मॅट्रिमोनियल साईटवर ओळख अन् महिलेला 10 लाखांचा गंडा; गुंगीचे औषध देत बलात्कार केल्याचा आरोप

प्रतीकात्मक छायाचित्र

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रतीकात्मक छायाचित्र
    • Author, भाग्यश्री राऊत
    • Role, बीबीसी मराठीसाठी

नागपुरात आर्थिक फसवणूक आणि बलात्कारासंबंधी दाखल झालेल्या एका तक्रारीतून एक अजब प्रकार घडल्याचं समोर आलं आहे.

मुंबईत वकिली करणाऱ्या एका महिलेची एका व्यक्तीने 10 लाखांची आर्थिक फसवणूक केली. तसंच महिलेला गुंगीचं औषध देऊन बलात्कार केल्याचा आरोपही त्याच्यावर आहे.

मॅट्रिमोनियल साईटच्या माध्यमातून भेट झाल्यानंतर आरोपीनं महिला आणि तिच्या भावाकडून पैसे घेतले आणि नंतर त्यांना धमकी देऊन फसवणूक केली.

पोलिसांनी या आरोपीला अटक केल्यानंतर तपासात आरोपीबाबत आणखी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

या आरोपीच्या विरोधात यापूर्वी हैदराबादेतही अशाच प्रकारे एक गुन्हा दाखल असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळं त्यानं आणखी काही महिलांना अशाप्रकारे फसवलं तर नाही, याबाबत पोलिसांकडून सध्या तपास सुरू आहे.

नेमके काय घडले?

मुंबईत वकिली करणाऱ्या एका 48 वर्षीय महिलेनं 42 वर्षीय कल्पेश कक्कड विरोधात 10 लाखांची आर्थिक फसवणूक आणि बलात्काराची तक्रार दाखल केली.

त्यावर कारवाई करत नागपूर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

आरोपीनं मॅट्रिमोनियल साईटद्वारे भेट झाल्यानंतर महिलेचा विश्वास संपादन केला. त्यानंतर महिलेला लग्नाचं वचन दिलं अन् साखरपुडाही केला होता.

त्यानंतर आरोपी कल्पेशनं महिला आणि तिच्या भावाचा विश्वास संपादन केला आणि त्यांच्याकडून 10 लाख रुपये घेतले. शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवून अधिकचे पैसे मिळवून देतो असं त्यानं सांगितलं होतं.

प्रतिकात्मक छायाचित्र

फोटो स्रोत, cybercrime.gov.in

अनेक दिवस झाल्यानंतरही तो पैसे परत करण्यास तयार नव्हता. जवळपास एक वर्ष वाट पाहिल्यानंतर महिलेनं पैशांची मागणी सुरू केली.

पण, पैसे परत मागितल्यानंतर मात्र कल्पेशनं त्यांना धमकी द्यायला सुरुवात केली. महिलेचे खासगी फोटो व्हायरल करण्याची धमकी तो देत होता.

त्यानंतर महिलेनं कल्पेशच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर त्याला पोलिसांनी त्याला अटक केली. आरोपीनं महिलेला गुंगीचं औषध देत लैंगिक अत्याचार केल्याचंही तक्रारीत म्हटलं आहे.

मॅट्रिमोनियल वेबसाईटवर ओळख

जरीपटका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण क्षीरसागर यांनी या प्रकरणात नेमकं काय घडलं होतं, याबाबत बीबीसी मराठीशी बोलताना माहिती दिली.

आरोपी कल्पेश कक्कड हा मुंबईचा रहिवासी आहे. एका मॅट्रिमोनियल वेबसाईटवर त्याची नोंद करण्यात आलेली होती.

तर पीडित महिला नागपूरच्या जरीपटका भागातील रहिवासी आहेत. अविवाहित असल्यानं या 48 वर्षीय महिलेनंही त्याच मॅट्रिमोनियल वेबसाईटवर नाव नोंदवलं होतं.

याठिकाणीच या दोघांची ओळख झाली. आरोपी अल्पेशनं त्यांच्याशी संपर्क साधला होता आणि तिथूनच त्यांच्या भेटीगाठी वाढल्या.

त्यानंतर या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर नागपूरच्याच जरीपटका भागात त्या दोघांचा साखरपुडाही झाला होता.

त्यादरम्यान आरोपीनं गुंगीचं औषध देऊन शारीरिक संबंध ठेवले होते, असा आरोपही करण्यात आला आहे. हा प्रकार जानेवारी 2024 मध्ये घडला होता.

ग्राफिक्स

दरम्यानच्या काळात आरोपीनं महिला आणि तिच्या भावाला विश्वासात घेऊन त्यांच्याकडून 10 लाख रुपये शेअर मार्केटमध्ये गुंतवण्यासाठी म्हणून घेतले होते.

पैशे शेअर मार्केटमध्ये गुंतवून अधिक वाढवून देतो, असं सांगत त्यानं 10 लाख रुपये घेतले होते. पण, अनेक महिन्यांनंतरही त्यानं एक रुपयाही परत केला नाही.

सुमारे वर्षभर वाट पाहिल्यानंतर महिलेनं पैशासाठी त्यांच्याकडं पैशाची मागणी सुरू केली पण त्यानं सुरुवातीला टाळाटाळ आणि नंतर थेट धमकी द्यायला सुरुवात केली.

पैसे परत मागितले किंवा लग्नासाठी तगादा लावला कर महिलेचे खासगी फोटो व्हायरल करण्याची धमकी कल्पेश देत होता, असंही पोलीस निरीक्षक अरुण क्षीरसागर यांनी सांगितलं.

यानंतर महिलेच्या तक्रारीवरन कल्पेशला अटक करण्यात आली आहे.

हैदराबादेतही गुन्हा दाखल

पीडित वकील महिलेनं पुण्यातील खडकी पोलीस ठाण्यात या संपूर्ण प्रकरणी कल्पेश कक्कडच्या विरोधात तक्रार दाखल केली होती.

त्यावेळी पुण्यात असल्यामुळं त्याठिकाणी तक्रार दाखल केली. खडकी पोलिसांनी आरोपी कल्पेशला ताब्यात घेऊन विचारपूस केली होती.

पण पीडित महिलेला गुंगीचं औषध देऊन शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रकार नागपुरातल्या जरीपटका भागात घडला होता. त्यामुळं तक्रार नागपूर पोलिसांकडं वर्ग करण्यात आली.

त्यानंतर नागपूर पोलिसांनी पुण्याला जाऊन आरोपी कल्पेश कक्कडला अटक केली. त्यानंतर त्याला नागपुरातल्या कोर्टात हजर करण्यात आलं

कल्पेशला 7 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. त्याच्यावर फसवणुकीसह बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक क्षीरसागर यांनी दिली.

प्रतिकात्मक छायाचित्र

फोटो स्रोत, Getty Images

दरम्यान, आरोपी कल्पेश कक्कडवर हैदराबादमध्येही असाच एक गुन्हा यापूर्वीच दाखल आहे.

महिलेची फसवणूक करून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले, तसंच तिची आर्थिक फसवणूक केली अशीच पद्धत त्यांनं त्यावेळीही वापरली होती.

त्यामुळं त्यानं याप्रकारे आणकी काही महिलांची तपास केली आहे का? याचा तपास सध्या पोलीस घेत आहेत.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)