'पैसे दिले नाही तर गोळ्या घालू,' ऑनलाईन गेमद्वारे ओळख वाढवून मुलीचे ब्लॅकमेलिंग; असा चालतो प्रकार

फोटो स्रोत, Getty Images
- Author, भाग्यश्री राऊत
- Role, बीबीसी मराठीसाठी
सायबर क्राईमच्या अनेक घटना आपल्या कानावर सातत्याने पडत आहेत. त्यामुळ केवळ आर्थिकच नाही तर मानसिक त्रासालाही सामोरं जावं लागत असल्यामुळं सायबर क्राईम ही गंभीर समस्या ठरत आहे.
मोबाईल फोनच्या प्रचंड वापरामुळं एकीकडे अशा प्रकारच्या सायबर क्राईमच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्याचवेळी किशोरवयीन मुलांच्या हाती मोबाईल आल्यानं तेही अशा प्रकारच्या गुन्ह्यांचे बळी पडत असल्याचं समोर आलं आहे.
मुलं मोबाईलचा वापर वेगवेगळ्या कारणांसाठी करत असतात. शिक्षणाच्या दृष्टीनं व्हीडिओ पाहणं अॅपचा वापर असा भाग त्यात असतो.
पण त्याचबरोबर मनोरंजनासाठी काही गेमही ही मुलं मोबाईलवर खेळत असतात. त्यापैकी अनेक गेम ऑनलाईन असतात, आणि त्यातूनच ही किशोरवयीन मुलं-मुली यात अडकत असतात.
सायबर गुन्हेगार अशा ऑनलाईन गेम खेळणाऱ्यांना जाळ्यात अडकवून त्यांची फसवणूक, ब्लॅकमेलिंग करून पैसे उकळत असतात. त्यामुळं मुलांच्या हाती मोबाईल देताना खूप काळजी घेणे आवश्यक आहे.
नागपुरात घडलेल्या एका घटनेवरूनही याचा प्रत्यय आला. आधी त्या घटनेबाबत जाणून घेऊयात.
नागपुरात नेमके काय घडले?
नागपुरातील एका दाम्पत्यानं त्यांच्या 14 वर्षांच्या मुलीला अभ्यासासाठी म्हणून वापरण्यासाठी एक स्मार्टफोन दिला होता. मुलगी अभ्यासासाठीच त्याचा वापर करत असेल, असा त्यांचा अंदाज होता.
पण मुलगी अभ्यासाशिवाय त्या फोनवरून ऑनलाईन गेमही खेळायची. पण त्यामुळं हे कुटुंब चांगलंच अडचणीत आलं.
ऑनलाईन गेम खेळताना एका व्यक्तीला ती ऑनलाईन भेटली. त्यानं रोहन वर्मा नाव सांगितले. ओळख वाढल्यानंतर मुलीनं त्याच्याबरोबर इन्स्टाग्राम आयडी शेअर केला. पण त्यानं तिचं अकाउंट हॅक केलं.
या प्रकाराने मुलगी घाबरली. तिनं आईला याबाबत सांगितलं. वर्माकडून मात्र त्रास देणं सुरुच होतं. तो मुलीच्या आईलाही त्रास देऊ लागला. मेसेज करणे, धमक्या देणे असे प्रकार त्याने सुरू केले.
मुलीच्या इन्स्टाग्राम अकाउंटद्वारे अश्लील व्हीडिओ किंवा काँटेंट शेअर करण्याची भीती दाखवत त्यानं ब्लॅकमेलिंग सुरू केलं.

या सर्वाला बळी पडून मुलीच्या आईने वर्माला 4,000 रुपये दिले. पण तरी त्याचा त्रास सुरूच राहिला. जवळपास वर्षभर मुलीला आणि तिच्या आईला सहन करावा लागला. पण असह्य झाल्यावर दोघींनी मुलीच्या वडिलांना ही गोष्ट सांगितली.
त्या गुन्हेगारानं मुलीच्या वडिलांकडे तब्बल अडीच लाख रुपयांची मागणी केली. पैसे दिले नाहीतर गोळ्या घालून जीवे मारण्याची धमकीही दिली.वडिलांनी अखेर सोनेगाव पोलीस ठाणे, नागपूर गाठून तक्रार दिली.
आयटी कायद्यानुसार या अनोळखी सायबर गुन्हेगाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी या आरोपीचा मोबाईल नंबर ट्रेस केला आहे.
त्याचं लोकेशन दिल्लीला दिसत असून तिथल्या पोलिसांकडून माहिती घेऊन आरोपी लवकरच शोधून काढला जाईल, असं पोलीस निरीक्षक नितीन मगर यांनी सांगितलं.
ऑनलाईन गेमद्वारे अशी होते फसवणूक
ऑनलाईन गेम खेळत असताना गेम खेळणारी व्यक्ती अनेकदा ऑनलाईन असलेल्या दोन किंवा अधिक जणांच्या ग्रुपबरोबर गेम खेळत असते. बहुतांश ऑनलाईन गेम लाईव्हच खेळले जातात. म्हणजे गेम खेळणारे दोन जण एकमेकांशी बोलत गेम खेळत असतात.
दोन वेगवेगळ्या शहरांतच काय पण हजारो किलोमीटर अंतरावरच्या दोन देशांमध्ये असलेले यूझरही एकत्र अशा प्रकारे गेम खेळतात. म्हणजे गेम खेळताना इंटरनेटद्वारे त्या सगळ्यांचे मोबाईल एकमेकांशी जोडलेले असतात.
यातला सर्वात मोठा धोका म्हणजे ऑनलाईन ओळख झालेली व्यक्ती ही अनोळखी असते. केवळ प्रोफाईलच्या माध्यमातून आपण त्या व्यक्तीला ओळखत असतो.
पण त्या प्रोफाईलमध्ये किती तथ्य आहे, हे मात्र दुसऱ्या व्यक्तीला समजत नसतं. परिणामी सायबर गुन्हेगार सावजाच्या शोधात फेक प्रोफाईल बनवून गेम खेळण्याच्या बहाण्याने संपर्क वाढवत असतात.

फोटो स्रोत, Getty Images
ओळख वाढल्यानंतर हे गुन्हेगार समोरच्या व्यक्तीचा विश्वास संपादन करतात आणि तिथून पुढं सुरू होतो फसवणुकीचा खेळ. हे गुन्हेगार काही बहाण्यानं समोरच्या व्यक्तीची वैयक्तिक माहिती मिळवतात. त्यात वेगवेगळ्या सोशल मीडिया अकाऊंटची माहिती, खासगी फोटो यांचा समावेश असतो.
काही जण तर अत्यंत चलाखीने समोरच्या व्यक्तीकडून अगदी बँकांची माहितीही मिळवतात. नंतर त्याचा वापर करून फसवणूक केली जाते.

फोटो स्रोत, Getty Images
सोशल मीडिया अकाऊंट हॅक केल्यानंतर अश्लिल फोटो कंटेट पोस्ट करण्याची धमकी देणं, संबंधितांचे खासगी फोटो सार्वजनिक करण्याची धमकी किंवा फोटो एडिट करून त्या माध्यमातून समोरच्या व्यक्तीचं ब्लॅकमेलिंग सुरू होतं.
त्याचबरोबर काही ऑनलाईन गेममध्ये चॅटिंगचा पर्याय असतो. यामधून अनोळखी व्यक्तींसोबत चॅटिंग केल्यानं फसवणूक होण्याचा धोका असतो.
कारण, यामधून काही लिंक शेअर होऊन त्यावर क्लिक केल्यास आपल्या लक्षातही येणार नाही इतक्या वेगानं दुसरे अॅप्लिकेशन डाऊनलोड होऊन मोबाईल हॅक होण्याचाही धोका असतो.
ऑनलाईन गेममुळे होणारी फसवणूक कशी टाळायची?
अशा प्रकारची फसवणूक होऊन आर्थिक फटका किंवा मानसिक त्रास होऊ द्यायचा नसेल तर काही खबरदारी घेणं हे सर्वात महत्त्वाचं आहे. त्यातली सर्वात पहिली खबरदारी म्हणजे, आपण मुलांना मोबाईल देतानाच काळजी घेणं गरजेचं आहे.
गरज असेल तरच मुलांना मोबाईल द्यायला हवा. कारण त्यातून अशा आर्थिक फसवणुकीबरोबरच इतरही मानसिक त्रास होणारे प्रकार घडू शकतात. तसंच मुलं मोबाईलचा वापर कशाप्रकारे करत आहेत, यावर पालकांनी बारकाईने लक्ष ठेवणं अत्यंत गरजेचं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
ऑनलाईन गेम खेळायचं असेल तर आपण कोणता गेम डाऊनलोड केला आहे, तो विश्वासार्ह आहे का हे पाहणं अत्यंत गरजेचं आहे. एखाद्या फसव्या साईटवरून किंवा प्लॅटफॉर्मवरून डाऊनलोड केलेल्या गेम किंवा अॅप्लिकेशनमुळं फसवणुकीचा धोका सर्वाधिक असतो.
ऑनलाईन गेम खेळत असताना समोरच्या व्यक्तींच्या शब्दांच्या जाळ्यात आपण अडकणार नाही, याची काळजी घ्यावी. कधीही कोणीही मागितलेली वैयक्तिक माहिती ऑनलाईन शेअर करायची नाही, हा तर सर्वात महत्त्वाचा नियम आहे.
नागपूरचे सायबरचे पोलीस उपायुक्त लोहित मतानी यांच्या मते, ज्या ऑनलाइन गेममध्ये चॅटींग करता येते तो गेम कधीच खेळू नये. कारण, चॅटिंगमधून लिंक शेअर होतात आणि आपला मोबाईल पूर्णपणे हॅक होऊ शकतो.
फसवणूक झालीच तर?
काळजी घेतल्यानंतरही तुमच्याकडून काही चुका झाल्या आणि अशाप्रकारे सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात तुम्ही अडकलेच तर त्यासाठी काही पावलं तातडीनं उचलणं हे गरजेचं असतं.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे, तुमचा मोबाईल हॅक झाला तर लगेच तो फॉरमॅट करायचा. त्यामुळे हॅकर्स वैयक्तिक माहिती चोरून फसवणूक सुरू ठेवू शकणार नाहीत.
तसंच इंस्टाग्राम किंवा कोणतंही अकाऊंट हॅक झालं तर अॅप्लिकेशनचे पासवर्ड लगेच बदलावे किंवा ते डिलिट करून नव्याने इन्स्टॉल करावे.

इंस्टाग्राम अकाऊंट हॅक झालं तर 1930 या क्रमांकावर तक्रार करण्याचा सल्ला सायबर तज्ज्ञ लोहित मतानी देतात.
पोलिसांशी संपर्क करण्याबाबत फार विचार करू नये. अनेकदा ब्लॅकमेलिंग करणाऱ्यांच्या धमक्यांमुळं पीडित पोलिसांत तक्रार द्यायला घाबरत असतात. पण तसं न करतात लवकरात लवकर पोलिसांशी संपर्क साधावा. कारण त्यामुळं भविष्यातीलही अनेकांची फसवणूक होणं आपण टाळू शकत असतो.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











