सिंधुताई सपकाळ यांच्यानंतर त्यांच्या आश्रमाचं काम कसं चालणार?

ममता सपकाळ

फोटो स्रोत, Rahul Gaikwad/BBc

फोटो कॅप्शन, ममता सपकाळ
    • Author, राहुल गायकवाड
    • Role, बीबीसी मराठीसाठी, पुण्याहून

"दारावरून कुणी भुकेला गेला नाही पाहिजे, अशी माईची शिकवण होती. जिथे जिथे गरज आहे, तिथे पोहचण्याचा प्रयत्न करा, असं ती म्हणायची. कुणाच्या वाट्याला अनाथपण येऊ नये, असं तिला वाटायचं. आम्ही तोच प्रयत्न करणार आहोत. तिने ज्या पद्धतीने संस्था चालवली तशीच आम्ही चालवणार आहोत."

सिंधुताई यांची मुलगी ममता सपकाळ सांगत होत्या.

सिंधुताई सपकाळ यांच्या पश्चात विविध ठिकाणी असलेल्या आश्रमांची संपूर्ण जबाबदारी त्यांची मुलगी ममता आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर आली आहे. बीबीसी मराठीने याबाबत ममता आणि सिंधुताईंचे मानस पुत्र दीपक गायकवाड यांच्याशी संवाद साधला.

ममता म्हणाल्या, "माई इतक्या लोकांपर्यंत पोहचली की आम्हाला संस्थेचं काम सांगावं लागत नाही. ती वटवृक्ष होती. वडाच्या पारंब्या जशा जमिनीत शिरतात त्या पद्धतीने आम्हाला स्वतःला झोकून देऊन काम करण्याची वेळ आली आहे.

"लोकांनी मला इथपर्यंत आणलं असं ती म्हणायची माझाही तोच विश्वास आहे आम्हाला कोणी वाऱ्यावर सोडणार नाही. लोक आमच्यासोबत उभे राहतील."

सिंधुताई

फोटो स्रोत, Rahul Gaikwad/BBC

ममता गेल्या अनेक वर्षांपासून पुण्यातील मांजरी भागात असणाऱ्या अनाथ आश्रमाचे काम बघत आहेत. त्या संस्थेच्या कार्याध्यक्ष देखील आहेत.

सिंधुताई सपकाळ यांच्याविषयीच्या अनेक आठवणींना ममता यांनी उजाळा दिला. सिंधुताई आपल्यात नसल्या तरी मन मानायला तयार नाही, असं त्या सांगतात. माई इथून नाहीशी झालीये आणि आपल्या आत शिरली आहे, असं देखील ममता यांना वाटतं.

सिंधुताई यांच्या प्रयत्नातून राज्याच्या विविध भागांमध्ये आश्रमं सुरू झाली. त्यात पुण्यातील मांजरी भागात असणाऱ्या अनाथ आश्रमात 45 मुलं आहेत, सासवड येथे मुलींसाठी असणाऱ्या आश्रमात 55 मुली आहेत, तर शिरुरमधील आश्रमात 65 मुलं आहेत.

चिखलदरा येथे सर्वप्रथम आदिवासी विद्यार्थिनींसाठी सिंधुताई यांनी वसतीगृह सुरु केले होते, ते आजही कार्यरत आहे तर दुसरीकडे वर्ध्यामध्ये गाईंसाठी देखील आश्रम सुरू करण्यात आलं आहे.

आश्रम

फोटो स्रोत, Rahul Gaikwad/BBC

सिंधुताईंच्या आश्रम सुरू करण्याच्या कष्टाबाबत सांगताना ममता म्हणाल्या, "माई राज्यातल्या विविध भागांमध्ये फिरली. ती दिवसात शेकडो किलोमीटरचा प्रवास करायची. लाखो किलोमीटरचा प्रवास तिने केला आहे. राज्यातील असं गाव नाही की माईने तिथे जाऊन तिथल्या शाळा कॉलेजांमध्ये भाषणं केली नसतील.

"2010 ला सिनेमा आल्यानंतर तिचं कार्य आणखी लोकांपर्यंत पोहोचलं. पण त्या आधी ती थेट शाळेत जाऊन तिच्या कार्याची माहिती देऊन भाषण करायची. ज्या पद्धतीने ती जायची तिला कोणी नाही म्हणायचं नाही. शाळेतल्या मुलांनी पैसे गोळा करून दिले आहेत, रेशन गोळा करून दिलंय. त्यातून हे उभं राहिलं आहे.

"माई भाषणातून तिचं जगणं मांडत गेली. भाषण नाही तर रेशन नाही असं ती म्हणायची आणि ते खरं होतं. भाषण देऊनच तिने मुलांना खाणं मिळवलंय. तिने कष्टातून हे सगळं उभं केलंय," ममता पुढे सांगत होत्या.

सिंधुताई

फोटो स्रोत, Rahul Gaikwad/BBC

सिंधुताई यांचे मानस पुत्र दीपक गायकवाड यांचा सिंधुताई यांनी लहानपणापासून सांभाळ केला होता. गायकवाड यांना वडिलोपार्जित जागा मिळाली होती. तिथे सुरुवातीला आश्रम सुरू करण्यात आले. या आश्रमात अनाथ मुलींचा सांभाळ केला जातो.

सिंधुताई यांच्या कार्याबद्दल सांगताना गायकवाड म्हणाले, "माईंनी केलेलं कार्य दोन पावलं पुढे जाऊन मोठं करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. माईला समाधान वाटेल असं काम आम्ही करत राहणार आहेत."

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)