'आईच्या उपचारांसाठी तातडीनं पैशांची गरज आहे'; फेसबुकवर फसवणूक होऊ नये म्हणून काय काळजी घ्याल?

सायबर गुन्हेगार सावजाच्या सोशल मीडिया अकाऊंट सारखं दुसरं बनावट अकाऊंट बनवतात.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, सायबर गुन्हेगार सावजाच्या सोशल मीडिया अकाऊंट सारखं अगदी हुबेहुब दुसरं बनावट अकाऊंट बनवतात.
    • Author, प्रियंका जगताप
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

'आई दवाखान्यात अॅडमिट आहे आणि तिच्या उपचारांसाठी मला तातडीनं पैशांची गरज आहे,' असं लिहिलेली एक गंभीर पोस्ट सौमित्रकडून त्याच्या फेसबुक अकाऊंटवर टाकण्यात आली.

सौमित्रला फेसबुकवर अनेक मित्र होते. त्याचं अकाऊंट सर्वासाठी खुलं होतं. तो नेहमीच काही ना काही मजेशीर पोस्ट फेसबुकवर टाकत असे.

मात्र एक दिवस अचानक सौमित्रला त्याच्या आईच्या उपचारासाठी तातडीनं पैशांची गरज असल्याचं सांगणारी पोस्ट त्याच्या मित्रांना दिसली.

त्या पोस्टसोबत एका बँक खात्याचे तपशीलही सौमित्रनं दिले होते. त्याचा मित्र निमिष याला ती पोस्ट वाचून खूप धक्का बसला.

आपल्या मित्राला मदत करण्याच्या हेतूनं त्यानं लगेच त्या खात्यावर बरीचशी रक्कम पाठवून दिली.

दरम्यान त्याच दिवशी संध्याकाळी सौमित्रनं पुन्हा काहीतरी मजेशीर पोस्ट फेसबुकवर टाकलेली पाहून निमिष बुचकळ्यात पडला.

आई कशी आहे हे विचारण्यासाठी त्यानं सौमित्रला फोन केला. सौमित्र नेहमीच्याच आवाजात म्हणाला, "यार आईनं मस्त पोहे केलेत. येतोस का घरी?" हे ऐकून निमिष काहीसा गोंधळला.

त्यानं त्या पोस्टविषयी विचारणा केली, जी वाचून त्यानं सौमित्रला पैसे पाठवले होते. मात्र सौमित्रला याबाबत काहीच कल्पना नव्हती. त्याची आईही एकदम चांगली होती.

त्यावेळी त्या दोघांनी संबंधित फेसबुक अकाऊंटची खात्री केली, तेव्हा समजंल की सायबर गुन्हेगारांकडून निमिषची आर्थिक फसवणूक झाली आहे.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

घडलं असं होतं की, सौमित्रच्या नकळत सायबर गुन्हेगारांनी त्याचं दुसरं बनावट फेसबुक अकाऊंट तयार केलं.

त्याच्या सर्व मित्रांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली आणि पैशांची गरज असल्याची पोस्ट त्या अकाऊंटवरून पोस्ट केली. याच पोस्टला सौमित्रचा मित्र निमिष बळी पडला.

अशा प्रकारे आपल्या ओळखीतल्या एखाद्या व्यक्तीनं आपल्याला फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली, तर आपण ती लगेच स्वीकारतो.

अनेकदा आपण त्या अकाऊंटबाबत कोणत्याही प्रकारची खात्री करत नाही. त्याचाच फायदा हे सायबर गुन्हेगार घेतात.

पोलिसांनी सायबर गुन्हेगारीपासून लोकांना वाचवण्यासाठी तयार केलेल्या पुस्तिकेत दिलेल्या वरील उदाहरण दिलं आहे. या माध्यमातून बनावट फेसबूक अकाऊंटचा वापर करून कशी फसवणूक होते हे आपण समजून घेतलं. त्यातच यापासून सावध कसं राहायचं आणि फसवणूक झाल्यास काय करायचं हेही नमूद करण्यात आलं आहे.

फसवणूक कशी होते?

सायबर गुन्हेगार फसवणूक करण्यासाठी संबंधित व्यक्तीच्या सोशल मीडिया अकाऊंटसारखं अगदी हुबेहुब दुसरं बनावट अकाऊंट बनवतात. त्या व्यक्तीच्या मित्र यादीतील लोकांना त्या बनावट प्रोफाईलवरून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतात.

ज्या व्यक्तीचं बनावट फेसबुक अकाऊंट तयार केलेलं असतं त्यांच्या मित्र यादीतील लोकांना मेसेज करून वेगवेगळी भावनिक कारणं देऊन पैशांची किंवा इतर प्रकारच्या मदतीची मागणी करतात.

यासाठी गुन्हेगार फेसबुक मेसेंजरचाही वापर करतात. रक्कम पाठवण्यासाठी फोन पे किंवा गुगल पे किंवा पेटीएम किंवा बँकेचा खाते क्रमांकही ते देतात.

जे मित्र कोणतीही खातरजमा न करता त्यांनी मागितलेली रक्कम देऊन टाकतात ते या जाळ्यात सहज अडकतात.

एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीच्या नावानंही फेसबुकवर बनावट प्रोफाईल तयार करुन भावनिक हाक घालून पैशांची मागणी होते.

काहीवेळा खोट्या स्वंयसेवी संस्था तयार करुनही देणगीच्या नावाखाली आर्थिक फसवणूक केली जाते.

एकदा का पैसे मिळाले की फसवणूक करणारी ती व्यक्ती आणि संस्था सगळे अचानक गायब होतात.

सायबर गुन्हेगार फसवणूक करायची आहे अशा व्यक्तीच्या मित्र यादीतील लोकांना फसवण्यासाठी फेसबुक मेसेंजरचा वापर करतात.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, सायबर गुन्हेगार फसवणूक करायची आहे अशा व्यक्तीच्या मित्र यादीतील लोकांना फसवण्यासाठी फेसबुक मेसेंजरचा वापर करतात.

अनेकदा आर्थिक फसवणूक करणारे सायबर गुन्हेगार हे विविध पदांवर काम करणाऱ्या वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांसह सेवानिवृत्त अधिकारी व खासगी सेवेतील नामांकित व्यक्ती तसेच विविध क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तींची नावं आणि फोटो यांचा वापर करून बनावट फेसबुक अकाऊंट तयार करतात.

त्याद्वारे अनेकांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून संपर्क करतात. मैत्री करतात.

त्यानंतर ज्याची फसवणूक करायची अशा व्यक्तीला काम देण्याचं आमिष दाखवून, आजारी असल्याचं कारण देऊन किंवा कुठल्या तरी संकटात अडकल्याचं कारण देऊन लोकांना लुबाडतात.

अशा प्रकारच्या घटना आजकाल सातत्यानं कानावर येत आहेत.

तुमच्यासोबत हे घडू नये म्हणून काय काळजी घ्याल?

सोशल मीडिया अकाऊंटवरील व्यक्तिगत माहिती केवळ मित्रांसाठी ठेवा. पब्लिक हे सेटिंग ठेऊ नका. सोशल मीडिया अकाऊंटचा पासवर्ड हा अक्षरं, अंक व चिन्हं मिळून बनवा आणि इतर कोणाच्याही हाती लागू देऊ नका.

फेसबुक वापरणाऱ्यांनी पासवर्ड बदलून प्रायव्हसी सेंटिंगमध्ये 'प्रोफाइल लॉक' करावं.

नामांकित अथवा ओळखीच्या व्यक्तीच्या नावानं नव्यानं फ्रेंड रिक्वेस्ट आल्यास संबंधित प्रोफाइल तपासून घ्यावं.

कोणत्याही परिस्थितीत सोशल मीडियावरील अनोळखी व्यक्तीला ऑनलाईन स्वरूपात पैसे पाठवू नयेत.

फेसबुक, व्हॉट्सअप किंवा इतर सोशल मीडिया अकाऊंटवरून रक्कम पाठवण्यास सांगण्यात आले तर संबंधित व्यक्तीला फोन करून किंवा भेटून खातरजमा करूनच पैसे पाठवावेत.

फेसबुक वापरणाऱ्यांनी फेसबुक 'प्रोफाइल लॉक' करावं.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, फेसबुक वापरणाऱ्यांनी पासवर्ड बदलून प्रायव्हसी सेंटिंगमध्ये 'प्रोफाइल लॉक' करावं.

मित्र यादीतील एखाद्या व्यक्तीच्या नावानं बनावट प्रोफाइल दिसल्यास त्याला 'ब्लॉक' करावं. तसेच संबंधित व्यक्तीला त्याबाबत कल्पना द्यावी.

एखाद्यानं मोबाइल क्रमांक मागून फर्निचर विक्री किंवा सैन्यातील अधिकारी अथवा जवान असल्याची बतावणी केल्यास त्वरित ब्लॉक करावं.

संबंधित प्रोफाइलवर जाऊन 'रिपोर्ट' म्हणत 'फेक प्रोफाइल' या पर्यायावर जाऊन फेसबुककडे तक्रार करावी. कारण हा सायबर गुन्हेगारांचा डाव असू शकतो.

बळी पडलात तर काय करायचं?

अशा प्रकारच्या फसवणुकीला आपण बळी पडलो आहोत हे लक्षात आल्यानंतर तात्काळ पोलिसांची मदत घ्यावी.

तसेच मित्र यादीतील लोकांना सोशल मीडियावरून सतर्क करावं. जेणे करून मित्र यादीतील इतर व्यक्ती अशा प्रकारच्या फसवणुकीला बळी पडणार नाहीत.

बनावट फेसबुक अकाऊंट बंद करण्यासाठी ते अकाऊंट रिपोर्ट करावं आणि इतर मित्रांनाही ते रिपोर्ट करायला सांगावं. त्यामुळे फेसबुक त्या बनावट अकाऊंटची दखल घेऊन ते बंद करेल.

तुमच्या बँक खात्यातील सर्व व्यवहारांची नोंद ठेवावी. ज्या दिवशी खात्यातून पैसे गेले असतील त्या दिवसाचे बँक स्टेटमेंट काढून घ्यावेत.

त्यात तुमच्यात झालेल्या आर्थिक व्यवहाराचा नंबर असतो त्याचा तुम्हाला आणि पोलिसांना पुढील कारवाईसाठी फायदा होतो.

बनावट प्रोफाइल दिसल्यास त्याला लगेच 'ब्लॉक' करावं.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, मित्र यादीतील कोणाचं बनावट प्रोफाइल दिसल्यास त्याला लगेच 'ब्लॉक' करावं.

त्या संबंधित व्यक्तीला तुम्ही ज्या खात्यावर पैसे पाठवले असतील त्या व्यवहाराचे आणि त्यांच्या सोबत झालेल्या संवादाचे स्क्रिनशॉट काढून ठेवावेत.

तुमच्यातील आर्थिक व्यवहार होताना ज्या बँक खात्यातून पैसे गेले असतील त्या बँकेत या फसवणुकीबाबत तात्काळ कळवावं, जेणेकरून बँक त्यांच्या पद्धतीनं पुढील कारवाई करेल आणि तुमचं अधिक नुकसान होणार नाही याची खबरदारी घेऊ शकेल.

तुमचं नेट बँकींग देखील तात्काळ बंद करावं आणि तुमच्या बँकेतील अधिकाऱ्यांच्या आणि पोलिसांच्या पुढील सुचना येईपर्यंत चालू करू नये.

सायबर गुन्हेगारांकडून होणाऱ्या अशा प्रकारच्या आर्थिक फसवणुकीला कोणीही बळी पडू शकतं.

कुटुंबातील किंवा ओळखीतील एखादी व्यक्ती जर अशा सायबर हल्ल्याला बळी पडत असेल तर त्यांना मदत करायला हवी.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)