मधमाशांच्या तडाख्यात सापडल्यानं तामिळनाडूत एकाचा मृत्यू, मधमाशांच्या दंशावर काय उपाय असतात?

डॉ. अमलारपवनाथन जोसेफ म्हणतात की मधमाशांच्या दंशामध्ये विषारी घटक असतात.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, डॉ. अमलारपवनाथन जोसेफ म्हणतात की मधमाशांच्या दंशामध्ये विषारी घटक असतात. (संग्रहित)
    • Author, मुरलीथरन कासी विश्वनाथन
    • Role, बीबीसी तामिळ

तामिळनाडूतील कल्लाकुरुची जिल्ह्यात मधमाशांनी केलेल्या हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर दहा जणांना हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं आहे. मधमाशांच्या डंख किंवा दंशामुळे मृत्यू का होतो? त्यापासून बचाव करण्यासाठी काय करता येईल?

कल्लाकुरुची जिल्ह्यात थियागदुर्गमजवळ असलेल्या कुथाकुडी शिव मंदिराच्या परिसरात एक शाही वृक्ष आहे. मधमाशांनी या झाडावर पोळं तयार केलं होतं.

बुधवारी (17 सप्टेंबर) सकाळी काहीजणांनी हे पोळं पाडून टाकलं. त्यामुळे तिथे असलेल्या लोकांवर मधमाशांनी हल्ला चढवला. मधमाशा त्या लोकांना डंख मारू लागल्या. दहाहून अधिक जणांवर मधमाशांनी हल्ला केला आहे.

वीरस्वामी हे त्याच गावातील रहिवासी असून ते कार ड्रायव्हर आहेत. ते देखील या लोकांमध्ये होते. त्याच गावातील सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्रात या सर्व लोकांवर उपचार करण्यात आले. त्यानंतर ते घरी परतले.

घरी आलेले वीरस्वामी त्या रात्री अचानक बेशुद्ध पडले. त्यानंतर वीरस्वामी यांच्या नातेवाईकांनी त्यांना पुन्हा प्राथमिक आरोग्य केंद्रात नेलं. तिथे त्यांच्यावर उपचार होण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला.

यानंतर मधमाशांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या त्या 10 जणांना कल्लाकुरुची येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

ज्या लोकांनी मधमाशांचं ते पोळं नष्ट केलं होतं, त्यांच्या कारवाई करण्याची मागणी करत कुथाकुडी गावच्या ग्रामस्थांनी कल्लाकुरुची - वेपुर रस्ता अर्धा तास रोखून धरला होता.

मात्र वीरस्वामी यांचा थोड्या वेळात मृत्यू झाला. मधमाशांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या 10 जणांवर कल्लाकुरुची येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचार केले जात आहेत.

याआधी मार्च महिन्यात सेंथिलकुमार नावाच्या व्यक्तीचा मधमाशांच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. वेल्लोर जिल्ह्यातील गुडियाथमजवळच्या परवाक्कम गावात ही घटना घडली होती. तर इतर बारा जणांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं.

मधमाशांनी दंश केल्यावर काय होतं?

सर्वसाधारणपणे, मधमाशांनी चावा घेतल्यावर किंवा दंश केल्यावर मृत्यू होण्याच्या दुर्दैवी घटना घडत नाहीत. मात्र जेव्हा मधमाशांचं पोळं पाडलं जातं किंवा नष्ट केलं जातं, तेव्हा त्यात असणाऱ्या मधमाशा मोठ्या संख्येनं माणसांना चावतात.

डॉक्टर म्हणतात की अशावेळी मधमाशांना हल्ल्याला बळी पडणाऱ्यांपैकी काहीजणांचा मृत्यूदेखील होतो.

"मधमाशांच्या डंखात विषारी पदार्थ असतात. त्यापैकी दोन विषारी घटक लक्षात घेण्यासारखे असतात. त्यातील एक असतो मेलिटिन. तर दुसरा विषारी घटक असतो फॉस्फोलिपेस A2," असं डॉ. अमलोलपावनाथन जोसेफ म्हणतात.

"मेलिटिन आपल्या शरीरातील रक्तपेशींचं आवरण भेदतं आणि हे विषारी घटक रक्तात सोडतं," असं ते म्हणतात.

डॉ. अमलारपवनाथन जोसेफ म्हणतात की साधारणपणे, 100 मधमाशांनी दंश केल्यावर मृत्यू होतो.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, डॉ. अमलारपवनाथन जोसेफ म्हणतात की साधारणपणे, 100 मधमाशांनी दंश केल्यावर मृत्यू होतो.
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

डॉ. अमलारपवनाथन पुढे म्हणतात, "अशाच प्रकारे ते स्नायूंच्या पेशींचं आवरण भेदतं आणि त्यात विषारी घटक सोडतं. हे विषारी घटक जेव्हा रक्तात मिसळतात आणि मूत्रपिंडापर्यंत पोहोचतात, तेव्हा मूत्रपिंडांवर त्याचा परिणाम होतो."

"त्याचा शरीरातील इतर अवयवांवर परिणाम होऊ शकतो आणि त्यामुळे मृत्यू होऊ शकतो. तर फॉस्फोलिपेस A2 या विषारी घटकामुळे देखील असाच परिणाम होऊ शकतो. त्याशिवाय, ते मज्जासंस्थेवर देखील परिणाम करतं."

डॉ. व्ही. राजेंद्रन चेन्नईतील स्टॅनली वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापक आहेत. त्यांनी टॉक्सिकोलॉजी विभागात संशोधन केलं आहे. ते म्हणतात की, मधमाशांनी दंश केल्यानंतर परिस्थिती बिघडत असल्याची काही लक्षणं असतात.

डॉ. व्ही. राजेंद्रन म्हणतात, "मधमाशांच्या दंशामुळे ॲनाफिलेक्सिस नावाची गंभीर स्वरुपाची ॲलर्जी होऊ शकते. त्यामुळे रक्तदाबदेखील वाढू शकतो. घसा बसू शकतो. हृदयविकाराचा झटका आल्यासारखं वाटू शकतं. अशावेळी, तातडीनं वैद्यकीय उपचार होणं आवश्यक असतं."

"जर एखाद्या व्यक्तीला एकापेक्षा जास्त मधमाशांनी चावा घेतला असेल, तर त्यांना नक्कीच हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पाहिजे आणि त्यांना निरीक्षणाखाली ठेवलं पाहिजे."

मधमाशांचे किती दंश होणं धोकादायक असतं?

"मधमाशांच्या दंशामुळे मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत," असं डॉ. अमलारपवनाथन सांगतात.

"त्यामागचं कारण असं आहे की मधमाशांनी दंश केलेल्या व्यक्तीला वर उल्लेख केलेल्या विषारी घटकांची ॲलर्जी असेल. अर्थात ती एक दुर्मिळ घटना असेल. एरवी एकाच मधमाशीनं दंश केल्यास त्यात मोठा धोका नसतो, असंच म्हणावं लागेल," असं ते पुढे म्हणाले.

ते इशारा देतात की "जर मधमाशीनं दंश केल्यानंतर तीव्र स्वरूपाच्या वेदना होत असतील, तर वेदनाशामक औषधं घेतल्यास मदत होईल."

विषारी घटकांमुळे झालेल्या ॲलर्जीवर व्यवस्थित उपचार करण्याची आवश्यकता असते.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, विषारी घटकांमुळे झालेल्या ॲलर्जीवर व्यवस्थित उपचार करण्याची आवश्यकता असते.

"मात्र जर मधमाशीनं एकदा डंख मारल्यानंतर जर तुम्हाला घसा बसणं किंवा घट्ट होणं, जीभ सुजणं अशी लक्षणं जाणवत असतील तर तुम्ही लगेच हॉस्पिटलमध्ये गेलं पाहिजे."

अर्थात, जेव्हा मधमाशांचं एखादं पोळंच पाडलं जातं किंवा नष्ट केलं जातं, तेव्हा त्याच्या जवळपास असणाऱ्या लोकांवर शेकडोच्या संख्येनं मधमाशा हल्ला चढवतात.

याबद्दल डॉ. अमलारपवनाथन म्हणतात, "मधमाशांचं पोळं पाडलं जात असतं, तेव्हा मधमाशा त्याच्या जवळच्या लोकांचा पाठलाग करतात आणि त्यांना डंख मारतात. त्यांच्यापासून सुटका करून घेण्यासाठी पळत असताना किती मधमाशा चावतात, ते मला माहीत नाही."

"सर्वसाधारणपणे, मधमाशांचे 100 दंश प्राणघातक ठरत असतील, तर आफ्रिकेसारख्या खंडात मधमाशांच्या 1,000 दंशाच्या घटना घडल्या आहेत."

ते पुढे म्हणतात, "त्यामुळे जर मधमाशांचा थवा असला तर मधमाशांचं पोळं तोडल्यानंतर त्या मोठ्या संख्येनं हल्ला चढवतात. अशावेळी हॉस्पिटलमध्ये ताबडतोब जाणं आवश्यक असतं. त्यानंतर किमान एक दिवस डॉक्टरांच्या देखरेखीखाली राहणं आवश्यक आहे."

मधमाशांच्या दंशावर काय उपाय असतो?

जर तुम्हाला मधमाशांनी दंश केला असेल, तर त्यांच्या विषामुळे होणाऱ्या ॲलर्जीसाठी तुम्हाला व्यवस्थित उपचारांची आवश्यकता असते.

"जेव्हा घसा बसतो किंवा घट्ट होतो, जीभेला सूज येते, तेव्हा स्टेरॉईड्स दिले जातात. त्यानंतर त्या व्यक्तीला दिसत असलेल्या लक्षणांनुसार उपचार केले जातात," असं डॉ. अमलारपवनाथन म्हणतात.

जर तुम्हाला मधमाशांनी दंश केला असेल, तर त्यांच्या विषामुळे होणाऱ्या ॲलर्जीसाठी तुम्हाला व्यवस्थित उपचारांची आवश्यकता असते.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, जर तुम्हाला मधमाशांनी दंश केला असेल, तर त्यांच्या विषामुळे होणाऱ्या ॲलर्जीसाठी तुम्हाला व्यवस्थित उपचारांची आवश्यकता असते.

गेल्या एप्रिलमध्ये, केरळमधील कोझिकोडच्या 26 वर्षांच्या साबीरला शेकडो मधमाशांनी दंश केला होता. निलगिरी जिल्ह्यातील गुडालूरमधील उसीमलाई व्ह्यू पॉईंटवर ही घटना घडली होती.

मधमाशांनी केलेल्या या हल्ल्यात साबीरचा मृत्यू झाला. या घटनेत आणखी एकजण जखमी झाला होता.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)