'आग्रहाचे निमंत्रण' : पत्रिकेची लिंक उघडली अन् हजारो गमावले, ऑनलाईन फसवणुकीचा असाही फंडा

प्रतिकात्मक छायाचित्र

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रतिकात्मक छायाचित्र
    • Author, प्रतिनिधी
    • Role, बीबीसी मराठी

"मला मोबाईलवर एका लग्नाच्या निमंत्रणाची पत्रिका आली. कुणाचं लग्न म्हणून उत्सुकतेपोटी मी त्या फाईलवर क्लिक केलं. एक एपीके फाईल डाऊनलोड झाली. त्यानंतर काही वेळातच माझ्या मोबाईलमधून एक मोठी रक्कम गेली आणि मला कळलं की फसवणूक झाली."

सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकून आर्थिक फटका बसलेल्या तरुणाला त्याच्याबरोबर नेमकं काय घडलं, हेही नीट सांगता येत नव्हतं.

पण हे तर एक प्रातिनिधिक उदाहरण झालं. गेल्या काही महिन्यांत सायबर गुन्हेगारांनी एका नव्या पद्धतीनं मोबाईल यूझर्सची फसवणूक सुरू केली आहे.

लग्नाच्या आमंत्रणाचं ई-कार्ड पाठवल्याच्या बहाण्याने गुन्हेगार ही फसवणूक करत आहेत. पण ही फसवणूक अगदीच तुमच्या नकळत होते असंही नाही. त्यामुळं थोडं जागरूक राहिलं आणि डोळसपणे सगळ्या गोष्टींकडं पाहिलं तर हे सहज टाळता येऊ शकतं.

त्यासाठी नेमकं काय करायला हवं? कोणत्या प्रकारची काळजी घ्यायला हवी? इंटरनेट आणि ऑनलाईन पेमेंटच्या या काळात मोबाईलचा वापर कशाप्रकारे करावा, हे आपण पाहणार आहोत. मात्र, त्यापूर्वी नेमकं हे प्रकरण काय आहे ते पाहूयात.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

आमंत्रण पत्रिका नव्हे फसवणुकीचा जाळ

नागपूरचे सायबर पोलीस निरीक्षक अमित डोळस यांच्याकडून बीबीसी मराठीनं ऑनलाईन फ्रॉडच्या या नव्या पद्धतीबाबत जाणून घेतलं. त्यांनी सांगितलं की, सध्या लग्नाचा हंगाम सुरू आहे. त्यामुळं सायबर गुन्हेगारांनी एक नवीन फंडा शोधून काढला आहे.

फ्रॉड करणारे हे गुन्हेगार लग्नाच्या आमंत्रणाचं ई-कार्ड तुमच्या मोबाईल क्रमांकावर मेसेजच्या माध्यमातून पाठवून ही फसवणूक केली जाते.

यामध्ये ई-कार्डद्वारे लग्नासाठी आमंत्रण पाठवतात. त्यात एक लिंक असते. त्या लिंकवर क्लिक केलं की .apk (डॉट एपीके) फाईल डाऊनलोड होते. या फाईलच्या माध्यमातून एखादा व्हायरल किंवा सॉफ्टवेअर हे गुन्हेगार तुमच्या मोबाईलमध्ये पाठवत असतात.

ही लिंक क्लिक करून फाईल डाऊनलोड होताच अनेकदा तुमच्या संपूर्ण मोबाईलचा ताबाच संबंधित गुन्हेगाराला मिळत असतो. त्यानंतर हे गुन्हेगार हवं ते करू शकतात.

प्रतिकात्मक छायाचित्र

फोटो स्रोत, Getty Images

तुमचा डेटा, फोनच गुन्हेगारांच्या ताब्यात

अशाप्रकारे एपीके फाईलवर क्लिक केल्यानंतर अनेकदा तुमच्या संपूर्ण फोनचा ताबा फसवणूक करणाऱ्या गुन्हेगारांकडे जात असतो. अशावेळी ते तुमच्याबरोबर काहीही करू शकतात.

मोबाईलचा ताबा गुन्हेगाराकडे जातो तेव्हा तुमचे बँक डिटेल्स, फोन पे, गुगल पे यासारख्या अॅपचे पासवर्ड हेही गुन्हेगाराला मिळू शकतात. त्याचबरोबर बँकेकडून येणाऱ्या ओटीपीचा अक्सेसही सुद्धा गुन्हेगाराला मिळू शकतो.

या सर्वाचा वापर करून आपण अनेकदा पाहतो, ऐकतो तशी तुमची आर्थिक फसवणूक केली जाण्याची शक्यता असते.

याशिवाय आणखी एक धोका असतो तो म्हणजे, तुमच्या मोबाईलमधील फोटो-व्हीडिओ अशा प्रकारचा डेटा वापरून ब्लॅकमेलिंग केली जाण्याची शक्यता. त्याचबरोबर तुमच्या मोबाईलमधील संपर्क क्रमांक वापरून त्यांच्याकडं पैशांची मागणीही केली जाऊ शकते. त्यामुळं

प्रतिकात्मक छायाचित्र

फोटो स्रोत, Getty Images

'शंका घेणे गरजेचे'

अशा प्रकारच्या फसणुकीपासून वाचण्यासाठी मोबाईल वापरणाऱ्यांनी सजग राहणं हेच सर्वात महत्त्वाचं असल्याचं सायबर तज्ज्ञ महेंद्र लिमये सांगतात.

तुम्हाला जर ओळखीच्या क्रमांकावरून असं ई-कार्ड किंवा लिंक आली तर त्याबाबत तुम्हाला फार विचार करावा लागत नाही. मात्र, अनोळखी क्रमांकावरून येणाऱ्या कोणत्याही लिंक किंवा मेसेजबाबत शंका घेणं गरजेचं असल्याचंही लिमये म्हणाले.

शिवाय लग्नाचं आमंत्रण असेल तर ती फाईल जेपीजी किंवा पीडीएफ अशी फोटोच्या स्वरुपात असेल. किंवा व्हीडिओ असू शकतो. पण लिंकची गरज काय हा एकदा विचार करायला हवा.

ग्राफिक्स

नागपूरचे सायबर पोलिस निरीक्षक अमित डोळस यांनीही अनोळखी क्रमांकावरून आलेलं ई-कार्ड उघडू नका असं आवर्जुन सांगितलं. ओळखीची व्यक्ती असेल तर तुम्हाला लग्नाचं आमंत्रण पाठवलं आहे हे सांगण्यासाठी फोन करेल, असंही डोळस म्हणाले.

त्याचबरोबर या लिंकवर क्लिक केल्यावर थेट फाईल डाऊनलोड होत नाही. ब्राऊजर तुम्हाला अलर्ट देतं. त्यामुळे असा अलर्ट आला तर लगेच सावध व्हावं आणि अशी फाईल डाऊनलोड करू नये, असं नागपूर गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त लोहीत मतानी यांनी सांगितलं.

नॅशनल सायबर क्राईम रिपोर्ट पोर्टलवर अशा तक्रारी जात असतात. त्या तक्रारी थेट बँकेकडे गेल्यानंतर संबंधित अकाऊंट गोठवलं जातं.

संबंधित तक्रारदाराला पैसे मिळाल्यानंतर पुढे जाऊन पोलिसांत तक्रार करायची की नाही, हे त्यांना ठरवायचं असतं. अनेकदा पैसे परत मिळाल्यानंतर कोणीही तक्रार करायला पुढे येत नाही, असंही मतानी म्हणाले.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)