'स्क्रीन शेअरिंग' करताना दहा वेळा विचार करा, नसता बँक अकाऊंट होईल रिकामं

फोटो स्रोत, Getty Images
- Author, नितीन सुलताने
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
"तुमच्या अकाऊंटचं सेटिंग करावे लागेल, त्यासाठी तुमच्या कॉम्प्युटरचा स्क्रीन शेअर करा," फोनवरून दुसऱ्या बाजूने बोलणाऱ्या व्यक्तीनं असं म्हणताच राजेशनं (काल्पनिक नाव) तसं केलं. त्यानंतर काही वेळातच त्याचं बँक अकाऊंट रिकामं झालं होतं.
ऑनलाईन फसवणूक होऊ नये म्हणून अनेक पातळ्यांवर जनजागृती केली जाते. जाहिरातींमधून वेगळ्याप्रकारे कशी फसवणूक होऊ शकते याची उदाहरणं दिली जातात. पण तसं असलं तरी अनेक लोक आजही अशा फसवणुकींचे बळी ठरत आहेत.
सायबर गुन्ह्यांमध्ये फसवणुकीसाठी गुन्हेगारांकडून अनेकवेळा वापरला जाणारा असाच एक प्रकार म्हणजे, स्क्रीन शेअरिंगच्या माध्यमातून केली जाणारी फसवणूक.
या माध्यमातून गुन्हेगार तुमच्या कॉम्प्युटरचा ताबा घेऊन अक्षरशः तुमच्या डोळ्यासमोर खात्यातले पैसे इतर खात्यात वळवतात आणि काही समजायच्या आत तुमची फसवणूक झालेली असते. अशावेळी काही खबरदारी बाळगून तुम्ही सहजपणे अशा प्रकारांपासून वाचू शकता.
पण हा प्रकार नेमका घडतो कसा? गुन्हेगार कशाप्रकारे यासाठी सावजाला जाळ्यात अडकवतात, हे एका उदाहरणातून जाणून घेऊ. पोलीस खात्याच्या 'सायबर कवच' नावाच्या पत्रकात याबाबत माहिती देण्यात आली आहे.


खोट्या नेटवर्कचं जाळं
राजेशला त्याच्या अकाऊंटच्या माध्यमातून काही ऑनलाईन व्यवहार करायचे होते. पण त्याबद्दल त्याला पुरेशी माहिती नव्हती, किंवा नेमकी प्रक्रिया त्याला माहित करुन घ्यायची होती. लगेचच बँकेत जाणं शक्य नसल्यानं फोनवरून माहिती मिळवावी असं राजेशला वाटलं. त्यामुळं त्यानं कस्टमर केअरमध्ये फोन करायचं ठरवलं
पण राजेशकडं बँकेचा कस्टमरकेअर नंबरही नव्हता. पण आजकाल ऑनलाईन सर्च केलं की काहीही मिळतं, या विचारानं त्यानं लॅपटॉप काढला आणि नंबर सर्च केला.
राजेशला वाटलं होतं तसा त्याला काही क्षणांतच बँकेचा कस्टमर केअरचा नंबर ऑनलाईन मिळालाही. राजेशनं लगेचच तो नंबर घेतला आणि मोबाईलवरून डायल केला. समोरून बोलणाऱ्या व्यक्तीनं राजेशबरोबर अत्यंत व्यवस्थित बोलून माहिती द्यायला सुरुवात केली.

फोटो स्रोत, Getty Images
समोरून बोलणाऱ्या व्यक्तीनं राजेशचं बोलणं व्यवस्थित ऐकलं आणि फोनवरून मदत करण्याचं आश्वासन दिलं. राजेशकडून काही माहिती घेतल्यानंतर त्या व्यक्तीनं राजेशला, "तुमच्या कॉम्प्युटरवरून काही अकाऊंटमध्ये काही सेटिंग कराव्या लागतील", असं सांगितलं.
या सेटिंग करण्यासाठी तुमच्या कॉम्प्युटरचा स्क्रीन शेअर करावा लागेल असंही त्यानं म्हटलं. बँकेच्या प्रतिनिधीशी बोलत असल्यामुळं राजेशला तशी शंका आली नाही. शिवाय समोरची व्यक्ती अत्यंत काळजीनं प्रतिसाद देत असल्यानं राजेशला शंका आली नाही.
राजेशनं त्या व्यक्तीनं सांगितलं तशा स्टेप्स फॉलो केल्या. काही वेळानं राजेशचं स्क्रीन समोरच्या व्यक्तीला शेअर झालं होतं. त्या व्यक्तीनं राजेशच्या कॉम्प्युटरवर काहीतरी केलं आणि ते बंद करून फोनही बंद केला.
त्यानंतर लगेचच राजेशच्या फोनवर मेसेज आला, त्याच्या बँक खात्यातले पैसे गेले होते. नेमकं काय झालं समजण्याआधीच राजेशला मोठा फटका बसला होता. पण हे सगळं झालं कसं हे काही त्याच्या लक्षातच येत नव्हतं.
गुन्हेगारांनी असा खेळला खेळ
या संपूर्ण प्रकरणात राजेशकडून झालेल्या चुकांचा त्यांना फटका बसला. सर्वांत पहिली बाब म्हणजे राजेशनं ऑनलाईन सर्च करून मिळवलेल्या कस्टमर केअर नंबरची काहीही पडताळणी न करता थेट फोन लावला.
अनेकदा सायबर गुन्हेगार सर्च इंजिनच्या माध्यमातून त्यांचे नंबर हे लोकांपर्यंत पोहोचवतात. त्यानंतर ग्राहकांबरोबर बँकेच्या कस्टमर केअरचे प्रतिनिधी म्हणून बोलून त्यांची फसवणूक करत असतात. राजेशही या जाळ्यात अडकला होता. म्हणजे राजेशबरोबर फोनवर बोलणारी व्यक्ती बँकेची प्रतिनिधी नव्हती तर सायबर गुन्हेगारांच्या टोळीतील व्यक्ती होती.
दुसरी गोष्ट म्हणजे राजेशनं जेव्हा त्याची समस्या सांगितली, त्यानंतर त्याला बँकेच्या प्रतिनिधीनं जे काही करायला सांगितलं तेही राजेशनं सहज केलं. त्यापूर्वी राजेशन शांतपणे विचार करून पावलं उचलायला हवी होती.

फोटो स्रोत, Getty Images
पण गुन्हेगारांनी नेमकं असं केलं तरी काय? तर बँकेचा प्रतिनिधी म्हणून बोलणाऱ्यानं राजेशला तुमच्या कॉम्प्युटरमध्ये व्यवहार करता यावे म्हणून काही सेटिंग्ज करायच्या आहेत, असं सांगितलं. एवढंच नाही तर या सेटिंग तुम्हाला करता येणार नाही, तर आम्हाला तुमच्या कॉम्प्युटरमध्ये ते बदल करावे लागतील असं सांगितलं.
त्यानंतर त्या प्रतिनिधीनं राजेशला त्याचं स्क्रीन शेअर करायला सांगितलं. स्क्रीन शेअर करणारे काही ॲप ऑनलाईन उपलब्ध आहेत. ते डाऊनलोड करून कॉम्प्युटमध्ये इन्स्टॉल करायची प्रक्रियाही त्या प्रतिनिधीनं राजेशला समजावली.
हे सर्व झाल्यानंतर स्क्रीन शेअर झालं, म्हणजे राजेशच्या संपूर्ण लॅपटॉपचा ताबाच त्या गुन्हेगाराकडं गेला. त्यानं राजेशच्या खात्यातली रक्कम इतर खात्यांत वळवली आणि त्यानंतर फोन बंद केला. राजेशनं नंतर अनेकदा ट्राय केल्यानंतरही त्या नंबरशी त्याला संपर्क करता आला नाही.
पण राजेशनं काही गोष्टींची काळजी घेतली असती; तर मात्र त्याला या समस्येचा सामना करावा लागला नसता. त्या कोणत्या गोष्टी आहेत, हेही जाणून घेऊयात.
अशा टाळता येतील चुका
राजेशला ज्यामुळं आर्थिक फटका बसला तो सहज टाळता आला असता. फक्त सजग राहून काही गोष्टी करणं त्यासाठी गरजेचं होतं.
राजेशनं कस्टमर केअरला फोन करण्यासाठी जो नंबर ऑनलाईन सर्च करून मिळवला त्याची खात्री केली नाही. सायबर गुन्हेगार असे नंबर पसरवून त्या माध्यमातून लोकांना जाळ्यात अडकवत असतात.
अशाप्रकारे कस्टमर केअरला संपर्क साधण्यासाठी संबंधित बँकेच्या पासबुक किंवा इतर माध्यमातून नंबर घ्यावा. तसंच त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर नंबर उपलब्ध असतात. त्यामुळं नंबर कुठून घेत आहोत, याची काळजी घ्यायला हवी.
त्यानंतर राजेशनं गुन्हेगारांनी सांगितलं तसं स्क्रीन शेअर करून थेट लॅपटॉपचा ताबाच गुन्हेगारांना दिला. पण अशाप्रकारे कधीही बँकेचे प्रतिनिधी स्क्रीन शेअर करायला सांगत नाहीत किंवा कधीही तुमची बँक खात्याची किंवा पासवर्डसारखी वैयक्तिक माहितीही मागत नाही.

अनेकदा बँकिंग व्यवहार मोबाईल ओटीपीशी जोडलेले असतात. अशावेळी किमान आपण ओटीपी कोणाला सांगणार नाही, याची काळजी घ्यावी.
अनेकदा ओटीपीशिवायही गुन्हेगार बँक खात्यातील रक्कम वळवत असतात. कुणाच्याही सांगण्यावरून मोबाईल किंवा लॅपटॉपमध्ये कोणतंही ॲप, सॉफ्टवेअर इन्स्टॉल करू नका.
त्यामुळं जर कोणी अशी माहिती मागत असेल किंवा काही करायला सांगत असेल तर वेळीच सावध होऊन पुढं पावलं उचलायला हवी.
ऑनलाईन व्यवहार पूर्णपणे शिका
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऑनलाईन व्यवहार करायचे असतील तर तुम्ही ते व्यवस्थित शिकून घेतलं पाहिजे. काय करायला हवं, काय नाही याची व्यवस्थित माहिती तुम्ही संबंधित अधिकृत लोकांकडून घ्यायला हवी.
बऱ्याचदा कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीदेखील ऑनलाईन व्यवहार वापरत असतात. अशावेळी त्यांना काय करायला हवं याबरोबरच काय करू नये, याबाबत पुरेशी माहिती देऊन ठेवायला हवी.
कॉम्प्युटरबाबतची पुरेशी माहिती असणेही गरजेचे आहे. कारण तांत्रिक अज्ञानाचा फायदा उचलत सायबर गुन्हेगार मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसवणूक करत असल्याचं अनेकदा पाहायला मिळालं आहे.
जसं आपण ऑनलाईन व्यवहार करताना काय काय करायचं हे सांगत असतो. त्याचप्रमाणे काय करू नये हेही सांगायला हवं. म्हणजे जसं ओटीपी द्यायचा नसतो, बँकेचा पासवर्ड सांगायचा नसतो तसंच स्क्रीन शेअर करायचं नाही, कुणाला आपल्या कॉम्प्युटरचा ताबा द्यायचा नाही, हेही तेवढंच महत्त्वाचं असतं.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











