पंकजा मुंडे : उद्धव ठाकरे माझे भाऊ, आमच्या नात्यात पक्ष येऊ शकत नाही - #5मोठ्याबातम्या

फोटो स्रोत, Getty Images
आज विविध वृत्तपत्रं आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा...
1. उद्धव ठाकरे माझे भाऊ, आमच्या नात्यात पक्ष येऊच शकत नाही - पंकजा मुंडे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे माझे भाऊ आहेत, आमच्या नात्यात पक्ष येऊ शकत नाही. पण शेतकऱ्यांसाठी मदत मागताना त्यांना भाऊ म्हणून नव्हे, तर राज्याचे मुख्यमंत्री म्हणून मदत मागणार आहे, असं वक्तव्य माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी केलं.
नांदेड जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केल्यानंतर गंगाखेडमध्ये शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी पंकजा मुंडे बोलत होत्या.
पिकांच्या नुकसानीने शेतकरी हवालदिल झाले आहेत. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट मदत मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
दरम्यान, "मुख्यमंत्री उद्धव ठाकरे माझे भाऊ आहेत. पण भाऊ म्हणून नव्हे तर मुख्यमंत्री म्हणून मी शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी त्यांच्याकडे करणार आहे. शेतकऱ्यांचा दसरा अश्रूत गेला, राज्यसरकारने या शेतकऱ्यांची दिवाळी तरी आता गोड करावी, अशी मागणी पंकजा मुंडे यांनी केली. ही बातमी दैनिक लोकमतने दिली आहे.
2. जलयुक्त शिवारच्या सहा लाख कामांमध्ये 700 तक्रारी अर्धा टक्काही नाहीत - देवेंद्र फडणवीस
राज्य सरकारने जलयुक्त शिवार योजनेच्या चौकशीचा आदेश नुकतेच दिले आहेत, याबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.
जलयुक्त शिवारप्रकरणी 700 तक्रारी प्राप्त झाल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे, सहा लाख कामांमध्ये 700 तक्रारी अर्धा टक्कादेखील नाहीत, असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

फोटो स्रोत, TWITTER
जलयुक्त शिवार ही योजना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना मागच्या सरकारकडून सुरू करण्यात आली होती. ही त्यांची महत्त्वाकांक्षी योजना म्हणून ओळखली जाते. पण या योजनेच्या चौकशीचे आदेश राज्य सरकारने नुकतेच दिले.
सध्या देवेंद्र फडणवीस राज्यातली पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान, उस्मानाबादमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. कोरोना संकट संपल्यानंतर जलयुक्त शिवारमुळे किती फायदा झाला, याचं प्रदर्शनच भरवणार असल्याचं फडणवीस म्हणाले.
"तसंच, जलयुक्त शिवार योजनेत 700 तक्रारी प्राप्त झाल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे, सहा लाख कामांमध्ये 700 तक्रारी हे प्रमाण अर्धा टक्केही नाही. सरकारी कामात एक टक्क्काही तक्रार येऊ नये, अशी माझी भूमिका आहे. पण त्यातही पाच ते सात टक्के ही किमान मर्यादा आहे. असं असूनही योजनेची जाणीवपूर्वक चौकशी लावण्यात आली. ही चौकशी लावून विरोधी पक्षनेत्याचं तोंड बंद करता येईल, असं वाटत असल्यास तसं काही होणार नाही. विरोधी पक्षनेता जनतेचा आहे, तो जनतेसाठीच काम करेल," असं फडणवीस पुढे म्हणाले. ही बातमी एबीपी माझाने दिली.
3. पंतप्रधानांनी विमानतळे विकली, आता देश विकत आहेत - प्रकाश आंबेडकर
कोरोनामुळे देश अडचणीत सापडल्याचे कारण देत पंतप्रधान मोदी यांनी विमानतळे विकली, आता ते देश विकायला निघाले आहेत, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केली.

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी सोलापुरात दाखल झाल्यानंतर आंबेडकर बोलत होते.
यावेळी आंबेडकर यांनी मोदी यांच्यासह फडणवीस आणि ठाकरे यांच्यावरही टीका केली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना सत्ता गेल्याचा विसर पडल्याचं ते म्हणाले. तसंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठराविक जिल्ह्यात पाहणी करण्यापेक्षा सर्व नुकसानग्रस्त भागाचा दौरा करावा, असं आंबेडकर म्हणाले. ही बातमी ई-सकाळने दिली आहे.
4. भाजपच्या 105 आमदारांना घरी बसवून उद्धव ठाकरेंनी दम दाखवून दिला - हसन मुश्रीफ
तुमच्यात सरकार चालवण्याचं दम नाही, म्हणून तुम्ही रडत बसला आहात. तुम्ही शेतकऱ्यांना काय मदत करणार, या विरोधकांच्या टीकेवर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
भाजपच्या 105 आमदारांना घरी बसवून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यातला दम दाखवून दिला आहे, असं वक्तव्य मुश्रीफ यांनी केलं.

फोटो स्रोत, TWITTER
"कोरोना संकट आणि नैसर्गिक संकटावर मुख्यमंत्र्यानी ज्या पद्धतीने मात दिली, ते दम असल्याशिवाय शक्य नाही. सत्ता गेल्यामुळे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस अस्वस्थ झाले आहेत. त्यामुळेच ते रोज टीका करत आहेत. त्यांनी थोडा संयम बाळगावा," असं मुश्रीफ म्हणाले. ही बातमी टीव्ही 9 मराठीने दिली आहे.
5. अमेझॉन अपमध्ये मराठी भाषेचा समावेश होणार
अमेझॉन ई-कॉमर्स कंपनीने मराठी भाषेचा समावेश त्यांच्या अपमध्ये करण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. येत्या 20 दिवसांत अमेझॉन अपमध्ये मराठी भाषेचा समावेश होईल, असं त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अखिल चित्रे यांना कळवलं आहे.

फोटो स्रोत, Thinkstock
चित्रे यांनी गेल्या आठवड्यात अमेझॉनसह फ्लिपकार्ट या अपनी मराठी भाषेचा समावेश करावा, अशी मागणी केली होती. ही मागणी मान्य न झाल्यास त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही त्यांनी दिला होता.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
या तक्रारीची दखल घेऊन मराठी भाषेचा समावेश करण्याबाबत अमेझॉनने मान्य केलं. याबाबत चित्रे आणि कंपनीचे अमेरिकेतील प्रतिनिधी यांच्यात व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा झाली होती.
तत्पूर्वी, फ्लिपकार्टनेही तीन दिवसांपूर्वी अपमधील मराठीच्या समावेशाबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला होता. ही बातमी लोकसत्ताने दिली आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








