उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन एकनाथ खडसे वेगळ्या पर्यायाचा विचार करत आहेत?

फोटो स्रोत, Getty Images
मी नाराज आहे, ही बातमीच चुकीची आहे. मी कोणताही वेगळा विचार करत आहे, असं वक्तव्यं भाजप नेते एकनाथ खडसे यांनी केलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटल्यानंतर खडसे माध्यमांशी बोलत होते.
दिल्लीत मी शरद पवारांची भेट घेतली होती. माझ्या मतदारसंघातील सिंचन प्रकल्पांबद्दल मी पवारांशी चर्चा केली होती. याच प्रकल्पांना निधी मिळावा, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे केली असल्याचं खडसेंनी सांगितलं.
मी मंत्री असताना गोपीनाथ मुंडे यांचं स्मारक औरंगाबादमध्ये व्हावं, यासाठी जमीन अधिग्रहण केलं होतं. पण मी मंत्रिपदावरून दूर गेल्यानंतर हे स्मारक रखडलं. 12 डिसेंबरला गोपीनाथ गडावर होणाऱ्या मेळाव्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी स्मारकाची घोषणा करावी, असं खडसे यांनी म्हटलं.
दरम्यान, भाजप नेते एकनाथ खडसे सोमवारी (9 डिसेंबर) दिल्लीत आले होते. भाजपच्या राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांची भेट घेण्यासाठी दिल्लीत आलेल्या खडसेंनी अचानक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली.
पवारांसोबत भेट कशासाठी?
दिल्लीत येऊन खडसेंनी भाजपचे महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव यांच्याशी फोनवर चर्चा केली. शरद पवारांची मात्र त्यांनी प्रत्यक्ष भेट घेतली. मतदारसंघातील प्रकल्पाबाबत पवारांची भेट घेतल्याचं खडसेंनी सांगितलं असलं तरी त्यातून अनेक राजकीय अर्थ काढले जात आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
ज्येष्ठ पत्रकार श्रीमंत मानेंनी खडसेंच्या दिल्ली दौऱ्याबद्दल सांगताना म्हटलं, "खडसेंना भाजप नेत्यांकडून भेट नाकारली जाणार नाही. मात्र, तेच दिल्लीत जाऊन नेत्यांना न भेटता माघारी येतं आपलं किती खच्चीकरण केलं जातंय, हे दाखवू पाहताहेत की काय, अशी शंका येते."
खडसेंची गेल्या काही दिवसांतील वक्तव्यं ही त्यांची नाराजी दाखवून देत असली, तरी ही नाराजी आजची नाहीये. विधानसभा निवडणुकीत पक्षानं उमेदवारी नाकारल्यापासूनच ते प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या पक्षाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मुलगी रोहिणी खडसेंचा झालेला पराभव तर खडसेंच्या जिव्हारी लागलाय. आपल्या मुलीच्या आणि पंकजा मुंडेंच्या पराभवाला पक्षांतर्गत कारणं असल्याचं खडसेंनी जाहीर बोलून दाखवलंय.
खडसेंची नाराजी वारंवार समोर येत असतानाही भाजप त्यांची दखल का घेत नाहीये, असा स्वाभाविक प्रश्न राजकीय वर्तुळासह राज्यातल्या अनेकांना पडलाय.
'खडसेंना पक्षाकडून नेहमीच पदं मिळाली'
खडसेंची नाराजी आणि पक्षाची भूमिका याबद्दल बोलताना श्रीमंत माने यांनी म्हटलं, "एकनाथ खडसेंना भाजप बेदखल करत नाहीये. मात्र ते तुटायलाही नको आणि डोक्यावर बसायलाही नको, एवढ्या अंतरावर नक्कीच ठेवलं जातंय. त्याचाच एक भाग म्हणून सुनेला तिकीट द्यायचं, मुलीला तिकीट द्यायचं आणि खडसेंना मात्र थोडं दूर ठेवून खच्चीकरण करायचं, असं धोरण दिसतं."
मात्र, खडसेंनी नाराज होण्याचं काहीच कारण नसल्याचं ज्येष्ठ पत्रकार दिलीप तिवारी म्हणतात. दिलीप तिवारी हे उत्तर महाराष्ट्रातील राजकारणाचे जाणकार आणि ज्येष्ठ पत्रकार आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
दिलीप तिवारी सांगतात, "सत्तेत असताना मंत्रिपद आणि सत्ता नसताना विरोधी पक्षनेते पद किंवा इतर पद, असं पक्षानं खडसेंना काही ना काही दिलंच आहे. त्यामुळं त्यांच्यावरील अन्यायाचा मुद्दाच निकाली निघतो. विरोधी पक्षनेतेपद आणि नंतर बारा खात्यांचं मंत्रिपद त्यांना मिळालं होतं."
पक्षाकडून अपेक्षा ठेवणाऱ्या खडसेंचा आता किती प्रभाव उरलाय, असा प्रश्नही दिलीप तिवारी यांनी उपस्थित केला.
खडसेंची ताकद किती?
दिलीप तिवारी यांनी म्हटलं, "उत्तर महाराष्ट्रात बहुजन वर्गात सर्वात मोठा घटक मराठा समाजाचा असला, तरी इतर घटकही प्रभावी आहेत. नंदुरबारमध्ये आदिवासी, धुळ्यात मराठा, जळगावात गुजर पाटील, माळी असा समाज आहे."
"गिरीश महाजन हे गुजर पाटील समाजाचे आहेत. त्यामुळं केवळ खडसेंची बहुजन नेते म्हणून तयारी झालेली प्रतिमा सुद्धा चूक आहे. खडसे सोडून बाकीचे बहुजन नाहीत का मग?" असा प्रश्न तिवारी विचारतात.
पण श्रीमंत माने यांच्या मते खडसेंची ताकद आजही जास्त आहे.
"फडणवीस निर्णय प्रक्रियेत येण्याच्या आधीपासून खडसे तिथं होते. मुंडे-गडकरींच्या रांगेतले ते नेते आहेत. उत्तर महाराष्ट्राबाहेरही त्यांची ताकद आहे. जिथं जिथं लेवा पाटील समाज आहे, तिथं खडसेंना मानलं जातं," असं श्रीमंत माने यांनी म्हटलं.

फोटो स्रोत, Getty Images
पण मग खडसेंचा प्रभाव उत्तर महाराष्ट्राच्या बाहेरही असेल, तर ते आतापर्यंत ठामपणे भूमिका का घेत नव्हते, या प्रश्नावर बोलताना श्रीमंत माने यांनी म्हटलं, "महाराष्ट्रात भाजप सत्तेत जाण्याआधी वेगळी स्थिती होती. त्यामुळं खडसे इतर पक्षांकडे जाण्याचा विचार करत नव्हते. मात्र महाराष्ट्रात इतर पक्षांकडे सत्ता गेल्यानंतर त्यांना थोडा धीर आला असेल आणि पर्यायानं त्यांनी इतर पक्षांचा विचार करण्यास सुरूवात केला असावा."
श्रीमंत माने यांचा अंदाज खरा मानायचा झाल्यास खडसेंपुढे काय पर्याय असू शकतात? कारण दिलीप तिवारींनी म्हटलं, "खडसे पक्ष सोडू शकत नाहीत. पहिला प्रश्न त्यांच्या सूनबाईंचा. कारण त्या भाजपच्या खासदार आहेत. भाजपच्या पाठबळामुळे मुलगी जिल्हा बँकेच्या अध्यक्षा आहेत, पत्नी जिल्हा दूधसंघाच्या अध्यक्षा आहेत."
खडसेंच्या इतर पक्षांच्या पर्यायांच्या चाचपणीचा अंदाजही तिवारी खोडून काढतात. ते म्हणतात, "खडसेंचं उपद्रवमूल्य किती आहे, हे शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना माहीत आहे."
'...म्हणून भाजपमधील ओबीसी नेत्यांमध्ये अस्वस्थता'
मग वारंवार नाराजी दर्शवून एकनाथ खडसे काय मिळवत आहेत, हा प्रश्न उपस्थित होतो. तर या सर्व गोष्टींना दबावाचं राजकारण म्हणतात.
पंकजा मुंडे, एकनाथ खडसे, प्रकाश मेहता, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे हे सर्व नेते पक्षाअंतर्गत दबाव निर्माण करत असल्याचं श्रीमंत माने म्हणतात.

फोटो स्रोत, Getty Images
महाराष्ट्रात राज्य करायचं असल्यास मराठा नेते सोबत असल्याशिवाय पर्याय नाही, हे भाजपला पटल्यानंतर त्यांनी इतर पक्षातून मराठा नेते घेतेल्याचं निरीक्षण नोंदवत श्रीमंत माने यांनी म्हटलं, "भाजपच्या राज्य नेतृत्त्वाची मराठ्यांशी जवळीक वाढल्यानंतर भाजपमधील ओबीसी नेत्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झालीये."
राज्य भाजपमध्ये आपली प्रतिष्ठा राखण्यासाठी आणि पक्षाअंतर्गत निर्णय प्रक्रिया सामूहिक नेतृत्वाकडे नेण्यासाठी खडसेंसह इतर नाराज नेत्यांचे प्रयत्न दिसतात, असंही श्रीमंत माने म्हणतात.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








