहचे मारले गेलेले नेते हसन नसरल्लाह यांचे नातेवाईक आहेत. मात्र हिजबुल्लाहचं प्रमुखपदाची जबाबदारी हाताळण्याएवढी सफिद्दीन यांची क्षमता नाही असं बरेचजण मानतात.
अर्थात सफिद्दीन यांचं दिसणं, त्यांची देहबोली आणि बोलण्याची शैली देखील नसरल्लाह यांच्यासारखीच आहे.
नसरल्लाह यांचे समर्थक आणि विरोधक यांचं मानणं आहे की नसरल्लाह हे करिश्मा असलेले नेते होते. लोकांना खिळवून ठेवणारे ते उत्तम वक्ते होते. मात्र सफिद्दीन यांच्याकडे असे कौशल्य नाही.
हसन नसरल्लाह यांच्यानंतर सफिद्दीन हेच हिजबुल्लाहचे प्रमुख होणार की नाहीत याबाबत अद्याप स्पष्टता नाही. हिजबुल्लाहच्या वरिष्ठ नेत्यांच्या फळीत ते नाहीत आणि हिजबुल्लाहचं नेतृत्व करण्यासाठी ते योग्य पर्याय नाहीत असं काही जणांचं मत आहे.
नवा प्रमुख कोण असणार याबाबत सार्वजनिकरीत्या घोषणा करण्याबाबत हिजबुल्लाह खूप सावध आहे. इस्रायलची लेबनॉनमधील मोहीम ही फक्त आपल्या संघटनेला कमजोर करण्यासाठी नाही तर आपली सत्ता आणि संभाव्य नेतृत्व संपवण्यासाठी आहे असं हिजबुल्लाहला वाटतं आहे.
मात्र इस्रायलच्या आक्रमतेमुळे लेबनॉनमधून सशस्त्र प्रतिकार निर्माण होईल असं मानलं जातं आहे.

फोटो स्रोत, Reuters
लेबनॉन आणि सीरियातील बोगद्यावर हल्ले
इस्रायलच्या लष्करानं या गोष्टीची पुष्टी केली आहे की त्यांनी लेबनॉनमधून सीरियात जाणाऱ्या बोगद्यांवर हल्ले केले आहेत.
याआधीच एक दिवस इस्रायलनं लेबनॉन आणि सीरियाला जोडणाऱ्या महत्त्वाच्या रस्त्यावर हवाई हल्ले केले होते.
एक्स या सोशल मीडिया व्यासपीठावर पोस्ट करत इस्रायलच्या लष्करानं म्हटलं आहे की लेबनॉनमधून सीरियात जाणाऱ्या बोगद्यांवर इस्रायली हवाई दलानं हल्ला केला आहे.
या बोगद्यांचा वापर हिजबुल्लाह शस्त्रास्त्रांची वाहतूक आणि साठा करण्यासाठी करत होतं असं इस्रायली लष्कराचं म्हणणं आहे.
या भागातील हिजबुल्लाहच्या लष्करी पायाभूत सुविधा, लष्करी इमारती आणि शस्त्रास्त्रांच्या गोदामांवर देखील हल्ले करण्यात आल्याचं इस्रायली लष्करानं पुढे सांगितलं आहे.
दक्षिण इस्रायलमध्ये दोन महिन्यात पहिल्यांदा सायरनचे आवाज
दक्षिण इस्रायलमध्ये गेल्या दोन महिन्यांमध्ये पहिल्यांदा हवाई हल्ल्याचे सायरन वाजत असल्याचं, इस्रायलच्या लष्करानं सांगितलं आहे.
इस्रायलच्या लष्करानं पुढे म्हटलं आहे की , 7 ऑक्टोबर च्या हमासच्या हल्ल्यानंतर अजूनही आमच्या नागरिकांना हमासकडून धोका आहे आणि आम्ही त्यांच्याविरोधातील मोहीम सुरूच ठेवणार आहोत.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











