सलमान रश्दी यांच्या जीवाला ज्या 'द सॅटनिक व्हर्सेस' कादंबरीमुळे धोका निर्माण झाला, ती पुन्हा चर्चेत का आहे?

फोटो स्रोत, Getty Images
सलमान रश्दी हे नाव तसं आपल्याला अपरिचित नाही. आपल्या लेखनातून त्यांनी एक वेगळी ओळख जगभरात निर्माण केली आहे.
विशेषकरून त्यांच्या लेखनात वास्तववाद आणि ऐतिहासिक संदर्भ असलेल्या कथांचा संगम साधला गेला आहे.
पाश्चात्य आणि पौर्वात्य संस्कृतींमधील परस्परसंबंध, त्यातील संघर्ष आणि त्यामध्ये झालेली स्थलांतरं यांचं प्रतिबिंब उमटत असतं.
मात्र सलमान रश्दींची जगभरातील खरी ओळख आहे ती त्यांच्या अत्यंत वादग्रस्त, त्यांच्या जीवाला धोका निर्माण करणाऱ्या आणि त्यांच्या आयुष्याची दिशाच बदलून टाकणाऱ्या "द सॅटनिक व्हर्सेस" या कादंबरीमुळे. या कादंबरीनं जगभरात मोठी खळबळ उडवून दिली होती.
एका बाजूला या कादंबरीमुळे रश्दींचं कौतुक देखील झालं तर दुसऱ्या बाजूला कादंबरीतील मांडणीमुळे इस्लामी जगत मोठ्या प्रमाणात रश्दींच्या विरोधात गेलं होतं. त्यामुळे रश्दी यांचं आयुष्य पूर्णत: बदलून गेलं. सलमान रश्दी आणि "द सॅटनिक व्हर्सेस" विषयी...
भारतात जन्मलेले ब्रिटिश कादंबरीकार सलमान रश्दी यांची 'द सॅटनिक व्हर्सेस' ही कादंबरी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. खरंतर हे पुस्तक आता भारतात विक्रीसाठी पुन्हा एकदा उपलब्ध झालं आहे.
23 डिसेंबरला दिल्लीतील 'बाहरीसन्स बुकसेलर्स' च्या एका पोस्टनंतर या पुस्तकावर पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली आहे. या बुकस्टोअरनं एक्स या सोशल मीडियावरील त्यांच्या अकाउंटमध्ये लिहिलं, "सलमान रश्दी यांची 'द सॅटनिक व्हर्सेस' ही प्रसिद्ध कादंबरी आता बाहरीसन्स बुकसेलर्स वर उपलब्ध आहे!"
सलमान रश्दी यांची ही चौथी कादंबरी आहे. ही कांदबरी 1988 मध्ये प्रकाशित झाली होती. प्रकाशित झाल्यापासूनच ही कादंबरी वादाच्या भोवऱ्यात सापडली होती आणि नंतरही बराच काळ या कादंबरीबाबत वाद निर्माण होत राहिले.


कादंबरी प्रकाशित झाल्यानंतर फक्त एक महिन्याच्या आतच तत्कालीन राजीव गांधी सरकारनं भारतात या कादंबरीवर बंदी घातली होती.
अर्थात जरी ही कादंबरी आयात करण्यावर बंदी असली तरी ही कादंबरी स्वत:जवळ बाळगणं काही बेकायदेशीर नव्हतं. पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, या वर्षी नोव्हेंबर महिन्यात या कादंबरीवरील बंदीला आव्हान देणाऱ्या याचिकेवरील सुनावणी दिल्ली उच्च न्यायालयानं थांबवली.
पीटीआयच्या बातमीत म्हटलं आहे की दिल्ली उच्च न्यायालय म्हणालं की 5 ऑक्टोबर 1988 ला लागू करण्यात आलेली अधिसूचना अधिकाऱ्यांकडून न्यायालयात सादर झालेली नाही. त्यामुळे असं मानलं जाईल की पुस्तकाच्या आयातीवर बंदी घालणारी अधिसूचना अस्तित्वातच नव्हती.
या सर्व प्रकरणाशी संबंधित प्रश्नांची उत्तर जाणून घेऊया.
कादंबरीच्या उपलब्धतेबद्दल बुक स्टोअर काय म्हणालं?
दिल्लीतील खान मार्केट मध्ये असणाऱ्या 'बाहरीसन्स बुकसेलर्स' या ग्रंथदालनानं 'द सॅटनिक व्हर्सेस' या कादंबरीच्या उपलब्धतेबद्दलची माहिती देत एक्सवर लिहिलं होतं, "ही कादंबरी आपल्या वेगळ्या प्रकारच्या कथेसाठी आणि रोखठोक विषयामुळे अनेक वर्षांपासून चर्चेत आहे. ही कादंबरी प्रकाशित झाल्यापासूनच जगभरात मोठ्या वादांच्या भोवऱ्यात सापडली होती. या कादंबरीमुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्य, धर्म आणि कला या मुद्द्यांवरून चर्चा सुरू झाली होती."
'बाहरीसन्स बुकसेलर्स' या ग्रंथदालनानं पुढे लिहिलं, "जर तुम्ही ही कादंबरी पहिल्यांदाच वाचत असाल किंवा पुन्हा एकदा ती वाचण्याची तुमची इच्छा असेल तर ही कांदबरी तुम्हाला विचार करण्यास भाग पाडेल."

फोटो स्रोत, X@Bahrisons_books
पेंग्विन रँडम हाऊस इंडियाच्या मुख्य संपादक मानसी सुब्रमण्यम यांनी देखील कादंबरीच्या उपलब्धतेबद्दल माहिती देत एक्सवर पोस्ट केली होती.
त्यात त्यांनी सलमान रश्दी यांना टॅग करत लिहिलं होतं, "भाषा म्हणजे हिंमत: एक विचाराचं चिंतन करण्याची, तो मांडण्याची आणि तो बोलून त्याचं रुपांतर सत्यात करण्याची ताकद."

या बातम्याही वाचा:

त्यांनी पुढे लिहिलं आहे की, "अखेर, सलमान रश्दी यांच्या 'द सॅटनिक व्हर्सेस' या कादंबरीवर भारतात 36 वर्षांपासून बंदी होती. मात्र आता ती भारतात विकण्याची परवानगी मिळाली आहे. ही कादंबरी आता नवी दिल्लीतील 'बाहरीसन्स बुकसेलर्स' या बुक स्टोअरवर उपलब्ध आहे."
भारतात कोणत्या परिस्थितीत बंदी घालण्यात आली होती?
सप्टेंबर 1988 मध्ये 'द सॅटनिक व्हर्सेस' ही कादंबरी प्रकाशित झाली होती. या कांदबरीमुळे मोठा वाद निर्माण झाला होता. तसंच त्याचे लेखक सलमान रश्दी यांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता.
ही कादंबरी म्हणजे इस्लाममधील पवित्र गोष्टींचा अपमान असल्याचं जगभरातील मुस्लिमांच्या एका समुदायानं मानलं आणि कादंबरीच्या विरोधात मोठ्या प्रमाणात निदर्शनं केली.
मुस्लिम समुदाय या कांदबरीला इस्लामचा अपमान मानत होते. या कादंबरी संदर्भात मुस्लिमांचा विरोध अनेक मुद्द्यांबाबत होता. मात्र यातील दोन महिला पात्रांच्या नावावरून जोरदार विरोध झाला.
जानेवारी 1989 मध्ये ब्रॅडफोर्ड मधील मुस्लिमांनी या कादंबरीच्या प्रती जाळल्या. या कादंबरीची विक्री करणाऱ्या डब्ल्यूएच स्मिथ या न्यूजएजंटनं प्रकाशन बंद केलं. त्याच दरम्यान सलमान रश्दी यांनी या कादंबरीमुळे इस्लामचा अपमान झाल्याचे आरोप फेटाळले.
भारतात तेव्हा राजीव गांधी यांचं सरकार होतं. सरकारनं ही कादंबरी भारतात आयात करण्यावर बंदी घातली होती. त्यानंतर पाकिस्तान आणि इतर अनेक इस्लामी देशांनी या कादंबरीवर बंदी घातली होती. दक्षिण आफ्रिकेत देखील कादंबरीवर बंदी घालण्यात आली होती.

फोटो स्रोत, Getty Images
मात्र त्याच वेळेस काही वर्गांमध्ये या कादंबरीचं कौतुक देखील झालं. या कादंबरीला व्हाईटब्रेड पुरस्कार देखील मिळाला. मात्र कादंबरीला असलेला विरोध वाढतच गेला आणि कादंबरीविरोधात रस्त्यांवर निदर्शनं होऊ लागली.
फेब्रुवारी 1989 मध्ये सलमान रश्दी यांच्या विरोधात मुंबईत मुस्लिम समुदायानं मोठी निदर्शनं केली. या निदर्शनावर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात 12 जण मारले गेले होते आणि 40 हून अधिक जखमी झाले होते.
फेब्रुवारी 1989 मध्ये काश्मीरमध्ये 'द सॅटनिक व्हर्सेस'च्या विरोधात निदर्शनं करणाऱ्या लोकांमध्ये आणि पोलिसांमध्ये चकमक उडाली होती. त्यात देखील तीन जण मारले गेले होते. पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीला हिंसक वळण लागून त्यात शंभरहून लोक जखमी झाले होते.
1989 मध्ये इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह खेमेनई यांनी तर सलमान रश्दी यांची हत्या करण्याचं आवाहन केलं होतं. त्यानंतर दिल्लीतील जामा मशिदीचे शाही इमाम अब्दुल्लाह बुखारी यांनी देखील त्याला पाठिंबा दिला होता आणि रश्दी यांची हत्या करण्याचं आवाहन सुद्धा केलं होतं.
जीव वाचवत लपून-छपून राहण्याची वेळ
जगभरात निदर्शनं झाल्यानंतर आणि फतवा जाहीर झाल्यानंतर सलमान रश्दी यांना आपल्या पत्नीसह लपावं लागलं होतं. जवळपास एक दशक त्यांना असंच लपून-छपून राहावं लागलं होतं.
यादरम्यान ब्रिटिश सरकारनं सलमान रश्दी यांना पोलीस सुरक्षा देखील पुरवली होती. परिस्थिती अशी झाली होती की त्यावेळेस इराण आणि ब्रिटन यांच्यातील राजनयिक संबंध देखील संपुष्टात आले होते.
सलमान रश्दी यांच्या कादंबरीला पेंग्विन वायकिंग या प्रकाशन संस्थेनं प्रकाशित केलं होतं. या प्रकाशन संस्थेच्या लंडनमधील कार्यालयाबाहेर पोलीस तैनात करण्यात आले होते. तर त्याचबरोबर पेंग्विन वायकिंग च्या न्यूयॉर्कमधील कार्यालयाला धमक्या देखील देण्यात आल्या होत्या.
मात्र अटलांटिक महासागराच्या दोन्ही बाजूला म्हणजे अमेरिका आणि युरोपात या कादंबरीची खूप चर्चा आणि प्रसिद्धी झाली. मुस्लीमांच्या कट्टर प्रतिक्रियांच्या विरोधात झालेल्या निदर्शनांना युरोपियन देशांनी पाठिंबा दिला होता. जवळपास सर्वच युरोपियन देशांनी इराणमधून त्यांचे राजदूत परत बोलावले होते.

फोटो स्रोत, Getty Images
नंतर या परिस्थितीबद्दल सलमान रश्दी म्हणाले होते, "तो खूपच भीतीदायक काळ होता. मला माझ्या जीविताबरोबरच माझ्या कुटुंबाच्या सुरक्षेची देखील भीती वाटत होती. माझं लक्षं विस्कळीत झालं होतं आणि काय करावं हे माझ्या लक्षात येत नव्हतं."
अर्थात फक्त कादंबरीतील विषयामुळेच फक्त सलमान रश्दी यांना धमक्या आल्या होत्या.
या कादंबरीचा जपानी भाषेत अनुवाद करणाऱ्या अनुवादकाचा मृतदेह जुलै 1991 मध्ये टोकियोच्या ईशान्य भागातील एका विद्यापीठात मिळाला होता.
पोलिसांनुसार, हितोशी इगाराशी यांनी या कादंबरीचा जपानी भाषेत केला होता. सूकूबा विद्यापीठातील हितोशी यांच्या कार्यालयाबाहेर अनेकवेळा चाकूनं भोसकण्यात आलं होतं आणि मरण्यासाठी तसंच सोडून देण्यात आलं होतं. हितोशी त्या विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापक होते.
जुलै 1991 मध्येच या कादंबरीचं इटालियन भाषेत अनुवाद करणाऱ्या इत्तोरो कॅपरियोलो यांच्यावर मिलानमधील त्यांच्या फ्लॅटमध्ये हल्ला झाला होता. सुदैवानं ते या हल्ल्यात वाचले होते. 1998 मध्ये इराणनं सलमान रश्दी यांच्यी हत्या करण्याचं आवाहन करणारा फतवा मागे घेतला होता.
2022 मध्ये जीवघेणा हल्ला
ही कादंबरी प्रकाशित झाल्यानंतर काही दशकांनी म्हणजे 12 ऑगस्ट 2022 ला सलमान रश्दी यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. या हल्ल्यात त्यांचा डोळा निकामी झाला होता. हा हल्ला न्यूयॉर्कमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमाच्या व्यासपीठावर चाकूनं करण्यात आला होता.
याच वर्षी बीबीसीला दिलेल्या एका खास मुलाखतीत सलमान रश्दी यांनी डोळा गमावल्याचं दु:ख पुढील शब्दात व्यक्त केलं होतं.
ते म्हणाले होते, "एक डोळा गमावल्याचा त्रास मला दररोज होतो."

फोटो स्रोत, PA Media
ते म्हणाले होते की पायऱ्या उतरताना किंवा रस्ता ओलांडताना, इतकंच ग्लासात पाणी ओतताना देखील त्यांना अधिक काळजी घ्यावी लागते.
मात्र त्यांच्या मेंदूला इजा न झाल्याबद्दल ते स्वत:ला नशीबवान समजतात. ते म्हणतात, "याचा अर्थ असा आहे की मी अजूनही माझ्यासारखाच होण्यास सक्षम आहे."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











