सायबर क्राईम : नफ्याच्या आमिषाला बळी पडून लाखोंची फसवणूक, असा ओळखा ऑनलाईन ट्रेडिंग स्कॅम

प्रातिनिधिक छायाचित्र

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, भाग्यश्री राऊत
    • Role, बीबीसी मराठीसाठी

आपल्या दैनंदिन वापरातील गोष्टींमध्ये आता मोबाईलचा समावेश झाला आहे. एवढंच काय तर अनेकांच्या जीवनातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मोबाईल बनली आहे.

त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे हे मोबाईल त्यातील अ‍ॅपच्या माध्यमातून आता आर्थिक व्यवहाराचं प्रमुख साधन बनले आहेत.

पण हे ऑनलाईन आर्थिक व्यवहार जसे वापरणाऱ्यांसाठी सहज सोपे आणि फायद्याचे ठरत आहेत, तसेच ते सायबर क्राईमच्या माध्यमातून ऑनलाईन गैरव्यवहार किंवा फसवणूक करणाऱ्यांसाठी संधीही ठरत आहेत.

अशाच ऑनलाईन व्यवहारांसाठी वापरल्या जाणाऱ्या बँकिंग सुविधा, वेगवेगळे अ‍ॅप किंवा अनेकदा इतर गोष्टींचा वापर करूनही सायबर गुन्हेगार आर्थिक फसवणूक करताना दिसतात.

गेल्या काही दिवसांत अशाच आणखी एका फसवणुकीची चर्चा पाहायला मिळाली. ऑनलाईन ट्रेडिंग स्कॅमच्या माध्यमातून काही जणांनी फसवणूक झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत.

या स्कॅममध्ये अडकून मोठ्या प्रमाणावर फसवणूक होत असल्याचं समोर येत आहे. नागपुरातील एका 55 वर्षीय व्यापाऱ्याचीही अशाच प्रकारे ट्रेडिंगमध्ये स्कॅमद्वारे फसवणूक झाली. त्यांना तब्बल 1 कोटी 65 लाख रुपयांचा गंडा घातला.

या प्रकरणी नागपूर सायबर पोलिसांनी दोन आरोपींना अटक करून त्यांच्याकडून 1 कोटी 25 लाख रुपये परत मिळवले.

पण, हा ऑनलाईन ट्रेडिंग स्कॅम नेमका काय असतो? या स्कॅममध्ये सायबर गुन्हेगार नेमकी कशी फसवणूक करतात? आपली फसवणूक झालीच तर नेमकं काय करायला हवं? याबाबत आपण या पार्श्वभूमीवर माहिती घेणार आहोत.

नागपूरच्या व्यापाऱ्यांबरोबर काय घडलं?

नागपुरातील फसवणूक झालेले हे व्यापारी एका व्हाट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून काही जणांच्या संपर्कात आले. त्यातून त्यांनी इतरांची आकर्षक माहिती आणि दाखवलेले आकडे पाहून 10 हजार रुपयांची गुंतवणूक केली.

या गुंतवणुकीनंतर त्यांना त्याच्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळत असल्याचं भासवण्यात आलं. त्यातून अधिक पैसे मिळण्याचं आमिष दाखवून त्यांना आणखी पैसे गुंतवण्यासाठी गळ घालण्यात आली.

त्याला भूलून त्या व्यापाऱ्यांनी तब्बल 1 कोटी 65 लाख रुपयांची गुंतवणूक केली. केलेल्या गुंतवणुकीतून नफा कमावल्यानंतर हळू-हळू आपली रक्कम परत काढून घेता येईल, असं त्यांना वाटलं होतं. पण खरं काय ते कळलं आणि त्यांना धक्का बसला.

ग्राफिक्स

पैसे परत काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा पैसे निघाले नाहीत. तेव्हा आपली फसवणूक झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं आणि त्यानंतर त्यांनी सायबर पोलिसांत तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी मेसेज आणि इतर सर्व बाबी तपासून शोध घेतला आणि गुन्हेगारांपर्यंत पोहोचत दोन आरोपींना अटक केली.

कोर्टाच्या माध्यमातून या दोन्ही आरोपींकडून 1 कोटी 25 लाख रुपये संबंधित व्यापाऱ्यांना मिळवून दिल्याची माहिती नागपूर सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बळीराम सुतार यांनी दिली.

पण हा ट्रेडिंग स्कॅम नेमका काय असतो? या स्कॅममध्ये गुन्हेगारांची नेमकी मोडस ऑपरेंडी काय असते? हे आपण जाणून घेऊयात.

ऑनलाईन ट्रेडिंग स्कॅम काय असतो?

अनेकदा आपल्याला अचानक एखाद्या व्हॉट्सअ‍ॅप किंवा टेलिग्रामच्या ग्रुपवर अ‍ॅड करून घेतलं जातं. शेअर मार्केटशी संबंधित असे हे ग्रुप असतात. त्या ग्रुपमध्ये प्रामुख्यानं शेअर मार्केटच्या ट्रेडिंगबद्दल चर्चा केली जात असते.

सायबर गुन्हेगार अनेकदा अशा ग्रुपचा वापर सावज शोधण्यासाठी किंवा त्यांच्या फसवणुकीसाठी करत असतात.

या ग्रुपमध्ये काही जण त्यांचे पोर्टफोलिओ शेअर करत असतात. त्या माध्यमातून आपल्याला किती फायदा झाला, अशा प्रकारची माहिती ग्रुपमध्ये असलेल्या इतरांबरोबर शेअर केली जाते.

स्क्रीनशॉट शेअर करून मोठे आकडे दाखवले जातात. त्यामुळं त्या ग्रुपमध्ये असलेल्यांना आपसूकच प्रचंड फायदा झालेला पाहून त्याबाबत आकर्षण वाटतं.

ग्राफिक्स

या आकर्षणापोटी आपणही काही रक्कम गुंतवून नफा कमावू शकतो असा विचार मनात आल्याने काही जण या ग्रुपवर चौकशी करतात.

त्यानंतर संबंधितांना व्हॉट्सअ‍ॅपवर कॉल येतो. त्यावेळी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक कशी करायची याबाबतचं सेशन अटेंड करण्यास सांगितलं जातं.

सेशन बघितल्यानंतर त्यांच्या माध्यमातून मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी पैसे देण्याचं आवाहन केलं जातं. ही रक्कम गुंतवल्यानंतर तुम्हाला झालेल्या नफ्याची रक्कम कधीही काढता येऊ शकते, असं सांगितलं जातं.

सुरुवातीला जेव्हा रक्कम गुंतवली जाते तेव्हा त्यावर भरघोस नफा मिळत असल्याचं दाखवलं जातं. तसंच त्यावेळी काही काळ नफ्याची रक्कम काढताही येते. त्यामुळं गुंतवणूक करणाऱ्यांचा विश्वास निर्माण होतो आणि ते अधिकाधिक गुंतवणूक करतात.

ग्राफिक्स

सायबर क्राईम टाळण्यासाठी हे वाचा -

ग्राफिक्स

हाच खरा डाव असतो. जेव्हा गुंतवणूकदार जास्त पैसे गुंतवतात तेव्हा सायबर गुन्हेगार ती रक्कम आधीच दुसऱ्या बँक खात्यात वळते करतात. त्यानंतर गुंतवणूकदारांना पोर्टफोलिओ प्रॉफीटमध्ये असल्याचं दाखवलं जातं.

गुंतवणूकदाराला पोर्टफोलिओ पाहून आपले पैसे सुरक्षित असून नफा वाढत आहे, असं वाटत राहतं. पण खरं म्हणजे सायबर गुन्हेगारांनी आधीच पैसे लंपास केलेले असतात. त्यामुळं पैसे काढायचा प्रयत्न केला, की पैसे निघत नाहीत आणि त्यावेळी फसवणूक झाल्याचं लक्षात येतं.

दुबईला जातो पैसा

सायबर पोलिसांनी याबाबत दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी गुजरातमधून अटक केलेले आरोपी या ट्रेडिंग स्कॅममधून लुटलेले पैसे हवालामार्फत दुबईला पाठवत होते.

सायबर गुन्हेगार गरजू विद्यार्थी किंवा अत्यंत गरीब लोकांना हेरून त्यांच्या नावावर बँक खाते उघडतात. त्यानंतर त्यांचे डेबिट कार्ड, पासबूक अशी सगळी कागदपत्रं स्वतःकडं ठेवतात. त्याच्या मोबदल्यात ज्यांच्या नावाने खाती आहेत, त्यांना महिन्याचे 500 किंवा 1 हजार रुपये देऊन ही खाती वापरतात.

प्रातिनिधिक छायाचित्र

फोटो स्रोत, Getty Images

गुंतवणूक करणाऱ्यांकडून लुटलेले पैसे सुरुवातीला या खात्यात टाकायला सांगायचे. नंतर वेगवेगळ्या खात्यात वळवून हे पैसे हवालामार्फत दुबईला पाठवले जात होते, असं पोलिसांनी सांगितलं.

पण, नागपुरातील व्यापाऱ्यानं लवकर तक्रार दाखल केली त्यामुळं त्यांचे पैसे परत मिळवता आले. फसवणुकीनंतर काही पैसे त्याच खात्यात होते. त्यामुळे तक्रार दाखल होताच पोलिसांनी लगेच बँक खाते गोठवले होते. त्यामुळे ते पैसे परत मिळवता आले.

अशी टाळा फसवणूक

काही अगदी नेहमीच्या सामान्य बाबी लक्षात ठेवल्या तर अशा प्रकारची फसवणूक टाळता येणं शक्य आहे. नागपूरच्या सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बळीराम सुतार यांनी याबाबतचा सल्ला दिला आहे.

एखाद्या अनोळखी व्हॉट्सअ‍ॅप किंवा टेलिग्राम ग्रुपवर कोणी अनोळखी व्यक्तीनं अ‍ॅड केलं हीच सावध होण्याची सर्वात पहिली पायरी आहे, असं ते म्हणाले.

या ग्रुपवर कोणी ट्रेडिंगबद्दलचे किंवा पैशांबद्दलचे मेसेज टाकत असतील, त्यांना फायदा झाल्याचं सांगत असतील किंवा कुठल्या लिंकवर क्लिक करायला सांगत असतील तर त्याला बळी पडू नका.

कोणत्याही लिंकवर क्लिक न करता तो ग्रुपला रिपोर्ट करून त्यातून बाहेर पडणं हे सर्वात सुरक्षित आहे.

प्रातिनिधिक छायाचित्र

फोटो स्रोत, Getty Images

त्यानंतरही जर वारंवार असेच गुंतवणुकीचे मेसेज येत असतील तर त्यांना रिपोर्ट, ब्लॉक करा आणि लगेच जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा सायबर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवा.

शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवायचे असतील तर सेबीकडे अधिकृत नोंदणीकृत असलेली जी खाती असतील तिथेच गुंतवणूक करायला हवी. इतर कोणावरही थेट विश्वास ठेवू नका.

तरीही जर अशा ट्रेडिंग स्कॅमच्या जाळ्यात अडकले तर तातडीनं 1930 क्रमांकावर कॉल करावा किंवा नॅशनल सायबर क्राईम पोर्टलवर तक्रार दाखल करावी. किमान जवळच्या पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल करावी असाही सल्ला बळीराम सुतार देतात.

लवकरात लवकर तक्रार दाखल केली तर गमावलेले पैसे मिळण्याची अधिक शक्यता निर्माण होते, त्यामुळं तक्रार करायला उशीर करता कामा नये असा सल्ला वारंवार दिला जातो.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.