राहुल नार्वेकरांवर उमेदवारांना धमकावल्याचा आरोप, विरोधकांकडून निलंबनाची मागणी; नेमकं प्रकरण काय?

फोटो स्रोत, Getty Images
राज्यात 29 महापालिकांच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय सभांचा धडाका सुरू आहे. दरम्यान आरोप-प्रत्यारोपांचं राजकारणही जोरदार सुरू आहे.
नुकताच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांवर विरोधी पक्षाच्या उमेदवारांना धमकावल्याचा आरोप करण्यात आला. त्यासंदर्भातील एक व्हीडिओदेखील समोर आला. खासदार आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी तो व्हीडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर शेअर केला होता.
यावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं. यावरून उद्धव ठाकरेंसह इतर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी नार्वेकरांवर गुन्हा दाखल करत त्यांचं निलंबन करण्याची मागणीही केली.
या पार्श्वभूमीवर राहुल नार्वेकर नेमकं काय म्हणाले? त्यांच्यावर नेमके काय आरोप होत आहेत? जाणून घेऊया.
नार्वेकरांवर काय आरोप करण्यात आले?
कुलाबा मतदारसंघात राहुल नार्वेकर यांनी आपले नातेवाईक बिनविरोध निवडून यावेत यासाठी उमेदवारांना उमेदवारी अर्ज भरण्यापासून रोखल्याचा आणि नामनिर्देशन भरण्याच्या सभागृहात उमेदवारांना धमकावल्याचा आरोप काही उमेदवारांनी केला होता.
महापालिका निवडणुकीकरीता अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस 30 डिसेंबर होता. कुलाबा मतदारसंघातील 3 प्रभागांतून राहुल नार्वेकर यांच्या नातेवाईकांनी अर्ज दाखल केले. ते अर्ज दाखल करत असताना राहुल नार्वेकर हे नातेवाईक म्हणून तिथे उपस्थित होते.
संध्याकाळी 5 वाजेपर्यंत अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होती. अनेकजण आपल्या अर्जासह तेथे उपस्थित होते. यावेळी त्यांना अर्ज भरण्यापासून रोखण्यात आल्याचा आरोप जनता दलाचे (सेक्युलर) ज्येष्ठ नेते व माजी खासदार हरीभाऊ राठोड यांनी केला.

फोटो स्रोत, Facebook/Rahul Narvekar
राहुल नार्वेकर आणि हरीभाऊ राठोड यांच्या वादाचा व्हीडिओही समोर आला होता. त्या व्हीडिओत नार्वेकर आणि राठोड यांच्यातील शाब्दिक चकमक झाल्याचं पाहायला मिळालं. हा व्हीडिओ समोर आल्यानंतर आरोप-प्रत्यारोप झाले. यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी नार्वेकरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.
व्हायरल व्हीडिओत काय?
नार्वेकर आणि राठोड यांच्यातील वादाच्या व्हीडिओमध्ये नार्वेकर फोन करून जनता दलाचे (सेक्युलर) ज्येष्ठ नेते व माजी खासदार हरीभाऊ राठोड यांची सुरक्षा तत्काळ काढून घेण्याच्या सूचना देताना दिसत आहेत. ते राठोड यांना सांगतात की, जर त्यांनी सहकार्य केले नाही, तर त्यांना सुरक्षा मिळणार नाही.
हरीभाऊ राठोड यांनी काय सांगितलं?
हरीभाऊ राठोड यांनी वृत्तसंस्था एएनआयशी बोलताना सांगितलं, "मीच नाही तर आम्ही 10-12 लोक तिथे उभे होतो. ते तिथल्यातिथे फिरत होते. ते माझ्याकडे येऊन म्हणाले की, तुम्ही मुख्यमंत्र्यांकडून कामे करवून घेता आणि इथे नामांकन दाखल करता, हे बरोबर नाही."

फोटो स्रोत, favebook/Haribhau Rathod
राठोड पुढे म्हणाले, "आम्ही तिथे बराच वेळ वाट पाहत होतो. काही लोकांना फॉर्म जमा करता आले नाहीत, तेव्हा मी सांगितलं की, संध्याकाळी 5 वाजण्यापूर्वी आलेल्या लोकांचे फॉर्म स्वीकारावेत. त्यावर नार्वेकर म्हणाले, 'इथे नेतृत्व मी करत आहे का?'
यानंतर त्यांनी आम्हाला सुरक्षा कोणी दिली, असा सवाल केला. त्यांनी सर्व सवलती काढून घेतल्या जातील, असंही नार्वेकर म्हणाले असल्याचं राठोड यांनी सांगितलं.
उद्धव ठाकरे काय म्हणाले?
उद्धव ठाकरे यांनी "अधिकाराचा दुरुपयोग करणाऱ्या अध्यक्षांना तत्काळ निलंबित केलं पाहिजे", म्हणत कारवाईची मागणी केली.
ठाकरे म्हणाले, "राहुल नार्वेकर हे विधानसभा अध्यक्ष आहेत. त्यांचा अधिकार हा सभागृहात असतो. सभागृहाच्या बाहेर ते राहुल नार्वेकर आहेत आणि आमदार आहेत. एक आमदार आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करून दमदाटी करतोय आणि संरक्षण काढून घेण्याचा आदेश स्वत: संरक्षणात राहून करतोय."
"निवडणूक आयोगाने हा विषय अतिशय गांभीर्याने घेतला पाहिजे आणि विधासभा अध्यक्षांना तत्काळ निलंबित केलं पाहिजे. कारण अध्यक्ष हे कोणत्याही पक्षाचे नसतात. ते जनतेचं न्यायासन म्हणजेच विधिमंडळ त्याचे अध्यक्ष असतात. निःपक्षपातीपणे कारभार करण्याची त्यांची जबाबदारी असते."

फोटो स्रोत, ANI
"अध्यक्ष हे कोणत्याही पक्षाच्या प्रचाराला जाऊ शकत नाहीत किंवा त्यांनी जाता कामा नये, असा लिखीत-अलिखीत संकेत आहे. मात्र, त्याला छेद देणारं उद्दाम वर्तन त्यांनी केलेलं आहे. म्हणून त्यांना तत्काळ निलंबित केलं पाहिजे. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे," अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली.
आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राहुल नार्वेकर यांच्याविरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. नार्वेकर यांनी पदाची प्रतिष्ठा घालवल्याची टीका सपकाळ यांनी केली.
ते म्हणाले, "राहुल नार्वेकर हे विधानसभा अध्यक्ष म्हणून नाही, तर आका म्हणून वावरत आहेत. अधिकाऱ्याची कृती अयोग्य अशा स्वरुपाचा शेरा असणारा अहवाल प्राप्त झाल्यानंतरही निवडणूक आयोग गप्प का?" असा प्रश्न सपकाळ यांनी उपस्थित केला.

फोटो स्रोत, Facebook/Harshwardhan Sapkal
नार्वेकर यांच्या कार्यालयात कार्यरत असलेले बहुतांश अधिकारी हे भ्रष्ट असल्याचा आरोपही सपकाळ यांनी केला. तसेच या संदर्भातला अहवाल मिळूनही निवडणूक आयोगाने कुठलीही कारवाई केलेली नाही. त्यामुळे या संदर्भात कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.
राहुल नार्वेकरांनी काय प्रतिक्रिया दिली?
राहुल नार्वेकर यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांनी याबाबत 'एक्स'वर पोस्ट करत स्पष्टीकरण दिलं.
नार्वेकर म्हणाले, "बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ येत असताना, आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण तीव्र झाले. अशातच, उमेदवारांना धमकावल्याची, माझ्याविरोधात झालेली खोटी तक्रार मागे घेण्यात आली असून माझ्यावरील आरोप निराधार आहेत."
"तक्रारीत काहीही तथ्य नाही. विधानसभेचा अध्यक्ष म्हणून मी नेहमीच निष्पक्षपणे काम केले आहे आणि कुलाब्याचा आमदार म्हणून माझ्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडल्या आहेत."

फोटो स्रोत, Facebook.com/rahulnarwekarbjp
जनता दलाने (सेक्युलर) तक्रार मागे घेतली आहे, असे नार्वेकर म्हणाले. तर, या प्रकरणी आपण वैयक्तिक तक्रार दाखल करणार असल्याचं जनता दलाचे (सेक्युलर) ज्येष्ठ नेते व माजी खासदार हरीभाऊ राठोड म्हणाले आहेत, अशी माहिती वृत्तसंस्था पीटीआयने दिली.
हायकोर्टात याचिका दाखल करणार – राठोड
दरम्यान, आज (6 जानेवारी) मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचं हरीभाऊ राठोड यांनी म्हटलं आहे. कुलाबा विधानसभेच्या प्रभाग क्रमांक 225, 226, 227 यातील घोटाळा बाहेर काढण्यासाठी, राहुल नार्वेकर यांचे असंवैधानिक काम मुंबई उच्च न्यायालयात उघड करण्यासाठी आणि त्या 12 उमेदवारांना न्याय मिळवून देण्यासाठी याचिका दाखल करणार आहे, असं राठोड म्हणाले आहेत.
नार्वेकर-राठोड प्रकरणावर असीम सरोदे काय म्हणाले?
ॲड. सरोदे यांनी नार्वेकर-राठोड प्रकरणावर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर व्हीडिओ पोस्ट करत आपलं मत मांडलं.
सरोदे म्हणाले, "बिनविरोध पद्धतीने निवडणुका जिंकायच्या अशी एक नवीन प्रक्रिया भाजपने अस्तित्वात आणण्याचा प्रयत्न सुरू केल्याचं मागच्या काही काळापासून दिसून येत आहे."
"यंदा महापालिका निवडणुकांमध्ये आधीच 60 उमेदवार बिनविरोध पद्धतीने निवडून आले आहेत. त्यात भाजपच्या उमेदवारांची संख्या जास्त आहे. लोकांना निर्णय प्रकियेचा भागच होऊ द्यायचा नाही आणि आपण परस्पर निवडून यायचं."
"विधानसभा अध्यक्षपदावर असलेल्या राहुल नार्वेकरांनी कुलाबा मतदारसंघात स्वत:च्याच 2-3 नातेवाईकांना उभं केलं आहे. माझे उमेदवार बिनविरोध निवडून आले पाहिजे यासाठी काय करता येईल ते सगळं करण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतो. त्यांच्यावर पदाचा दुरुपयोग करण्याचे आरोप झाले आहेत," असं असीम सरोदे यांनी म्हटलं.

फोटो स्रोत, Devendra Fadnavis/X
पुढे बोलताना सरोदे म्हणाले, "12 लोक अर्ज घेऊन, व्यवस्थित फॉर्म भरून निवडणुकीची उमेदवारी करण्यासाठी म्हणून तयार होते. मुंबईच्या संदर्भात संध्याकाळी 5 च्या आधी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या ऑफिसमध्ये आवश्यक सर्व कागदपत्रे घेऊन तयार असले पाहिजे, अशी अट आहे. हे 12 जण आपला फॉर्म घेऊन तयार होते. तसेच त्यांनी डिपॉझिट रक्कमही भरली होती, असं हरीभाऊ राठोड यांनी मला फोनद्वारे सांगितलं."
"त्यांना मी त्यांचे सर्व आक्षेप लेखी स्वरुपात घेऊन आवश्यक कागदोपत्री माहिती ठेवण्यास सांगितलं. एखादं काम बेकायदेशीर सुरू असेल, निवडणुका निष्पक्षपणे होत नसतील तर त्याबदद्ल आक्षेप घेण्याची जबाबदारी किंवा हक्क प्रत्येक नागरिकाला भारतीय संविधानाने दिला आहे. मग त्यामध्ये जर काहीजण तिथे आक्षेप घेत होते, तर त्याचा राहुल नार्वेकरांना इतका राग का आला?" असा प्रश्न असीम सरोदे यांनी उपस्थित केला.

फोटो स्रोत, facebook/Asim Sarode
'राहुल नार्वेकर यांनी संवैधानिकपदाचा दुरुपयोग केला, निवडणूक अधिकाऱ्याच्या कार्यालयातून पोलीस कमिशनरला फोन करून माजी खासदार हरिभाऊ राठोड यांचे प्रोटेक्शन काढून घ्या इत्यादी धमक्या देण्याचा गुन्हा केला. आता राहुल नार्वेकर यांनी जेष्ठ नेते हरिभाऊ राठोड यांची माफी मागावी आणि निवडणूक अधिकाऱ्यांनीही राहुल नार्वेकर यांच्यावर गुन्हा नोंदवावा', अशी मागणी सरोदे यांनी केली आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीतील बिनविरोध उमदेवारांच्या मुद्द्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ॲड. असीम सरोदे यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











