एकनाथ खडसे-देवेंद्र फडणवीस वाद: खडसेंनी मला व्हिलन ठरवलं- फडणवीस

एकनाथ खडसे

फोटो स्रोत, Getty Images

'माझी नाराजी देवेंद्र फडणवीस यांच्यावर आहे. मला खूप त्रास दिला गेला. मी फक्त देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे पक्ष सोडतोय,' असं म्हणत एकनाथ खडसे यांनी भाजप सोडत असल्याची घोषणा केली.

एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषद घेऊन पक्ष सोडण्यामागची कारणं आणि आपली भूमिका स्पष्ट केली.

देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्यावर झालेल्या आरोपांना उत्तर दिलं आहे. ते म्हणाले, "एकनाथ खडसे जे सांगत आहेत, ते अर्धसत्य आहे. त्यावेळी मी आता बोलणार नाही. त्यांच्या माझ्याबद्दल काही तक्रारी होत्या, त्या त्यांनी वरिष्ठांकडे मांडायला हव्या होत्या. असो...अशावेळी कोणाला तरी व्हिलन ठरवावं लागतं, त्यांनी मला ठरवलं."

पत्रकार परिषदेवेळी खडसे म्हणाले "माझ्यावर विनयभंगाचे आरोप करण्यात आले, जर मी त्यातून बाहेर पडलो नसतो तर ३ वर्षे जेलमध्ये गेलो असतो. किती आरोप सहन करायचे? मला खूप त्रास दिला गेला. गेली चार वर्षे मानसिक तणावाखाली जगलो." आपली सर्व सहनशक्ती संपल्याच खडसे यांनी म्हटलं.

"मी लाचार, कोणाचे पाय चाटत बसणाऱ्यांपैकी मी नाही. मला पद मिळालं, मी मेहनत केली. तुमच्या उपकारांमुळे पद नाही मिळालं," असं खडसेंनी म्हटलं.

खडसे यांच्या सून आणि भाजप खासदार रक्षा खडसे मात्र पक्ष सोडणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

'खडसे पक्ष सोडणार नाहीत असं शेवटपर्यंत वाटत होतं'

" खडसेंनी जे आरोप केले होते, त्यावर देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टीकरण दिलं होतं. त्यामुळे खडसे यांच्यावर अन्याय झाला म्हणजे नेमकं काय झालं हे तेच सांगू शकतात," अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली.

चंद्रकांत पाटील

फोटो स्रोत, CHANDRAKANTPATIL

चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं की, अगदी त्यांनी पत्रकार परिषद घेईपर्यंत मला आशा होती की, ते पक्ष सोडणार नाहीत. पण आता त्यांनी राजीनामा दिला आहे.

ते ज्या पक्षात जात आहेत, तिथे त्यांनी समाजपयोगी काम करावं, असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं.

खडसेंनी केलेली टीका ही विरोधी पक्ष नेत्याच्याच भूमिकेतून - छगन भुजबळ

"एकनाथ खडसेंनी शरद पवार किंवा राष्ट्रवादीवर आरोप केले होते, हे खरं आहे. पण एक लक्षात घ्यायला हवं की, ते तेव्हा विरोधी पक्षात होते आणि विरोधी पक्षनेते होते. विरोधी पक्षनेत्याचं कामच आहे हे. सरकारमध्ये जर एखादी गोष्ट चुकीची वाटली, एखादी व्यक्ती चुकीची वाटली तर ते बोलणारच," असं म्हणत एकनाथ खडसेंनी पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसवर केलेल्या टीकेबद्दल छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.

भुजबळांनी त्यासंदर्भात स्वतःचंही उदाहरण दिलं. "मी स्वतः शिवसेनेत होतो. मी पण शरद पवारांविरोधात 'भूखंडाचं श्रीखंड' वगैरे कोलाहल केला होता. पण त्यांना हे कळत होतं की, विरोधी पक्षातला माणूस त्याचं काम करत आहे. त्यासाठी आयुष्यभर कटुता वगैरे ठेवण्यात अर्थ नाही."

आपलं उदाहरण देऊन भुजबळ यांनी म्हटलं की, "आता जर खडसेंचा विचार त्यांचा विचार बदलला असेल किंवा आपली भूमिका त्यांना पटत असेल, ते बरोबर येऊन पक्षाची ताकद वाढत असेल तर सोबत घ्यायला काय हरकत आहे?"

खडसेंमुळे पक्षाची ताकद वाढेल- जयंत पाटील

दरम्यान, एकनाथ खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचं राष्ट्रावादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. शुक्रवारी (23 ऑक्टोबर) त्यांचा प्रवेश होईल असं पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. शुक्रवारी दुपारी 2 वाजता राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात त्यांचा प्रवेश होणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाचं स्वागत केलं आहे.

खडसेंवर भाजपमध्ये अन्याय झाला आहे, असं जयंत पाटील यांनी म्हटलंय. एकनाथ खडसे पक्षात आल्याने राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढेल, असंही पाटील यांनी म्हटलंय.

खडसे यांनी पक्षात येण्यासाठी कुठलीही अट ठेवली नसल्याचं पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे.

एकनाथ खडसे यांनी भाजपचा राजीनामा दिल्याचंही पाटील यांनी स्पष्ट केलंय.

आज एकनाथ खडसे यांनी फोन करून भाजपचा राजीनामा दिल्याचं पाटील यांनी सांगितले आहे. त्यामुळे त्यांचं राष्ट्रवादीत आम्ही स्वागत करत आहोत, असं जयंत पाटील म्हणाले.

भाजपचे काही आमदारही राष्ट्रवादीत येण्याच्या तयारीत आहेत. ते कोरोनाचा काळ संपल्यानंतर येतील असं पाटील यांनी सांगितलं आहे.

तत्पूर्वी बीबीशी बोलताना 'मी भाजपचा राजीनामा देणार आहे,' असं एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केलं होतं.

गेले कित्येक दिवस भाजपचे नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा होती ती आज संपुष्टात आली आहे.

आता फक्त खडसेंनाच प्रवेश दिला जाणार असून त्यांचे समर्थक येण्यास इच्छूक आहेत त्यांनाही काही दिवसात प्रवेश दिला जाईल असं पाटील यांनी स्पष्ट केलंय.

महाआघाडी सरकार 5 वर्षांपेक्षा जास्त काळ चालेल, तसंच आठ ते दहा दिवसात भाजपच्या तीन ते चार मोठ्या नेत्यांशी माझी चर्चा झाली आहे, तेही पक्षात यायला उत्सुक आहेत, असा दावा जयंत पाटील यांनी केला आहे.

खडसेंनी पक्ष सोडणं दुःखद - मुनगंटीवार

"पक्षासाठी ही चिंतनाची बाब आहे, खडसेंसारख्या नेत्याने पक्षाची 40 वर्षं सेवा केली आहे. त्यांनी जाऊ नये असं मला सतत वाटायचं," अशी प्रतिक्रिया भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.

"हे धक्कादायक आणि दुःखद आहे, त्यांच्या मनात खंत होती, माझ्यावर अन्याय होतोय असं त्यांना वाटायचं, तो चर्चेतून संपेल असं वाटायचं," असंही मुनगंटीवार यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटलंय.

"आम्ही बिलकुल कमी पडलो नाही, त्यांच्याबाबतच्या तीन बाबी कोर्टात आहेत, त्यामुळे पक्ष त्यांच्याबाबत निर्णय घेऊ शकत नव्हता, आता त्यांनी दिल्याघरी सुखी रहावं," असं भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी म्हटलंय.

एकनाथ खडसे यांना शुभेच्छा - भाजप

"आताच आम्हाला एकनाथ खडसे यांचा राजीनामा मिळाला आहे. त्यांच्याशी संवाद साधून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला आहे. पण त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. त्यांना शुभेच्छा आहेत," असं भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी म्हटलंय.

तर खडसेंच्या राजीनाम्याविषयी अधिकृतपणे काही कळलेलं नाही. अद्याप राजीनामा आलेला नाही. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील योग्य तो निर्णय घेतील, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)