'मला भाऊ हवा', ऑनलाईन जाहिरातीच्या जाळ्यात अडकल्या आजी, सायबर स्कॅमरनी लाखोंना गंडवले

फोटो स्रोत, Getty Images
- Author, अल्पेश करकरे
- Role, बीबीसी मराठीसाठी
वय वाढतं तसं एकटेपणाही वाढतो. सोबत कोणी राहत नसलेल्या अनेक वृद्धांना कुणाच्या तरी आपलेपणाची साथ हवी असते.
पण त्याचाच फायदा काही स्कॅमर उचलतात. त्यात आता तर सायबर स्कॅमर एका नव्या पद्धतीनं अशा वृद्धांची फसवणूक करत आहेत.
नातेवाईक किंवा विशेषतः भाऊ, बहीण मिळवून देण्याच्या जाहिरातीच्या माध्यमातून वृद्धांची फसवणूक केली जात असल्याचं समोर आलं आहे.
मुंबईत अँटोप हिल परिसरात राहणाऱ्या अशाच एका आजीला भावनिक करून त्यांची जवळपास 11 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.
आपल्याला हक्काचा नातेवाईक किंवा भाऊ-बहीण मिळेल या आशेनं वृद्ध या जाहिराती किंवा स्कॅमर्सच्या बोलण्याला बळी पडतात आणि हा प्रकार घडतो.
या आजींबरोबरही असंच काही घडलं आहे. पण नेमकं सायबर स्कॅमर्सनी कशा प्रकारे या आजींना जाळ्यात अडकवलं? याबाबत आपण जाणून घेणार आहोत.
आजीने दिलेल्या तक्रारीत ही माहिती समोर आली आहे.

अँटोपहील परिसरात राहणाऱ्या तक्रारदार 60 वर्षीय आजी त्यांच्या पतीबरोबर राहतात. त्यांचे पती शिपिंग कंपनीत कामाला आहेत. त्यामुळं त्या शक्यतो घरात एकट्या असतात.
घरात एकटं राहावं लागत असल्यानं त्या सोशल मीडियालाही काही वेळ देत असतात. जवळपास अडीच महिन्यांपूर्वी त्यांना सोशल मीडियावर अशीच एक जाहिरात दिसली.
ही जाहिरात काहीशी विचित्र, पण तेवढीच आकर्षकही होती. जाहिरात होती एका 'रिलेशनशिप ब्युरो'ची.
"भाऊ-बहिणीचं नातं जोडायचंय? परदेशात राहणारे व्यावसायिक आपली वाट पाहत आहेत," असा आशय त्या जाहिरातीमध्ये होता.
आजीला जाहिरात पाहून नेमकं काय हे जाणून घेण्याची उत्सुकता झाली. त्यांनी त्या जाहिरातीवर क्लिक केलं.
त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर उघडलेल्या पेजवर तुम्हाला काय हवं आहे ते व्हाईस मेसेजद्वारे सांगण्याची विनंती दिसली.
त्यानुसार आजींनी मला भाऊ हवा आहे, असा व्हाईस मेसेज पाठवत त्यांची विनंती सांगितली. त्यानंतर पुढील काही प्रक्रिया झाल्यानंतर त्यांना भाऊ कोण हे समजलं.
तेव्हा लंडनमध्ये व्यवसाय करणाऱ्या सूरज सिंग या तरुणाला 'भाऊ' म्हणून स्वीकारण्याची इच्छा असल्याचं आजींनी सांगितलं.
त्यानंतर 4-5 दिवसांतच आजीला एका अनोळखी नंबरवरून व्हाट्सअपवर एक मेसेज आला.
"हाय दिदी, आपने गैर को भाई माना, मुझे अच्छा लगा,' अशा आशयाचा तो मेसेज होता. मग तिथून त्या आजी आणि मेसेज करणारा तो तथाकथित भाऊ यांच्याच बोलणं सुरू झालं.
सूरज नाव सांगणारा तो अनोळखी माणूस, त्या आजींशी आपुलकीने बोलू लागला. भाऊ बहिणीच्या नात्याने दोघं गप्पा मारत होते. तो त्या आजींना दीदी म्हणत होता.
आजीलाही त्या बोलण्यातून एक आपुलकी निर्माण झाली. या चर्चेतच त्यानं आजींना भेटण्यासाठी मुंबईला येणार असल्याचंही सांगितलं.
येण्याचा दिवस वगैरेही ठरला आणि येताना सोबत आजीसाठी खूप भेटवस्तू आणणार असल्याचं त्यांनं सांगितलं.

फोटो स्रोत, Getty Images
त्यानं लगेचच आजीला भेटण्यासाठी मुंबईला येत असल्याचं सांगितलं. त्यासाठी लंडहून दिल्लीसाठीचं तिकिट बूक केलं, असं सांगत एका तिकिटाचा फोटो आजीला पाठवला.
आजी भाऊ येणार म्हणून आनंदात होत्या. त्यांनी गोडधोडाचा बेतही केला. सूरज सिंगनं 25 एप्रिलला दिल्लीला पोहोचणार असंही सांगितलं. त्यानुसार आजी भावाच्या स्वागताची तयारी करत होत्या.
पण त्यादिवशी आलेल्या एका फोननंतर मोठा धक्कादायक प्रकार घडला. आजीला 25 तारखेला त्यांचा तथाकथित भाऊ सूरजचा फोन आला.
"मी दिल्ली विमानतळावर उतरलोय, पण कस्टम ऑफिसरने डॉलर्स जास्त असल्याने मला पकडलं आहे," असं त्यानं या आजींना सांगितलं.
भारतात त्यांच्याशिवाय कोणालाही ओळखत नसल्याचं सांगत त्यानं कस्टम अधिकाऱ्यांना तुमच्याशी बोलायचं आहे, असं म्हणत दुसऱ्या एकाकडे फोन दिला.
फोनवर बोलणाऱ्या त्या दुसऱ्या व्यक्तीनं कस्टम अधिकारी असल्याचं सांगितलं.
"सूरज सिंगकडे खूप मोठ्या प्रमाणात परकीय चलन आहे. त्यामुळं त्यावर तुम्हाला जीएसटी टॅक्स भरावा लागेल", असं त्यानं आजींना फोनवरून सांगितलं.
त्यानंतर पुन्हा काही वेळात सूरज सिंग नावाच्या व्यक्तीनं आजीला फोन केला. अधिकाऱ्यांनी आपल्याला अटक केली असून, पैसे भरेपर्यंत सोडणार नाही, असं त्यानं आजींना सांगितलं.
या सगळ्या प्रकाराने आजी पूर्णपणे गोंधळून गेल्या होत्या. दुसऱ्या दिवशी पुन्हा इनकम टॅक्स अधिकाऱ्याच्या नावाने एका जणाने आजीला फोन केला.
सूरज सिंगच्या प्रकरणातील जीएसटी टॅक्सपोटी 1 लाख 5 हजार रुपये एका अकाऊंटवर ट्रान्सफर करण्यास त्यांनी सांगितलं.
घाबरलेल्या आजीने यावर विश्वास ठेवला आणि नेहमीचे व्यवहार असलेल्या एका दुकानदाराच्या मदतीने त्यांच्या अकाऊंटमधील पैसे त्या संबंधित अकाऊंटला पाठवले.

फोटो स्रोत, Getty Images
पण ही एका खेळाची सुरुवात होती. त्यानंतर या आजींना वारंवार अशाप्रकारचे फोन येऊ लागले. इंटरनॅशनल अकाऊंटमध्ये ते आजींकडून पैसे उकळत राहिले.
तब्बल 137 ट्रान्सझॅक्शनद्वारे त्यांनी 10 लाख 87 हजार रुपये आजीकडून उकळले. त्यात जीएसटी, टॅक्स, कस्टम फी अशी अनेक कारणे पुढे करण्यात आली होती.
पण तरीही पैशाची मागणी सुरूच असल्यानं त्यांना शंका आली. त्यांनी सूरज सिंग नावाच्या व्यक्तीकडे पैसे परत दे म्हणून तगादा लावला आणि त्याचा फोन नॉट रिचेबल येऊ लागला.
अखेर, सूरज सिंग नावाच्या अनोळखी व्यक्तीचा मुखवटा चढवून बोलणारा प्रत्यक्षात सायबर स्कॅमर असल्याचं लक्षात येताच त्यांना धक्का बसला.
त्यांनी आपल्या मुलीला हा सगळा घडलेला प्रकार सांगितला. अखेर 5 मे 2025 रोजी मध्य सायबर पोलीस ठाण्यात धाव घेत आजींनी तक्रार दिली.
यासंदर्भात बीबीसी मराठीच्या प्रतिनिधींशी बोलायला मात्र आजींनी नकार दिला.

सायबर पोलीस ठाणे, मध्य विभाग याठिकाणी आजीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणामध्ये अनोळखी आरोपींच्या विरोधात भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत 66 ड, 3(5), 318 (5), 319( 2), 336 (3), 338, 340 (2) कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी तक्रारदाराची सर्व माहिती आम्ही घेतलेली आहे. विविध पथके या प्रकरणी तपास करत आहेत, असं सायबर पोलीस ठाणे, मध्य विभाग यांनी सांगितलं आहे.

सायबर स्कॅमर सोशल मीडिया किंवा मोबाईल अॅपवर भावनिक अपील असलेली जाहिरात करतात.
"माझं कुणी नाही, एक भाऊ, बहीण किंवा इतर नातेवाईक हवे आहेत, आई-वडील, मुलं, पती-पत्नी गेल्यावर कोणी जवळचं उरलं नाही, त्यामुळे आपलासा नातेवाईक हवाय," असा मजकूर या जाहिरातीत असतो.
या जाहिरातींना कोण प्रतिसाद देतं हे पाहून त्यातून कुणाला फसवता येईल हे स्कॅमर हेरतात आणि त्याला जाळ्यात अडकवतात.
एकदा संपर्क झाला की, त्याला भावनिक बोलण्यात अडकवून त्याची वेगवेगळ्या मार्गांनी फसवणूक केली जाते.

अशा घटनांची माहिती त्वरित सायबर क्राईम हेल्पलाइन 1930 किंवा सायबर पोर्टलवर तक्रार द्यावी, असं आवाहन सायबर पोलिसांकडून करण्यात आलं आहे.
कोणत्याही अनोळखी व्यक्तीशी नातं जोडताना सतर्क राहा, शहानिशा करा. कोणीही जर पैशांची मागणी करत असेल, तर तो 'भाऊ' असो वा 'प्रियकर' फसवणुकीची शक्यता नक्कीच आहे, असा संशय घ्या, असं पोलीस सांगतात.
आतापर्यंत लग्न, प्रेमसंबंध याच्या नावाखाली सायबर गुन्हे झाले, पण आता 'भावा-बहिणी'सारख्या नात्याच्या आडूनही स्कॅमर्सनी फसवणूक सुरू केली आहे. ही चिंतेची बाब आहे. त्यामुळं अशा प्रकारे सायबर फसवणुकीला बळी पडू नका, असं आवाहन पोलीस करतात.
कोणतीही खात्री केल्याशिवाय कोणत्याही जाहिरातीवरून व्यवहार करू नका, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.

एकटेपणा, विशेषतः वृद्धापकाळात, ही एक गंभीर सामाजिक गरज बनली आहे. अशा परिस्थितीत बोलण्यासाठी, संवाद साधण्यासाठी किंवा फक्त ऐकण्यासाठी माणसं हवी असतात.
यासाठी भारतात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर काही संस्था आणि अॅप कार्यरत आहेत, जे "emotional companionship", "listening services" किंवा "elder care companionship" ही सेवा पुरवतात. याच सेवेचा काही सायबर स्कॅमर्स गैर फायदा घेत वयोवृद्धांची फसवणूक करत असल्याच्या काही घटना सध्या समोर येत आहेत.

अशा प्रकारच्या फसवणुकीपासून वाचण्यासाठी काही काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. ती खालीलप्रमाणे...
- अनोळखी कॉल, मेसेज किंवा जाहिरातीवर विश्वास ठेऊ नका.
- स्वत:ला अधिकारी किंवा कोणीही इतर पदाधारी म्हणणाऱ्या व्यक्तीकडून पैसे मागितल्यास सतर्क व्हा.
- कोणतीही रक्कम ट्रान्सफर करण्याआधी पोलिसांशी आणि घरातील व्यक्तींशी संपर्क साधा.
- फसवणूक झाल्यास तत्काळ जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवा.
सावधपणा हीच तुमची सुरक्षितता आहे. सायबर पोलीस नेहमी तुमच्या सेवेत आहेत, असे आवाहन महाराष्ट्र सायबर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

या संदर्भात बीबीसी मराठीशी बोलताना सायबर एक्स्पर्ट तन्मय दीक्षित म्हणाले, "नागरिकांनी अशा फसवणुकीपासून सावध राहण्यासाठी सोशल मीडिया आणि ॲप्लिकेशन्स व्यवस्थित आणि योग्य पद्धतीने हाताळले पाहिजेत.
समाज माध्यम किंवा कोणत्याही ॲपद्वारे अनोळखी व्यक्तीशी संवाद साधण्यापूर्वी, त्याची शहानिशा करायला हवी.
आधार कार्ड, पॅन कार्ड, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड तसेच घराचा पत्ता, फोन नंबर, ईमेल अॅड्रेस अशी माहिती कोणालाही देऊ नये.
भावनेच्या भरात कोणताही आर्थिक व्यवहार करण्यापूर्वी सायबर पोलीस आणि घरातील शिक्षित व्यक्तींची मदत घ्यावी.
सायबर फ्रॉडचे अनेक प्रकार आहेत. त्यामुळे कोणीही कशावरून एखाद्या व्यक्तीला घाबरवत असेल, तर घाबरून जाऊ नये. सतर्क रहा आणि त्वरित सायबर पोलिसांकडे तक्रार करावी.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











