मैत्री करुन ऑडिशनच्या बहाण्याने बनवला व्हीडिओ, ऑनलाईन सेक्सटॉर्शनपासून 'असं' सावध राहा

फोटो स्रोत, Getty Images
- Author, नितीन सुलताने
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
घरात रिकामं बसलेलं असताना, एकटं असताना, प्रवास करताना किंवा अगदी काही उगाचच म्हणूनही, आपण फोन हातात घेऊन चाळायला लागतो. त्यातही अनेकजण हे फेसबूक, व्हाॅट्सअॅप अशा किंवा इतर काही अॅपवर वेळ घालवायला लागतात.
पण या अॅप्सच्या माध्यमातून होणारी व्हर्च्यूअल मैत्री अनेकदा अडचणीची ठरते आणि त्यातून फसवणुकीचे अनेक प्रकार घडत असल्याचं पाहायला मिळतं. असाच एक प्रकार असतो सेक्सटॉर्शनचा.
इंटरनेटच्या जगात या माध्यमातून लोकांची फसवणूक किंवा आणखी योग्य सांगायचं झाल्यास ब्लॅकमेलिंगचे प्रचंड प्रकार घडत असतात.
हे नेमकं कशाप्रकारे होतं, ते टाळण्यासाठी काय करता येऊ शकतं आणि काय खबरदारी घ्यावी हे जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत.
विचारापलिकडच्या घटना
ऑनलाईन सेक्सटॉर्शनच्या घटना नेमक्या कशा घडतात याची काही प्रातिनिधिक उदाहरणं आपण पाहूयात.
एका कॉलेज प्रोफेसरना एक मेसेज आला. विद्यार्थिनीची आई बोलत असल्याचं भासवून त्या प्राध्यापकांशी काही बोलल्या. त्यानंतर काही वेळानं त्याच नंबरवरून कॉल आला. त्यावर काही वेळ बोलल्यानंतर आवाज नीट येत नव्हता म्हणून व्हीडिओ कॉल केला. त्यात महिलेने थेट कपडे काढायला सुरुवात केली. नंतर तो व्हीडिओ एडिट करून शिक्षकांच्या ग्रुपवर पोस्ट करण्यात आला. प्राध्यापक मागण्या मान्य करून घेण्यासाठी काय-काय करतात ते पाहा? असा दावा त्यात केलेला होता. नंतर कळलं की विद्यार्थ्यांनी हे सर्व केलं होतं.


या प्रकारांत तर आधी काही मैत्री वगैरेही केली नव्हती. पण काहीतरी संबंध भासवून त्यांनी बोलण्याचा आणि संपर्क साधण्याचा प्रयत्न केला.

फोटो स्रोत, Getty Images
दुसरा एक प्रकार खुद्द पोलिसांनी जनजागरणाच्या दृष्टीने सांगितला आहे. यातली नावं बदलली आहेत.
काजलला अभिनेत्री व्हायचं होतं. सोशल मीडियावर ती कायम सेलिब्रिटींबरोबरचे फोटो टाकायची. तिला समाराची फ्रेंड रिक्वेस्ट आली. तिलाही चित्रपटांचं आकर्षण होतं.
त्यांच्यात चांगली मैत्री झाली. त्या व्हीडिओ चॅट करू लागल्या. एकदा समारानं तिला चित्रपटांसाठी फिगर महत्त्वाची असल्याचं म्हणत चर्चा सुरू केली.
पुढं फिगर दाखवण्याच्या बहाण्याने तिला कपडे उतरवण्यास सांगितलं. दुसऱ्याच दिवशी काजलला तिच्या फोनवर तिचे नग्न फोटो आले आणि तिचं ब्लॅकमेलिंग सुरू झालं. त्यानंतर तिला सर्व प्रकार लक्षात आला.
या तर दोनच घटना आहेत. रोज अशा अनेक घटना घडत असतात आणि त्याची माहितीही समोर येत नाही.
कसे अडकतात जाळ्यात?
फेसबूक, व्हाॅट्सअॅप किंवा व्हीडिओ चॅटिंग करता येणाऱ्या मॅसेजिंग अॅपद्वारे विविध क्लृप्त्या वापरून अशा प्रकारची फसवणूक केली जात असते. त्यातील काही मोजके प्रकार आपण जाणून घेऊन.
सुरुवातील एखाद्या अनोळखी यूझरकडून तुम्हाला फ्रेंड रिक्वेस्ट येते. कधी-कधी विशिष्ट फोटो त्या प्रोफाईलसाठी वापरले जातात. त्याकडे आकर्षित होऊन किंवा काहीवेळा सहज किंवा अगदी नकळतही काही लोक ती फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारतात.
त्यानंतर हळू-हळू त्या अकाऊंटद्वारे तुमच्याशी व्हर्च्यूअल मैत्री वाढवली जाते. गप्पांच्या माध्यमातून वाढलेल्या मैत्रीमुळं एकप्रकारची जवळीक निर्माण करण्याचा प्रयत्न ते करत असतात.
समोरच्या व्यक्तीचा विश्वास संपादन करायचा. बहुतांश वेळा त्यांना ठरावीक अॅप डाऊनलोड करायला लावायचे आणि त्यामाध्यमातून व्हीडिओ चॅटिंग करायचे असे प्रकारही केले जातात.

फोटो स्रोत, Thinkstock
अशा प्रकारच्या अकाऊंटवरून मग समोरच्या व्यक्तीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केला जातो. त्यानंतर न्यूड व्हीडिओ किंवा सेक्स चॅटच्या माध्यमातून मग समोरच्या व्यक्तीला ब्लॅकमेल करायला किंवा त्रास द्याययला सुरुवात केली जाते.
काही व्यावसायिक अकाऊंटचा बनाव करूनही आमीष दाखवून किंवा इतर कारणांनी महिला किंवा पुरुषांचेही व्हीडिओ तयार करून घेतले जातात. त्यानंतर त्यांचा वापर करून पैशांची मागणी करत ब्लॅकमेलिंग केलं जातं.
आपल्या सवयी गुन्हेगारांच्या फायद्याच्या
सोशल मीडियाचा वापर करताना सायबर गुन्हेगार हे एखाद्या विशिष्ट प्रोफाईलवर लक्ष ठेवून असतात. त्या व्यक्तीकडून कोणत्या प्रकारच्या कंटेट किंवा फोटोला लाईक किंवा शेअर केलं जात आहे, त्याचा अभ्यासही ते करत असतात.
त्याचा आधार घेऊन हे गुन्हेगार संबंधितांशी संपर्क साधतात. त्याच प्रकारचं फेक प्रोफाईल तयार करून संपर्क साधत असतात.
अनेकदा नोकरीच्या संदर्भातली आपण पोस्ट करतो किंवा तशा प्रकारच्या पोस्ट क्लिक करत असतो. अशावेळी तुम्हाला कामाची गरज आहे, हे हेरून व्यावसायिक कारण दाखवतही तुमच्याशी संपर्क साधला जाऊ शकतो.
आजच्या काळात एक ना अनेक अशा खूप गोष्टी हे सायबर गुन्हे करत असतात.

फोटो स्रोत, Getty Images
प्रोफाईलचा अभ्यास करून फसवणूक
ही माध्यमं वापरताना सतर्क राहण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. पुणे सायबर पोलीसचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दगडू हाके यांनी एका जुन्या प्रकरणात बीबीसी मराठीशी बोलताना याबाबत माहिती दिली होती.
"एखाद्या व्यक्तीशी फेसबुकवरुन मैत्री केली जाते. त्यानंतर न्यूड फोटो पाठवले जातात व्हीडिओ कॉलवर नग्न होण्यास सांगितले जाते आणि नंतर बदनाम करण्याची धमकी देऊन पैसे उकळले जातात.
फसवणुक करणारे लोक फसवल्या गेलेल्या व्यक्तीच्या प्रोफाईलचा संपूर्ण अभ्यास करतात. त्यांच्या फ्रेंडलिस्टमध्ये कोण आहे, ही व्यक्ती काय करते वगैरे ही सगळी माहिती ते घेतात," असं ते म्हणाले होते.
सोशल मीडियाचा वापर करताना सतर्क राहणे आणि काही अनुचित प्रकार झाल्यास पॅनिक न होता पोलिसांशी संपर्क साधण्याचं आवाहनही पोलीस करतात.
काय खबरदारी बाळगावी?
अशा प्रकारच्या फसवणुकीपासून वाचण्यासाठी सोशल मीडियाचा वापर अत्यंत विचारपूर्वक करणं सर्वात गरजेचं आहे. त्याशिवाय काही गोष्टींची काळजी घेतली तर आपण यापासून वाचू शकतो.

घाबरण्याचं काहीही कारण नाही
ऑनलाईन फसवणुकीला बळी पडू नये यासाठी काही गोष्टींची दक्षता घेणं आवश्यक असं मानसोपचारतज्ज्ञ डॉ. सागर मुंदडा सांगतात. याच सोबत घाबरून न जाता त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करायला हवा असंही ते म्हणाले.
पंचविशीच्या आतले तरुण हे साधारणपणे बेधडक वागणारे असतात. टीनेज ते पंचवीशी ही अशी फेज असते की यामध्ये शारीरिक मानसिक बदलही होतात. यामुळे त्यांच्या मनात आकर्षण निर्माण होतं.

हल्ली सगळ्या गोष्टींसाठी ऑनलाईनच पर्याय शोधले जातात. योग्य सेक्स एज्युकेशन नसणे, सायबर विश्वाबद्दलची साक्षरता नसणे यामुळे अशा गोष्टींना ही तरुण बळी पडतात. यावर उपाय म्हणून फार काही वेगळं करण्याची गरज नाही. पण ज्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत त्याच प्रभावीपणे करण्याची गरज आहे.
काहीही अडचण आली तरीही कुणीतरी जवळ बोलून ते शेअर करणे आवश्यक आहे. मुलांमध्ये ही भावना रुजवणंही तितकंच महत्त्वाचं आहे की एखादी कठीण परिस्थिती आली तरीही त्यातून मार्ग निघू शकतो.
कधीही पोलिसांकडे जाण्यास कचरू नये. पोलिसांत तक्रार देऊन वेळीच अशा प्रकारांविरोधात कारवाई केल्याच भविष्यातील नुकसान कमी होऊ शकतं.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











