‘एका सेल्फीमुळं कळलं की मला लहानपणी पळवून नेलं होतं’

- Author, सारा मॅक्डर्माट
- Role, बीबीसी वर्ल्ड सर्विस
1997 चा एप्रिल महिना. केप टाऊनच्या हॉस्पिटलमध्ये बाळंतकक्षातून एक परिचारिकेचे कपडे घातलेली बाई तीन दिवसांच्या एका बाळाला हातात घेऊन बाहेर पडली.
बाळाची आई झोपलेली असताना ती बाळाला घेऊन बाहेर पडली. या बाळाची खरी ओळख पटायला पुढे 17 वर्षांचा काळ गेला.
2015. केप टाऊनच्या झ्वान्स्क हायस्कुलच्या शिक्षण सत्राचा पहिला दिवस होता आणि मिशे सोलोमनच्या
शाळेतल्या अंतिम वर्षाची ती सुरुवात होती.
या वर्षाच्या जानेवारी महिन्यात मिशे भोवती इतर मुलांनी एकच गलका केला होता. "आपल्या शाळेत एक कॅसिडीनर्स नावाची मुलगी नव्याने आलीय, ती तुझ्यापेक्षा 3 वर्षांनी लहान असली तरी अगदी तुझ्याचसारखी दिसतेय", असं ती पोरं सांगत होती.
सुरुवातीला मिशेने त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं.
पण जेव्हा ती लहान मुलगी खाली व्हरांड्यात समोर आली तेव्हा मिशेला अचानक आपलं तिच्याशी काहीतरी नातंआहे असं वाटू लागलं. तिच्याकडे पाहून नक्की कसं वाटलं हे मिशेला शब्दांत मांडताही आलं नाही.
“तिला पाहिल्यावर ही आपली ओळखीची मुलगी आहे असं वाटलं, तिच्याकडे पाहून मला असं का वाटत होतं
तेच समजत नव्हतं”, असं मिशे सांगते.
त्यानंतर वयात अंतर असलं तरी मिशे आणि कॅसिडी एकमेकींबरोबर बराच काळ व्यतीत करू लागल्या.
“त्यानंतर आमचं एकदम बहिणींसारखंच नातं तयार झालं. वॉशरुमला गेल्यावर तिचे केस विंचर, तिला लिप ग्लॉस लावून दे असं आमचं सुरू झालं”, असं मिशे सांगते.
तुम्ही दोघी बहीणी आहात का असं कोणीही विचारलं तर त्या दोघी हसत हसत म्हणायच्या, “ते काही आम्हाला माहिती नाही, कदाचित पुढच्या-मागच्या जन्मात असू.”

फोटो स्रोत, MPHO LAKAJE
एकेदिवशी दोघींनी एक सेल्फी काढला आणि आपापल्या मित्रांना दाखवला, त्यांच्यात इतकं साम्य दिसत होतं की काही लोकांनी मिशेला ‘तू नक्की दत्तक तर गेलेली नाहीस ना?’ असा प्रश्न विचारला. ‘यावर अजिबात नाही’, असं मिशेने उत्तर दिलं होतं.
याप्रसंगानंतर मिशे आणि कॅसिडी आपापल्या घरी गेल्या आणि त्यांच्या कुटुंबीयांना त्यांनी हा सेल्फी दाखवला. मिशेची आई लॅवोना या मिशेला राजकुमारीच म्हणे. तिने तुम्हा दोघींमध्ये साम्य दिसतंय असं म्हटलं आणि मिशेला सिनेमा, मॉलमध्ये फिरायला घेऊन गेली. तर तिचे बाबा मायकल यांनी कॅसिडीच्या वडिलांना आपण इलेक्ट्रिक स्टोअरमध्ये पाहिलंय असं सांगितलं.
पण कॅसिडीचे आईबाबा सेलेस्ट आणि मोर्न नर्स यांनी तो फोटो फारवेळ निरखून पाहिला. पुढच्यावेळेस मिशे भेटली की तिला ‘तुझा जन्म 30 एप्रिल 1997 ला झालाय का?’ हा प्रश्न त्यांनी विचारायला सांगितला. कॅसिडीनं मिशेभेटल्यावर हाच प्रश्न विचारला.
त्यावर मिशे म्हणाली, “का गं असं का विचारलंस? तू माझ्या फेसबुकवर पाळत ठेवून आहेस का?”
कधी झाला एवढंच तिला हवं असल्याचं तिनं सांगितलं. त्यावर मिशेनं होय आपण 30 एप्रिल 1997 रोजी
जन्मल्याचं सांगितलं.
यानंतर काही आठवडे गेले. एके दिवशी गणिताचा तास सुरू असताना मिशेला मुख्याध्यापकांच्या कार्यालयातून बोलावणं आलं.
तिथं दोन समाजसेवक वाट पाहात बसले होते. त्यांनी मिशेला तिच्या जन्माची गोष्ट सांगितली. मिशेचं खरं नाव झेफेनी नर्स होतं. जन्मल्यानंतर तिसऱ्याच दिवशी तिला चोरुन नेण्यात आलं होतं. हे सगळं केप टाऊनच्या ग्रूच श्यूर रुग्णालयात घडलं होतं आणि 17 वर्षांपूर्वी तिची चोरी झाल्यावर तिचा कधीच शोध लागला नव्हता.

मिशेनं सगळी कथा ऐकली खरी. पण तिचा विश्वास बसत नव्हता. त्यानंतर त्या समाजसेवकांनी ते चोरीला बाळ गेलेलं म्हणजे तूच आहेस हे दाखवणारे पुरावे असल्याचं सांगितलं.
यावर मिशेनं आपला ग्रूट श्यूर रुग्णालयात जन्म झालेला नसून 20 मिनिटांच्याच अंतरावर असलेल्या रिट्रिट
रुग्णालयात आपण जन्मलो असल्याचं आपल्या जन्मदाखल्यावर लिहिलं असल्याचं सांगितलं.
त्यावर त्या समाजसेवकांनी मिशे रिट्रिटमध्ये जन्मल्याची कोणतीही नोंद नसल्याचं सांगितलं.
तरीही काहीतरी चुकलं असेल असं म्हणत मिशेनं डीएनए चाचणीला होकार दिला.
“ज्या आईनं मला वाढवलं ती माझ्याशी कधीच खोटं बोलणार नाही, यावर माझा नितांत विश्वास होता. त्यातही मी कोण आहे, कुठून आलेय याबद्दल तर नक्कीच होता, असं मिशे सांगते. त्यामुळे डीएनए चाचणीचा निकाल नकारात्मकच लागेल असं माझ्या मनानं घेतलं होत”, असं ती सांगते.
पण तिला वाटत होतं तसं झालं नाही. या चाचणीतून ती मिशे सोलोमन नसून झेफेनी नर्स असल्याचं स्पष्ट झालं. 1997 साली ग्रूटं श्यूरमधून चोरीला गेलेलं बाळ म्हणजे तीच असल्याचं सिद्ध झालं होतं.
मिशे सांगते, “मी धक्का बसून मटकन खालीच बसले, सगळं आयुष्य हातातून निसटलंय असं मला वाटू लागलं.”
एक चोरीला गेलेलं बाळ आता जवळपास दोन दशकांनंतर प्रौढत्वाच्या उंबरठ्यावर होतं. तिची स्टोरी दक्षिण आफ्रिकेत सर्वत्र वेगानं प्रसिद्ध झाली. तिचं आयुष्य तात्काळ पूर्णपणे बदलूनच गेलं.
ती आता घरात परतू शकणार नाही असं तिला सांगण्यात आलं. तीनच महिन्यांत ती 18 वर्षांची होणार होती
आणि स्वतःचे निर्णय स्वतः घेण्यास सिद्ध होणार होती. त्यामुळे तिला एका सुरक्षित घरात ठेवण्यात आलं.
पण याहून मोठा धक्का दिला बसला. तो म्हणजे मिशे ज्या लॅवोना सोलोमनला आजवर आई मानायची, जिनं
तिला वाढवलं होतं तिला अटक झाली होती.
“त्यामुळे मी कोलमडूनच गेले. मला तिची गरज होती. हे का होतंय. काय चाल्लंय नक्की हे तिला विचारायचं होतं. मी तिची नसून परकी होते ही भावना मनात उचंबळून आली होती.”
ज्यांना ती वडील मानायची त्या मायकल यांची पोलिसांनी चौकशी केली तेव्हा मिशेही तिथं उपस्थित होती.

मिशे सांगते, त्यांच्या चेहऱ्यावरचा ताण मला दिस होता, त्यांचे आरक्त डोळे मला दिसत होते, मी घाबरून गेले होते.
मुलीचं अपहरण करण्याच्या कटात वडीलही सामील होते का याचा शोध पोलीस घेत होते.
मिशे सांगते, “माझे बाबा अत्यंत मृदू आणि शांत स्वभावाचे आहेत. पण ते माझ्यासाठी ते आधारवड आहेत, माझे हिरो आहेत, माझे बाबा आहेत. माझ्यासाठी ते कणखर पुरुष आहेत. पण इथं मात्र ते एखाद्या लहान मुलासारखे दिसत होते. मी यात सहभागी नव्हतो, मी हे केलेलं नाही” असं ते सांगत होते.
मिशेला तिच्या परवानगीविना मूळ जन्मदात्या पालकांपासून दूर करण्यात मायकल सोलोमन यांचा सहभाग असल्याचा पुरावा सापडला नाही त्यामुळे पोलिसांनी त्यांना सोडून दिलं. मायकल यांच्या माहितीनुसार, लॅव्होना गरोदर होती पण तिचा गर्भपात झाला.
तरीही तिनं खोटंखोटं गरोदर असल्याचं पुढेही भासवलं आणि झेफेनी नर्सचा म्हणजे मिशेचा जन्म झाला तेव्हा तिला तिनं आपणच तिला जन्म दिल्याचं सांगत घरी आणलं.
आता लॅव्होना सोलोमन पोलिसांच्या ताब्यात होती. बाळाचं अपहरण आणि आपण बाळाची आई असल्याचं खोटं सांगण्याचा आरोप तिच्यावर होता. त्याच्या खटल्याच्या प्रतीक्षेत ती होती.
या मुलींच्या जन्मानंतर सेलेस्ट आणि मोर्न नर्स दाम्पत्याला आणखी तीन मुलं झाली पण त्यांनी झेफेनीचा शोध थांबवला नव्हता. तिच्या अपरोक्ष ते तिचा वाढदिवस साजरा करत होते. अगदी त्यांचा घटस्फोट झाल्यावरही ही परंपरा ठेवली होती.
पण हे सगळं सुरू असताना त्यांचं हरवलेलं बाळ त्यांच्या जवळच्या भागातच लहानाचं मोठं होत होतं. सोलोमन यांचं घर नर्स मंडळींच्या घरापपासून फक्त 5 किलोमीटर अंतरावर होतं. इतकच काय नर्स यांच्या घरासमोरील मोकळ्या जागेत लहान असताना मिशे दुडूदुडू धावत खेळत असे आणि मायकलही तिथं फुटबॉल खेळत असतं.
या सगळ्यांच्या आयुष्यांनी अशी वेगवेगळी वरखाली जाणारी वळणं घेतली असली तरी अखेर नर्स कुटुंबाच्या प्रार्थनेला यश आलं होतं. मिशेला तिचे जनक पालक मिळाले होते.
मिशे सांगते, त्यांनी मला कवटाळलं, घट्ट मिठी मारली आणि ते रडू लागले पण मला कसंतरीच होत होतं. काहीतरी चुकलंय असं मला वाटत राहिलं.

फोटो स्रोत, HUISGENOOT/NONCEDO MATHIBELA
या लोकांनी फार भोगलंय म्हणून त्यांच्याबरोबर गेलं पाहिजे असं वाटत असलं तरी मला तेव्हा काहीच वाटलं नाही. मला काहीच त्यांची आठवण येत नव्हती.
मिशे अगदीच भावनांच्या गर्तेत सापडली होती. एक अनोळखी वाटणारे पालक मधला काळ विसरुन तिला
आपलंस करण्याच्या जोरदार प्रयत्नात होते.
आणि दुसरे पालक ज्यांच्यावर तिनं प्रेम केलं होतं ते उद्ध्वस्त झाले होते, त्या पालकांतली एक व्यक्ती गजाआड होती.
ऑगस्ट 2015 मध्ये केप टाऊनमधील उच्च न्यायालयात लेव्होनाच्या खटल्यात तिची बाजू ऐकायला मिशे आणि नर्स दाम्पत्य उपस्थित होतं.
पूर्ण खटल्यात आपण काहीच चूक केलं नसल्याचं लेव्होनानं सांगितलं. “गर्भ राहाण्यासाठी आपण अनेकदा प्रयत्न केले, अनेकदा आपला गर्भपात झाला, मूल दत्तक घेण्यासाठी आपण कसे प्रयत्न केले” हे सगळं तिनं कोर्टात सांगितलं.
आपल्यावर उपचार करणाऱ्या एका सिल्विया नावाच्या बाईने मला हे बाळ दिल्याचं तिनं सांगितलं. हे बाळ एका तरुण मुलीचं असल्याचं आणि त्या तरुणीला ते बाळ नको असल्यामुळे दत्तक देत आहे असं सिल्वियानं आपल्याला सांगितलं असं लेव्होनानं सांगितलं. पण सिल्विया अस्तित्वात असल्याचा कोणताच पुरावा मिळाला नाही.

फोटो स्रोत, Getty Images
इतकंच नाही तर ते बाळ चोरणारी व्यक्ती लेव्होनाच असल्याचं साक्षीदाराने जवळपास दोन दशकांनंतर झालेल्या ओळखपरेडीत ओळखलं. त्यामुळे लेव्होनाविरोधात पुरेसे पुरावे असल्याचं न्यायाधीशांनी स्पष्ट केलं.
2016 साली लेव्होनाला अपहरण, लबाडी, बालकायद्याचं उल्लंघन या आरोपांमुळे 10 वर्षांचा तुरुंगवास ठोठावण्यात आला. तिनं खटल्यादरम्यान काहीच पश्चाताप झाल्याचं न दाखवल्यामुळे न्यायाधीशांनी तिच्यावरटीकाही केली.
मिशे सांगते, “मला तर मरणच आल्यासारखं वाटलं, मी या सगळ्या परिस्थितीशी कशी जुळवून घेईन असा प्रश्नमी स्वतःला विचारत होते, मी आजवर जिला आई मानत होते तिच्याविना मी आता कशी राहाणार हा प्रश्न मला सतावत होता.”
त्यानंतर काही काळाने मिशे लेव्होनाला तुरुंगात भेटायला गेली. समाजसेवक शाळेत आल्यानंतर हे त्यांचं पहिलंच बोलणं होतं. “महिला कैद्यांच्या पोशाखातल्या आईला पाहिलं आणि मला काळीज तुटल्यासारखं वाटलं. मी रडले... जोरजोरात रडू लागले...”
मिशेला खरंच त्यातलं सत्य जाणायचं होतं. लेव्होनाने तिला उचलल्याच्या दिवशी काय घडलं हे तिला ऐकायचं होतं.
मी तिला म्हणाले, “माझ्यात तुझा अंश नाही आणि मी दुसऱ्या कोणाची आहे. तू कोणाचा तरी हक्क हिरावून
घेतलास त्यामुळे माझं नशीबचं कोलमडून गेलंय. याचं मला दुःख झालंय. तू माझ्याशी खोटं बोलली असताना मी तुझ्यावर कसा विश्वास ठेवणार, तू विश्वासाला तडा दिलास... माझ्याशी नातं जोडायचं होतं तर तू सत्य बोलायलाहवं होतंस...” त्यावर ती म्हणाली, “एके दिवशी ...मी तुला सांगेन....”
“हे सगळं तिनं केलं नसल्याचं ती म्हणाली, पण मला वाटतं तिनं हे केलं असावं.”

फोटो स्रोत, Getty Images
क्षमा केल्यामुळे दुःखाचा घाव भरुन निघतो असं मिशे सांगते, आय़ुष्य चालत राहिलंच पाहिजे. मी तिला क्षमा केली आणि मी अजूनही तिच्यावर प्रेम करतेय हे तिला माहिती आहे.
18 वर्षांची झाल्यावरही मिशेने आपल्या जनक पालकांकडे जाण्याचा निर्णय घेतला नाही.
ती सांगते, “त्यांनी एकमेकांना घटस्फोट दिला होता, ते कुटुंब विस्कटलेलं होतं. त्यामुळे मायकल यांच्याबरोबर राहाण्याचा निर्णय घेतला. ते सुरक्षित घर होतं आणि माझं होतं.”
मिशेला तिच्या जन्मदात्या कुटुंबाशी संबंध प्रस्थापित करण्यात फार त्रास झाला, त्यांनी आपल्या हिरावून नेलं असं तिला कधीकधी वाटतं.

अजूनही ती लेव्होनाला तिच्या घरापासून 120 किमी अंतरावरच्या जेलमध्ये भेटायला जाते. आता तिला स्वतःची दोन मुलं आहेत.
अजूनही ती लेव्होनाचा कारावास संपण्याची आणि ती घरी परतण्याची वाट पाहात आहे.
आपल्या मिशे आणि झेफेनी या दोन्ही ओळखी जपण्यात ती कशीबशी यशस्वी झाली आहे.
मिशे सांगते, “सुरुवातीला मी माझ्या झेफेनी या ओळखीचा द्वेष करे असं मला वाटतं.”
“कोणत्याच आमंत्रणाविना अचानक ही ओळख माझ्यावर येऊन कोसळली, त्यामुळे दुःख आणि वेदना वाट्याला आल्या. पण झेफेनी ही ओळख सत्य आहे. 17 वर्षांची मिशे ही ओळख खोटी होती. दोन्ही नावांत
मी कसाबसा ताळमेळ राखलाय. तुम्ही मला झेफेनी म्हणा किंवा मिशे... मला काहीही चालतंय.”
मिशे यांची ही कथा जोएन जॉवेल यांनी लिहिलेल्या ‘झेफेनीः दोन माता, एक कन्या’ पुस्तकात आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








