एकनाथ खडसे: 'राष्ट्रवादी काँग्रेसमधील माझ्या प्रवेशाबाबत फक्त माध्यमांमध्येच चर्चा'

एकनाथ खडसे

फोटो स्रोत, Eknathrao Khadse/facebook

भाजप नेते एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशाबाबत चर्चेला उधाण आले आहे पण एकनाथ खडसे यांनी आपण राष्ट्रवादीत जात नसल्याचं सांगितलं आहे.

बीबीसी मराठीशी बोलताना भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी सांगितले, "मी उद्या मुंबईत येत नाहीय. 22 तारीख ठरली नाहीय. हे सर्व मीडिया ठरवत आहे. काही असेल तर मी स्वत:हून जाहीर करेन. ज्या अर्थी मी गावात आहे त्याचा अर्थ काय? गुरुवारी प्रवेश आहे असा कोणताही विषय नाही." असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गुरुवारी प्रवेश करण्याचे वृत्त त्यांनी फेटाळून लावले.

भाजपात नाराज असलेले एकनाथ खडसे गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा आज (20 ऑक्टोबर) सकाळपासून होऊ लागली. मुक्तानगरमधून कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले अशाही बातम्या येत होत्या. पण खडसेंनी सध्यातरी असे काही नाही सांगितले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही यांसदर्भात सूचक प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, "एकनाथ खडसे यांच्याबाबत मी दोन दिवसांत बोलेन." यामुळे येत्या काही दिवसांतच खडसेंचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होईल अशी शक्यताही वर्तवली जात आहे.

18 ऑक्टोबरला खडसेंनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचीही चर्चा सुरू झाली होती मात्र बीबीसी मराठीशी बोलताना स्वतः खडसे यांनी यासंबंधीचं वृत्त फेटाळून लावलं.

खडसे यांनी म्हटलं की, "मी राजीनामा दिला ही फेक न्यूज आहे. यात काहीही तथ्य नाही. आमच्या प्रदेशाध्यक्षांनीही या बातमीचं खंडन केलं आहे. प्रदेशाध्यक्षांपेक्षा कोण मोठं आहे?"

राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या प्रवेशाबाबत विचारले असता ते म्हणाले, "मीडिया माझ्या प्रवेशाच्या तारखा ठरवत आहे. यामध्ये काही तथ्य नाही. मी मीडियाला स्वत:हून सांगेन. तारीखही सांगेन आणि काय असेल तेही मांडेन."

तेव्हा एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवेशाबाबत संभ्रम कायम का ठेवत आहेत हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यांच्या प्रवेशाच्या मुहूर्ताला विलंब का होतोय असाही प्रश्न आहे. भाजपवर दबाव टाकण्याचा हा प्रयत्न आहे की अद्याप प्रवेशासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडूनच हिरवा कंदील मिळाला नाही? की महाविकास आघाडीमध्ये यावरून नव्याने मतभेद निर्माण झाले आहेत?

अमित शाह-

फोटो स्रोत, Getty Images

राजकीय विश्लेषकांचं मत

खडसेंच्या राष्ट्रवादी कांग्रेसमधील प्रवेशाबाबतच्या चर्चांवर बीबीसी मराठीशी बोलताना ज्येष्ठ पत्रकार आणि दिव्य मराठीचे संपादक जयप्रकाश पवार म्हणाले, "गेल्या सहा महिन्यांपासून खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार अशी चर्चा सुरू आहे. पण, प्रवेशाला मुहूर्त मिळालेला नाही. याचं एक कारण म्हणजे खडसेंना पक्षात स्थान कसं द्यायचं हा मोठा प्रश्न आहे. राष्ट्रवादीत मोठे स्वयंभू नेते आहेत. त्यात खडसेंचा शांत न बसण्याचा स्वभाव सर्वांना माहित आहे. मग त्यांना घेवून गोंधळ का निर्माण करायचा?

"देवेंद्र फडणवीसांवर सातत्याने तोफ डागण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला खडसेंचा चांगला उपयोग होईल. मात्र, NCP कडून खडसेंच्या प्रवेशानंतर परिस्थिती काय होईल याची चाचपणी सुरू असावी. त्यामुळे खडसेंच्या प्रवेशाला अजून मुहूर्त मिळत नाही आणि इतक्या लवकर मिळण्याची स्थिती नाही," पवार सांगतात.

लेवा-पाटील जातीय समीकरण

एकनाथ खडसे उत्तर महाराष्ट्रातील मोठं नेतृत्व आहे. गोपीनाथ मुंडेंनंतर राज्यातील ओबीसी समाजाचा एक राज्यव्यापी चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. जळगाव जिल्ह्यात लेवा-पाटील समाज मोठ्या संख्यने आहे. या जातीय समीकरणाचा खडसेंच्या प्रवेशाशी संबंध असू शकतो का?

यावर बीबीसीशी बोलताना महाराष्ट्र टाईम्सचे नाशिकचे निवासी संपादक शैलेंद्र तनपुरे म्हणतात, "एकेकाळी लेवा-पाटील समाज एकमुखी एकनाथ खडसेंच्या पाठीशी उभा होता. माता आता असं चित्र नाही. लेवा-पाटील समाज विखुरला गेला आहे. हा समाज आता मोठ्या संख्येने खडसेंच्या मागे नाही. त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते या जातीय समीकरणांचा अंदाज घेत असण्याची शक्यता आहे. हे खडसेंच्या प्रवेशाला मुहूर्त न मिळण्याचं एक कारण आहे.

एकनाथ खडसे, देवेंद्र फडणवीस

फोटो स्रोत, Getty Images

"रक्षा खडसे खासदार आहेत. मुलगी जळगाव जिल्हा सहकारी बॅंकेवर, पत्नी महानंदावर. अशा परिस्थितीत खडसे पक्षात आले तर त्यांच्यामागे किती लोकं येतील? घरातील व्यक्तींना पक्षात स्थान कसं द्यायचं? हे प्रश्न खडसेंच्या पक्षप्रवेशाला मुहूर्त न मिळण्याची प्रमुख कारणं आहेत."

तर, ज्येष्ट पत्रकार संजय जोग म्हणातात, "खडसे पक्षात आले तर त्यांचं पक्षासाठी योगदान काय असेल. राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशानंतर स्थानिक राजकारणावर याचा काय परिणाम होईल. ओबीसी, लेवा-पाटील समाजाच्या मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी खडसेंची कशी मदत होईल? मतदारांपर्यंत पोहोचून राष्ट्रवादीला जळगावात पुन्हा अस्तित्व निर्माण करता येईल का? या प्रत्येक गोष्टीवर विचार करावा लागेल. त्याशिवाय खडसेंच्या प्रवेशाला मुहूर्त मिळणार नाही."

खडसेंच्या राष्ट्रवादी विरोधातील भूमिका

खडसेंनी आपल्या राजकीय कारकिर्दीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर सतत आरोप केले. अशा परिस्थितीत स्थानिक नेते मानतील? बरं, शरद पवारांनी मध्यस्ती केली तरी, स्थानिक समीकरणं जुळतील? हे प्रश्न अजूनही अनुत्तरीत असल्याने अद्याप खडसेंचा प्रवेशाला मुहूर्त मिळत नाही, असं राजकीय जाणकार म्हणतात.

"खडसेंनी आत्तापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर सतत भ्रष्टाचाराचे आरोप केले. NCP च्या स्थानिक नेत्यांशी त्यांचं कधीच जुळलं नाही. मग, पक्षात आल्यानंतर काय? याचा विचार राष्ट्रवादी कांग्रेसच्या नेत्यांना करावा लागेल," असं शैलेंद्र तनपुरे म्हणाले.

फक्त भाजपचा मोठा नेता आम्ही फोडू शकतो, असे संकेत देत एकीकडे भाजपवर दवाब बनवायचा आणि दुसरीकडे भाजपतील पंकजा मुंडे, विनोद तावडेंसारख्या नाराजांना टॅप करण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न असल्याचं शैलेंद्र तनपुरे यांना वाटतं.

शरद पवार, उद्धव ठाकरे

फोटो स्रोत, Getty Images

खडसेंच्या प्रवेशावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत मतभेद?

एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार अशा बातम्या सातत्याने येत आहेत. एकनाथ खडसे यांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांच्याशी जवळचे संबंध आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि उत्तर महाराष्ट्रातील नेत्यांची बैठक नुकतीच पार पडली. जळगावचे आमदार अनिल पाटील, माजी आमदार गुलाबराव देवकर, माजी आमदार सतीश पाटील हे बैठकीला उपस्थित होते.

पण उत्तर महाराष्ट्रातील स्थानिक शिवसेनेच्या आमदारांमध्ये खडसेंच्या प्रवेशावरून अस्वस्थता आहे. यामुळे स्थानिक पातळीवर शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा नवा संघर्ष उभा राहू शकतो.

एकनाथ खडसे

फोटो स्रोत, Twiiter/eknath khadse

"आतापर्यंत आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांसोबत काम करत होतो. आमच्यात कधीही टोकाचा संघर्ष नव्हता. पण एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्यास संघर्ष अटळ आहे," अशी प्रतिक्रिया एका शिवसेनेच्या आमदाराने बीबीसी मराठीशी बोलताना दिली.

जळगाव पुण्यनगरीचे संपादक विकास भदाणे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितले, "जळगावमध्ये शिवसेना आणि खडसे यांच्यात कायम वाद होतात. 2014 मध्ये शिवसेना आणि भाजपने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्यानंतर उद्धव ठाकरेंनी खडसेंचा मतदारसंघ मुक्ताईनगरमध्ये प्रचारसभा घेतली होती."

"खडसेंचे विरोधक समजले जाणारे शिवसेनेचे माजी आमदार सुरेश जैन हे पक्षातले ज्येष्ठ नेते आहेत. त्यांचेही मत शिवसेना पक्षश्रेष्ठी विचारात घेऊ शकते," असंही विकास भदाणे सांगतात.

एका बाजूला सत्ता टिकवण्याचे आव्हान आणि दुसऱ्या बाजूला स्थानिक नेत्यांची नाराजी वेळीच दूर करण्याचे आव्हान अशा दोन्ही पातळ्यांवर शिवसेनेला संघटनात्मक काम करावे लागणार आहे.

ज्येष्ठ पत्रकार मृणालिनी नानिवडेकर यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितले,"शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही प्रादेशिक पक्ष आहेत. त्यामुळे दोन्ही पक्ष वर्चस्वाच्या लढाईत समोरासमोर येत राहणार. राष्ट्रवादी काँग्रेस प्रत्येक ठिकाणी काहीतरी मिळवताना दिसत आहे.

शरद पवार, अमित शहा, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, शरद पवार आणि उद्धव ठाकरे

"खडसेंनी राष्ट्रवादीत प्रवेश केला तर त्यानिमित्त ही स्थानिक खदखद बाहेर पडतानाही दिसू शकते. महाविकास आघाडीतले तिन्ही पक्ष सत्ता स्थापनेसाठी एकत्र आलेत. पण हे तीन पक्ष एकत्र येणं राज्यात विविध ठिकाणी स्थानिक राजकारणाला धरून नाही. तेव्हा स्थानिक नाराजी बाहेर येण्याची ही सुरुवात असू शकते."

महाविकास आघाडीत हे दोन्ही पक्ष एकत्र असले तरी पक्षांनी स्वतंत्र वाढीचा मार्ग मोकळा ठेवला आहे. पारनेरमध्ये जेव्हा नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला असला तरी खडसेंच्या बाबतीत असे काही होण्याची शक्यता कमी आहे.

"एकनाथ खडसेंसारखा बडा नेता जर राष्ट्रवादीत प्रवेश करत असेल तर ते शिवसेनेचे ऐकतील असे वाटत नाही." असे मत मृणालिनी नानिवडेकर यांनी व्यक्त केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचा हा संघटनात्मक निर्णय असला तरी त्याचा फटका महाविकास आघाडीला इतर ठिकाणीही बसू शकतो. सहकारी पक्षाला डावलून असे प्रवेश होऊ लागले तर महाविकास आघाडीसाठी घातक ठरण्याची शक्यताही नाकारता येत नाही. कारण यामुळे स्थानिक अस्वस्थता वाढू शकते.

खडसेंना शोधावी लागणार उत्तरं

राष्ट्रवादी काँग्रेस खडसेंना पक्षप्रवेश देण्याबाबत ठोस निर्णयापर्यंत पोहोचली असली. तरी, अखेर जायचं का नाही, हे खडसेंना ठरवावं लागणार आहे, असं पत्रकार संजय जोग सांगतात.

"खडसे गेली 40-45 वर्षं भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडलेले आहेत. मग, राजकीय विचारसरणी अचानक बदलणार? भाजप-आरएसएसशी संबंध तोडणार? राष्ट्रवादीच्या पहिल्या फळीतील नेत्यांसारखं स्वत:च वेगळं वलय निर्माण करणं त्यांना शक्य होईल? राष्ट्रीय पक्ष सोडून ते महाराष्ट्रातील स्थानिक पक्षात येतील? याचं उत्तर खडसेंना स्वत: शोधावं लागणार आहे. त्याखेरीस त्यांच्या पक्षप्रवेशाला मुहूर्त मिळणार नाही," असं संजय जोग पुढे म्हणतात.

एकीकडे छगन भुजबळांसारखा मोठा बहुजन नेता पक्षात असताना खडसेंचा फायदा होईल. यावर जोग म्हणतात, उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादीला पुन्हा अस्तित्व मिळवून देण्यासाठी भुजबळांसोबत खडसेंच्या नेतृत्वाचा फायदा होऊ शकेल.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)