ऑनलाईन मैत्री, निराश असल्याचं सांगत जवळीक; 'कॅटफिशिंग'मधून असं फसवलं जातं

फोटो स्रोत, Getty Images
- Author, प्रियंका जगताप
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
हल्ली सायबर गुन्ह्यांचं प्रमाण लक्षणीयरित्या वाढल्याचं दिसून येतं. तुमच्या परिचयातील कुणा ना कुणाचं कधी व्हॉट्सअप हॅक, तर कधी सोशल मीडिया अकाऊंट हॅक, तर कधी अगदी मोबाईलच हॅक, असे प्रकार घडताना दिसत असतील.
एकूणच वाढते सायबर गुन्हे तुमच्या-आमच्यासह जगभरात सर्वत्रच चिंतेचा विषय बनलाय.
भारतात इंटरनेट वापरकर्त्यांची वाढती लोकसंख्या आणि विविध क्षेत्रांमध्ये वेगानं होणारं डिजिटल परिवर्तन यामुळे सायबर गुन्हेगारांसाठी पोषक वातावरण निर्माण झालं आहे.
आजकाल जवळपास सर्व वयोगटातील आणि सर्व आर्थिक स्थरातील लोक विविध प्रकारे सायबर गुन्हेगारीला बळी पडताना दिसत आहेत.
'कॅटफिशिंग' हा या सायबर गुन्ह्यांमधील आणखी एक गुन्हा.
विशेषत: ऑनलाइन डेटिंगमध्ये कॅटफिशिंग ही एक गंभीर समस्या सध्या चर्चेचा विषय बनली आहे. कॅटफिशिंगमुळे विविध ऑनलाइन डेटिंग सेवा देणारे प्लॅटफॉर्म वापरणं देखील जोखमीचं बनलं आहे.
कॅटफिशिंग हे नक्की काय असतं ? त्यात अडकण्यापासून स्वतःला कसं वाचवायचं? आणि चुकून त्यात अडकलं तर त्यातून बाहेर कसं पडायचं? हे या लेखातून जाणून घेऊया.


कॅटफिशिंग नक्की काय असतं ?
प्रगत तंत्रज्ञानाच्या वापराचे जेवढे फायदे आहेत, तेवढेच तोटे देखील आहेत. त्यामुळे अनेकांची ऑनलाईन फसवणूक होते. कॅटफिशिंग हा त्यातलाच एक प्रकार.
कॅटफिशिंगमध्ये बनावट व्यक्तिमत्त्व तयार करून एखाद्या व्यक्तीची भावनिक किंवा आर्थिक फसवणूक केली जाते. अशा कॅटफिशिंग करणाऱ्या व्यक्तीला कॅटफिशर म्हणतात.
हे सायबर गुन्हेगार सोशल मीडियावर एखाद्या व्यक्तीचं प्रोफाईल पाहून ती व्यक्ती आपलं सावज बनू शकेल का, याचा अंदाज बांधतात. नंतर हे लोक त्या व्यक्तीशी विविध समाज माध्यमं, डेटिंग साइट्स किंवा इतर ऑनलाइन प्लॅटफॉर्म यांचा वापर करून संपर्क साधतात.
अशावेळी सायबर गुन्हेगार स्वतःची खरी ओळख लपवून दुसऱ्याचा फोटो, एखादं चित्र, नाव आणि इतर कागदपत्रं वापरून एक बनावट व्यक्तिमत्व समोरच्या व्यक्तीपुढं आकर्षक तसेच भव्य पद्धतीनं सादर करतात.

फोटो स्रोत, Getty Images
ऑनलाइन चॅटिंगद्वारे समोरच्या व्यक्तीशी मैत्री करतात आणि विश्वास संपादन करतात. कधी कधी हे सायबर गुन्हेगार आपण मानसिकरित्या खूप निराश आहोत, असं दाखवून देखील संबंधित व्यक्तीची सहानुभूती मिळवत त्यांच्याशी भावनिक जवळीक साधतात.
एखाद्या व्यक्तीच्या भावनांवर ताबा मिळवून त्या व्यक्तीची भावनिक फसवणूक करणं, आर्थिक फसवणूक करणं, गोपनीय माहिती चोरणं किंवा वेळेचा आणि ऊर्जेचा गैरवापर करणं हाच कॅटफिशिंगचा मुख्य हेतू असतो.
सावज कसे अडकवतात?
पोलिसांनी सायबर गुन्हेगारीपासून लोकांना वाचवण्यासाठी तयार केलेल्या पुस्तिकेत दिलेल्या उदाहरणाच्या माध्यमातून कॅटफिशिंगमध्ये कसं अडकवलं जातं हे आपण समजून घेऊया.
तर फेसबुकवर एक सावज हेरून त्याच्याशी मैत्री केली जाते. आपण मानसिकरित्या खूप निराश आहोत असं सांगून त्या व्यक्तीशी भावनिक जवळीक साधत तिला प्रेमात पाडलं जातं.
काही दिवसांनंतर त्या सावजाला परदेशातून आपण तुझ्यासाठी एक महागडी भेटवस्तू पाठवत आहोत, असं त्या सायबर गुन्हेगाराकडून सांगितलं जातं. आवश्यकता भासल्यास ती महागडी भेटवस्तू स्वीकारण्यासाठी त्या सावजाला गळही घातली जाते.

फोटो स्रोत, Getty Images
नंतर त्या संबंधित व्यक्तीला कळवलं जातं की परदेशातून पाठवलेली ती भेटवस्तू काही कारणानं कस्टम्सच्या अधिकाऱ्यांनी अडवली आहे. दरम्यान सायबर गुन्हेगारांच्या टोळीतील एक व्यक्ती कस्टम्स ऑफिसर बनून सावजाला फोन करते आणि ती भेटवस्तू सोडविण्यासाठी काही पैसे भरावयास सांगते.
जाळ्यात अडकलेली ती व्यक्ती कस्टम्सच्या अधिकाऱ्यांनी सांगितलेली सगळी रक्कम भरून मोकळी होते. मात्र पैसे भरूनही सावजाला ती भेटवस्तू कधीच मिळत नाही. शिवाय पैसे गेल्यानंतर फसवणूक करणारी व्यक्ती देखील फेसबुकवर सावजाला अनफ्रेंड करते.
अशाप्रकारे सायबर गुन्हेगारांच्या टोळीकडून त्या व्यक्तीची आर्थिक आणि भावनिक फसवणूक केली जाते.
10 वर्ष चाललेलं कॅटफिशिंगचं प्रकरण
नेटफ्लिक्सनं काही महिन्यांपूर्वी 'स्वीट बॉबी : माय कॅटफिश नाईटमेअर' या माहितीपटच्या माध्यमातून कॅटफिशिंगला जवळपास दशकभर बळी पडलेल्या किरत अस्सी या महिलेची गोष्ट समोर आणली होती.
साधारण 2009 मध्ये किरत यांना बॉबीची फ्रेंड रिक्वेस्ट आली होती. बॉबी हे दिसायला देखणे होते आणि व्यवसायानं हृदयरोगतज्ज्ञ होते. किरत यांनी बॉबी यांची रिक्वेस्ट स्वीकारली, त्यांच्यात मैत्री झाली आणि नंतर त्या मैत्रीचं प्रेमात रूपांतर झालं.

फोटो स्रोत, Netflix
ऑनलाइन ओळखीतून संपर्कात आलेले बॉबी आणि किरात जवळपास 10 वर्ष प्रेमात होते. मात्र ते प्रत्यक्ष कधीही भेटले नाहीत किंवा त्यांनी परस्परांना व्हिडिओ कॉल देखील केले नाहीत. जेव्हाही भेटण्याबद्दल चर्चा व्हायची तेव्हा बॉबी काहीतरी कारणं देत असत. त्यांना चक्करच आली आहे, गोळी मारली आहे किंवा कोर्टात कोणासाठी साक्ष द्यायला जात आहे अशी कारणं द्यायचे.
किरत यांना जवळपास 10 वर्षांनंतर या सत्याचा उलगडा झाला की, ज्या बॉबीसोबत त्यांचे 10 वर्ष प्रेमसंबंध होते, ती व्यक्ती प्रत्यक्षात बॉबी नसून किरत यांची चुलत बहीण सिमरन भोगल होती. यामुळे किरत यांना प्रचंड मानसिक आणि भावनिक त्रासाचा सामना करावा लागला.
दुसरा एक प्रकार खुद्द पोलिसांनी जनजागरणाच्या दृष्टीने सांगितला आहे. यातली नावं बदलली आहेत. स्वप्नांच्या दुनियेत राहणारी रेवती लंडनस्थित रामच्या प्रेमात पडली. त्यांची फेसबुकवर मैत्री झालेली.

फोटो स्रोत, Netflix
रामला त्याच्या गर्लफ्रेंडनं धोका दिलेला, त्यामुळे तो निराश होता. पण त्या रेवतीशी मैत्री केल्यापासून रामला बरं वाटत होतं असं तो तिला सांगायचा. एके दिवशी रामने रेवतीला हिऱ्यांच्या नेकलेसचा फोटो पाठवला. खास तिच्यासाठी त्यानं तो खरेदी केला होता.
त्याला तिला सरप्राईज द्यायचं होतं, परंतु नेकलेस कस्टम्समध्ये अडकल्यानं काही पैसे भरून तो रेवतीला घ्यावा लागणार होता असं त्यांनं तिला सांगितलं. रेवतीला कस्टम्स अधिकाऱ्यांचा तसा फोनही आला होता.
त्या अधिकाऱ्यानं सांगितलेली रक्कम रेवतीनं त्यांच्या बँक खात्यात पाठवून दिली. परंतु अनेक दिवस जाऊनही नेकलेस काही मिळाला नाही आणि रामनेही तिला फेसबुकवर ब्लॉक केलं.
अशाप्रकारे डेटिंग अॅप्स आणि साइट्सवर अनेक लोक आकर्षक बनावट खाती तयार करतात. अनेकदा स्क्रीनच्या दुसऱ्या बाजूस असलेल्या व्यक्तीला अंदाज देखील येत नाही की ते प्रत्यक्षात कोणाशी संवाद साधत आहेत.
डेटिंग साइटवरील एखाद्या प्रोफाईलच्या मागे एखादी फसवणूक करणारी, गुन्हेगार किंवा मानसिकदृष्ट्या आजारी असलेली व्यक्ती लपलेली असू शकते, याचा विचार डिजिटलच्या जगात सर्वांनी करायला हवा.
कॅटफिशिंग टाळण्याचे 'हे' आहेत मार्ग
सोशल मीडियावर कोणत्याही नवीन किंवा अनोळखी व्यक्तीसोबत मैत्री करण्याआधी त्याच्या प्रोफाईलवर उपलब्ध असलेली सर्व माहिती तपासून घ्यावी.
सोशल मीडियावर महत्त्वाची वैयक्तिक माहिती टाकू नये. तसेच, तुमची वैयक्तिक किंवा आर्थिक माहिती तसेच खासगी फोटो पटकन ऑनलाइन कोणाशीही शेअर करू नये. विशेषतः जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला चांगले ओळखत नसाल.
तुम्ही वापरता त्या वेबसाइट्स किंवा ॲप्सवर तुमच्या सुरक्षेसाठी अनेक पर्याय उपलब्ध असतात त्यांचा वापर करावा.

फोटो स्रोत, Getty Images
ऑनलाइन मैत्री असलेली व्यक्ती जर तुम्हाला भावनिकरित्या गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न करत असेल किंवा पैसे मागत असेल तर सावध व्हा, कारण अशावेळी तुम्ही कॅटफिशिंगला बळी पडू शकता.
जर ऑनलाइन मैत्री असलेली व्यक्ती तुम्हाला भेटू इच्छित नसेल, विविध बहाणे देऊन भेटण्यास नकार देत असेल तसेच त्या व्यक्तीनं दिलेल्या माहितीत अनेकदा विसंगती आढळत असेल तर सावध व्हा, हेही कॅटफिशिंगचं लक्षण आहे.
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सोशल मीडियावरील अनोळखी किंवा नव्यानं ओळख झालेली व्यक्ती तुम्हाला महागडी भेटवस्तू देणं शक्य नाही. त्यामुळे याबाबत सावधगिरी बाळगावी.
जर कधी तुमच्यासोबत कॅटफिशिंगची घटना घडली तरी घाबरून न जाता तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा. सायबर गुन्ह्याबाबत आपल्याकडे अनेक कायदे आहेत.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











