'मी तुरुंगात असूनही माझ्या मुलांना गोष्टी वाचून दाखवायचो, त्यामुळेच जगलो'

फोटो स्रोत, TREVOR BURROWS
- Author, डोगल शॉ
- Role, बीबीसी स्टोरीज
लुईस हार्डी यांच्यासाठी तुरुंगातील जीवन अत्यंत कठीण होतं. एक तर कुटुंबापासून दूर आणि त्यात वाढती थंडी यामुळं ते त्रासले होते. पण त्यानंतर त्यांना असा मार्ग मिळाला, जे करण्याकडं बहुतांश पालक शक्यतो दुर्लक्ष करत असतात. त्यानंतर मात्र सर्वकाही बदलू लागलं.
लुईस हार्डी नुकतेच तुरुंगातून सुटले होते. घरी जाण्यासाठी ते टॅक्सीत बसले होते. नऊ महिन्यांनंतर त्यांच्या दोन मुलांना भेटणार होते. पण त्याचवेळी त्यांना एक कॉल आला.
"तू काय करतोय?" समोरून एक परिचित आवाज आला.
"मी मुलांना भेटायला जाण्यासाठी टॅक्सीत बसलोय."
"त्यांची काळजी करू नको," समोरून त्यांचा जुना मित्र बोलत होता. "त्यांना उद्या भेट, आज आमच्याबरोबर पबमध्ये चल."
पण त्यांना नेमकं काय उत्तर द्यायचं हे लुईस यांना चांगलंच ठाऊक होतं.
"मी तुमच्याबरोबर परत कधीच पबमध्ये येणार नाही, माझ्यासाठी माझी मुलं अधिक महत्त्वाची आहेत," असं उत्तर त्यांनी दिलं.
कैद्यांना विचार करण्यासाठी खूप वेळ असतो. त्यामुळं माझ्यासाठी योग्य निर्णय काय आहे, हे मला समजलं होतं, असं लुईस म्हणाले.
ते जेव्हा घरी गेले तेव्हा त्यांच्या मुलांनी एवढ्या आनंदात आणि आवेगात त्यांच्या अंगावर उडी घेतली की ते जवळपास खाली कोसळलेच होते, अशी आठवण लुईस सांगत होते. त्यांची मुलं तेव्हा पाच आणि सहा वर्षे वयाची होती.
एवढा काळ त्यांच्यापासून दूर राहिल्यानंतर लुईसला त्यांच्याबरोबर खूप काही करायचं होतं. त्यासाठी ते आतूर झाले होते.
पण जे जे करायचं आहे, त्या यादीमध्ये सर्वात वर होतं ते म्हणजे, मुलांना गोष्टी सांगणं किंवा गोष्टी वाचून दाखवणं.
गोष्टी सांगण्यात किती आनंद मिळतो याची नव्यानं जाणीव व्हायला लुईस यांना तुरुंगात काहीसा वेळ लागला.
प्लायमाऊथ मध्ये जन्मलेले आणि लहानाचे मोठे झालेल्या लुईस यांचं 2013 मध्ये मद्यधुंद अवस्थेत एक भांडण झालं होतं. गंभीर मारहाण प्रकरणी त्यांना डार्टमूरमध्ये दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती.
लुईस यांच्यासाठी त्यावेळी तो प्रकार स्वभाच्या फारसा विपरीत नव्हता. कारण अगदी लहान वयाचे असल्यापासून त्यांना रागावर नियंत्रण मिळवण्यात बराच संघर्ष करावा लागला होता.
पण रिमांड सेंटरमध्ये त्यांची रवानगी झाली, तेव्हाच त्यांना त्याठिकाणचं नवं वातावरण त्यांच्यासाठी किती कठीण असेल, याची जाणीव व्हायला सुरुवात झाली होती.

फोटो स्रोत, TREVOR BURROWS
कैद्यांना पहिल्यांदा यार्डमध्ये पाठवण्यात आलं, त्यावेळी भांडण सुरू झालं आणि कोणाला तरी चाकू मारण्यात आला होता.
कैद्यांनी टूथब्रश आणि रेझरचा वापर करून चाकू तयार केले होते. अगदी सिगारेटच्या कागदासारख्या क्षुल्लक कारणावरूनही इथं तुम्हाला चाकू मारला जाण्याची शक्यता होती.
"त्याठिकाणी हे सर्व काही 'मर्द'पणा दाखवण्यासाठीचे प्रकार असतात, त्यामुळं तुम्हाला कायम धोका असतो," असं ते म्हणाले.
डार्टमूरमध्येच तुम्ही त्याच चाकूनं तिथलं वातावरणही कापू शकता, असं ते म्हणतात.
"प्रत्येकवेळी दरवाजा उघडला गेला की, त्यानंतर काही क्षणांमध्येच काहीतरी घडतच होतं. मग ते तुमच्याबरोबर असो वा इतर कोणाबरोबर."
हिंसक गुन्हेगार आणि त्यांचे मित्र हे कायम, तिथं असणाऱ्यांची शारीरिक किंवा मानसिक कमजोरी शोधात असायचे. कारण त्यामुळं त्यांना अशा लोकांवर अत्याचार करता येत होते.
लुईस यांना या सर्व अडचणींना टाळण्यात यश आलं, पण ते सर्व अत्यंत तणाव निर्माण करणारं होतं.
"तुम्हाला स्वतःसाठी उभं राहावं लागतं. तसंच अशा गोष्टींपासून दूर कसं राहायचं, यासाठीदेखील तुम्ही सतत प्रयत्न करत असता."

फोटो स्रोत, Getty Images
लुईस यांच्यामते, तुरुंगात जाणं हे कधीही चांगलं नसतं. पण तरीही तुरुंगात स्टोरीबूक डॅड्स नावाच्या एका उपक्रमात सहभागी होता आलं, हे ते सौभाग्यच समजतात.
या उपक्रमात ज्या कैद्यांना लहान मुलं आहेत त्यांना, एका स्टुडिओमध्ये बेडटाईम स्टोरीज (रात्री झोपण्यापूर्वी मुलांना सांगण्याच्या गोष्टी) रेकॉर्ड करण्याची संधी मिळत होती. त्यानंतर त्या गोष्टींचं रेकॉर्डींग असलेल्या सीडी किंवा डिव्हीडी कैद्यांच्या घरी मुलांपर्यंत पोहोचवल्या जायच्या.
"तुम्ही त्या (रेकॉर्डिंग स्टुडिओच्या) दारामधून आत प्रवेश करताच, तुम्हाला अगदी शांत, आनंदी आणि सुरक्षित वाटतं," असं लुईस म्हणाले.
लुईस त्यांच्या कुटुंबीयांसाठी दर आठवड्याला एक कार्यक्रम तयार करायचे. ते ज्युलिया डोनाल्डसन यांच्या ग्रुफालो सारख्या गोष्टी सांगायचे. कधी-कधी ते कैद्यांच्या लायब्ररीतून घेऊन मार्व्हल स्टोरीजदेखील सांगायचे. त्यावेळी व्हीडिओ कॅमेऱ्यासमोर ते कार्टूनचे चित्र दाखवायचे.
त्यांनी स्वतःचेदेखील कॉमिक तयार करून ते त्यांच्या मुलांना पाठवलं होतं.
लुईस यांना जाणवलेली सर्वात पहिली बाब म्हणजे, या गोष्टींचा कुटुंबीयांना म्हणजे त्यांच्या पार्टनर आणि दोन मुलांना फायदा होत आहे.
"माझ्या पत्नीला रात्रीच्या वेळी मुलांना सांभाळणं किंवा झोपवणं जरा कठीण जायचं," असं लुईस म्हणाले.
पण ती माझ्या रेकॉर्ड केलेल्या गोष्टी प्ले करायची आणि त्यामुळं ते शांतपणे झोपी जायचे.

फोटो स्रोत, Getty Images
मुलं लुईस यांना सांगायचे की, "त्यांचा आवाज ऐकल्यानंतर जेव्हा ते डोळे बंद करून घ्यायचे तेव्हा त्यांना वडील त्यांच्याबरोबर त्याच खोलीत आहेत, असं वाटायचं."
लुईस यांनाही हे ऐकून आनंद होत होता की, वडिलांची आठवण आली की त्यांची मुलं एकत्र बसून त्यांनी रेकॉर्ड केलेल्या गोष्टी ऐकत असतात.
लुईस तुरुंगात गेले तेव्हा त्यांची मुलं चार आणि सहा वर्षांची होती. तुरुंगात जाण्यापूर्वी ते मुलांना गोष्टी सांगण्याकडं दुर्लक्ष करायचे. पण स्टोरीबूक डॅड्समुळं त्यांना लहानपणी अनुभवलेले काही क्षण पुन्हा जगता आले.
"हे गमतीशीर आहे. पण गोष्टी हा माझ्या बालपणामधला एक अत्यंत महत्त्वाचा भाग होता," असं ते म्हणाले.
"माझी आई मला खूप गोष्टी सांगायची. शिवाय वयाच्या नवव्या वर्षी जेव्हा, डिस्लेक्सिक असल्याचं समजलं त्यानंतर मीदेखील खूप वाचू लागलो. पुढं किशोरवयात माझं वर्तन बिघडेपर्यंत हे वाचन सुरू होतं. मला अॅनिमॉर्फ्स नावाची सिरीज आवडायची आणि मी ते खूप वाचायचो."
आपल्या गोष्टींमुळं कुटुंबावर चांगला प्रभाव होत असल्याचं समजल्यानंतर लुईस यांना त्यात वाढ करण्याची प्रेरणा मिळाली. या गोष्टींनी केवळ लहान मुलांनाच आनंद मिळाला असं नाही, तर त्या गोष्टी सांगणाऱ्यांनाही त्यातून बरंच काही मिळालं.
"तुरुंगात तुमचा ज्या पद्धतीच्या तुमच्याच भावनांशी सामना होत असतो, त्या समजणं अत्यंत कठिण असतं," असं लुईस म्हणतात.
"तुम्हाला कधीही कुणाला प्रेमानं मिठी मारता येत नाही. तुम्ही कुणाशी हातही मिळवू शकत नाही. मुलांच्या डोळ्यात स्वतःबद्दलचं प्रेम पाहण्याची तुमची इच्छा असते आणि हळू हळू रोज तुम्हाला अधिक थंड वाटू लागतं.

फोटो स्रोत, TREVOR BURROWS
"तुम्हाला कोणी भेटायला आलं आणि त्यानं तुम्हाला मिठी मारली तर, तो अनुभव एवढी ऊब देणारा असतो की, त्याची कल्पनाही तुम्ही करू शकणार नाही. तुम्ही एखादं इलेक्ट्रीक ब्लँकेट गुंडाळलं, तरी त्याची सर येत नाही."
मुलांना गोष्टी सांगित्यामुळं लुईस यांनाही त्यांच्या जीवनात पुन्हा एकदा तशीच ऊब अनुभवायला मिळाली.
"पुनर्वसन किंवा जुन्या आयुष्यात परतण्याची इच्छा असलेल्यांसाठी ही प्रचंड महत्त्वाची गोष्ट असते," असं लुईस म्हणाले.
शॅरन बेरी यांनी स्टोरीबूक डॅड्स हा उपक्रम सुरू केला होता. त्यांनी जेव्हा तुरुंगांना भेटी द्यायला सुरुवात केली होती, त्याचवेळी त्यांना कैंद्यांसाठी अशी ऊब देणारी भावना गरजेची असल्याचं लक्षात आलं होतं.
शॅरन यांनी रेडिओ प्रोडक्शनचा शिक्षण घेतलं होतं. रेडिओसाठी नाटकं लिहिण्याची त्यांची इच्छा होते. या स्वप्नाच्या दिशेनं त्यांची वाटचाल सुरू होती. तेव्हाच चॅनिंग वूड तुरुंगात रेडिओ स्टेशन उभारणीच्या कामात मदत करण्यासाठी त्यांनी आठवड्यातून एक दिवस काम सुरू केलं. तुरुंगात त्यांना जेव्हा पुरुष कैद्यांशी बोलण्याची संधी मिळाली तेव्हा कैद्यांच्या मनाजलं जाणून घेऊन त्यांना आश्चर्य झालं.
कैद्यांनी मुलांच्या आठवणीचं दुःख, वाढदिवसासारख्या क्षणांच्या आठवणी लहान मुलांचं चालणं, शाळेतला पहिला दिवस हे सर्व मिस करत असल्याचं सांगितलं होतं.

फोटो स्रोत, STORYBOOK DADS
त्यांनी फोन कॉलवर रडणाऱ्या कैद्यांचे अश्रू पाहिले. आपल्या अनुपस्थितीतील कुटुंबाच्या जीवनाबाबत समजल्यानंतर कैद्यांचे अश्रू थांबत नसायचे.
या सर्वामुळं त्यांना स्टोरीबूक डॅड्सची कल्पना सुचली. यातून कैद्यांना कुटुंबांबरोबरचं नातं आणखी घट्ट करण्याचा एक मार्ग सापडणार होता. त्याचबरोबर त्यांना मीडिया प्रोडक्शनची काही कौशल्य अवगत होणार होती. कदाचित त्यांचा फायदा त्यांना तुरुंगाबाहेरच्या जीवनात होऊ शकेल. त्यामुळं पुन्हा गुन्हेगारीकडं वळण्याची शक्यता कमी होईल, असं त्यांना वाटलं.
त्यांनी 2003 मध्ये संस्था सुरू करत डार्टमूर तुरुंगात हा उपक्रम सुरू केला. रेकॉर्डींग रूम म्हणून त्यांना जी पहिली खोली मिळाली होती, ती एक रिकामी कोठडी होती.
पण आता 16 वर्षांनंतर त्यांची संस्था 100 तुरुंगांबरोबर काम करते आणि दरवर्षी ते 5 ते 6 हजारच्या दरम्यान स्टोरीची निर्मिती करतात. (संस्थेमार्फत महिला तुरुंगांमध्येही स्टोरीबूक मम्स हा उपक्रम चालवला जातो.)
एका प्रकारच्या कठोर प्रतिमेमुळं कैद्यांना स्टोरीचं रेकॉर्डींग करणं कठिण जात असल्याचं शॅरन यांच्या लक्षात आलं.
"त्याठिकाणी एकप्रकारचं पुरुषी वातावरण असतं, तुम्हाला तुमची कमकुवत बाजू दाखवता येत नाही. दुसरीकडं त्याच्या अगदी उलट आमच्या स्टुडिओचं वातावरण असतं. ते त्यांच्या हळव्या बाजुसाठी पोषक आहे. त्यांच्यात असलेल्या पित्याची बाजू या स्टुडिओमुळं समोर येते. कायम पुरुषी प्रतिमा घेऊन वागल्यामुळं त्यांना अत्यंत अस्वस्थ वाटत असतं."
गोष्ट सादर करण्यापूर्वी छोटासा संदेश रेकॉर्ड करण्याच्या प्रयत्नात अनेक कैद्यांच्या भावना अनावर झाल्याचं त्यांनी पाहिलं होतं.
पण कैद्यांना आणखी एक वेगळीच अडचण येत होती.
काही कैद्यांना ते हंसेल अँड ग्रेटेल किंवा लिटल रेड रायडींग हूड अशा गोष्टी वाचून दाखवताना प्रचंड घाम येत होता. शॅरनला कदाचित त्यामागचं कारण माहिती होतं.
"हे तरुणांसाठी आव्हानात्मक होतं. अनेकदा लहान मुलं वाचतात तसं ते वाचत नाहीत. त्यामुळं त्यांच्यासाठी हे काहीतरी नवं असतं. या लहानशा स्टुडिओमध्ये ते गोष्टी वाचायला येतात पण अनेकदा त्यांना वाईट वाटतं. कारण त्यांना हे कसं करायचं ते माहिती नसतं. त्यामुळं त्यांना शांत करून त्यांची ही भीती कमी करणं हे यातलं मोठं काम होतं."

फोटो स्रोत, STORYBOOK DADS
लुईस यांनी स्वतःच्या रेकॉर्डिंगबरोबरच इतर कैद्यांच्या रेकॉर्डिंगचं एडिटिंगचं कामही शिकलं होतं. त्यांच्या मते काही कैद्यांना या वाचनामध्ये काही अडचणी येतात. काहींचा त्यांच्या मुलांशी अगदीच कमी काळासाठी संपर्क आलेला असतो, असंही त्यांनी सांगितलं.
त्यांना स्वतःला एकदाच अशाप्रकारची भीती वाटली होती. त्यावेळी त्यांनी मुलांची खेळणी आणि बाहुल्यांबरोबर शूट केलं होतं.
"तुम्ही गोष्ट सांगत असता तेव्हा इतर कैदी तुम्हाला पाहत असतात. त्याठिकाणी शाळेच्या जुन्या आठवणी येतात. पाहणारे आपली खिल्ली तर उडवणार नाहीत ना, असं वाटत असतं."
पण अनेक कैद्यांना त्यांच्या गोष्टींची सकारात्मक परिणाम झाल्याचं जाणवलं. त्यातून त्यांना पुढं ते करत राहण्याचा आत्मविश्वास मिळाला असं शॅरन म्हणतात.
कैद्यांना नंतर हे समजत होतं की, त्यांच्या मुलांना त्यांचा एवढा अभिमान वाटतो की ते त्यांच्या स्टोरीच्या रेकॉर्डींग शाळेमध्ये नेतात आणि त्यांच्या मित्रांना दाखवतात. पुढची स्टोरी कधी येणार यासाठी ते वाट पाहत असतात.
"यातून मुलांना कोणीतरी आपल्यावर प्रेम करत आहे. आपल्याकडे दुर्लक्ष केलेलं नाही, ही जाणीव होते," असं शॅरन म्हणाल्या.

फोटो स्रोत, TREVOR BURROWS
तुरुंगातून सुटल्यानंतर पाच वर्षांनंतर अजूनही लुईसनं पुन्हा गुन्हा केलेला नाही.
त्यांनी प्रॉपर्टी केअर सर्व्हीसमधील फेन्सर (तारांचे कुंपन करणारे) म्हणून काम पुन्हा सुरू केलं आहे. स्टोरीबूक डॅड्सबरोबर ठरावीक काळ काम केल्यानं, त्यांना त्यांच्या नेहमीच्या कामाच्या कठिण काळातही फायदा होतो.
त्यांनी दारू सोडली असून गेल्यावर्षी त्यांना तिसरा मुलगा झाला आहे.
लुईस यांनी रागाला वाट मोकळी करून देण्यासाठी हौशी बॉक्सिंगही सुरू केलं आहे. पण हिपमध्ये असलेल्या काही समस्यांमुळं त्यांना त्याऐवजी कोचिंगकडं वळावं लागलं.
मुलांना गोष्टी सांगणं हे आता त्यांचं सर्वात आवडीचं काम बनलंय.
मोठ्या मुलाबरोबर ते त्याच्या पद्धतीनं हॅरी पॉटर कलेक्शनच्या माध्यमातून हे काम करतायत. अद्याप प्रिझन ऑफ अॅझकबानच्या भागापर्यंत पोहोचले नसल्याचं त्यांनी सांगितलं. पण जेव्हा हा भाग येईल तेव्हा शॉक टॅक्टिकचा वापर करणार असल्याचं ते म्हणाले. शॉक टॅक्टिक म्हणजे संवादाची एक पद्धत, जी मुलाला अशा गोष्टीपासून दूर नेईल, जे त्याला जीवनात खाली जाण्यासाठी प्रवृत्त करत असेल.
"मी त्याला तुरुंगांबद्दलचं सत्य सांगेन. ते किती भीतीदायक असतात ते सांगेल," असं लुईस म्हणाले.
तसंच गोष्टी सांगण्याच्या आनंदामुळं त्यांना त्यांच्या जीवनाची कहाणी नव्यानं लिहिण्याची संधी कशी मिळाली, तेही लुईस मुलाला सांगणार आहेत.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








