ChatGPT माणसालाच रिप्लेस तर नाही ना करणार?

फोटो स्रोत, Getty Images
शिवाजी महाराजांचा जन्म झाला ते ठिकाण?
लॉर्ड्स हे मैदान कुठे आहे आणि त्याला क्रिकेटची पंढरी असं का म्हटलं जातं?
बूर्ज खलिफाची उंची किती आहे?
जनरल नॉलेजच्या या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आपल्याकडे गुगल हा उतारा होता. पण आता केवळ प्रश्नच नव्हे तर आपल्यासाठी कथा, कविता, पटकथा, निबंध असं सगळं चुटकीसरशी देणारं तंत्रज्ञान वापरासाठी तय्यार आहे.
विविध क्षेत्रातल्या या प्रश्नांची उत्तरं वाचून, शोधून तुम्हाला समर्पक उत्तर देण्याचं काम करणारं हे तंत्रज्ञान आपल्या सगळ्यांच्या वापरासाठी उपलब्ध झालं आहे. त्याचं नाव आहे (ChatGPT) चॅट जीपीटी. (ChatGPT)
1 डिसेंबरपासून बिटा टेस्टिंग अर्थात चाचणीसाठी हा प्लॅटफॉर्म लोकांसाठी खुला करण्यात आला.
लाँच झाल्यानंतर अवघ्या आठवडाभरात चॅटजीपीटीने 1 मिलिअन युझर्सचा टप्पा गाठला आहे.
माणूस विचार करतो, डोकं लावतो. हे सगळं काम हे तंत्रज्ञान करू शकणार आहे.
हे तंत्रज्ञान माणसानेच तयार केलं असलं तरी भविष्यात हे तंत्रज्ञान माणसालाच रिप्लेस तर करणार नाही ना अशी भीतीही व्यक्त करण्यात येत आहे.

फोटो स्रोत, Getty Images
चॅटजीपीटी काय आहे?
संभाषण करू शकणारा चॅटबॉट म्हणजे चॅटजीपीटी. ओपन आर्टिफिशियल इंटेलिजन्स या कंपनीने हे तंत्रज्ञान विकसित केलं आहे. उद्योगपती एलॉन मस्क हे या कंपनीचे सहसंस्थापक आहेत.
मस्क आणि चॅटजीपीटीचे सध्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी सॅम अल्टमन यांनी या कंपनीची स्थापना केली.
युझरने विचारलेल्या प्रश्नाचं अभ्यासपूर्वक उत्तर देण्यासाठी या बॉटला प्रशिक्षण देण्यात आलं आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स चॅटबॉटपेक्षा हा वेगळा कसा असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो.

फोटो स्रोत, Getty Images
तर हा चॅटबॉट तुमच्या प्रश्नाला उत्तर देताना प्रतिप्रश्नाचं उत्तर देतो, मजकुरात काही चुका असतील तर त्याही सांगतो, चुकीचे संदर्भ बाजूला करतो, तुम्ही भलतंच काही विचारलंत तर तेही तुम्हाला सांगतो.
चॅटजीपीटी काम कसं करतं?
ओपनएआय कंपनीने तूर्तास ही यंत्रणा विनाशुल्क उपलब्ध करून दिली आहे. संशोधन पातळीवर असल्याने त्यांनी युझर्सकडून पैसे न घेण्याचा निर्णय घेतला आहे.
युझर्स ओपनएआय कंपनीच्या वेबसाईटवर जाऊन या सुविधेचा लाभ घेऊ शकतात. या साईटवर गेल्यानंतर ट्राय चॅटजीपीटी यावर क्लिक करून प्रश्न विचारू शकतात.
चॅटजीपीटी सुरू करण्यासाठी साईनअपचा पर्याय आहे किंवा ओपनएआय अकाऊंट उघडून वापरू शकता. चॅटजीपीटी कसं वापरायचं हे समजून घेण्यासाठी कंपनीने एक डेमोही शेअर केला आहे.
बॉटची उत्तरं अधिकाअधिक सखोल आणि संवादात्मक व्हावीत यासाठी चॅटजीपीटीने आरएलएचएफ नावाची प्रणाली अंगीकारली आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स जाणणाऱ्या लोकांनी त्या बॉटबरोबर चर्चा केली.
चॅटजीपीटी काय काय करतं?
आपण गुगलवर जाऊन जसं मनातला प्रश्न विचारतो तसं या बॉटला प्रश्न विचारू शकतो. अवघड गणितं तो सोडवतो.
चॅटजीपीटी विविध ठिकाणचा मजकूर एकत्र करुन एकगठ्ठा सादर करू शकतो. चॅटजीपीटी एखाद्या चित्रपटाचं कथानकही लिहू शकतो.
कविता लिहायला सांगितली तर तो कविताही सादर करू शकतो. तो दोन भाषांमधली भाषांतरं करू शकतो.

फोटो स्रोत, Getty Images
चॅटजीपीटीला परीक्षेत जे प्रश्न विचारले जातात ते विचारले तर चोख उत्तरं मिळतात. माणसं जसं लिहितात तसं चॅटजीपीटीला लिहिता येत असल्यामुळे पत्रकारांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतं.
आतापर्यंत विकसित चॅटजीपीटीला समीक्षात्मक विचार किंवा एखाद्या गोष्टीतले बारकावे काढण्याची पद्धत माहिती नाही पण भविष्यात हे तंत्रही त्याला जमू शकतं.
चॅटजीपीटी कशाचा भाग आहे?
आपण संवाद साधून माहिती, उत्तरं मिळवू शकतो अशा जनरेटिव्ह प्री ट्रेन्ड ट्रान्सफॉर्मर शाखेचाच चॅटजीपीटी एक भाग आहे.
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचाच हा प्रगत प्रकार आहे. इंटरनेटवरची अगणित माहिती चाळून त्यातून तुम्हाला नेमकं हव्या असलेल्या गोष्टीचं उत्तर हा चॅटबॉट देतो.
पण तो चुकणारच नाही याची खात्री कंपनी देत नाही. एखादा विशिष्ट प्रश्न विचारल्यानंतर बॉट त्यानुसार उपलब्ध माहिती वाचून तुम्हाला उत्तर देईल पण तोच प्रश्न वेगळ्या पद्धतीने विचारला तर चॅटजीपीटी त्याचं तेच उत्तर देईल का याविषयी अद्यापही खात्री नाही.
चॅटजीपीटी पुढचं गुगल होईल का?
दररोज जगताना आपण अनेकदा गुगलला प्रश्न विचारुन माहिती मिळवतो. गुगल देत असलेल्या माहितीचा उपयोग करून आपण निर्णय घेतो. गुगल सर्चला मागे टाकेल इतकी ताकद चॅटजीपीटीत आहे का? तूर्तास याचं उत्तर तंत्रज्ञांनाही मिळालेलं नाही.
गुगलला मागे टाकत संदर्भासहित स्पष्टीकरण देण्याची ताकद चॅटजीपीटीमध्ये आहे. कदाचित हे गुगलची पुढची आवृत्ती असू शकते. चॅटजीपीटी एखाद्या मित्राप्रमाणे तुमच्याशी बोलत असल्याने तुम्ही सहजपणे त्याला विचारू शकता. आधीच्या प्रश्नावर आधारित प्रतिप्रश्नही तुम्ही त्याला करू शकता.
उदाहरणार्थ तुम्हाला कविता स्वरुपात उत्तर हवं असेल तर चॅटजीपीटी त्या प्रारुपात उत्तर देऊ शकतो. आधीचं संभाषण आणि कमेंट हे सगळं लक्षात ठेऊन चॅटजीपीटी पुढची उत्तर देतो. कथा, कविता, निबंध, आकडेवारी कोणत्याही प्रकारात चॅटजीपीटी प्रतिसाद देऊ शकतं. दोन माणसं जेव्हा चर्चा करतात, बोलतात तेव्हा जसं संभाषण होतं तसं चॅटजीपीटी प्रतिसाद देतं.
चॅटजीपीटीचे धोके?
चॅटजीपीटीला सगळंच येऊ लागलं तर माणसाची गरज एकदमच कमी होईल आणि नोकऱ्यांवर गदा येऊ शकते.
यामुळे लिखाणाची शैलीही बदलू शकते. त्याचवेळी चॅटजीपीटी हे उपलब्ध गोष्टींमधून उत्तर देतं. कोणीतरी मूळ काम करून ठेवलं आहे, त्याचा संदर्भ देऊन चॅटजीपीटी काम करतं.
ती गोष्ट करण्यासाठी संबंधित माणसाने व्यतीत केलेला वेळ, पैसा, ऊर्जा यांच्या गुंतवणुकीचं काय? असा प्रश्नही निर्माण होतो. यातून चौर्यकर्माचाही मुद्दा उपस्थित होऊ शकतो. एखाद्या लेखकाने-कवीने लिहिलेला मजकूर हा त्याचा असतो. चॅटजीपीटीसारखं तंत्रज्ञान सगळ्या मजकुराचं सरसकटीकरण करू शकतं. तंत्रज्ञान एकीकडे आपलं आयुष्य सुकर करत आहे. आपला वेळ आणि ऊर्जा वाचवतं. पण आता तंत्रज्ञान माणूस करतो त्या गोष्टीही करू लागलंय.
ललित शैलीतलं लिखाण करु शकणारा चॅटबॉट असं याचं वर्णन केलं जाऊ शकतं. भविष्यात कदाचित मानवाचा सहाय्यक नव्हे तर प्रतिमाणूस म्हणून हा चॅटबॉट वावरू शकतो.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त










