अनिल अवचट : मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र असं झालं सुरू

फोटो स्रोत, Samkalin prakashan
- Author, मयुरेश कोण्णूर
- Role, बीबीसी मराठी
अनिल अवचटांच्या लेखनाची सुरुवातच पु. ल. देशपांडेंवर टीका करणा-या एका लेखानं झाली होती! अवचट तेव्हा मेडिकलचे विद्यार्थी होते, 24 वर्षांचे होते आणि नुकतेच बिहारला जाऊन आले होते.
माणसांच्या जगण्याच्या त्या दर्शनानं त्यांच्या तरुण मनाला प्रश्न पडायला सुरुवात झाली होती. 1966-67चा तो काळ होता. तेव्हा पुण्याचं बालगंधर्व रंगमंदिर मुठा नदीकाठी उभं राहात होतं.
पुलंचा 'बालगंधर्व'च्या उभारणीत कसा सहभाग होता हे सगळ्यांना माहीत आहे. तेव्हा पुण्यात 'स्वच्छ पुणे की सुंदर पुणे' असा वाद सुरू होता आणि पुलंनीही त्यावरुन भूमिका घेतली होती. तरुण अनिल अवचटांना तेव्हा 'साधना'चे संपादक असणाऱ्या यदुनाथ थत्तेंनी लिहायला प्रवृत्त केलं होतं आणि 'वेध' नावाची मालिका लिहायला दिली होती.
त्यातल्या पहिल्याच लेखात अवचटांनी पुलंवर टीका केली. 'बालगंधर्व' उभं राहात होतं त्या जागी काही झोपड्या होत्या. त्या एका रात्रीत उठवल्या गेल्या आणि पुनर्वसन वगैरे न होता ते तिथून निघून गेले.
त्यांचं काय झालं, ते कुठे गेले हाच अवचटांसमोरचा प्रश्न होता आणि तो प्रश्न आपल्या पहिल्याच लेखात विचारतांना त्यांना पुलंची प्रसिद्धी, वलय यांचा विचार अडथळा ठरला नाही. त्यांनी स्पष्ट लिहिलं.
त्यावरुन वादही निर्माण झाला, पण पुल अवचटांवर चिडले नाहीत. बोलावून या प्रश्नात काय करता येईल आणि मी त्यात सहभागी असेन असं त्यांनी अवचटांना सांगितलं. त्यांचं मैत्र वाढत गेलं. पुढे जेव्हा अवचट आणि त्यांच्या पत्नी सुनंदा यांनी व्यसनमुक्तीसाठी 'मुक्तांगण'ची स्थापना केली तेव्हा त्याची सुरुवात पुल आणि सुनिताबाईंनी दिलेल्या देणगीतून झाली.
पण इथं मुद्दा हा अवचटांनी लेखणी हाती धरल्या क्षणापासून विचारलेल्या प्रश्नांचा आहे. जे प्रश्न इतरांना समोर असून दिसत नाहीत, ते अवचटांना दिसले आणि ते आपल्या लेखणीतून विचारुन समाजाचा विवेक सतत जागवत राहिले.
पुणेकरांना प्रश्न तेव्हा स्वच्छ, सुंदर पुण्याचा पडला होता. अवचटांना तिथं तो घर मोडलेल्या आणि ते दु:ख गिळून शांतपणे निघून गेलेल्या वंचितांचा दिसला होता. अवचटांची प्रश्न शोधण्याची ही दृष्टी शेवटच्या श्वासापर्यंत जागी होती.
प्रश्न, प्रश्न आणि पुन्हा प्रश्न
जाण्यापूर्वीच्या त्यांच्या शेवटच्या प्रकाशित पुस्तकाचं नाव आहे 'आणखी काही प्रश्न.' त्यांचं काही वर्षांपूर्वीचं 'प्रश्न आणि प्रश्न' हे पुस्तक खूप गाजलं होतं. आता हे नवे प्रश्न.
त्याच्या प्रस्तावनेत अवचटच लिहितात, 'मी प्रश्नांवर लिहू लागलो तसं काही लोक म्हणू लागले, अमक्या प्रश्नावर लिहा. पण मला असं ठरवून लिहिता येत नाही. आतमध्ये त्या विषयाची ठिणगी पडावी लागते. मग मला कोणी थांबवू शकत नाही. कुठला विषय कधी भिडेल हे सांगता येत नाही.'

फोटो स्रोत, facebook
तसे असंख्य प्रश्न विषय अवचटांना भिडत राहिले आणि त्यामागे होतं सतत टवटवीत, हिरवंगार, त्यांच्या मनातलं कुतूहल. एक शब्द 'अनिल अवचटांच्या आयुष्याचं वर्णन करतांना अगदी जवळ जाऊ शकेल तो म्हणजे 'कुतूहल.' त्यांच्या एका पुस्तकाचं नावंही आहे 'कुतूहलापोटी'.
हे कुतूहल छंदांना जन्म देणारं तर होतंच, पण तिथंच न थांबता समकालीन गंभीर प्रश्नांना भिडणारं अधिक होतं. त्यांना प्रश्न पडायचं कधी थांबलं नाही.
जेव्हा सर्व काही आलबेल आहे, सुंदर आहे, गुंतागुंत नाही अशा गुलाबी दुनियेची स्वप्नं प्रत्यक्षात उतरताहेत अशी भावनांची लाट येत असते, तेव्हा या प्रश्नांचे आरसे घेऊन अनिल अवचट प्रत्येक वळणावर उभे आहेत.
दोन गोष्टी अनिल अवचटांनी मराठी साहित्यविश्वाला आणि पत्रकारितेला दिल्या. त्या म्हणजे सामाजिक प्रश्नांकडे बघण्याची दृष्टी आणि ते लिहिण्याचा लेखनप्रकार, ज्याला 'रिपोर्ताज' असं म्हटलं गेलं. ते या अगोदरही जगभरात लिहिले होते.
अवचटांअगोदर मराठीतही रिपोर्ताज अंगानं झालेलं लिखाण असणार. पण ज्या सातत्यानं अवचटांनी गेली पन्नास वर्षं भिरी भिरी भ्रमंती करत हे प्रदीर्घ लिखाण केलं, त्यामुळे 'रिपोर्ताज' म्हणजे अवचट असं एक समीकरण तयार झालं. तशा दीर्घ लेखनाची एक परंपरा तयार झाली.

फोटो स्रोत, Smakalin Prakashan
मी फक्त जसं दिसतंय तसं आणि जसं आपल बोलतो तसं लिहित गेलो, 'फॉर्म'ची वगैरे कल्पना कधी केली नाही, असं अवचट म्हणत. त्यांच्या 'माझ्या लिखाणाची गोष्ट' या पुस्तकात ते लिहितात: 'फ्रान्समध्ये पत्रकार वर्तमानपत्रात कथेच्या शैलीनं विशेष लेख लिहू लागले होते. त्याला त्यांच्याकडे रिपोर्ताज म्हणत. मग सगळ्यांनी तेच नाव उचलून धरले.
'कोणी कोणी तर मला श्रेय देतं की यांनी रिपोर्ताज फॉर्म मराठीत आणला. पण हा फॉर्म मराठीत आणायला मी अगोदर तिकडचं वाचायला तर हवं. आधी माझं मराठीतलं वाचन जेमतेम, तर फ्रेंचमधलं वाचायला मी कुठला जातोय? मग कशाला हे श्रेय मला आणि कशाला ती लेबलं, असं मला वाटायचं. तुमच्या समोर आलंय ते लिखाण वाचनीय आहे का, वाचकाला काही नवं जग त्यातून कळतंय का, किंवा जीवनाकडे बघण्याची नवी दृष्टी देतंय का, एवढं तपासा म्हणजे झालं.'
अंधारातल्या शोषितांच्या न ऐकलेल्या कथा
तसं नवं जग अवचटांच्या लिखाणातून मराठी वाचकांसमोर उलगडत गेलं. ते जग सभोवतीच होती, त्यातच ते राहात होते, पण कोणाचं लक्ष त्याकडे गेलं नव्हतं.

फोटो स्रोत, Samkalin Prakashan
अवचटांच्या प्रश्न शोधण्याच्या आणि माणसांना समजून घेण्याच्या कुतूहलातून ते वास्तव समोर आलं, जे कोणाच्या कल्पनेतही नव्हतं. विशेषत: पांढरपेशाच्या वर्गाच्या.
नाहीतर इचलकरंजीच्या हातमाग कामगारांच्या, निपाणीतल्या तंबाखू कुटणाऱ्या बायकांच्या, 'रेड लाईट' एरियात एड्सशी झगडणाऱ्या बायका-पुरुषांच्या आयुष्याच्या गोष्टी कोणी सांगितल्या होत्या?

फोटो स्रोत, facebook
कुमार सप्तर्षींसोबत 'युवक क्रांती दला'त, बाबा आढावांसोबत पाणवठ्यांच्या आणि कष्टकऱ्यांच्या चळवळींमध्ये अनिल अवचट होते. त्यामुळे राजकीय आणि सामाजिक प्रश्नांकडे बघण्याची त्यांचा एक दृष्टिकोन तयार झाला होता.
मूळचे ओतूरच्या असलेल्या अवचटांनी पुण्यातल्या बी जे वैद्यकीय महाविद्यालयातून डॉक्टरकीचं शिक्षण पूर्ण झाल्यावर तो व्यवसाय न करता, पूर्ण वेळ लिखाणाकडे वळायचं ठरवलं. त्यांनी काही काळ रिपोर्टिंगही केलं, साप्ताहिकांमध्ये लिहिलं. पण त्यांच्या स्वतंत्र लिखाणाचा मार्ग त्यांना खुणावत होताच.
'माणसं' हे अवचटांचं एक गाजलेलं पुस्तक आणि आजच्या तरुण वाचकांच्याही कायम पसंतीस उतरणारं. इथं अवचट या शहरांतल्या आणि गावातल्या आडवस्तीतल्या दुर्लक्षित आयुष्यांशी गाठ घालून देतात.
शहरांतले हमाल, जनावरांसह मजल दरमजल करत पाठीवर बिऱ्हाड घेऊन फिरणारे भटके विमुक्त, दुष्काळाचा फेरा आला की स्थलांतरित होणारे, शरीरविक्रय करणाऱ्या महिला, देवाला वाहिलेल्या देवदासी अशी असंख्य माणसं आपल्याला भेटवतात.
ते जरी 'नॉन फिक्शन' प्रकारातलं लिखाण असलं तरीही त्यात एकेक व्यक्ती तिची गोष्ट घेऊन समोर येते. अवचट तिला बोलतं करतात. तलम कापडावर टोकदार नख्यांनी ओरखडे पाडून ते फाडून टाकावं, तशा आपल्या नितळ आयुष्याबद्दलच्या कल्पना या गोष्टी या माणसांच्या तोंडून ऐकतांना फाटत जातात. अवचटांचा हेतू सिद्ध होतात.

फोटो स्रोत, Samkalin Prakashan
अवचट त्या माणसांपर्यंतच थांबत नाहीत. ते अजून खोल जातात. त्या माणसांना भेडसावणाऱ्या प्रश्नांच्या मुळाशी जातात. त्यांचं 'प्रश्न आणि प्रश्न' हे अशाच प्रयत्नाचं पुस्तक. अशा प्रश्नांचं शेपूट अवचटांनी शेवटपर्यंत सोडलं नाही.
त्यांचं शेवटचं पुस्तक हे 'आणखी काही प्रश्न'. ते लिहिपर्यंत त्यांचं वय वाढलं आहे, तरुणपणीची भ्रमंती मर्यादित झाली. पण प्रश्नांची धग नाही. त्यातही अवचट बर्न्स वॉर्ड मधल्या भाजलेल्या माणसांबद्दल, एड्सशी सामना करणाऱ्यांबद्दल, शहराची घाण गोळा करणाऱ्या सफाई कामगारांबद्दल आणि त्यांच्या प्रश्नांबद्दल विस्तारानं लिहितात. त्यांच्या बालपणी गावं असलेली आणि पण आता शहरं झालेल्या भागांबद्दल लिहितांना एका मोठ्या आर्थिक प्रक्रियेचा धांडोळा घेतात.
एखादी घटना घडते, पण त्यामागे अनेक सामाजिक पदर असतात. अनेकजण घटना बघतात आणि विसरुन जातात. पण अवचट त्यातले नव्हते. इथं त्यांचे रिपोर्ताज हे शोधपत्रकारितेचं शस्त्र हाती धरतात.
त्यामुळे त्यांच्या 'कोंडमारा' या पुस्तकातल्या लेखांमध्ये ते दलित प्रश्नाचा, गावगाड्यांतल्या त्यांच्यावरच्या अन्यायाचा शोध घेतात. कुठे बहिष्काराच्या, जातीय दंगलींच्या बातम्या येतात. पण अवचट जाऊन, ती घटना खोदून सत्य समोर आणतात. तो होणारा 'कोंडमारा' वाचतांनाही आपल्याला असह्य होतो.
अवचटांची 'संभ्रम' आणि 'धार्मिक' ही पुस्तक तर मुळापासून हादरवून सोडतात. तेच एका ठिकाणी म्हणतात तसं यातली काही प्रकरणं म्हणजे आपल्या संस्कृतीच्या -हासाची उदाहरणं आहे. इथे विषय आहे अंधश्रद्धेचा, बुवाबाजीचा आणि त्यातून होणा-या अनियंत्रित शोषणाचा.
केवळ देवळं वा मोठ्या संस्थांमधल्या श्रद्धेच्या व्यापा-याच्या या गोष्टी ते समोर आणत नाहीत, तर शहरांमध्ये आणि गावांमध्ये हातपास पसरलेल्या भोंदूबाबा आणि माताजींनाही ते एक्स्पोज करतात.
काही ठिकाणी तर लैंगिक शोषणही आहे. हे सगळं भयानक आहे आणि अशा भोंदूमागे जाणारा मोठी आक्रमक झुंड आहे. त्यांच्याविरोधी बोलण्याची कोणाची हिम्मतही नाही. पण ती जोखिम पत्करुन निडरपणे अनिल अवचट शोधपत्रकाराची भूमिका निभावतात.
'मुक्तांगण' आणि व्यसनमुक्ती
अवचटांच्या लेखनाची, पुस्तकांची अशी मोठी यादी आहे. अर्ध्या शतकाचा असा हा मोठा भरलेला काळ आहे. पण अवचटांच्या सामाजिक जाणीवा या केवळ लेखनापुरत्या जागृत राहिल्या नाहीत.
त्या कार्यरत असणा-या कार्यकर्त्याच्या जाणीवा होत्या. त्यातून प्रत्यक्ष संस्थात्मक कार्यही झालं. जेव्हा नव्वदच्या दशकात अवचट लिखाणाच्या निमित्तानं व्यसनांच्या विषयाकडे वळले, तेव्हाच ते या कार्याकडे ओढले गेले.
'गर्द' नावाचं त्यांचं पुस्तक आणि या विषयावर केलेल्या वर्तमानपत्रीय लिखाणानं विविध व्यसनं, ड्रग्सचा आपल्या समाजातला वाढत चाललेला पसारा हे समोर आलंच होतं.

फोटो स्रोत, facebook
लिखाणानंतर अवचटांनी प्रत्यक्ष व्यसनमुक्तीच्या कामातही स्वत:ला झोकून दिलं. त्यांच्या पत्नी सुनंदा याही मानसोपचार विषयामध्ये काम करत होत्याच. अन्य मित्र होते. त्यातूनच 'मुक्तांगण'ची निर्मिर्ती झाली.
पुण्यातल्या 'मुक्तांगण'नं आजपर्यंत हजारोंना दारुच्या आणि अन्य नशा-व्यसनांपासून मुक्त केलं आहे. एक व्यक्ती व्यसनापासून मुक्त होते, पण त्याचं खरं स्वातंत्र्य त्या व्यक्तीचे कुटुंबीय अनुभवतात. त्या स्वातंत्र्यामागे अनिल अवचट हे असे आहेत.
व्यसनमुक्तीसाठी कोणतीही ढिलाई न बाळगण्यांपैकी अवचट होते. त्यामुळे 'सोशल ड्रिंकिंग' वगैरे कल्पनाही त्यांना मान्य नव्हत्या. काही वर्षांपूर्वी पुणे पोलिसांनी एक व्यसनमुक्ती सप्ताह आयोजित केला होता आणि अनिल अवचट प्रमुख पाहुणे होते.
एका मोठ्या चित्रपट-नाट्य कलाकारालाही बोलावलं होतं. अवचटांपूर्वी झालेल्या भाषणात त्यांनी व्यसनं कशी चुकीचं हे सांगितलं, पण शेवटी कधीतरी 'सोशल ड्रिंकिंग' करायला हरकत नसावी असं म्हटलं. पण नंतर बोलतांना अवचटांनी त्यावरुन जाहीर कार्यक्रमातच ते कसं चूक आहे हे सुनावलं होतं.
छंदांविषयी..
लेखक, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते यांच्यासोबतच अनिल अवचटांची मराठी मनावरची न पुसली जाणारी एक प्रतिमा ही छांदिष्टाची आहे.
असंख्य छंद असणारा हा अवलिया कमालीचं विविधरंगी आयुष्य जगला. काय केलं नाही त्यांनी. त्यांना एक जपानी मित्र भेटला. त्याच्याकडून ते कागदाची ओरिगामी शिकले आणि ओरिगामीचे जणू ब्रँड अम्बॅसेडर बनले.

फोटो स्रोत, Samkalin Prakashan
कागदाच्या तुकड्यांपासून अनेकविध आकार तयार करणारा कलाकार त्यांच्यात लपला होता. आणि स्वत: छंद शिकल्यावर ते आपल्यापुरतंच ठेवायचं नाही तर सगळ्यांना वाटायचं. त्यांनी ओरिगामीवर पुस्तक लिहिलं, शिबिरांमध्ये शिकवलं.
कार्यक्रमांमध्ये कंटाळा आल्यावर जवळपासच्या कागदातून ओरिगामी करणारे आणि कार्यक्रम संपल्यावर ते भेट देणारे अनिल अवचट पुण्यातल्या अनेकांना आठवत असतील.
त्यांचे छंद इतकेच नव्हते. जादूचे प्रयोग ते करायचे. फोटोग्राफी हा त्यांच्या आवडता छंद. भटकंती तर होतीच, त्यालाही परस्परपूरक असा तो छंद.
लाकूड कोरून काष्ठशिल्प बनवणं या छंदानंही त्यांना पछाडलं होतं. त्यांच्या घरी एक कायमस्वरुपी प्रदर्शनच या त्यांनी केलेल्या काष्ठशिल्पांचं भरवलं होतं. त्यांच्या घरी गेल्यावर ही काष्ठशिल्पं दाखवणं हा त्यांचा आवडता कार्यक्रम.
दुसरा आवडता कार्यक्रम म्हणजे बासरी वाजवणं. संगीताचे प्रेमी असणा-या अवचटांना बासरीनं भुरळ घातली आणि ते बासरी वाजवायला शिकले. अनेक प्रकारच्या बासऱ्या त्यांच्याकडे होत्या. त्यांच्याकडे कोणी भेटायला गेलं की शेवटी जाताना एखादं गाणं बासरीवर आवर्जून वाजवून दाखवणार. शेवटी तब्येतीमुळं बासरी वाजवणं थांबलं होतं ही खंत त्यांना होती.
कुतूहल न संपलेला माणूस
या सगळ्या छंदांच्या मुळाशी तेच ते त्यांच्या आयुष्याचं सूत्र वाटावं असं कुतूहल. त्या कुतूहलाच्या इंधनावरच ते जगले. या कुतूहलापोटी त्यांनी काय काय केलं, कोणत्या विषयांमध्ये त्यांना आकर्षण निर्माण झालंय हे त्यांच्या 'कुतूहलापोटी' या पुस्तकात त्यांनी विस्तारानं लिहिलं आहे.

फोटो स्रोत, Samkalin Prakashan
मधमाशा कसं काम करतात, सापांचं आयुष्य कसं असतं, फंगस म्हणजे बुरशी असते ती काय करते असे अनेक प्रश्न त्यांना स्वस्थ बसू देत नसत आणि मग संशोधन करुन ते विस्तारानं त्यावर लिहितात.
वास्तविक ते डॉक्टर, पण नंतर कामाचं क्षेत्र बदललं. पण आता मानवी शरीराबद्दल त्यांचं कुतूहल पुन्हा जागृत झालं होतं. त्याविषयी त्यांनी लिहिलं. ज्यावेळेस त्यांना शेवटचा भेटलो तेव्हा माणसाचा मणका कसं आणि काय करतो यावर ते बराच वेळ बोलत होते.
अवचटांनी कविता लिहिल्या. मुलांसाठी 'सृष्टीत गोष्टी' म्हणून बालसाहित्य लिहिलं. जेव्हापासून ते लिहिते झाले तेव्हापासून एखादीही दिवाळी नसावी जेव्हा दिवाळी अंकांमध्ये अनिल अवचटांचा लेख नाही. त्यांचं पुण्याच्या पत्रकार नगरमधलं घर सर्वांसाठी कायम खुलं असायचं.
भरपूर वेळ देऊन ते बोलायचे. पत्रकारांसाठी तर ते एक विद्यापीठ होते. वयानं त्यांच्या मनातल्या कुतूहलावर कधीही परिणाम केला नाही. कोरोनाकाळात सतत भटकणाऱ्या, माणसांच्या गोतावळ्यात रमणाऱ्या अवचटांवर घरीच थांबण्याची जणू सक्ती झाली. पण तरीही लिखाण शेवटपर्यंत थांबलं नाही.
अनिल अवचटांनी मराठी मनाला व्यसनांपासून मुक्त, प्रश्नांनी जागं आणि कुतूहलातून आलेल्या छंदांनी समृद्ध केलं.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








