अंबरनाथमध्ये पुन्हा ट्विस्ट, राष्ट्रवादीच्या 4 नगरसेवकांचा शिंदेसेनेला पाठिंबा; सत्ता कोण स्थापन करणार?

फोटो स्रोत, Alpesh Karkare
- Author, अल्पेश करकरे
- Role, बीबीसी मराठीसाठी
अंबरनाथ नगरपालिकेच्या सत्तास्थापनेत आणखी एक ट्विस्ट आला आहे. भाजपसोबत असलेल्या राष्ट्रवादीच्या 4 नगरसेवकांनी शुक्रवारी (9 जानेवारी) अचानक एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पाठिंबा दिला. त्यामुळे शिवसेनेची अंबरनाथ पालिकेवरील सत्ता कायम राहणार आहे.
सोमवारी (12 जानेवारी) होणाऱ्या उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपचाच उपनगराध्यक्ष बसेल, असं वातावरण असताना गट नोंदणी करण्याच्या शेवटच्या दिवशी अचानक राष्ट्रवादीच्या 4 नगरसेवकांनी शिवसेनेला पाठिंबा दिला. त्यामुळं आता शिवसेनेचं संख्याबळ 32 झालं असून उपनगराध्यक्ष, विषय समित्या शिवसेनेकडेच राहणार आहेत.
त्यामुळे, भाजपचा नगराध्यक्ष निवडून आला असला, तरी शिवसेनेने उपनगराध्यक्षपद आणि विषय समितीच्या आघाडीवर यश मिळवलं आहे.
अंबरनाथ नगरपालिकेत शिंदे शिवसेनेचे सर्वाधिक 27 नगरसेवक निवडून आले होते. त्यानंतर एक अपक्षाच्या मदतीने शिवसेनेचं संख्याबळ 28 वर पोहोचलं. सत्तास्थापनेसाठी शिवसेनेला आणखी 2 नगरसेवकांची आवश्यकता असताना किंगमेकरच्या भूमिकेत असलेल्या काँग्रेस आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी भाजपाला पाठिंबा दिला.
त्यात काँग्रेसमधून निलंबित 12 नगरसेवकांनीही भाजपमध्ये प्रवेश केल्यानं भाजपचं संख्याबळ 15 वरून 31 वर पोहोचलं. मात्र, पुन्हा एकदा राजकीय समीकरण बदललं आहे. अजित पवार गटाचे 4 आणि 1 अपक्ष नगरसेवक सोबत घेत शिंदेसेनेकडे 32 नगरसेवकांचं संख्याबळ झालं आहे.
त्यामुळे शिंदेसेनेच्या हातून नगराध्यक्षपद निसटलं असलं, तरी त्यांना उपनगराध्यपद आपल्याकडे राखण्यात यश आलं आहे.
'ते' 4 नगरसेवक कोण?
अजित पवार गट नगरसेवक
- सदाशिव पाटील
- मीरा शेलार
- सचिन पाटील
- सुनिता पाटील
आणि एक अपक्ष नगरसेवकाने शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे.
अंबरनाथमधील राजकीय उलथापालथ, आतापर्यंत काय घडलं?
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यातच त्यांना मोठा राजकीय धक्का बसला होता. ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ नगरपरिषदेत सर्वाधिक जागा जिंकूनही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला आपला नगराध्यक्ष निवडता आला नाही.
मात्र, हा राजकीय धक्का एकनाथ शिंदे यांच्यापुरता मर्यादित राहिला नाही, तर महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरही इथल्या राजकीय समीकरणांची चर्चा झाली. याचं कारण अंबरनाथ नगराध्यक्षपदासाठी भाजप आणि काँग्रेस हे दोन पक्ष एकत्र आले.
स्थानिक समीकरणांमधून काँग्रेस आणि भाजप एकत्र आली असली, तरी या घडामोडीनं राजकारणात मात्र एकच खळबळ उडवून दिली होती.
खरंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला अंबरनाथ नगरपरिषदेच्या निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळाल्या. मात्र, शिंदेंच्या शिवसेनेला बाजूला ठेवत भाजप, काँग्रेस, अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येत सत्ता स्थापन केली.
मात्र, अंबरनाथ नगरपरिषदेतल्या या घडामोडींनंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी संबंधित नगरसेवकांवर कारवाई केली. भाजप, अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि काँग्रेसने अंबरनाथ विकास आघाडी तयार केल्यानंतर सपकाळ यांनी काँग्रेसच्या नगरसेवकांना पक्षातून निलंबित केलं होतं.
काँग्रेसचे 12 नगरसेवक भाजपमध्ये
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी कारवाई केल्यानंतर ब्लॉक अध्यक्ष प्रदीप पाटील नाराज झाले. त्यांच्यासह 12 नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
- दर्शना पाटील
- अर्चना पाटील
- हर्षदा पाटील
- तेजस्विनी पाटील
- प्रदीप पाटील
- विपुल पाटील
- कबीर गायकवाड
- मनीष म्हात्रे
- धनलक्ष्मी जयशंकर
- संजवणी देवडे
- दिनेश गायकवाड
- किरण राठोड
सर्वाधिक जागा जिंकूनही शिंदेंची शिवसेना विरोधी बाकांवर
अंबरनाथ नगरपरिषदेच्या 59 जागांसाठी निवडणूक झाली होती. या नगरपरिषद निवडणुकीमध्ये स्थानिक पातळीवर कुठलीच युती-आघाडी झाली नव्हती. परिणामी सर्व पक्ष स्वतंत्रपणे लढले होते.
निवडणुकीच्या निकालात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 23 जागा मिळाल्या. म्हणजेच, शिंदेंची शिवसेना सर्वाधिक जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला.
त्यापाठोपाठ भाजपला 16 जागा, काँग्रेसला 12 जागा आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 4 जागा जिंकता आल्या होत्या.
जागांचं गणित पाहता एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचा नगराध्यक्ष होईल, हे स्पष्ट दिसत होतं. राज्यातील महायुतीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिंदेंची शिवसेना एकत्र येत अंबरनाथमध्ये सत्ता स्थापन करतील, असंही दिसत होतं.
मात्र, प्रत्यक्षात जुळलेली सत्ता-समीकरणं अनेकांची झोप उडवणारे ठरले.
कारण भाजप आणि शिवसेनेची युती न होता, इथे थेट काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपची युती झाली होती.

फोटो स्रोत, tejashrii karranjule/ Facebook
अंबरनाथ नगरपरिषदेत नगराध्यक्षपदासाठी झालेल्या चुरशीच्या लढतीत भाजपच्या तेजश्री करंजुळे यांनी बाजी मारली. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या मनिषा वाळेकर यांचा तेजश्री करंजुळेंनी पराभव केला.
या निवडणुकीत नगराध्यक्षपद भाजपकडे गेलं असलं, तरी शिंदेसेनेचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आले.
दुसरीकडे, अकोला जिल्ह्यातील अकोटमध्येही अनेकांना धक्का देणारी राजकीय समीकरणं जुळली. अकोटमध्ये भाजपनं असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएम पक्षासोबत युती केली.
काँग्रेस-भाजपच्या स्थानिक नेत्यांची भूमिका काय?
भाजप–काँग्रेस युतीवर शिवसेना शिंदे गटाने जोरदार टीका केली. ही युती म्हणजे 'अभद्र युती' असल्याचा आरोप शिंदे गटाकडून करण्यात आला. काँग्रेससोबत जाऊन भाजपने शिवसेनेचा घात केल्याचं शिवसेनेचे आमदार बालाजी किणीकर यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं.
बालाजी किणीकर यांनी म्हटलं, "राज्यामध्ये आणि केंद्रमध्ये भाजप शिवसेनेची युती आहे. या ठिकाणी नगरसेवकांचं संख्याबळ सगळ्यांत जास्त भाजप शिवसेनेचं होतं. भाजपचे नगराध्यक्ष निवडून आले होते, त्यामुळे जी नैसर्गिक युती आहे ती होणं अपेक्षित होतं. परंतु, काँग्रेसबरोबर युती करून महाराष्ट्रमध्ये एक वेगळा चुकीचा संदेश देण्याचं काम भाजपच्या स्थानिक नेत्यांनी केलं."
"महाराष्ट्रामध्ये भाजप शिवसेना नगरपालिका आणि नगरपरिषदेमध्ये मैत्रीपूर्ण लढले. कुणावर टीका टिप्पणी न करता निवडणुका झाल्या. यामध्ये सर्वात जास्त नगरसेवक भाजप आणि शिवसेनेचे निवडून आले. सर्वच ठिकाणी भाजप शिवसेनेची पारंपारिक युती होऊन सत्ता स्थापन झाली."
"परंतु, अंबरनाथमध्येच फक्त भाजपच्या 'काँग्रेसमुक्त भारत' हा जो नारा आहे त्याला छेद देण्याचं काम भाजपच्या स्थानिक नेत्यांनी काँग्रेसबरोबर युती करून, एक अभद्र युती स्थापन करून येणाऱ्या महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये चुकीचा संदेश दिला की काय असं आम्हाला वाटतं," असं मत किणीकर यांनी व्यक्त केलं.

फोटो स्रोत, BBC/ alpesh karkare
या सत्ता-समीकरणांबाबत शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे हे एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले, "ज्या पक्षांविरोधात महायुती नेहमी लढत आली आहे, शिवसेना लढत आली आहे, भाजप लढत आली आहे, त्या पक्षाशी फक्त सत्तेच्या लालसेपोटी भाजपच्या स्थानिक नेत्यांनी युती केली. मला वाटतं ते चुकीचं आहे. यावर पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी कारवाई केली पाहिजे."

फोटो स्रोत, Dr Shrikant Eknath Shinde/x
शिंदे गटाच्या टीकेला भाजपनेही प्रत्युत्तर दिलं. भाजप प्रदेश सचिव गुलाबराव करंजुळे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं, "गेल्या 25 वर्षांत भ्रष्टाचार केलेल्या शिंदे गटासोबत सत्तेत बसलो असतो, तर तीच खरी अभद्र युती ठरली असती. आम्ही महायुतीच्या माध्यमातून शिंदे गटाशी अनेकदा चर्चा करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्या नेत्यांकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही."
काँग्रेस, अजित पवार गट आणि अपक्ष यांचा तुम्हाला पाठिंबा मिळालाय. त्यामुळे नवीन आघाडी होणार का? या प्रश्नाला उत्तर देताना गुलाबराव करंजुळे म्हणाले होते, "भाजप नेते किसनराव कथोरे आणि अंबरनाथचे ज्येष्ठ यांच्या नेतृत्वाखाली भाजप पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्ष असा एक गट आम्ही तयार केला आहे. या गटाच्या नेतृत्वाखाली अंबरनाथचा आम्ही विकास करणार आहे."

फोटो स्रोत, BBC/ alpesh karkare
काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी याबद्दल ट्वीट करत म्हटलं, "अंबरनाथ येथे पक्षीय अभिनिवेश व चिन्ह बाजूला ठेवून स्थानिक पातळीवरील शिंदेसेनेने केलेल्या भ्रष्टाचाराविरुद्ध विविध पक्षीय कार्यकर्त्यांनी अंबरनाथ विकास आघाडी स्थापन केली. यात अपक्षही सामिल आहेत. त्यामुळे काँग्रेस आणि भाजप एकत्र आले अशा बातम्या चुकीच्या आहेत. कृपया नोंद घ्यावी."
याबाबत बोलताना अंबरनाथ काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रदीप पाटील म्हणाले, "आम्ही विकासाच्या मुद्द्यावर पाठिंबा दिला. आम्ही कुठलाही पक्ष भेदभाव केलेला नाही. अंबरनाथ शहरात काँग्रेसचे 12 नगरसेवक निवडून आले. आम्ही सत्तेची वाटचाल करू शकत नव्हतो. पण आम्हाला विकासाला साथ द्यायची आहे."
"अंबरनाथमध्ये नव्याने निवडून आलेल्या अध्यक्षांबद्दल आम्हाला विश्वास आहे. जनतेचा कौल हा मान्य केला पाहिजे. तेजश्री करंजुळे लोकांमधून निवडून दिलेल्या प्रतिनिधी आहेत, मग आम्ही त्यांना पाठिंबा का देऊ नये? त्यांच्या नेतृत्वात नवीन दिशा नवी ताकद पाहायला मिळेल."
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सदाशिव पाटील म्हणाले, "अंबरनाथ नगरपालिकेच्या होऊ घातलेल्या निवडणुकींमध्ये नवनिर्वाचित ज्या नगराध्यक्षा आहेत, त्या शिकलेल्या आहेत. त्या अतिशय चांगल्या प्रकारे काम करतील असा आम्हाला त्यांच्याबद्दल आत्मविश्वास आहे."
"कारण पदभार स्विकारताना त्यांनी जे भाषण केलं, की कामाचा दर्जा सुधारला पाहिजे आणि खरोखरंच ज्या कॉन्ट्रॅक्टर्सनं चांगलं काम केलं आहे त्यांच्या बिलांनाही आम्ही दिरंगाई करू देणार नाही. अशा महत्त्वाच्या बाबींवर त्यांनी दोन शब्द बोलले आहेत. आम्ही त्यांच्याबरोबर आहोत. विकासाला आम्ही त्यांना साथ देणार आहोत."
फडणवीस आणि सपकाळांची भूमिका काय?
'काँग्रेसमुक्त भारत'ची घोषणा करणाऱ्या भाजपनेच काँग्रेससोबत हातमिळवणी केल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं.
यावर एबीपी माझा वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "काँग्रेस आणि एमआयएमसोबत कोणतीच युती चालणार नाही, ही युती तोडावी लागेल. जर स्थानिक पातळीवर असं कोणी केलं असेल, तर हे चुकीचं आहे, शिस्तभंग आहे, यावर कारवाई केली जाईल. 100 टक्के मी आदेश दिले आहेत, यावर आम्ही कारवाई करणार आहोत."

फोटो स्रोत, Getty Images
दरम्यान, भाजपसोबत गेलेल्या काँग्रेसच्या सर्व नगरसेवकांविरोधात काँग्रेसनं शिस्तभंगाची कारवाई केली.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे (एमपीसीसी) गणेश पाटील यांनी अंबरनाथ काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष प्रदीप पाटील यांना पत्र लिहिले.
त्यात त्यांनी म्हटलं, "आपण अंबरनाथ नगरपालिका निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढविली असून आपल्या पक्षाचे 12 सदस्य निवडून आले आहेत. मात्र आपण प्रदेश कार्यालयास कोणतीही माहिती न देता अंबरनाथ नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांसोबत आघाडी केल्याचे प्रसार माध्यमांद्वारे कळाले. ही बाब अत्यंत चुकीची असून पक्षशिस्तीचा भंग करणारी आहे."
"ही बाब लक्षात घेता प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशावरून आपणास काँग्रेस पक्षामधून निलंबित करण्यात येत आहे. तसेच आपली ब्लॉक काँग्रेस कार्यकारिणी बरखास्त करण्यात येत आहे. त्याच प्रमाणे आपल्या सोबत पक्षशिस्तीचा भंग करणाऱ्या सर्व नगरसेवकांनाही पक्षामधून निलंबित करण्यात येत आहे."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











