मोईन काबरा: 'जसं पुस्तकांमुळे बाबासाहेबांचं आयुष्य बदललं तसं माझंही बदलेल'

मोईन
    • Author, राहुल रणसुभे
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

“ज्याप्रमाणे बाबासाहेबांचं पुस्तकांनी आयुष्य बदललं, तसं पुस्तकं आपलंसुद्धा आयुष्य बदलू शकतात असं मला आतून कुठं तरी वाटायला लागलं आणि तेव्हापासून मी पुस्तकांना आपला मित्र बनवून घेतलं. आज मी दररोज दिवसाचे 40 - 45 पेजेस वाचत असतो. एका आठवड्यामध्ये 2 पुस्तकं, 15 दिवसांमध्ये 4 तर एका महिन्यामध्ये 8 पुस्तकं वाचणं होतात.”

ही दिनचर्या आहे बुलडाण्याच्या सुल्तानपूरमध्ये राहणाऱ्या मोईन काब्राची.

बुलडाण्यापासून 75 किमीवर असलेल्या सुल्तानपुर या गावातील मोईन काबरा हा तरूण लोकांमधील वाचनप्रेम वाढावं यासाठी प्रयत्न करतोय. यासाठी त्याने स्वखर्चाने स्वतःच्या घरी मोफत लायब्ररी सुरू केली आहे. मोईनच्या घराच्या दाराचा पडदा बाजूला केला की दिसतात ते पुस्तकांनी भरलेले रॅक.

मोईनचं स्टडी बंकर

मोईनच्या या लायब्ररीत जवळपास 700 पेक्षा जास्त पुस्तकं आहेत आणि विशेष म्हणजे यातील अर्ध्याहून जास्त त्याने वाचलेली आहेत. मोईनने या लायब्ररीला “स्टडी बंकर” असं नाव दिलंय. दरवाज्यातून आत शिरल्यास या स्टडी बंकरच्या एका कोपऱ्यात मोईनचा टेबल आहे.

या टेबलावर गौतम बुद्धांची प्रतिमा, त्याबाजूलाच बाबासाहेबांचा एक फोटो, तुकारामांची प्रतिमा, पेनांनी भरलेले दोन कप, त्यातील एका कपावरही बाबासाहेबांचा फोटो, त्यासमोर मोबाईल स्टँड, नाईट लँप, एक लॅपटॉप आणि त्यासमोर खुर्चीवर बसेलला मोईन असं चित्र आपल्या डोळ्यासमोर दिसतं.

मोईनचा टेबल

या स्टडी बंकरच्या भिंती दिसणं थोडं अवघडच. कारण त्याने या भिंतीवर भारतात होऊन गेलेल्या महान व्यक्तींचे फोटो, नकाशे, सुविचार, सुर्यमाला अशा विविध फोटोंनी त्याच्या घरच्या भिंती भरल्या आहेत.

याशिवाय त्या स्टडी बंकरमध्ये एक पलंग, सोफा, टी पॉय आणि त्यावरही पुस्तक ठेवलेली, एक लोखंडी कपाट या गोष्टी नजरेत पडतात.

पुस्तकांशिवाय त्या स्टडीबंकरमध्ये इतर विषयांवर चर्चा होत असावी हे विरळच. अनेक वाचनप्रेमी या स्टडीबंकरला भेट देतात. तिथेच बसून निवांतपणे पुस्तकं वाचतात, वाचलेल्या पुस्तकावर मोईनशी चर्चा करतात. हाच या घरातील दिनक्रम सुरू असतो.

बाबासाहेबांमुळं लागली वाचनाची आवड

आपल्या पुस्तकप्रेमाविषयी मोईनला विचारल्यावर तो भरभरून बोलायला लागतो.

तो सांगतो, सातवी पासूनच मला वाचनाची आवड लागली. सातवीत असताना मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावरील एक चित्रपट पाहिला होता. ज्यामध्ये मामुटी या अभिनेत्याने बाबासाहेबांची भूमिका साकारली होती. त्या चित्रपटातून मला बाबासाहेब समजले म्हणून शकतो. आणि तिथूनच मला त्यांचं पुस्तकांवरील प्रेम बघून मला वाचनाची आवड निर्माण झाली. बाबासाहेबांचं ज्याप्रमाणे पुस्तकांनी आयुष्य बदललं, तसं पुस्तकं आपलंसुद्धा आयुष्य बदलू शकतात असं वाटू लागलं. त्यामुळे मी छोटं 10 रुपयांच्या पुस्तकापासून वाचनाची सुरूवात केली.”

ईदला नवीन कपड्यांऐवजी घेतो पुस्तकं

मोईनच्या कुटुंबातील कोणीही जास्त शिकलेले नाही. त्यामुळे त्याच्या घरची आर्थिक परिस्थिती जेमतेम आहे. उदरनिर्वाहासाठी त्यांचं कुटुंब किराणा दुकान चालवतं. अशा परिस्थितीतही मोईनने त्याची पुस्तक वाचनाची आवड जपली आहे.

आपल्या सुरुवातीच्या दिवसांबद्दल बोलताना तो सांगतो, जेव्हा सुरूवातीला पुस्तकांसाठी पैसे नसायचे तेव्हा मी 10-10-20 रुपये सेव्हींग करत होतो. आताही मी दररोज 20 रुपये सेव्हींग करतो. तर दर महिन्याला मी 600 रुपयांची पुस्तकं खरेदी करतो."

"ईद असो किंवा दिवाळी असो तेव्हा मी कपडे न घेता पुस्तकांना प्राधान्य देतो. तर माझी 10 रुपयांच्या 1 पुस्तकापासून झालेली सुरूवात आज माझ्या संग्रहात 700-750 पुस्तकं आहेत आणि यापैकी निम्मी पुस्तकं मी वाचली आहेत आणि माझं वाचन सध्या सुरूच आहे,” मोईन सांगतो.

वयासोबतच पुस्तकांची आवडही बदलत गेली

मोईनने सुरुवातीला पंचतंत्रच्या गोष्टी”, “सिंदबादच्या सफरींचे किस्से”, “शेखचिल्लीचे कारनामे”, “चांदोबा”, “ठकठक” अशी पुस्तकं वाचली. त्यानंतर जसं वय वाढत गेलं, तसं त्याची पुस्तकंही बदलत गेली.

मोईन सांगतो, “मी आठवीत असताना डॉ. एपीजे अब्दूल कलाम यांची “अग्नीपंख” ही बायोग्राफी वाचली. त्यानंतर दहावीत असताना मृत्यूंजय, ययाती, छावा, संभाजी ही पुस्तकं वाचलं. तर बारावीला असताना माझ्या आयुष्यात उपरा, कोल्हाट्याचं पोर, बलुतं ही दलीत साहित्यात मोडणारी पुस्तकं आली आणि तिथून माझ्या वाचनाची दिशा बदलली.

"बारावीतच असताना मला विश्वास नांगरे पाटलांचं मन में है विश्वास, अन्सर शेख यांचं युपीएससी मी आणि तुम्ही आणि भरत आंधळे सरांची एक बायोग्राफी आहे गरुडझेप नावाची ती मी वाचली. आणि तिथूनच मला प्रशासनामध्ये जायची इच्छा निर्माण झाली.”

मोईनचं स्टडी बंकर

मोईनने 12 वी नंतर युपीएसस्सीची तयारी करण्यासाठी पुणं गाठलं. मात्र पुण्यात तो जास्त रमला नाही. काही दिवसातंच तो सुल्तानपूरला परत आला आणि आपण गावातच पुण्यासारखं वातावरण तयार करायचं आणि युपीएसस्सीची तयारी करायची असं त्यानं ठरवलं.

त्याच्या काकांची बंद असलेली एक पडीक खोली त्याने त्याच्या स्टडी बंकरसाठी निवडली. आणि त्यातच त्याने आतापर्यंत वाचलेली सर्व पुस्तकं ठेवून तिथेच अभ्यासाला सुरूवात केली.

सर्वांसाठी खुलं असणारं स्टडी बंकर

मोईनच्या स्टडी बंकरचं वैशिष्ट्य म्हणजे इथे कोणीही येऊन मोफत पुस्तकं वाचू शकतो. अगदी मोफत. तो कोणाकडूनही कसलीही फिस चार्ज करत नाही.

तो सांगतो, “हा संग्रह मी प्रत्येकासाठी उघडा ठेवला आहे. तुम्ही इथे या, इथं येऊन वाचत बसा. जर तुम्हाला कधी काही पुस्तकं हवी असतील, तर तुम्ही ती एका आठवड्यासाठी ती घरी घेऊन जाऊ शकता. यात अट एवढीच असते की, तुम्ही त्या पुस्तकांची काळजी घेतली पाहिजे आणि ती पुस्तकं तुम्ही वाचली पाहिजे. माझ्या शाळेमधील काही सर त्यांच्या विद्यार्थ्यांना पाठवतात, तर त्यांना मी काही पुस्तकं देत असतो.”

शिक्षक विद्यार्थी देतात नियमित भेट

विद्यार्थ्यांनी दिली स्टडी बंकरला भेट

मोईनचं ज्या शाळेत शिक्षण झालं त्या श्री शिवाजी हायस्कूल शाळेचे मुख्याध्यापक सुनिल सोळंके आणि शिक्षक त्यांच्या विद्यार्थ्यांना नियमित या स्टडीबंकरला घेऊन येतात.

ते सांगतात आमचे विद्यार्थी इथे मोईनच्या स्टडी बंकरला भेट देतात आणि विविध प्रकारची पुस्तकं वाचतात. नुसतं वाचतच नाही तर ती पुस्तकं जेव्हा ते मोईनकडे वापस आणून देतात तेव्हा ते त्या पुस्तकावर चर्चाही करतात.”

स्वप्नील कोलते साहित्य पुरस्कार

केवळ पुस्तक वाचूनच मोईन थांबत नाही. तर त्या पुस्तक वाचताना आलेला अनुभव तो नियमित लिहून काढतो आणि हा त्याचा अनुभव तो सोशल मीडियावर शेअर करतो. त्याच्या या लिखाणाला वाचकांकडून चांगली पसंतीही मिळते.

या त्याच्या पुस्तकांच्या अनुभवांची दखल घेत त्याला 2022 चा “स्वप्नील कोलते साहित्य पुरस्कार” देण्यात आला आहे. एक लाख रुपये रोख, स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र असं त्या पुरस्काराचं स्वरूप होतं.

WE READ ची संकल्पना

We Read

लोकांमध्ये पुस्तकांची आवड निर्माण व्हावी यासाठी मोईनने त्याच्या मित्रासोबत We Read नावाची संकल्पना सुरू केलीये. या माध्यमातून वाचकांना हवी असलेली पुस्तकं तो माफक दरात त्यांच्यापर्यंत पोस्टाने पोहोचवतो.

सध्या सोशल मीडियाच्या जगात वाचन संस्कृती लोप पावत चाललीये अशी ओरड अनेकजण करतात. याबद्दल बोलताना मोईन म्हणतो, “तुम्हाला सोशल मिडियावर केवळ माहिती मिळते. ज्ञान तुम्हाला पुस्तकांतूनच मिळेल. पुस्तकं तुम्हाला समृद्ध करतात. तुम्हाला विचार करायला भाग पाडतात. पुस्तक वाचणं महत्त्वाचं नसून पुस्तक जगणं महत्त्वाचं आहे. एकंदरीत पुस्तक तुमचं मस्तक घडवतात. आणि हा घडलेला मस्तक कोणापुढेही नतमस्तक होत नाही.”

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)