एकनाथ खडसेः "वारंवार अन्याय होत राहिल्यास वेगळा विचार करावा लागेल"

फोटो स्रोत, Eknathrao Khadse/facebook
"पक्षातल्या काही व्यक्तींकडून जाणीवपूर्वक माझा अपमान केला जातोय," असं वक्तव्य भाजप नेते एकनाथ खडसे यांनी माध्यमांशी बोलताना केलं आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशी झालेल्या भेटीनंतर खडसे पत्रकारांशी बोलत होते.
"विधानसभा निवडणुकीत उत्तर महाराष्ट्रात भाजपच्या उमेदवारांच्या पराभवासाठी कारणीभूत ठरलेल्या पक्षातील नेत्यांचे पुरावे सादर केले आहेत," असं त्यांनी म्हटलं आहे.
"मला निर्णय प्रक्रियेतून बाहेर ठेवलं जात आहे. मी पक्ष सोडणार नाही. माझ्यावर वारंवार अन्याय होत राहिला, तर मला वेगळा विचार करावा लागेल," असंही त्यांनी म्हटलंय.
यापूर्वीही खडसे यांनी पंकजा मुंडेंच्या भेटीनंतर याबाबत वक्तव्य केलं होतं.
ते म्हणाले होते, "पक्षातल्याच लोकांमुळे रोहिणी खडसे आणि पंकजा मुंडे यांचा पराभव झाला. चर्चेअंती माझं आणि पंकजाचं एकमत झालं, की काही प्रमाणात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या परळी आणि मुक्ताईनगरच्या जागा पाडण्यासाठी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून प्रयत्न झाला. बहुजन समाज आणि ओबीसींचं नेतृत्व करणारे नेते दुर्दैवानं हारले, काहींना तिकीटं नाकारली. नीट रचना झाली असती तर 105 पेक्षा जास्त आमदार आले असते."
"पक्षातूनच जागा पाडण्याचा प्रयत्न झाला, असं एकनाथ खडसे यांना वाटत असेल तर त्यांनी पक्षाच्या अनुशासन समितीकडे तक्रार करावी," असं मत भाजप नेते आणि माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केलं होतं.
बीबीसी मराठीशी बोलताना त्यांनी म्हटलं होतं, "अशा प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी पक्षात अनुशासन समिती असते. पंकजा मुंडे आणि रोहिणी खडसे यांना पक्षातल्या लोकांकडून पाडण्याचा प्रयत्न झाला असल्यास त्यावर कारवाई व्हायलाच हवी. पण, एकनाथ खडसे यांना असं वाटत असेल, तर त्यांनी त्यासंदर्भातील माहिती पक्षाच्या अनुशासन समितीकडे द्यायला हवी. खडसे यांचे आरोप सिद्ध झाल्यास संबंधितांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात येईल."
मुंडे-खडसे एकत्र?
एकनाथ खडसेंनी हे वक्तव्य केलं त्याच्या आदल्यादिवशी पंकजा मुंडेंनी पत्रकारांशी बोलताना म्हटलं, की "मला आत्मचिंतनासाठी वेळ हवा आहे. मी दरवर्षी 12 डिसेंबरला गोपीनाथ गडावर मोठा कार्यक्रम घेत असते. माझ्या फेसबुक पोस्टची सर्व मीडियानं योग्य बातमी दिली. पण काही वर्तमानपत्रांनी मी पक्ष सोडणार अशा बातम्या दिल्या. त्यामुळे या चर्चेला वेगळा सूर मिळाला. मी यामुळे दुःखी आहे, व्यथित आहे. माझ्यावर असा आरोप केला जात आहे, की मी कुठल्या पदासाठी असं करत आहे. पण उलट आता मला कुठलं पद मिळू नये म्हणून हे सगळं सुरू आहे का," असा सवाल पंकजा मुंडे यांनी मीडियाला उद्देशून उपस्थित केला.

फोटो स्रोत, Getty Images
पंकजा मुंडे यांची फेसबुक पोस्ट आणि त्यानंतर एकनाथ खडसेंनी त्यांची घेतलेली भेट, यामुळे बऱ्याच राजकीय तर्क-विर्तकांना सुरुवात झाली आहे. पंकजा मुंडे भाजप सोडतील किंवा एकनाथ खडसे-पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वात भाजपमध्ये बहुजन समाजाची दुसरी फळी उभी राहील, अशी चर्चा सुरु आहे.
'भाजपसाठी कसोटीचा काळ'
पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे यांच्या वक्त्यांमुळे आता भाजपमधील पक्षांतर्गत विरोध वाढणार असून येणारा काळ पक्षासाठी कसोटीचा असणार आहे, असं मत ज्येष्ठ पत्रकार संजय जोग मांडतात.
त्यांनी म्हटलं, "भाजपच्या विस्तारासाठी वर्षानुवर्षे प्रयत्न केलेल्या नेत्यांना या निवडणुकीत तिकीटं नाकारण्यात आली. यामध्ये ओबीसी नेते एकनाथ खडसे, मराठा नेते विनोद तावडे, प्रकाश मेहता यांचा समावेश होतो. त्यामुळे आता पक्षांतर्गत विरोध बाहेर यायला लागला आहे. विधानसभा निवडणुकीत जवळपास 65 बंडखोर निवडणुकीच्या रिंगणात होते. हे सगळे प्रामुख्यानं भाजप आणि शिवसेनेतील होते. या सगळ्यांना सामावून घेण्याचा नेतृत्वानं म्हणजेच देवेंद्र फडणवीसांनी काय प्रयत्न केला, हा एकनाथ खडसे यांचा प्रश्न आहे."

फोटो स्रोत, Getty Images
पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे यांचं एकत्र येणं देवेंद्र फडणवीसांसाठी डोकेदुखी ठरू शकतं का, याविषयी जोग सांगतात, "पंकजा मुंडेंचा पराभव झाला आणि आता त्यांनी केलेल्या पोस्टमुळे ओबीसी नेतृत्वावर अन्याय झाला का, हा प्रश्न उपस्थित होत आहे. पण हा प्रश्न वारंवार उपस्थित झाला आणि तो निदर्शनास आणूनही स्थानिक नेतृत्व त्यावर शांत राहिलं. त्यामुळे आता पक्षविस्तारासाठी काम करणारे, पण वारंवार डावलेले गेलेले भाजपचे नेते आवाज उठवत आहे. त्यामुळे येणारा काळ भाजपसाठी कसोटीचा असणार आहे. आताच हा प्रश्न न सोडवल्यास येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला त्याचा फटका बसू शकतो."
असंतुष्टांचा गट प्रभावी ठरेल?
देवेंद्र फडणवीसांनी अपयशाची जबाबदारी स्वीकारून चिंतन करावं, अशी खडसेंची भूमिका असल्याचं मत ज्येष्ठ पत्रकार सुधीर सूर्यवंशी मांडतात.
त्यांनी म्हटलं, "इतके दिवस देवेंद्र फडणवीस एकहाती कारभार हाकत होते. त्यात त्यांना यश येत होतं. पण आता अपयश आल्यामुळे पक्षांतर्गत कुरबुरी वाढायला लागल्या आहेत. 2014 मध्ये भाजप आणि शिवसेना या पक्षांनी वेगवेगळी निवडणूक लढवली होती, तरीही भाजपच्या 122 जागा निवडून आल्या होत्या. यंदाच्या निवडणुकीत सगळी साधनं हाताशी असतानाही भाजपला केवळ 105 जागा मिळाल्या. त्यामुळे यशाची जशी जबाबदारी स्वीकारता तशीच अपयशाचीही जबाबदारी स्वीकारा आणि अपयशाचं चिंतन करा, असं खडसेंना वाटतं."

फोटो स्रोत, Getty Images
"पंकजा मुंडे भाजपमधून बाहेर पडणार नाहीत. पक्षात राहूनच संघर्ष करण्याची त्यांची योजना असेल. पण, आता भाजपमधील असंतुष्टांचा गट एकत्र यायचा प्रयत्न करेल. हा गट मोठ्या प्रमाणावर सक्रिय होईल आणि वरच्या पातळीवरील त्यांचं नेतृत्व ऐकावं लागेल," असं सूर्यवंशी पुढे सांगतात.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








