मधमाशी चावल्यामुळे गुडघेदुखी बरी होते का? या उपचार पद्धतीबद्दल तुम्हाला माहितीये?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, ओंकार करंबेळकर
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
एकेकाळी विरोधी नेत्यांवर आक्रमक आरोप करुन अगदी वर्मावर डंख करणाऱ्या एकनाथ खडसे यांनी आपली गुडघेदुखी मधमाशी चावून घेण्याच्या उपचारांमुळे बरी झाल्याचं सांगितलं होतं.
गुडघेदुखी आणि पाठदुखीसाठी खडसे यांनी आपण केरळ, जोधपूर, मुंबई अशा अनेक ठिकाणी उपचार घेतले मात्र फारसा आराम पडला नाही नाही असे सांगितले. परंतु अॅपिथेरपी (मधमाशीचा डंख करवून घेण्याची उपचारपद्धती) मुळे आपली तब्येत सुधारल्याचे सांगितले.
या व्हीडिओमध्ये त्यांचे डॉ. नांदेडकर यांनी खडसेंच्या पाठीला मधमाशीचा दंश करुन दाखवला. ही पद्धती आपले गुरू डॉ. कुळकर्णी यांनी शिकवल्याचे नांदेडकर या व्हीडिओत सांगतात. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याचे प्रात्यक्षिकही दाखवले.

फोटो स्रोत, Getty Images
मधमाशांप्रमाणे जळू अंगाला लावून रक्त शोषून घेण्यासारखे अनेक उपचार केले जातात. परंतु त्यावरील संशोधन काळजीपूर्वक वाचूनच रुग्णांनी निर्णय घेणं आवश्यक आहे.
मधमाशी चावल्यामुळे खरंच बरं वाटतं का?
मधमाशीद्वारे केल्या जाणाऱ्या उपचारांना अॅपिथेरपी असं म्हटलं जातं. या उपचारांमध्ये मधमाशीपासून मिळणाऱ्या मध, पोळ्यातील डिंक, रॉयल जेली तसेच विषाचाही उपयोग केला जातो. हे विष आधीच काढलेले असते किंवा जिवंत माशीचे वापरले जाते. जिवंत माशीचा डंख ही एकप्रकारची अक्युपंक्चर म्हणता येईल.
अॅपिथेरपीचे काही उपयोग होत असल्याचे दावे केले जातात तर अनेकदा त्याचा उपयोग होत असल्याचं सांगोवांगीच्या घटनांमधून समजत असतं.
मधमाशीच्या विषाच्या या उपचारांचा उपयोग मल्टिपल स्केलेरोसिस (मेंदू आणि मज्जापेशी कठीण झाल्यामुळे होणारा आजार) तसेच संधिवातावर केला जातो.
मधमाशीचा डंख झाल्यावर होणाऱ्या जळजळीला (inflammation) थांबवण्यासाठी आपली प्रतिकारक्षमता दाहप्रतिरोधक शक्तीचा (अँटीइन्फ्लामेटर) वापर करते असा विचार या उपचारपद्धतीत आहे.
परंतु मल्टिपल स्क्लेरोसिस ट्रस्ट म्हणते, अशाप्रकारे मल्टिपल स्क्लेरोसिसच्या रुग्णांना याचा काही उपयोग झाल्याचे संशोधन उपलब्ध नाही. 2018 साली या ट्रस्टने घेतलेल्या आढाव्यामध्ये, मल्टिपल स्क्लेरोसिसवर होणाऱ्या अपारंपरिक उपचारांत मधमाशीच्या डंखाच्या उपचाराचा मामुली पुरावा असल्याचं म्हटलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
2018 साली एका स्पॅनिश महिलेचा या उपचारांमुळे मृत्यू झाल्याचं समोर आलं होतं. ही महिला 2 वर्षे मधुमक्षिका डंखाचे उपचार घेत होती. त्यानंतर तिचे अनेक अवयव निकामी झाले व शेवटी तिचा मृत्यू झाला होता.
मधमाशीच्या विषात नक्की काय असतं?
मुंगी, गांधीलमाशी, मधमाशी हे कीटक हायमेनोप्टरा गटात मोडतात. त्यांना डंख करण्यासाठी नांगी असते. त्यांच्या विषामध्ये अनेक संयुंगांचं मिश्रण असतं. यामध्ये सर्वात महत्त्वाचे मेलिटिन्स हे संयुग असतं. यामुळे चावल्यावर दाह किंवा जळजळ होते.
मग माशी चावल्यावर काय होतं?
जेव्हा दाह होऊ लागतो तेव्हा आपल्या पेशी दाहशामक संयुगं प्रसारित करू लागतात. ही संयुगं TRPV1 नावाचा एक मार्ग तयार करून त्या चेतापेशींना जागं करतात. मग चेतापेशी मेंदूला अमूक अमूक ठिकाणी जळजळ होत असल्याचा संदेश देतात.
मधमाशीचा दंश करुन घेण्यामागचा विचार
मधमाशीच्या विषाचा उपयोग करण्याची पद्धती नवी नाही. अनेक शतकांपासून तिचा वापर पूर्व आशियातील देशांमध्ये होत आहे. इसब आणि फिट्स येण्यावर विंचूदंशाचा वापर केला जातो.

फोटो स्रोत, Getty Images
प्राचीन राष्ट्र पोंटुसचा राजा मिथ्राजेट्स सहावा रक्त थांबवण्यासाठी सापाच्या विषाचा वापर करत असे सांगितलं जातं.
मधमाशीच्या दंशउपचारांबद्दल अधिक माहिती घेण्यासाठी आम्ही आयुर्वेद वाचस्पति डॉ. परिक्षित शेवडे यांच्याशी संपर्क केला.
डॉ. शेवडे म्हणाले, "विषावर विष हे औषध असं आयुर्वेदात म्हटलं असलं तरी असे मधमाशीद्वारे उपचार करणं धोकादायक ठरू शकतं. विषाचे प्रमाण जास्त झाल्यावर मृत्यू ओढावू शकतो. असे उपचार आगीशी खेळण्यासारखे आहे. यामुळे सांधेदुखी, पाठदुखी कमी झाल्याचे संशोधन आमच्यासमोर आलेले नाही."
अलोपॅथीमध्ये थेट डंखाला मान्यता नाही
विविध औषधांमध्ये विषाचा वापर केला जातो अशी माहिती मुंबईस्थित डॉक्टर शुभम आगलावे यांनी बीबीसी मराठीला दिली.
ते म्हणाले, "विषाचा स्नायू शिथिल होणे (लुळे पडणे) हा एक साईड इफेक्ट आहे. या परिणामाचा उपचार म्हणून उपयोग केला जातो. स्नायूंचा संबंध मणक्याशी असतो. त्यामुळे सांध्यांनाही आराम मिळाल्यासारखे वाटते. पण अलोपॅथीमध्ये थेट साप किंवा माशीचा डंख वापरला जात नाही. विषातील द्रव्ये वापरुन, त्यावर संशोधन करुन गोळ्या केल्या जाऊ शकतात. पण थेट असा कोणताही डंख वापरण्याला मान्यता नाही. तसेच तसे वापरण्याचे ज्ञानही अलोपॅथीत दिले जात नाही."
ही सर्व औषधे देताना रुग्णाचे लिंग, वय, त्याला सहव्याधी आहेत का याचा विचार करूनच डॉक्टर औषधे देतात.
पुण्यात मधुमक्षिका संवर्धनासाठी काम करणारे अमित गोडसे यांनी दिलेल्या माहितीनुसार अॅपिथेरपीचा उपयोग परदेशात अनेक ठिकाणी तसेच आता भारतातही काही ठिकाणी केला जात आहे. मधमाशीच्या दंशाचा उपयोग होत असल्याचे सांगितले जात असले तरी डब्ल्यूएचओ, आयसीएमआरसारख्या संस्थांनी त्याला मान्यता दिलेली नाही.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








