'सायरन वाजताच तीन मिनिटांत बंकर गाठतो', कुटुंबीयांना काय सांगत आहेत इस्रायलमधील भारतीय मजूर ?

- Author, सय्यद मोजेज इमाम
- Role, बीबीसी प्रतिनिधी, उत्तर प्रदेशातील बाराबांकीहून
इराण आणि इस्रायल यांच्या मध्ये तणाव वाढल्यामुळे भारतीयांवर त्याचा परिणाम होत आहे.
इराणने मंगळवारी रात्री मिसाईल हल्ला केला. त्यामुळं इस्रायलमध्ये काम करणाऱ्या भारतीय कुटुंबीयांची काळजी वाढली आहे.
एका दिवसांत अनेकदा व्हीडिओ कॉल करून ते आप्तेष्टांची ख्यालीखुशाली विचारत आहेत.
मात्र, इस्रायलमध्ये राहणारे सगळं ठीक आहे असं सांगत आपल्या घरच्यांना दिलासा देत आहेत.
उत्तर प्रदेशात आम्ही अशाच काही कुटुंबीयांशी चर्चा केली.
इराणच्या हल्ल्यानंतर भारतीय दुतावासाने इस्रायलमध्ये राहणाऱ्या नागरिकांना बाहेर न निघण्याचा आणि सुरक्षा नियमांचा पालन करण्याचा सल्ला दिला होता.
भारतातील जवळजवळ 24 हजार लोक सध्या इस्रायलमध्ये राहत आहेत.
यापैकी अर्ध्याहून अधिक लोक असे आहेत, जे एक वर्षांपासून तिथं कामगार म्हणून गेले आहेत.

इस्रायलमध्ये मजुरांचा तुटवडा निर्माण झाला होता. त्यामुळं तिथल्या सरकारनं पुढाकार घेतला होता. हमास आणि इस्रायल यांच्या युद्धामुळं तिथं मजुरांची संख्या लक्षणीयरित्या कमी झाली होती.
त्यानंतर भारतीय कामगारांना तिथे नेण्याची प्रकिया सुरू झाली होती.
दुहेरी संकट
या बातमीसाठी वार्तांकन करायला गेलो तेव्हा नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर नई बस्ती भागात मंदिराची रंगरंगोटी सुरू होती.
या मंदिरापासून काही अंतरावर इस्रायलमध्ये राहत असलेल्या दिनेश सिंह यांच्या घरासमोर गर्दी गोळा झाली होती. लोक तिथे इराण आणि इस्रायल समस्येबद्दल बोलत होते.
दिनेश यांची पत्नी अनिता म्हणाल्या की, “सकाळी व्हीडिओ कॉलवर बोलणं झालं होतं. तसंच रात्री हल्ल्यानंतरही दिनेश यांनी फोन केला होता. पुन्हा फोन केला तेव्हा नेटवर्क नव्हतं. काही वेळाने फोन आला, तेव्हा आम्ही त्यांना काळजी वाटत असल्याचं सांगितलं.”
“मी त्यांना म्हटलं की, जास्त अडचण होत असेल तर परत या. ते पैसे पाठवताहेत पण मनात काळजीही आहेच,” असं त्या म्हणाल्या.
दिनेश यांचे भाऊ केसर सिंह म्हणाले की, “युद्ध होऊच नये अशी आमची इच्छा आहे. हे सगळं थांबायला हवं. यात कोणाचंच भलं होणार नाही. माझा भाऊच नाही तर सगळ्यांनाच अडचणी येत आहेत. इथे काही काम नाही पण अडचणी जास्त वाढल्या तर सरकारनं आपल्या लोकांना परत बोलवायला हवं.”

लखनऊमध्ये यावर्षी जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात लोकांची नोंदणी करण्यात आली होती. सध्या इस्रायलमध्ये पाच हजार पेक्षा जास्त भारतीय कामगार आहेत.
सरकारी आकडेवारीनुसार आधी 4800 लोक आले होते. गेल्या महिन्यात अंदाजे 1500 लोक गेले आहेत.
या लोकांपैकीच एक भंवर सिंह यांचे भाऊ राकेश सिंहदेखिल इस्रायलच्या तेल अवीव शहराजवळ राहतात. भावाची ख्यालीखुशाली विचारण्यासाठी त्यांनीही भावाला व्हीडिओ कॉल केला होता.
ते म्हणाले की, “भावाने प्रचंड प्रमाणात स्फोट झाल्याचं सांगितलं. काही बॉम्ब हवेतच विरले. पण सायरन वाजल्यावर लगेच बंकरमध्ये जावं लागतं.”
गावाच्या आसपास जवळजवळ चोवीस लोक इस्रायलमध्ये होते आणि काही लोक जाण्याच्या तयारीत होते.
गावात किराण्याचं दुकान चालवणाऱ्या राजू सिंह यांचे डोळे सतत टीव्हीकडे लागले आहेत. ते युद्धाबाबत गावातल्या लोकांना सांगत असतात.
राजू सिंह यांनी सांगितलं, “गावातले 20-25 लोक तिथे आहेत. त्यापैकी दोन जण परत आले आहेत. मात्र ते वैयक्तिक कारणासाठी परत आले आहेत. गावातले आणखी लोक जाण्याची तयारी करत आहेत. पैसा जास्त मिळत असल्यामुळं आणखी लोकांची जायची इच्छा आहे. युद्धामुळे आता लोक कदाचित नाही जाणार.”
वाढती बेरोजगारी आणि नाइलाज
महेंद्र सिंह म्हणाले, “भावाने सांगितलं की, तीन मिनिटं आधी सायरन वाजतो आणि आम्ही बंकरमध्ये जातो. भावाला भारतीय रुपयांत 1 लाख 85 हजार इतका पगार मिळतो.”
प्रसारमाध्यमात आलेल्या बातम्यांनुसार इस्रायलमध्ये आणखी 10 हजार लोकांची गरज आहे. त्यासाठी भारतीय युवकांना प्रशिक्षण देण्याचं काम सुरू आहे.
या कामासाठी इस्रायलच्या अधिकाऱ्यांचं शिष्टमंडळ भारतात आलं होतं. त्यानंतर पुण्यातील औंध भागात असलेल्या आयटीआयमध्ये नोंदणी केली आहे.

तिकडे लखनौमध्ये अलीगंज आयटीआयमध्ये इस्रायलला जाणाऱ्या लोकांसाठी प्रशिक्षण सुरू आहे. तिथले प्रशिक्षित युवक इस्रायलला जाणार आहेत. चंद्रशेखर सिंह त्यांपैकी एक आहे. बेरोजगारीमुळं मला तिथे जावं लागत आहे असं त्यांनी सांगितलं.
“इथं बेरोजगारी इतकी जास्त आहे, तसंच काम मिळणं कठीण होत आहे. लोकांकडे काही पर्याय नाही. आमचं प्रशिक्षण सुरू आहे, मात्र कधी जायचं हे मात्र सरकारनं अद्याप सांगितलेलं नाही.”
सीएमआयएच्या एका अहवालानुसार भारतात जून 2024 मध्ये बेरोजगारीचा दर 9.2 टक्के होता. त्यात ग्रामीण भागातील बेरोजगारीचा दर 9.3 टक्के तर शहरातील बेरोजगारीचा दर 8.9 टक्के होता.
ज्या कुटुंबांशी बीबीसीने संवाद साधला त्यांच्यापैकी सगळ्यांचं म्हणणं आहे की, तिथे पैसा जास्त मिळतो. तिथे गेलेले लोक महिन्याला एक ते दोन लाख रुपये कमावत आहेत.


इस्रायलमध्ये राहणारे भारतीय लोक त्यांच्या कुटुंबांना आश्वस्त करत आहेत की, त्यांना काहीही धोका नाही.
इस्रायलमध्ये राहणाऱ्या लोकांचं म्हणणं आहे की, ते जिथे राहतात तिथे रोजच सायरन वाजत आहेत. मोबाइलवरही अलर्ट येतो. त्यानंतर लोकांना बंकरमध्ये जावं लागतं.











